Login

घर कुणासाठी? ( भाग -३)

The heart wrenching story of a family.
घर कुणासाठी ? ( भाग -३)

लेखिका - स्वाती बालूरकर, सखी

पुढे-

तिघांनाही नगरपालिकेकडून टेस्ट करावी लागली. सुदैवाने दोघांची निगेटिव्ह आली.

तिघांनीही टेस्ट करून घेतली त्यावेळी मिहिरला खूप ताण आला होता. त्याला निगेटिव्ह नाही आलं तरीही खूप माईल्ड सिम्प्टम्स होते त्यामुळे घरातच वाफ घेऊन किंवा औषध उपचार आणि काळजी घेवून ते बर होण्यासारखं होतं.

ते तिघेजण आता वेगवेगळ्या तीन खोलीत राहायला लागले. जसं जमेल तसं खाण्या पिण्याची सोय करून घेत होते.

मिहिरच्या ऐवजी आता मृदुला रोज आईकडे चक्कर मारत होती व मनीषा बाबांकडे.

आईला दवाखान्या हलवूनही नऊ दिवस झाले होते. परिस्थिती हाताबाहेरच जात होती.
अचानक संध्याकाळी दवाखान्यातून फोन आला की मिसेज अरूणाला म्हणजे आईला कोविडच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.

बाबांची तब्येतही खूप खालावली होती त्यामुळे मनिषाने बाबांना हे कळू दिलं नाही.

जमेल तसा फोनवर संपर्क होत होता. मिहिरला दोन दिवसात बरं वाटू लागलं .

मृदुलाला घरातूनच अर्णवशी बोलणं कठिण होतं. त्यामुळे खूपदा चाटिंगवर मेसेज जायचे किंवा ती बाहेर पडल्यावरच बोलणं व्हायचं.
मृदुला मनातून खूप धास्तावली होती. पुढे काय वाढून ठेवलंय कळत नव्हतं.
हळवी झाली की फोनवरच बोलता बोलता रडायला लागली होती.
आता तर त्या आपल्याच घरात रहायची तिला भीती वाटू लागली.
आईला विडिओ कॉल लावला तर तिला बोलण्याचा देखील त्रास होत होता. त्या नळ्या व मास्क लावलेले बघून तिन्ही भावंडांना खूप रडू आलं.

एकच दिवस गेला असेल आणि मृदुलाच्या फोनवर सकाळीच दवाखान्याच्या नंबरवरून फोन आला.

" मिसेज अरूणाचे नातेवाईक का?"
"हो त्यांची मुलगी बोलतीय, काय झालं ? आई कशी आहे ?"
"मॅडम तेच सांगण्यासाठी कॉल केलाय की तुमच्या आईची तब्येत क्रिटिकल आहे. लंग्ज इनफेक्शन कंट्रोल मधे येत नाहीय. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय . तर कागदपत्रांवर सह्या हव्या होत्या , तुमच्या वडिलांना घेवून या."
हे ऐकून मृदुला रडायलाच लागली.

मिहीरने फोन घेतला, " हे बघा मॅडम माझे बाबा पण कोबिड सेंटरमधे अॅडमिट आहेत. ते येवू शकणार नाहीत. आमची ताई आली तर चालेल का?"

"हो हो चालेल फक्त मेजर नातेवाईक हवा. या तुम्ही लवकरात लवकर."

" हो येतोच आहोत." मिहिर बोलला व फोन ठेवून टाकला.

"मी कशी जाऊ मृदु ? तिघेही जाऊयात ना!" मनिषा रडायला लागली.

"तुम्ही दोघी जा. माझी हिंमतच नाही आईला अाजारी बघण्याची. आणि १४ दिवसांपर्यंत मी बाहेर पडायला नकोय. तुम्ही जा." मिहिर डोळे पुसत म्हणाला.

तो मनातून कोसळ ला होता पण दाखवू इच्छित नव्हता.

तिघेही दुखात होते पण एकमेकांच्या गळ्यात पडून रडूही शकत नव्हते.

नको तेच झालं. दवाखान्याच्या आवारात पोचून चौकशी करेपर्यंत फोन आला की "मिसेज अरुणा इज नो मोर"

बाहेरून यांना काहीच करता आलं नाही.
नियमात बसेल त्याप्रमाणे केवळ औपचारिकता म्हणून मिहिरने लांबून सगळे विधी केले.

शेवटी आई कुणाला न भेटताच हे जग सोडून गेली.

आता मात्र तीनही लांच्या पायाखालची जमीन सरकली.
मुलांना तर आभाळ कोसळल्यागत झालं.
वडिलांना कळवू शकले नाहीत, कारण ते काहीच करू शकणार नव्हते , उलट ते नैराश्यात पडले असते.
कधी जिम्मेदारीची झळ लागलेली नव्हती. आईने जणु अंगावर घेवून संसार ओढला होता. पण तिचं असं झालं होतं.

आई नेहमीसाठीच नाही ही कल्पनाच करवत नव्हती.

नेमकी त्याचवेळी वडिलांची तब्येतही दोन दिवस खूपच गंभीर होती.

त्यावेळी तर सतत देवासमोर बसून प्रार्थना करण्याशिवाय दुसरं काहीच करता येत नव्हतं . तिघेही जण त्यावेळी व्यक्तिगत आयुष्य विसरून गेले.
बाहेर मृत्यूचे तांडव चालू होते.
हाहाकार माजला होता.
सगळ्या दवाखान्यात ,सेंटरवर असंच निराशाजनक बातम्या!
अशाच नकारात्मक बातम्या कानावरती येत होत्या.

ते ३ दिवस कसे गेले त्या लेकरांनाच ठाऊक.

त्यांची मात्र एकमेकांशी एक वेगळीच जवळीक निर्माण झाली.

देवाची दया असेल , चार दिवसानंतर बाबांची तब्येत नॉर्मल झाली. त्यांना पत्नीच्या मृत्यूची बातमी कळ ली व ते स्वतःला खूपच कमनशिबी व असहाय्य समजून स्वतःला दोष देत रडत राहिले.

दहा दिवसानंतर बाबा सुखरूप घरी आले.

बाबा घरी आले पण घराला जी स्मशान कळा आली होती , ते पाहून व अरूणाची अनुपस्थिती जाणवून त्यातून बाहेर यायला त्यांना महिना लागला .

पत्नीशी प्रेमाने वागता आलं नाही, तिची हौस मोज पुरवता आली नाही या गोष्टीची प्रचंड अपराधी भावना त्याच्या मनात सतत येत होती.

तिच्याशिवाय हे घर. . . घर नाहीच!

इतक्या सुंदर बांधलेल्या बंगल्यामध्ये त्याचा जीवच राहवेना पण आजाराने आलेला अशक्तपणा, हतबल मनस्थिती असा जिवंत राहण्याचा संघर्ष!
महिन्या दोन महिन्यानंतर थोडी तब्येत सावरली , अरूणाचं जाणं मनाने मान्य केलं व बाहेरही वातावरण निवळलं. नियम शिथिल झाले.


नाईलाजाने का होईना बाबांना नोकरीवर रुजू व्हावे लागले. आठवड्या ३ दिवस जावं लागे.

मुलांना सुट्टी होत्या.
तो काळही संपला , आता त्यांना कशाचीच इच्छा राहिली नव्हती.

सुदैवाने एक स्वयंपाकीण मावशी आणि कामवाली बाई मिळाली होती.

ती दोन वेळा काहीतरी करून जायची, म्हणून हे खायचे, सगळी कामं यांत्रिकपणे होत होती.

मनीषा होईल तितकं करत होती.

मृदुलाला त्या घरात राहण्याची इच्छा होत नव्हती.
मिहिर तर नाश्ता करून सकाळी गेला की संध्याकाळीच परत यायचा.

मृदुला काहीतरी कारणाने बाहेर पडायची , कधी मैत्रिणीं तर कधी अर्णवला भेटायची. आई गेल्यापासून त्याने खूपच मानसिक बळ दिलं होतं.

काही महिने गेले. लोक हळू हळू निर्धास्त व्हायला लागले. नियम अजून शिथिल झाले.
मास्क जणु सगळ्यांचा परम साथी झाला.

वडिलांनी हळूहळू ऑफिसातून येण्याचा वेळ वाढवला.

मुलींच्या लक्षात येऊ लागलं की त्यांनी दारू पुन्हा सुरू केलीय.

आता त्यांना त्यांच्या दुःखाला विसरण्यासाठी पिणे हा एकच पर्याय दिसत होता.

मुलांसमोर चर्चा नको म्हणून बाहेरून घेऊन यायचं.

दोघी मुली व मुलगा दोन खोल्यांमध्ये फोन हातात घेऊन बसलेले असायचे.

मृदुलाला वाटायला लागले, आई होती तोवर ठीक होतं पण आता आपल्या आयुष्याचा काही खरं नाही.

आपलं लग्न या जन्मात होणारच नाही अशी भीतीच मनात बसून गेली.

वडिलांच्या मनात तर लांब लांब पर्यंत मुलींच्या लग्नाचा विचारच नव्हता.

त्यांना फक्त त्यांची गेलेली पत्नी आणि तिची उणीव भासून दिवस चालले होते.

काळ थांबत नाही सगळं होत होतं , आला दिवस जात होता पण घराला जे घर पण होतं ते निघून गेलं होतं.

घराचं एक अव्यवस्थित असतं तसं स्वरूप आलं होतं.

कोणीही कुणाचं काम करायला तयार नव्हतं ज्याने त्याने वाटलं तेव्हा वाटेल ते करायचं.

ना स्वयंपाकामध्ये सुव्यवस्थित पणा होता ना घराच्या ठेवणीत.

अव्यवस्थित घरात कुणीही आपल्या घरी कुणाला ही घेऊन येत नव्हतं .

आता मात्र मृदुलाला हे सगळं राहून राहून असह्य होऊ लागलं.

नेमका मुलगा मिहिर बारावीला होता.

तो कसं बसं ट्युशन्स आणि क्लास करत होता , बऱ्यापैकी मार्क्स आणत होता.

वर्ष सरलं , तोच महिना आला.

आईचं वर्ष श्राद्ध!

क्रमशः
©® स्वाती बालूरकर, सखी

🎭 Series Post

View all