Login

घर की मुर्गी भाग १

Ghar Ki Murgi Dal Barabar
घर की मुर्गी भाग १

©® सौ.हेमा पाटील.


आजच्या आपल्या या कथेचा नायक आहे मोहन देशमुख...जो सरकारी ऑफिसात क्लार्क आहे.
आणि नायिका आहे त्याची बायको जया... एकदम साधीसुधी, पण समजूतदार गृहिणी.

दोघांचा संसार तसा बघायला गेले तर चारचौघांसारखा व्यवस्थित चालू आहे. जया आपल्या संसारात खुश आहे. आपल्या कुटुंबासाठी कष्ट करण्यात तिला समाधान मिळते. रोज सर्वांसाठी नाश्ता, रुचकर व पौष्टिक जेवण बनवणे, घरातील इतर कामे करणे, सर्वांची काळजी घेणे याकडे ती बारकाईने लक्ष देते.

मोहनला मात्र रोजचे ऑफीस, जेवण, रुटीन आयुष्य यांचा कंटाळा आला आहे. काय यार रोज रोज तेच...सकाळी लवकर उठा, आंघोळ उरकून नाश्ता करा आणि डबा उचलून ऑफीसला जा. शनिवारी रविवारी जरी सुट्टी असली तरी आठवड्याची कामे असतात. बायकोला किराणामाल आणून द्या, मुलांचे काही ना काही असतेच. काय हे आयुष्य आहे.... मरेपर्यंत खर्डेघाशी करतच जगणार आपण! यातूनच त्याच्या तक्रारी वाढू लागल्या. आता आपण त्यांच्या घरात डोकावून पाहूया...तिथे नेमके काय चाललेय ते!

सकाळचा गोंधळ

सकाळी आठ वाजता घरात नेहमीप्रमाणे आरडाओरडा सुरु होता.
जया स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होती, आणि मोहन बाथरूममधून ओरडत होता.

"जया! माझा टॉवेल कुठं गेलाय? रोज रोज काय जागा बदलतेस गं?"

"टॉवेल तिथंच नेहमीच्या जागेवर आहे कपाटात, पण तुम्ही ते बघणार तर दिसेल ना? जणू काही मी मुद्दाम लपवते! मला थोडीच हौस आली आहे सकाळी सकाळी तुमचे दोन शब्द ऐकून घेण्याची."

मोहन रागारागाने बाहेर आला. केस विस्कटलेले होते. तोंडात टुथब्रश होता.

"बघ गं, रोजचा हा त्रास नको. चल मला दाखव कुठे ठेवला आहेस टाॅवेल ! जर आज टाॅवेल कपाटात जागेवर सापडला तर आईशप्पथ, आजनंतर कधीच तुला टाॅवेल मागणार नाही. मग मला ओलेत्याने कपडे अंगावर चढवावे लागले तरी चालेल."

"बघा बरं! बोलून फसाल." जया म्हणाली.

"नाही नाही, चलच तू बेडरुममध्ये." मोहन म्हणाला.

जयाने गॅस कमी केला आणि ती मोहनच्या पाठोपाठ बेडरुममध्ये शिरली. तिने मोहनच्या कपाटाच्या मधल्या कप्प्यात हात घातला आणि एका मिनिटाच्या आत व्यवस्थित घडी घातलेला टाॅवेल त्याच्यासमोर धरला. ती टाॅवेलची घडी पाहून मोहन म्हणाला,
" शक्यच नाही, मी सगळे कपाट शोधले होते, मला सापडला नाही आणि आता तू कुठून काढलास?"

"वा वा! आत्ता तुमच्या समोरच या कप्प्यातून काढला ना? धन्य आहात." जया म्हणाली. तरीही मोहनचा यावर विश्वास बसत नव्हता की तो टाॅवेल तिथेच होता. पुढे बोलण्यात अर्थ नव्हता त्यामुळे मोहन बाथरुमकडे वळला व जया किचनकडे...


आंघोळ करून आल्यावर मोहन डायनिंग टेबलापाशी बसला. तिने उपम्याची डिश आणून दिली.

"काय हे रोजरोज पोहे, उपमा, शिरा अन् इडली. कंटाळा आला यार... कधीतरी काही वेगळे बनवत जा." जयाने यावर काहीही उत्तर दिले नाही.

मोहनने टेबलावर ठेवलेला डबा उघडला. आत भेंडीची भाजी आणि पोळ्या होत्या. सोबत जवसाची की तिळाची कसलीतरी चटणी होती.

मोहन नाक मुरडत म्हणाला,
" डब्याला हेच रोज? भेंडी, डाळ–भात, पोळी, चटणी...कधी तरी काही वेगळे बनवत जा. कंटाळा आला रोज रोज तेच खाऊन."

"रोज? आज भेंडीची भाजी वीस दिवसांनंतर बनवलीय, तरीही रोज म्हणताय? आणि काल तुमच्या आवडीची भाजी दिली होती ना दोडक्याचा कीस..."

"अगं बाई, दोडका आणि भेंडी याच्या पलिकडे ही काही पदार्थ असतात.
कधीतरी छोले भटुरे बनवून देत जा. कधी पास्ता, पिझ्झा पण बदल म्हणून बनवत जा. तुझ्या या भाज्यांमुळे ऑफीसमध्ये मला डबा उघडायची लाज वाटते. काय एकेक डबे असतात लोकांचे! उघडले की नुसता घमघमाट सुटतो." मोहन करवादला.


"साधे जेवण आरोग्यासाठी चांगले असते. मी रोज भेंडी करते असं नाही. कधी मी सोबत दही देते कधी मसाला ताक. कधी खरविस देते तर कधी डिंकाचा लाडू. माझ्यासारखी मेथीची मोड आणून केलेली उसळ कुणीही आणत नसणार याची मला खात्री आहे. पण तुम्हांलाच यांची चव कळत नाही! ते पास्ता आणि पिझ्झा खाण्यापेक्षा पौष्टिक खाणे कधीही चांगले. आपले आरोग्य उत्तम रहाते त्याने." जया म्हणाली.

मोहन म्हणाला,

"अगं, आमच्या ऑफिसातल्या सहकाऱ्यांच्या बायका काय भारी डबे देतात. छोले–भटुरे, पनीर बटर मसाला, पास्ता, भुना मसाला आणि मी? मी खात असतो भेंडी नाही तर पचपचीत वांग्याचे भरीत!"

जयाने रागाने पोळी उलटली.

जया म्हणाली ,
" हो का? मग एक काम करा. त्या सहकाऱ्यांच्या बायकांनाच सांगा, तुमच्यासाठी पण असा रंगेबिरंगी टिफिन भरून द्या म्हणून. म्हणजे मी या डब्याच्या कटकटीतून मोकळी होऊन जाईन."

मोहनने मिश्कीलपणे डोळे मिचकावले.

मोहन म्हणाला,
"हं, खरं सांगायचं तर तू माझा डबा बनवला नाहीस तर मला अजिबात वाईट वाटणार नाही!"

हे ऐकून जया रागावली. हातातले लाटणे तिने किचनकट्ट्यावर आपटले.

"मोहन, माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नका बरं का!" हे ऐकून मोहनने मुकाट्याने डबा उचलला आणि ऑफीसचा रस्ता धरला.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होते पुढे? जया खरंच डबा देणे बंद करते की पास्ता, पिझ्झा, बर्गर बनवायला शिकते? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
0

🎭 Series Post

View all