घर कुणासाठी? (भाग -४)

The heart wrenching story of a family.
घर कुणासाठी ? (भाग -४)

लेखिका - स्वाती बालूरकर , सखी

आईचं वर्ष श्राद्ध !

पण त्याला कुणालाच बोलावण्याची इच्छा झाली नाही.
एवढे नातेवाईक असूनही तशावेळी क्रिया कर्माला कोणीच नव्हतं मग श्राद्धाला तरी का बोलवायचं ? मुलंही या विचाराशी सहमत झाले. कुणाला बोलावून रिस्क नकोच .

म्हणून बाबांनी बहिणींना देखील निरोप पाठवलं नाही.
लहान बहीण काही येऊ शकले नाही .
पण मोठी बहीण आपल्या मुलासोबत आली होती.

अगदी थोडक्यामध्ये वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम झाला.
दुसऱ्या दिवशी मोठी अात्या परत निघणार होती तिने भावाला बसवलं. चार समजूतीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्या बायकोचे झालेल्या गप्पा ही सांगितल्या .

मनीषा साठी एक स्थळ चालून आला होतं पण या सगळ्या गोष्टींमध्ये त्या मुलाचं सुद्धा करोना काळामध्ये थोडक्या लोकांमध्ये लग्न झालं.
दुसरं स्थळ पहावं लागेल. सुरूवात कर वगैरे!

मोठ्या आत्याने हे पण समजावलं की आता त्याने मुलांचा भवितव्य बघावं .

"झालं गेलं विसर , मुलाला पुढे काय शिकायचे आहे ते ठरव. एवढा पैसा बँकेत पडलेला आहे.
तू स्वतःकडे पण लक्ष दे !"

हेच सगळं ऐकूत बसलेल्या मृदूला वाटलं आता हीच ती वेळ आणि ती पटकन म्हणाली , " बाबा आणि आत्या ताईचं मला माहित नाही पण मी लग्नासाठी तयार आहे."

तिचं हे वाक्य ऐकताच बाबांच्या डोक्यात एकच तिडीक गेली.

" आई जाऊन वर्ष झालं नाही आणि तुला स्वतःच्या लग्नाचा पडलेलं आहे? कशी मुलगी आहेस? आता ताईचं सोडून तुझे लग्न करू म्हणतेस? इतकी काय घाई झालीय?
आणि एक सांग?"

"अरे चिडू नकोस शांततेने बोल. ती सांगतीय ना! ऐक तरी!" आत्याने बाबांना शांत केलं.

"एक सांग, कोण करणार आहे सगळं? लगचन म्हणजे खेळ नाही. अरूणा नाही मग पुजेला कोण बसणार आहे?"

" बाबा , आई नाही हे मला माहित नाही का ? कोण बसेल ते मला माहित नाही . हवं तर मी रजिस्टर मॅरेज करीन, पण मी आता थांबू शकत नाही. . . या घरात मी राहू शकत नाही."

बाबा थक्कच झाले.
आत्या हळूच जवळ सरकली व तिने हळूच विचारले ," बेटा इतक्या विश्वासाने म्हणतेस, कोणी आहे की ,आम्ही बघायचं?"

" आत्या . . . बाबा . . माझं केव्हापासून ठरलेलं आहे, मी फक्त ताई चं ठरण्यासाठी वाट पाहत होते. मी आईला सांगणारच होते अन त्यापूर्वीच आई गेली. खरं सांगते आई असताना मला तिची किंमत कधीच कळली नाही पण आज तिने मला नक्की सपोर्ट केला असता. ताईच लग्न अगोदर व्हावे म्हणून मी इतके दिवस थांबले. आता जर तुमच्याने जमणार नसेल तर मला सांगा माझा निर्णय घ्यायला मी समर्थ आहे . " एकीकडे ती रडतही होती पण धारधार बोलतही होती.

मुलीचे हे बोल ऐकून बाबांचे पाय थरथर कापायला लागले.
इतका रागीट आणि संतापी असलेल्या माणूस त्या क्षणी पत्नी नसल्याने असहाय्य वाटून घेऊ लागला . आज कळालं की अरूणाच त्याची शक्ती होती. आत्याने नजरेने इशारा केला.

"जशी तुझी मर्जी ! आता सांगितलं आहेस तर धन्यवाद! न सांगता निघून गेली असतीस तर मी काय केलं असतं ?" असं बोलून त्याने तिला जवळ बसून घेतलं आणि धाय मोकलून रडू लागला. ही पण मला सोडून जाणार या कल्पनेने तो भावनिक झाला.

आत्या म्हणाली "आपण लवकरात लवकर मुहूर्त धरूयात पण फक्त त्या लोकांना एकदा भेटायला यायला हवं. कोण मुलगा काय करतो सगळं सांग."

"आत्या तू जायची घाई नको ना करू! तिचं करून द्या , मला घाई नाही. मी राहीन बाबांसोबत!" मनिषा आत्याला प्रेमाने म्हणाली.

"बरं! मृदु हवं तर मी थांबते अजून दोन दिवस. थांबू ना रे?"
आत्याचा मुलगाही म्हणाला की " आई तू थांब.
मी जातो पुढे. नमू मावशीला सांग आणि सगळं जमवूनच ये. मामी गेल्यावर कुणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा ना! "

मग त्यानंतर जर्मनीच्या अात्याशी कॉन्फरन्स कॉल झाला. सगळं वातावरण एकदम मोकळं झालं.
"बरं रे बाबा , पोरीने ठरवून घेतलं. आता कुठं स्थळं बघितली असतीस तू! " आत्या भावाला म्हणाली.

होईल तितकी समोरची बैठक व जुजबी घर आवरून आत्याने व्यवस्था केली .
अर्णवचे कुटुंबिय भेटायला आले. त्यांच्याकडून काहीच हरकत नव्हती.
मृदुलाचे मामा मामी पण श्राद्धाला आलेच होते . मुलाकडची मंडळी भेटायला आली तेव्हा त्यांनी लग्न करून देण्याची तयारी दाखवली.

मामांना मोठ्या मुलीला ठेवून लहान मुलीचे लग्न करण्याची इच्छा बिलकुल नव्हती पण स्वतः मनीषा म्हणाली की, " बाबा व मामा तुम्ही ज्याच्याशी ठरवाल त्याच्याशी मी करेल आणि तिचं होऊन जाऊ दे !"

ठरल्याप्रमाणे मृदुलाच रजिस्टर मॅरेज झालं.

सासरी छोटी-मोठी पूजा घातली गेली, विधी करवले.

हॉटेलमध्ये वडिलांनी रिसेप्शन दिलं.

आता मृदु तिच्या घरी सासरी आनंदानेव नांदायला गेली.

आता तिला घराचं महत्त्व कळालं होतं.

आई गेल्यानंतर त्या चार भिंतींमध्ये तिला राहावं असं वाटत नव्हतं म्हणूनच तिने घाई केली होती. सासरची मंडळी प्रेमळ होती त्यामुळे ती सासरी छान जुळवून घेत होती.

या लग्नानंतर आता तर यांच्या घराला अजूनच वाईट कळा आली होती.

मनीषा शांत आईसारखीच सगळं सहन करणारी.
मिहीर सकाळी गेला की रात्री जेवायलाच यायचा.

आणि वडिलांचा तर विचारायलाच नको.

नेमकं त्यादरम्यान जर्मनीची आत्या भारतात परत आली आणि मनिषासाठी त्यांच्या पुतण्याचं स्थळ घेऊनच आली.

बाबाच म्हणाले, " माझ्याकडे करण्यासारखं कुणीच नाही. मी तर पूजेला बसणारच नाही मग?"

त्यांचे चुलत भाऊ पूजेला बसायला तयार झाले म्हणाले\" चला आम्हाला कन्यादानाचं पुण्य घडेल.\"

बोलणी केल्यावर सद्य परिस्थिती बघता चर्चा झाली व मुलाकडच्या लोकांना बाबांनी एक रक्कम दिली.

मुलाकडच्या लोकांनीच थाटामाटात लग्न करून घेतले .
मनिषाला त्यांनी लहानपणापासूनच पाहिलेलं होतं. पंधरा-वीस माणसं इकडची व ४० माणसं तिकडची अशी त्या लग्नासाठी जमली .

मनीषाची जेव्हा पाठवणी झाली म्हणजे लग्न घरी तिला सोडून वधुकडीलमंडळी परतली , त्या दिवशी तर वडील घरी आलेच नाहीत , परस्पर मित्राकडे गेले .
रात्री तिकडेच राहिले.

मुलगा मिहिरही घरी आला नाही. सकाळी जेव्हा दोघे एकाच वेळी परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जो एवढा मोठा बंगला आहे तो नुसता विटा आणि सिमेंट चा आहे आता याला घर म्हणावं का?

नेमकं एका आठवड्यात मिहिरचा बारावीचा रिझल्ट आला. त्याला बऱ्यापैकी मार्क पडले आणि पुढची हालचाल सुरू झाली.
तोही दिवस उजाडला जेव्हा मिहिर म्हणाला " बाबा मला इथे शिकायचंच नाही. मी मु्ंबई,पुणे, हैदराबाद , दिल्ली कुठेही जायला तयार आहे. या घरात आपण दोघांनी राहायचं मला तरी शक्य नाही."

"अरे असं काय? तू पण निघून गेलास तर मी काय करू?"

"बाबा तुमची सरकारी नोकरी आहे त्यामुळे काय करणार. नोकरी करा आणि इथेच रहा. मी मात्र इथे राहू शकत नाही आणि मी पुन्हा इथे येणारही नाही."

" का रे?"
" या घरात आलं की मला आई नसल्याची खूप जास्त जाणीव होते आणि पोटात भडभडून येतं . घरासाठी राब राब राबली पण तिच्या नशीबात तुमच्या व माझ्याकडून अंत्यसंस्कार करवून घेणं पण नव्हतं . . .ही सल जात नाही."

"अरे पण आपलं घर सोडून दुसरीकडे का रहायचं. काहीतरी सोय करू. इथेच शिक."

"बाबा, आपलं घर ही संकल्पना आईसोबतच संपली. आता तर दोन्ही ताई पण नाहीयेत. त्या कधीतरी सणावाराला येतील या भरोशावरती आपलं आपण दोघं काय राहायचं? माझे मित्र आहेत पुण्याला, तिथे कॉलेजच्या होस्टेल मध्ये सोय करा . मी तिथेच हॉस्टेलमध्ये राहीन."

"ठीक आहे किमान माझ्या रिटायरमेंट पर्यंत तू शिक्षण संपवून परत येशील या आशेवर मी राहीन."


"मुळीच नाही. स्पष्टच सांगतो. उद्याला शिक्षण पूर्ण झाल्यावर मी जगात कुठेही नोकरी करीन पण या घरी येणार नाही."
मुलाचे हे स्ट्राँग टोनमधले टोकाचे शब्द ऐकून वडील खूप दुःख झाले . पण नाईलाज होता.

महिना दोन महिन्यात भरपूर पैसा पुरवून त्याची हॉटेल मॅनेजमेंट ला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सोय झाली. चांगल्या ठिकाणी त्याचा नंबर लागला होता. तो सामान घेवून गेला.

आता मात्र त्यांचाच बांधलेला बंगला वडिलांना खायला उठायला लागला.

एकावेळी भरलेलं घर होतं जणु गोकुळ! येणार जाणार आणि सणवार ! पाच माणसांचं कुटुंब ! तेव्हा त्यांच्याकडे द्यायला वेळ नव्हता , आता वेळच वेळ होता पण घरात कोणीच मायेचं नव्हतं.

क्रमशः
©® स्वाती बालूरकर , सखी

🎭 Series Post

View all