Login

घर की मुर्गी भाग २

Ghar Ki Murgi Dal Barabar

घर की मुर्गी भाग २


©® सौ.हेमा पाटील.

पहिल्या भागात आपण पाहिले, मोहनला आपल्या पत्नीच्या हातच्या जेवणाचा कंटाळा आला आहे. तिने चमचमीत पदार्थ बनवावेत असे त्याला वाटत असते. आता पुढे....


ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सगळे सहकारी डबा उघडून बसले होते.

रमेश म्हणाला,

"आज माझ्या बायकोने शाही पनीर दिलेय. घे रे मोहन, थोडे पोळीसोबत."

मोहन एक घास चाखून म्हणाला,

"व्वा! खरंच खूप छान चव आहे. माझ्याकडे बघा… भेंडीची भाजी आहे.!"

सगळे हसले. रमेश म्हणाला,

"मला आवडते वहिनींच्या हातची भेंडी. दे मला."

तेवढ्यात त्यांची एक सहकारी प्रेरणा आपला डबा घेऊन आली. तिच्या डब्यात पास्ता होता.

प्रेरणा म्हणाली ,
"मोहन सर, घ्या ना, पास्ता केला आहे मी स्वतः."

मोहनने घेतला आणि तो खुश झाला.

मोहन म्हणाला ,

"वा! काय चव आहे. तुमचा नवरा खरंच भाग्यवान आहे."

सगळे त्याला चिडवत म्हणाले ,

"मोहन, तुझ्या जयाला सांग की पास्ता शिकायला." यावर मोहनने मान हलवली.

मोहनच्या मनात सतत तुलना सुरू होती. एकीकडे नोकरी करणारी व डब्यात रोज रोज पास्ता, पिझ्झा, बर्गर आणणारी प्रेरणा अन् दुसरीकडे रोज डब्यात भाजी पोळी वा तत्सम पदार्थ देणारी त्याची बायको जया...
संध्याकाळी ऑफिस सुटायच्या वेळीही अगदी फ्रेश दिसणारी प्रेरणा आणि सकाळी गाऊन अडकवून घामेजल्या चेहऱ्याने किचनमध्ये डबा बनवणारी जया... त्यामुळे त्याला आपल्या बायकोचा अधिकच राग येत होता.


त्यादिवशी संध्याकाळी घरी आल्यावर जयाने विचारले,

"कसं झालं जेवण? माझ्या हातची चटणी आवडली का? वेगळ्या पद्धतीने केली होती."

मोहन तिरकसपणे म्हणाला,

"हं…ठीक होती, पण खरं सांगू? प्रेरणाने आणलेला पास्ता भारी होता."

"अरे देवा! म्हणजे आता रोजच्यासारखा त्या प्रेरणाबाईंचा कौतुकाध्याय सुरू झाला म्हणायचा. काय हो, मी काय रोज गवत वाढते का ताटात?"

मोहन म्हणाला ,

"अगं, तेवढं कौतुक केलं तर काय झालं? ती त्या कौतुकाला पात्र आहेच. तुला सांगतो कारण यातून तुला पण शिकता येईल."

जया रुसून म्हणाली,

"बरं बरं, कळतात हो टोमणे. उद्यापासून मी डबा बनवणेच बंद करते. तुम्ही तिकडे ऑफीसमध्येच पास्ता आणि पिझ्झा खात बसा."

ती आत निघून गेली. मोहन स्वतःशी म्हणाला,

"या बायकोला समजवायचे म्हणजे ना सगळ्यात कठीण काम आहे !"

एका रविवारी मोहन म्हणाला,
"आज मला हॉटेलमध्ये जेवायला जायची इच्छा झाली आहे. चल आवर , आपण आज नैवेद्यम मध्ये जेवायला जाऊ."

जयाने हट्टाने घरीच वेगळे काहीतरी बनवते असे सांगितले . तिने मिक्स मसाला व भाज्या घालून "झुंजार पोळी" बनवली.
मोहनने पहिलाच घास घेतला आणि तो जोरात ओरडला,

"अगं! तोंड भाजलं माझं. मिरची घातलीस की बारूद भरलायस यात?"

जया म्हणाली,
"तुम्हाला झणझणीत आवडतं ना? म्हणून ही 'झुंजार पोळी' खास तुमच्यासाठी बनवलीय!" खरंतर तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होते. प्रेरणाचे कौतुक करणाऱ्या मोहनच्या मनात जयाबद्दल अजून एक अढी निर्माण झाली.


प्रेरणा डब्याला रोज वेगवेगळे पदार्थ बनवून आणत होती, सर्वांना चाखायला देत होती. तिचे वागणे, बोलणे, व्यवस्थित रहाणे याने मोहन तिच्याकडे नकळत ओढला जात होता.

काही दिवसांनी ऑफिसातील सर्वांना प्रेरणाने आपल्या घरी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पार्टीला येण्याचे आमंत्रण दिले. सहकुटुंब या असे आवर्जून सांगितले होते. मोहनला खूप आनंद झाला. ऑफिसमध्ये इतक्या टापटीपीत रहाणाऱ्या प्रेरणाचे घरही तितकेच व्यवस्थित असेल असा मोहनचा अंदाज होता. पार्टी निमित्त तिच्याकडे आणखी छान छान पदार्थ चाखायला मिळतील याचा मोहनला आनंद झाला. जयाला घेऊन गेलो की प्रेरणाकडे पाहून तिला समजेल की, जेवण कसे बनवावे? व्यवस्थित कसे रहावे? नवऱ्याची काळजी कशी घ्यावी? आणि तिच्यात सुधारणा होईल असे स्वप्न मोहन पहात होता.

अखेर तो दिवस उजाडला. त्यादिवशी मोहन ऑफीसमधून लवकर घरी आला. जयाला त्याने तयार व्हायला सांगितले. तो स्वतः व्यवस्थित तयार झाला. जयाने आज कांजीवरम साडी नेसली होती. लांब बाह्यांचा ब्लाऊज तिला शोभून दिसत होता. गळ्यात फक्त मंगळसूत्र घातले होते व हातात सोन्याच्या दोन बांगड्या... पण तिचे सात्विक सौंदर्य खुलून दिसत होते.

घरात बनवलेला केक तिने प्रेरणासाठी घेतला होता व सोबत तीळ व जवसाची चटणी आणि मिरचीचे लोणचे. ते पाहून मोहन रागावला.

"आपण प्रदीपमधून मिठाईचा बाॅक्स घेऊन जाऊ, ते लोणची, चटण्या ठेव घरातच. अन् हा तुझा साधा केक कोण खाणार आहे तिथे? तिने चांगल्या बेकरीत केकची ऑर्डर दिली असेल."

यावर जया म्हणाली,

"मिठाई घेऊन जाऊ आपण, पण हेही सोबत असुद्या. वेळप्रसंग पाहून मी ठरवेन द्यायचे की नाही ते..."

"तू कधी ऐकले आहेस ते आता ऐकणार आहेस!" असे म्हणून मोहनने तिच्याकडे दुर्लक्ष केले.

दोघे तिथे पोहोचले तोपर्यंत ऑफीसमधील जवळपास सगळे आधीच पोहोचले होते. थोड्याफार गप्पा झाल्या. एकमेकांच्या कुटुंबांच्या ओळखी झाल्या. तेव्हा तिथे महिला मंडळाचा आपोआपच वेगळा गृप तयार झाला. त्यांच्यात चाललेले बोलणे ऐकून मोहन आश्चर्यचकित झाला.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

मोहनला का आश्चर्य वाटले? महिला मंडळाचे नेमके काय बोलणे चालू होते हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा.

0

🎭 Series Post

View all