Login

जेन-झी

जेन-झी म्हणजे बिघडलेली पिढी, उद्धटपणाचा कळस, स्त्रीदाक्षिण्य म्हणजे काय न जाणणारी, वयस्कांचा अनादर करणारी मुलं-मुली... ही आणि अशी बरीच वाक्ये ऐकायला येतात. अहिल्याचेही असेच मत आहे, का ते कळेलच या बस प्रवासातून...
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(लघुकथा)

शीर्षक : जेन-झी

दररोजप्रमाणे आजही नैतिक एस.टी.ने प्रवास करत होता. आज जरा उशीरच झाला त्याला पण सुदैवाने बसून प्रवास होईल अशी सोय झाली, अर्थात योगायोगाने एक सीट रिकामी होती; म्हणून वेगळाच आनंद पसरला त्याच्या चेहऱ्यावर! तो लगेच त्या सीटवर बसला.

घड्याळाचा काटा बघत आणि अधूनमधून खिडकीबाहेरील दृश्य पाहत प्रवास सुरू होता. तेवढ्यात काही क्षणांसाठी बस थांबली आणि नेहमीप्रमाणे काही प्रवासी आत आले. गर्दी बरीच असल्याने बरेच लोक आधार घेत उभे होते. तेवढ्यात नैतिकच्या सीटजवळ साधारण पन्नाशी पार केलेली वयोवृद्ध स्त्री—अहिल्या उभी ठाकली.

नैतिकने सहज म्हणून पाहिले, अहिल्यानेही पाहिले आणि ती नैतिककडे पाहून मंद हसली. नैतिकनेही हसूनच प्रतिक्रिया दिली आणि तसाच बसून खिडकीबाहेर बघू लागला. थोड्या वेळाने परत अहिल्याने नैतिककडे पाहून मंद स्मित केले. त्यानेही काही न बोलता मंद स्मित केले व परत खिडकीबाहेर पाहू लागला आणि आता अहिल्याच्या चेहऱ्यावर मात्र वैतागलेले हावभाव तरळले. तिसऱ्यांदा त्याचे लक्ष अहिल्याकडे गेले. यावेळी तो पुढाकार घेत मंद हसला; पण तिने नाक मुरडले. त्याने खांदे उडवून दुर्लक्ष केले आणि त्याची प्रतिक्रिया पाहून तिचा पारा विनाकारणच चढला.

ती तिच्या कपाळावर आलेला घाम पुसतच म्हणाली, "अरे मेल्या हसतोस काय? उठ त्या सीटवरून आणि मला बसू दे. ती सीट तुला तुझ्या सासऱ्याने आंदणात दिली असावी, असा बसून आहेस तू तिच्यावर..."

उष्ण वातावरण त्यात गर्दी यामुळे अहिल्याची चिडचिड होत असेल, हे लगेच ओळखले त्याने म्हणून शांतपणेच तो म्हणाला, "सॉरी काकू पण आज मी तुम्हाला माझी सीट नाही देऊ शकत."

"ही आजकालची मुलं म्हणजे ना... काय म्हणावं तुझ्यासारख्या मुलांना? म्हातारी मी आहे की तू? गुडघे दुखतात माझे... निदान माझं वय पाहून तरी तू उठायला हवं, तर वर तोंड करून माझ्याशी हुज्जत घालून म्हणतोय की मी सीट नाही देणार... जरा म्हणून लाज नाही ना!" अहिल्या बरसलीच त्याच्यावर.

तिचा आवाज एवढा चढला होता की शेवटच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांपासून ते पुढे बसलेल्या कंडक्टरपर्यंत सगळ्यांनाच ते ऐकू गेले आणि ते सगळेच नैतिककडे खाऊ की गिळू नजरेने पाहू लागले. नैतिकने एक कटाक्ष सगळ्यांकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवून तिथेच बसून राहिला; कारण सध्यातरी त्याला तो प्रवास करताना ना चिडचिड करायची होती, ना वाद घालायचा होता, म्हणून त्याने शांत राहणेच निवडले.

"बघा, एवढं बोलूनही ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. बेशिस्त कुठला..." अहिल्या आणखी मोठ्या आवाजात त्याचा उद्धार करू लागली. कदाचित लोकांचे लक्ष वळवू पाहत होती ती आणि झालेही तसेच!

"काही नाही हो, जेन-झी आहे ना... उद्धट तर असणारच!" अहिल्याला दुजोरा देत बसमधील काही प्रौढ प्रवासी म्हणाले.

"खरं बोललात! यांच्या पिढीला जरा म्हणून स्त्रीदाक्षिण्य नाही." अहिल्या रागातच म्हणाली आणि पुढेही प्रत्येक शब्दातून त्याचा बराच उद्धार केला. त्याला त्याच्या पिढीबद्दल बरेच काही बोलली आणि अंततः नैतिकचा संयम गळून पडला.

"काय आजकालची मुलं काकू? ऐकून घेतोय म्हणून काहीही बोलाल का? आणि जेन-झी, काय जेन-झी? प्रत्येक जेन-झी मुलं-मुली उद्धट असतात हे ठरवणारे तुम्ही कोण?" नैतिक आता सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकून त्याच्याशी विनाकारण वाद घालणाऱ्या अहिल्याकडे त्याची तीक्ष्ण नजर रोखून बघत म्हणाला.

"आम्ही नाही तूच ठरवतोय स्वतःला उद्धट! बोलण्यातूनही आणि कृतीतूनही..." एक म्हातारी स्त्री वाकडे तोंड करत त्याला म्हणाली.

"बघा ना... उद्धटपणा तर पाहा ह्याचा... किती जीभ चुरुचुरु चालतेय! वाद घालण्यात तर किती पटाईत!" अहिल्या काही आपला हेका सोडत नव्हती. लगेच स्वतःची बाजू मांडत होती.

"वाद मी नाही, तुम्ही घालत आहात आणि काय उद्धटपणा केला मी? काकू, स्पष्टवक्तेपणा आणि उद्धटपणा यात सूक्ष्म अंतर असतं, याची कल्पना मलाही आहे आणि ते अंतर मी योग्य पद्धतीने पाळतोय. याउलट तुम्हीच अद्वातद्वा बोलत आहात मला आणि मी कधीपासून गप्प बसून ऐकतोय, तुम्ही शांत व्हाल या अपेक्षेने; पण तुम्ही आहात की विषयाचा चोथा करून टाकलात अगदी..." स्वतःचा राग शांत ठेवून पण तितक्याच आवेगाने नैतिक त्याचे मुद्दे मांडत होता.

"मी विषयाचा चोथा करतेय तर तूसुद्धा एवढं ऐकून घेण्यापेक्षा, माझ्याशी हुज्जत घालण्यापेक्षा पाषाणासारखा का बसून आहेस? उठ अन् दे ना सीट मला..." अहिल्या अजूनही तिच्या मुद्द्यावर ठाम होती.

"का देऊ? मी नाही देऊ शकत. मला द्यायची नाही. मी फुकट प्रवास करत नाही. तिकीट मीही काढलंय. दमून-भागून प्रवास मीही करतोय. तुम्हाला जसं आरामशीर प्रवास करता यावा असं वाटतं, तसंच मलाही वाटतं. मी माझी सीट द्यायला कोणालाही बांधील नाही; कारण जेवढा तुमचा या सीटवर अधिकार आहे, तेवढाच माझाही आहे आणि आता तर स्पष्टच बोलतो. काय हो काकू, गेल्या सहा महिन्यांपासून मी तुम्हाला बसायला माझी सीट देतोय कोणताही स्वार्थ न बाळगता; पण आज काही खाजगी कारणामुळे नाही दिली सीट तर सरळ उद्धट म्हणाल?" तो नजर रोखत म्हणाला आणि आता सगळे प्रवासी त्याच्याकडे हरखून बघू लागले.

अहिल्या काही क्षण वरमली होती; पण लगेच फणकाऱ्यात बोलू लागली, "हो मान्य, देतोस तू सीट मला रोज, मग आज तरी का नाही दिलीस? मीही तुझ्या याच सवयीने तुझ्याकडे पाहून मंद हसते ना... आजही त्याच हेतूने तुझ्या सीटजवळ आले, वाटले देशील तू नेहमीप्रमाणे सीट; पण नाही! आज चक्क तसाच बसून राहिलास. तू मला घरंदाज आणि सुसंस्कृत वाटलेलास; पण शेवटी खोटा मुखवटा गळून पडला तुझा. तू आजच्या जेन-झी पिढीचाच, आणखी काय वेगळं करणार! तुमच्या पिढीकडे अपेक्षा करून मीच चुकले..." अहिल्या आता त्याच्याकडे तुच्छपणे पाहत म्हणाली.

"लागलंय माझ्या पायाला, काल अपघात झाला माझा. जखम फार गंभीर नसली तरी सूज आहे पायावर. तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नाही काहीच कारण ही माझ्यासाठी खाजगी बाब आहे. मी त्याविषयी तुम्हाला सांगावं, एवढी ओळख नाही आपली. रोज तुम्ही बसमध्ये आल्या की मी हसून माझी सीट तुम्हाला बसायला देतो, एवढीच काय ती ओळख आपली... साधी नावे नाही माहिती आपल्याला एकमेकांची म्हणून मी काही माझ्या अपघाताविषयी तुम्हाला बोललो नाही, मात्र शांतपणेच मी सीट द्यायला नकार दिला. मलाही वाटलेलं की एका दिवसाचा तर प्रश्न आहे, तुम्ही मला समजून घ्याल; पण तुम्ही तरी माझी बाजू समजून घेतली का? आणि मला हौस नाहीच कारणं देण्याची... एवढं प्रकरण चिघळत असूनही मी सगळं ऐकत राहिलो नसतो. मला अक्षरशः चालायलाही त्रास होतोय म्हणून आज उठलो नाही आणि दिली नाही सीट तर दुसरीकडे तुम्ही सरळ लाज काढलीत माझी..." आता नैतिक संतापत बोलत होता. हळूहळू सगळ्या प्रवाशांना त्याची बाजू कळत होती. सगळे शांतपणे ऐकत होते.

"मुळात कोणत्या हक्काने बोलत आहात हो तुम्ही मला? ही सीट स्त्रियांसाठी राखीव नाही. ज्या ज्या सीट्स राखीव आहेत स्त्रियांसाठी त्यावर काही स्त्रिया आणि पुरुष बसलेले आहेत. तुम्ही त्या राखीव सीट्सवर बसलेल्या त्या इतर पुरुषांना एक अक्षर बोलल्या नाहीत पण मला एवढं ऐकवत आहात... म्हणजे सिरियसली? आणि प्रत्येक बाबतीत पिढीचे गाऱ्हाणे का गाता? यांची पिढी अशी, यांची पिढी तशी म्हणून... प्रत्येक जेन-झी मुलगा किंवा मुलगी तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे असेलच असे नाही आणि मी तर मुळीच नाही. सगळ्यांना एका मापात मोजणे बंद करा प्लीज... आहे मी जेन झी पण स्त्रीदाक्षिण्य मलाही कळतं म्हणून आजपर्यंत मी तुम्हाला दररोज माझी सीट देत आलोय; पण आज मला त्रास असह्य झाला आणि राहिलो बसून, त्याचा तुम्ही इतका बाऊ कराल? इतके दिवस, इतके महिने तुम्हाला मदत केली, ते सहज विसरलात; पण आज मी सीट द्यायला नकार दिला तर हे प्रतिफळ? तुमच्या या वागण्याला मी कृतघ्नपणा म्हणावा का?" धुसफूस करतच नैतिक मनातील भडास व्यक्त करून शेवटी शांत झाला.

बसमध्ये बसलेल्या सर्वच प्रवाशांना आता नैतिकची बाजू कळली होती आणि त्याच्या प्रती त्यांना सहानुभूती वाटत होती. तसेच अहिल्यालाही तिची चूक लक्षात आली. तिला स्वतःचीच लाज वाटली व स्वतःच्या तापट आणि हेकेखोर स्वभावाचा रागही आला.

"सॉरी बाळा, तू नेहमी मला सीट द्यायचास म्हणून मी तुला गृहीत धरले. आज तू सीट दिली नाहीस तर वाटले तू आजपर्यंत सुसंस्कृत असण्याचा दिखावा करत होतास म्हणून मी नको नको ते बोलून बसले तुला; पण तू काही कारणास्तव नकार दिला असशील, असा विचार केलाच नाही. माफ कर मला." अहिल्याने लगेच चूक कबूल करून दिलगिरी व्यक्त केली.

"काही हरकत नाही काकू." त्याने उदार मनाने माफ केले व म्हणाला, "घ्या काकू बसा या सीटवर."

"नाही, नको. बस तू. मला खरंच माहिती नव्हतं तुझ्या जखमेबद्दल म्हणून तशी रिॲक्ट झालेले..." अहिल्या लगेच नकार देत म्हणाली.

"अहो काकू आपल्या वाद-विवादात तुम्हाला प्रवास कळला नसेल पण स्टॉप आलाय माझा, उतरतोय मी बसमधून आता म्हणून तुम्हाला बसा म्हणतोय इथे." तो हसतच म्हणाला. त्यावर अहिल्या ओशाळून हसली. इतर प्रवासीही खळखळून हसले.

तो बसमधून सावकाश खाली उतरला. काही वेळातच ती बस तिच्या मार्गाने गेली आणि तो त्या बसच्या धूसर प्रतिकृतीकडे पाहत म्हणाला, 'एस.टी.ने अनेकदा प्रवास केला, अनेक अनुभव आले; पण कधी वाद होईल वाटलं नव्हतं. असो... हा अनुभवही आला.' हसतच बोलून तोसुद्धा त्याच्या मार्गाने निघून गेला.

समाप्त.
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
0