घर की मुर्गी भाग ३
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, मोहन आणि जया पार्टीच्या ठिकाणी पोहोचले आहेत. जयाची ओळख होताच सगळ्या महिलांनी तिला जणू घेरावच घातला. हे पाहून मोहन विस्मयचकित झाला. आता पुढे...
"अय्या तुम्ही का मिसेस मोहन देशमुख? आमचे हे तुमच्या हातच्या भाजीची खूप तारीफ करत असतात नेहमी. ती कारल्याची भाजी तुम्ही कशी बनवता मला सांगा बरं. आमचे हे म्हणतात, कारले खावे तर मिसेस देशमुखांच्या हातचे." पाटलांच्या मिसेस विचारत होत्या.
"तुम्ही ती जवसाची चटणी कशी बनवता? तिला अजिबात कोरडेपणा येत नाही असे हे नेहमी सांगतात. मला सांगा ना कशी बनवायची." इति भार्गवच्या मिसेस...
"हो, आणि ती भेंडी सुद्धा तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे बनवता. मला सुद्धा शिकवाल का? नाही तर असे करुयात, तुम्ही आमचे आठवडाभर पाककलेचे क्लास घ्या. पौष्टिक व आरोग्यदायी जेवण कसे बनवायचे? चालेल?" यावर सगळ्या महिलांनी इतक्या जोरात हो म्हणून संमती दिली की तो आवाज ऐकून सर्वांच्या माना तिकडे वळल्या. जयाचे चाललेले कौतुक ऐकून मोहनला विस्मय वाटला. 'या बायका पण ना...प्रेरणाकडून धडा घ्यायचा सोडून चटणी भाजीची रेसिपी शिकण्यात यांना इंटरेस्ट आहे.'
मोहन बारकाईने प्रेरणाच्या घराचे निरीक्षण करत होता. तिचा नवरा तिला खूप मदत करत होता. आतून सगळे पदार्थ त्यानेच आणून बाहेर टेबलावर मांडले. तो अगदी साधा होता. आत्ता प्रेरणा अगदी नटूनथटून आली होती, पण तो मात्र घामेजल्या चेहऱ्याने कामे करीत होता. त्याने अजून कपडे पण बदलले नव्हते.
मोहनला आपल्यासमोर प्रेरणाचा नवरा अगदीच सामान्य वाटला. प्रेरणा मात्र त्यावेळी सतत नवऱ्याचे कौतुक करत होती. हे ऐकून मोहनला आश्चर्य वाटले.
प्रेरणा म्हणाली,
प्रेरणा म्हणाली,
"आमचे साहेब रोज मला स्वयंपाकात मदत करतात, मुलांचा अभ्यास घेतात. घरातील पसारा आवरतात. एवढेच काय मला भाजी निवडायला पण मदत करतात."
"आणि ते पिझ्झा, बर्गर, फ्रेंच रोल्स कोण बनवते?" मोहनने विचारले.
'ते बनवण्यात काय अवघड असते? पिझ्झा बेस तयार मिळतो. त्यावर क्रीम, साॅस लावून त्यावर भाज्या पसरुन ओव्हनला लावण्याचे काम आमचे साहेबच करतात. मी सकाळी लवकर उठत नाही ना...मला सवय नाही लवकर उठायची. त्यामुळे माझ्या डब्यात भाजी पोळी ऐवजी ते पदार्थ असतात."
मोहनच्या मनात विचार आला,
"मी तर घरी काहीच मदत करत नाही, उलट जयालाच रागावतो. ही प्रेरणा तर घरात काहीच काम करत नाही. घरात सुद्धा किती पसारा आहे. विशेष म्हणजे पास्ता व पिझ्झा सुद्धा ती बनवत नसून तिचे यजमान बनवतात. आपण मात्र घडोघडी जयाला प्रेरणाचे उदाहरण देऊन तिला टोचून बोलत होतो."
प्रेरणा मोहनपासून पुढे गेली व महिला मंडळाशी तिचे बोलणे सुरू झाले. एवढी फाॅरवर्ड असणारी प्रेरणा त्यांच्याशी काय बोलतेय हे ऐकण्याची उत्सुकता मोहनला शांत बसू देईना. तो हळूच त्यांच्या मागच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
प्रेरणा सगळ्यांशी अगदी आत्मीयतेने बोलत होती. जया तिला म्हणाली,
"मोहन कायम तुमची स्तुती करत असतात. तुम्ही नोकरी करत असूनही नवनवीन पदार्थ छान बनवता. तसेच किती व्यवस्थित रहाता असे ते सांगत असतात."
"अहो मिसेस देशमुख, मी जे बनवते त्याला स्कीलची गरज नसते. थोडाफार साॅस कमी जास्त झाला, अगर क्रीम इकडे तिकडे झाले तरी चवीत फारसा फरक पडत नाही. तुम्ही ज्या वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवता त्यात नैपुण्य असल्याशिवाय कुणी ते करु शकत नाही.
तुमच्या हातच्या भेंडीचीच भाजी घ्या... तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने बनवता. साधी भेंडी, मसाला भेंडी, भरली भेंडी, आलु भेंडी, मटार भेंडी, तळलेली भेंडी....आणि प्रत्येक वेळी चव अगदी वेगळी लागते. हे फक्त एका सुगरणीलाच जमू शकते आणि जिला आपल्या कुटुंबाच्या तब्येतीची काळजी आहे तीच एवढे कष्ट घेऊन बनवू शकते."
प्रेरणाने जयाचे कौतुक करण्यात कसलीच कसर सोडली नाही.
प्रेरणाने जयाचे कौतुक करण्यात कसलीच कसर सोडली नाही.
हे ऐकून जया म्हणाली,
"मोहन सांगत होते ते खरेच होते... तुम्ही खरंच ग्रेट आहात. एका बाईच्या तोंडून दुसऱ्या बाईची इतकी मनापासून स्तुती? हे सगळ्यांनाच जमत नाही."
प्रेरणा म्हणाली,
"मी फक्त सत्य काय आहे ते सांगितले." याला बाकीच्या महिला मंडळानेही अनुमोदन दिले.
जया म्हणाली,
"मी तुमच्यासाठी घरात खास मावा केक बनवला आहे. तुम्हांला आवडणार असेल तर देऊ का?"
"नेकी और पूछ पूछ? द्या द्या लवकर. तुमच्या हातचा आहे म्हणजे खासच असणार." प्रेरणा म्हणाली.
जयाने केक, लोणचे, चटण्या सगळे काढून जवळच्या टेबलावर ठेवले. ते पाहून प्रेरणाला खूप आनंद झाला. तिने आपल्या नवऱ्याला हाक मारली.
"या बघा मिसेस देशमुख. आमच्या ऑफीसमध्ये देशमुख सर आहेत ना, त्यांच्या मिसेस."
"अच्छा! त्याच ना, ज्यांच्या हातच्या भाज्यांची तू नेहमी तारीफ करत असतेस." प्रेरणाचे यजमान म्हणाले.
हे ऐकल्यावर मोहन तर चकीतच झाला.
प्रेरणाच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती, पण भाव मात्र जया खाऊन गेली. तिच्याभोवती सगळ्यांची गर्दी जमली होती. मोहनकडे मात्र कुणाचेच लक्ष नव्हते.
त्या रात्री पार्टी संपल्यानंतर ते दोघे घरी आले तर जया थकलेली असूनही त्याच्या सकाळच्या डब्याची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेली. त्याची झोप लागेपर्यंत ती बेडरुममध्ये आली नव्हती.
सकाळी जेव्हा मोहनला जाग आली तेव्हा शेजारी जया नव्हती. तो किचनमध्ये डोकावला. जया वाटल्या डाळीला फोडणी देत होती.
तो शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला.
जयाचे त्याच्याकडे लक्ष गेले तेव्हा ती म्हणाली,
"काय पहाताय एवढे? तुम्हांला आवडते ना, म्हणून रात्री भिजवली होती डाळ. रात्री तिथे तुम्ही व्यवस्थित जेवला नाही हे लक्षात आले होते माझ्या. आज तुमच्या आवडीचा नाश्ता बनवलाय."
"काय बनवलेय?"
"पास्ता..." असे म्हणून जया खळखळून हसली.
"तू आणि पास्ता?" असे मोहनने विचारले तसे जयाने शेवयांच्या उपम्याची डिश त्याच्या समोर धरली. ते पाहून तोही हसला.
मोहन म्हणाला ,
"जया, खरं सांगू? मी खूप चुकीचे बोललो तुला. रोज तुझ्या हातचे जेवण मला नकोसे वाटत होते, पण तुझे कष्ट व तू माझी घेत असलेली काळजी माझ्या कधीच लक्षात आली नाही. काल जेव्हा सगळ्यांनी तुझे कौतुक केले तेव्हा मला माझी चूक समजली. तोपर्यंत मी याच भ्रमात होतो की, प्रेरणाला भेटल्यावर तुला चार गोष्टी सुनावता येतील.
तिचा नवरा तिच्यासाठी किती राबतो हे पाहून मी तर घरात इकडची काडी तिकडे करत नाही हे माझ्या लक्षात आले. नुसतेच लक्षात आले नाही तर त्यामुळे तुझ्यावर कामाचा लोड किती पडत असेल याचीही जाणीव झाली."
तिचा नवरा तिच्यासाठी किती राबतो हे पाहून मी तर घरात इकडची काडी तिकडे करत नाही हे माझ्या लक्षात आले. नुसतेच लक्षात आले नाही तर त्यामुळे तुझ्यावर कामाचा लोड किती पडत असेल याचीही जाणीव झाली."
यावर जया काहीच बोलली नाही. तिचे पोळ्या लाटण्याचे काम सुरू होते.
मोहन पुढे म्हणाला,
"घर की मुर्गी दाल बराबर...आजवर मी तुझी कधीच कदर केली नाही. जेव्हा इतरांनी तुझे गुणगान केले तेव्हा माझ्या लक्षात आले की, आपण किती भाग्यवान आहोत. नाही तर आजपर्यंत तुझ्या या मळकट गाऊनचा आणि तुझ्या घामेजल्या चेहऱ्याचा मला राग यायचा. पण ते कशामुळे तसे आहे याचा बोध मला काल रात्री झाला. माफ कर मला. माझ्याजवळ अमृतकुंभ असूनही मी मात्र मृगजळामागे धावत होतो."
जया डोळ्यात पाणी आणून म्हणाली –
"खरंच? आता दुसऱ्यांचे कौतुक नाही करणार?"
"नाही गं. 'घरकी मुर्गी दाल बराबर' ही म्हण खरी आहे, पण आता मला तिचा अर्थ उमगला. तूच माझी राणी आहेस."
मोहनला समजले – बाहेरचे आकर्षण हा केवळ दिखावा आहे.
खरं सुख, खरं प्रेम, खरं समाधान आपल्या घरातच आहे.
जया अजूनही रोज भेंडी पोळी करते, पण आता मोहन आनंदाने खातो, कारण त्याला ठाऊक आहे...
ही भाजी म्हणजे फक्त जेवण नाही, यामागे माझ्या बायकोची माया, काळजी आहे.
समाप्त. ©® सौ.हेमा पाटील.
समाप्त. ©® सौ.हेमा पाटील.
कथा कशी वाटली हे कमेंट्स द्वारे नक्की कळवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा