घर कुणासाठी? ( भाग -२)

The Heart wrenching story of a family.
घर कुणासाठी ? ( भाग -२)

लेखिका - स्वाती बालूरकर, सखी


बरेच दिवसांनंतर-

(साधारण एप्रिल २०२‍१ च्या आसपास)

"आई आत्याचा फोन आहे."

मृदुलाने आईला आवाज दिला.

आई घाईतच आली व फोन घेतला.

" मालती वहीनी, अहो किती दिवसांनी कॉल केलात. आधीच त्या कोरोनामुळे वर्षभरापासून भेट नाही त्यात बाकीचे टेंशन्स आहेतच. तब्येत बरी आहे ना?"


"अरुणा तू कशी आहेस ग ? तब्येतीची काळजी घे आणि हो काय म्हणतात भाऊराया? संध्याकाळचे कार्यक्रम कमी झाले की नाही?"

"हो कमी आहे सगळं . तब्येतीचं असं काही नाही. सगळ ठीक आहे. बरे आहेत ते . तुमची कधी चक्कर ?"

"अग तेच सांगण्यासाठी तर फोन केलाय मी आणि नमू दोघीजणी पुढच्या आठवड्यात येऊन जावं म्हणतोय चार दिवसांसाठी !"

\" अहो या ना ! कधीही या ."

"आणि हो यावेळी विशेष कारणासाठी येतोय."

"मालती वहीनी काय हो?"

"आल्यावर सांगते गं!"

"नाही माझा जीव पण टाकलेला लागेल, सांगा ना!"

" काही विशेष नाही माझ्या मोठ्या मुलाची आशीषची बदली भोपाळला झालीय . पंधरवाड्यात किंवा महिनाभरात तो तिकडे शिफ्ट करणार आहे . पहिल्या लॉकडाऊन मधे त्याची कंपनीच बंद झाली होती ना. आता मागच्याच महिन्यात इथे नोकरी लागलीय, छान ऑफर मिळालीय. कंपनी भोपाळ ला पाठवतेय, तर मी तिकडे त्यांच्यासोबत गेले तर आपली काही लवकर भेट होणार नाही."

"अहो छान झालं वहीनी. अन् नमू वन्स येताहेत ना!"

"हो तर. आणि नमू आहे ना तिच्या मिस्टरांना कंपनीकडून जर्मनीला बोलावलं आहे. त्यामुळे ते दोघेही जाणार आहेत ,पंधरा दिवसानंतर. हे ऐकून मीच म्हटलं दोघीजणी जाऊन चार दिवस राहून येवूयात . त्यालाही बरं वाटेल आणि हो एक स्थळही होतं मनीषा साठी!"

"अगं बाई हो का! छान बातमी दिलीत तुम्ही, माझी पण धडपड चालूच आहे."

" मनीषाचं पाहिलं म्हणजे मृदुला पण हाताशी आलेलीच आहे. खूप घाई होईल पुन्हा दोघींचं."

"वहिनी तुम्हाला तर माहितच आहे, हे काही लक्ष देत नाहीत."

" असू दे गं! आम्ही येतो मग बोलतो त्याच्याशी!"

" हो हो निघालात की फोन करा. मी मिहिरला पाठवते हवं तर स्टेशनवर."

आईचं सगळं बोलणं स्पीकरवर चालल्यामुळे मृदुलाला मनात आनंद होत होता. आनंद यासाठी की ताईचं जर लवकर ठरलं तर तिचा मार्ग मोकळा होईल आणि दुसरं असं की नमू अात्या तिची सगळ्यात लाडकी आत्या होती.

ती तिथे जर्मनीला जाणार म्हटल्यावर तिला खूप आनंद होत होता येताना तिला काय काय आणायचे त्याची लिस्ट देता आली असती.

तिचं व आईचं बोलणं झालं .

रात्री मृदुलाने अर्णवला कॉल लावला आणि सगळी बातमी सांगितली. तोही आनंदला.

"पण मृदु एक गोष्ट लक्षात आलीय का ? तुझ्या दोन- दोन आत्या येणार तर त्या तुला घरातून बाहेर पडू देणार नाहीत , त्यावेळी मी गरिबांने काय करायचं ?"

"असं काही नाही रे ! काहीतरी बहाणा काढून मी बाहेर निघेलच. त्याची काळजी तू सोड आपण नक्कीच भेटू आणि यावेळी काहीतरी पॉझिटिव्ह होणार हे मात्र नक्की."

एक आठवडा गेला.

अर्णव ने वैतागून कॉल लावला.

" अगं काय झालं ५ दिवसांपासून बोलणं नाही भेटणं नाही . बरोबर नाही असं. . . सांग ना फोन का नाही केलास? भेट बरं मला अर्जंट."

" टेंशन आहे रे थोडं. आईची तब्येत बरी नाहीये त्यामुळे मला भेटायला येता येणार नाही."

" काय झालंय?"

" प्रचंड ताप आहे आणि सर्दी!"

"मृदु हलक्यावर घेऊ नकोस गं, एकदा आरटीपीसी आर करवूनच घे. घरी नसेल करायची तर बाहेर नगरपालिकेचं सेंटर आहे सुभाष चौकात, तिकडे जाऊन करून घे."

"बघते काय ते. आता ठेवते."

मृदुला आणि मनिषा आईला टेस्ट साठी घेऊन गेल्या . खूपच अशक्तपणा जाणवत होता आईला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिपोर्ट आला.

आईची करोना टेस्ट पॉजिटीव्ह आलेली पाहताच घाबरून मनीषाने बाबांना व आत्याला कॉल लावला. बाबा तर घाबरलेच. मोठ्या आत्यानी फोनवर सूचना दिल्या. मुलींना हिंमत दिली.

दोन्हीही अात्यांचं इकडे येणं रद्द झालं. अरूणाला घरातच वेगळं ठरलं होतं. बेडरूम मधे तिला विलग ठेवण्यात आलं. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊन व पहिल्या लाटेत कुटुंबाने खूप काळजी घेतली होती व कुणालाच काही झालं नव्हतं पण या वेळी पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या बातम्या डोकं वर काढत होत्या. टी वी वर पुन्हा तीच आकडेवारी सांगणं सुरू झालं.

फोनवर बोलून औषधोपचार सुरू झाला. दोन्ही आत्या येणार म्हणून खुश असलेली मृदुला आईच्या आजारपणाने हताश झाली व आत्या येणार नाहीत म्हणून नाराज झाली.
रिस्क नको या कारणाने आत्यांच्या घरचे पण कोणी पाठवायला तयार नव्हते.

सुरळीत असलेलं घर आई आजारी पडली तेव्हा. . . विस्कळीत झालं. सुव्यवस्थित असलेल्या घराचं रान झालं.

मुलाचा मिहिरचा आईवर खूप जीव, तो तर आईच्या सेवेत तत्पर होता.
मनीषा तर घर आवरायला लागली.

नेमकं अशा मध्ये पुन्हा बाहेर सरकारने लॉकडाऊन चे शिथिल केलेले नियम पुन्हा कडक केले.
तीन दिवसात जेव्हा अरूणाचा ताप उतरेना आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन खालीच चाललं तेव्हा मात्र बाबा घाबरले आणि त्यांनी तिला दवाखान्यात ऍडमिट करण्याचा निर्णय घेतला.

काही लोकांनी घरीच ठेवा असा सल्ला दिला तर काहीजण कोविड सेंटर मधे ठेवा म्हणून आग्रह करू लागले.
अरूणाला अगोदर कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आलं पण त्यादिवशी रात्रीच ऑक्सिजन ची कमतरता जाणवली म्हणून दुसर्‍या दिवशी सकाळी ऑक्सिजनच्या सिलेंडरची उपलब्धता पाहून तिला सरकारी दवाखान्यात हलवण्यात आलं. बायकोकडे नेहमी दुर्लक्ष करणारे बाबा तिच्या घरी नसण्याने मात्र खचून गेले.

आई सरकारी दवाखान्यात गेली आणि बाबांना त्या रात्री प्रचंड सर्दी आणि खोकला सुरू झाला. आता मात्र तिन्ही लेकरं खूप घाबरली.

बाबांना दुरूनच जेवढा उपचार शक्य होता तेवढा करण्याचा प्रयत्न करत होते.
ज्या माणसाला स्वतःची कामं स्वतः कधीच करून माहित नाही त्याला सगळंच अवघड झालं होतं.
बायको दवाखान्यात असलेल्या टेन्शन मुळे तो आधीच गर्भगवळीत झाला होता त्यात त्याची तब्येत त्याला साथ देत नव्हती.

मुलींची कितीही इच्छा असेल तरी मुलगा त्यांना पुन्हा पुन्हा आयसोलेट करून लांबूनच काळजी घेण्याचा सल्ला देत होता.

दोन्ही आत्या इकडे आल्या नाहीत पण बाहेरचं वातावरण पाहून त्यांनी घाई केली व त्या त्यांच्या गावी पोहोचल्या होत्या.

म्हणजे मोठ्या आत्या भोपाळला आणि लहान आत्या जर्मनीला निघून गेली. ती तिकडे पोचली आणि युरोपच्या फ्लाईट बंद झाल्या. तिथूनच फोनवरती सतत बोलणं चालू होतं.

तीन दिवसांनी बरं वाटण्या ऐवजी बाबांचा खोकला वाढतच गेला. तेव्हा वडिलांनाही दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी फॅमिली डॉक्टरांनी दोन्ही मुलींवर पण जोर टाकला.
मिहिर आईकडे बाहेरूनच भेटून व डॉक्टरांकडून माहिती घेवून येत होता. तब्येत मात्र बरी नव्हतीच. बाबा दवाखान्यात ऍडमिट झाले आणि घरातल्या लेकरांची तारांबळ विचारता सोय नाही.

मनीषा दिवसभर कपडे, भांडे, फरशी पुसणे आणि स्वयंपाक करून गळून जात होती.

तिघांनाही नगरपालिकेकडून टेस्ट करावी लागली. सुदैवाने दोघांची निगेटिव्ह आली.

क्रमशः
©® स्वाती बालूरकर, सखी

🎭 Series Post

View all