Login

घडा भरला- 1

मराठी कथा
"देवाने इतकी शिक्षा केली तरी अजून अक्कल आली नाही का तुला? उठ, उचल ते ताट आणि आत नेऊन ठेव.."

शारदा आपल्या नवऱ्याला सासूसमोर ओरडली आणि संकेतने रागारागात ताट आत नेऊन ठेवलं.

(1 वर्षापूर्वी)

"माझं घड्याळ, रुमाल आणि डबा दे लवकर..मला ऑफिसला निघायचं आहे.."

तापाने फणफणलेली शारदा तशीच उठली आणि कामाला लागली. किचनमध्ये जात असताना सासूबाई तिच्या थकलेल्या आणि आजारी चेहऱ्याकडे बघत होत्या तरी मदतीला आल्या नाहीत. शारदाला वाईट वाटलं नाही, कारण सासूबाईंना तिने चांगलंच ओळखलं होतं, त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्याच.. पण नवऱ्यानेही समजून घेऊ नये?

वेळ कमी होता, तिने पटकन तीन बटाटे कापले आणि साधीच फोडणी दिली. डबा पाहिल्यावर संकेत ओरडला,

"हे काय, बटाटा? नाही न्यायचा मला डबा.."

संकेतने त्याचे नखरे सुरू केले..

"अहो मला बरं नाही ओ, आजच्या दिवस..."

संकेत काहीही न ऐकता डबा तसाच ठेऊन निघून गेला. सासूबाईंनी पाहिलं आणि तिला येऊन बोलू लागल्या,

"एवढंसं काही दुखलं तर लगेच आळस बाईला..नवरा बिना डब्याचा गेला त्याचं काहीच कसं वाटत नाही तुला?"

आधीच त्रस्त असलेल्या शारदाला अजूनच रडू आलं, डोकं जड झालं. कशीबशी तिने बाकीची कामं उरकली. संध्याकाळी संकेत कामावरून आला तरी तोंडावर राग तसाच होता. शारदा तिचं आजारपण विसरून त्याच्या मागे मागे करू लागली.

"अहो, आज काय बनवू? तुम्हाला आवडेल ते बनवते."

"काही गरज नाही, मी खाऊन आलोय..."

हे ऐकून शारदाला वाईट वाटलं. सासूबाई म्हणाल्या,

"दिवसभर घरातच असते, काही काम नसतं.. नवऱ्याचं दोन वेळचं जेवणही जमत नाही हिला.."

"माझे इस्त्रीचे कपडे आणले का?"

"नाही...ते.."

"घ्या, हे ही काम नाही केलं म्हणजे...काय करतेस तू दिवसभर घरात? जा आता माझे शूज आहेत बाहेर, नीट पुसून पॉलिश करून दे..उद्या मिटिंग आहे..आणि माझं मोबाईलचं चार्जर आण.."

"तुम्ही ऑफिसला नेलं होतं ना.."

चार्जर ऑफिसला विसरलो हे संकेतच्या लक्षात आलं आणि त्याने डोक्याला हात लावला, तोच सासूबाई म्हणाल्या,

"अशी डोक्याला ताप देणारी बाई असली तर माणसाचं डोकं ठिकाणावर राहत नाही...बिचारा संकेत, काय पदरात येऊन पडलं त्याच्या काय माहित.."

"तुला अक्कल नावाचा प्रकार आहे का गं? सकाळी जाताना चार्जर बॅगेत ठेवलं ते दिसलं तुला, मग सांगता नाही आलं की नेऊ नका म्हणून??"

"अहो मला वाटलं तुम्हाला न्यायचं असेल..."

"तू डोकं चालवतच जाऊ नकोस..."

"माझा मुलगा कमवून आणतो म्हणून खायला मिळतं तुला लक्षात ठेव, तू घरात फक्त झोपा काढतेस..तो पैसे आणतो म्हणून आपण जगतोय.."

हे झालं एक दिवसाचं, रोज असे कितीतरी प्रसंग घडायचे आणि पदोपदी शारदाचा अपमान व्हायचा. पण थांबा, शारदा काही लेचीपेची नव्हती, हे सगळं तिने मनात साठवून ठेवलं..एखाद्या क्षणी सगळा बदला घ्यायला..

एके दिवशी संकेत त्याच्या मित्रांसोबत पार्टीला गेला, शारदाला न सांगता. रात्रीचे 3 वाजले तरी पत्ता नाही. शारदाने काळजीने फोन केला पण फोनही बंद. रात्रभर जागलेल्या तिने सकाळी सासूबाईंना सांगितलं..

"तूच...तूच काहीतरी बोलली असणार त्याला म्हणून रागारागाने निघून गेला तो"

तेवढ्यात दारात पोलीस आणि संकेत दिसले, संकेतचे कपडे फाटलेले, मळकट आणि चेहरा गुंगी आल्यासारखा. पोलीस म्हणाले,

"घ्या तुमच्या नवऱ्याला घरात...रात्री दारू पिऊन गाडी चालवत असताना गाडीवरून पडला, रस्त्याच्या कडेला पडून होता रात्रभर.. गर्दी जमली होती, आम्ही गेलो आणि कार्डवर पत्ता बघून आणून सोडलं याला..."

शारदासाठी आता सहनशक्तीचा हा शेवटचा पडाव होता. तिने हातातल्या बांगड्या मागे ओढल्या आणि.....

क्रमशः
0

🎭 Series Post

View all