Login

घर कुणासाठी - अंतिम( भाग-५)

The heart wrenching story of a family.
घर कुणासाठी?( भाग ५) अंतिम


लेखिका -स्वाती बालूरकर,सखी.


आई नाही म्हणून मुलींना माहेरी येण्याचे ओढ नव्हती आणि मुलींच्या सासरी नेहमी जाणं बरं दिसत नव्हतं म्हणून तो टाळायचा.पण मनिषा व मृदुलाचे कुटुंबिय सणा वाराला आग्रहाने बोलवायचे.

एकटा बसला की वाटायचं अजून एक वेगळा जन्म जगत आहे की काय?

दोन्ही बहिणीचे फोन येत असायचे पण त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसायचं.

असंच वर्ष निघून गेल.

कोरोनाची दुसरी ,तिसरी लाट व दहशत संपली. सगळ्यांचे लसीकरण झाल।

आयुष्य पुन्हा सुरळीत झालं.

आता बाबांच्या दोघी बहिणीने ठरवलं, एकदा भावाच्या घरी निवांत चक्कर मारावी, त्याच्या मनातल्या गाठी मोकळ्या कराव्या. पुढे त्याचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकूयात.

दोघी ठरवून घरी आल्या आणि अंगणात पाय ठेवताच घराकडे पाहू रडू फुटलं.

बाग बगीचा आणि फुलांनी भरलेलं एका काळी सुंदर असलेल्या बंगला रुपी घराचं जणू अवशेष( खंडर) राहिलेत अशी त्याची अवस्था झाली होती. अंगणातली अरूणाची रांगोळी व बहरलेली तुळस आठवली. सगळं रुक्ष!

भाऊ बाजूला चावी ठेवून गेला होता.

दोघीजणी घरात आल्या पण बसण्या योग्य सुद्धा एकही जागा नव्हती, दीवाणवरच्या अंथरलेल्या बेडशीट वर धुळीचे थर साचलेले होते.

घरामध्ये एक नजर टाकून आल्या .

दोघींना अक्षरशः डोळ्या पाणी आवरेना. जिथे तिथे जाळे जळमट, झुरळ व मुंग्यानी स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता.
दुर्दैवी अरुणा होती की भाऊ? असंही वाटलं.

त्याच्यावर राग येण्या ऐवजी दया आली.

आता घर आवरायचं. . . तर सुरुवात तरी कुठून करावी असाही प्रश्न पडला.

त्या दिवशी त्यांनी बाहेरचं मागून खाल्लं .

संध्याकाळी भाऊ आला व दोघी बहिणींना पाहून खूप रडला.
" खरं सांगू का मला एकटं जगण्याचं त्राणच राहिलं नाही. तिला कधीच वेळ दिला नाही हे मनाला खात राहतं. अरूणाला गृहित धरलं होतं.
एकट्यासाठी काय करू व आवरू. मिहिर तर इथे येणारच नाही आता. मला तर भीती वाटते ताई की कुठल्यातरी दिवशी मी घरात मरून पडेल आणि दोन चार दिवसांनी लोकांना कळेल."

भावाचं हे बोलणं ऐकून दोघी शॉक झाल्या.

"काय हे बोलणं? सावर स्वतःला. असं काही नाही होणार."

"असं वाटायला लागलंय. . . कुठेतरी मन मोकळं करू देत ना!"

"नाही रे असं अभद्र बोलू नकोस."

ती रात्र त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन काढली.

सकाळी दोघी बहिणींनी कंबर कसली.
ओळखीने एक कामवाली बोलावली आणि घरामध्ये कामाला लागल्या.

एका एका वस्तूला जेव्हा बहिणींचा हात लागला होता तेव्हा कळत होतं की वर्ष दीड वर्षात काहीच केलेलं नाहीय. अरूणाचा शेवटचा हात लागलेला आहे.
आता जे गेल्या वर्षभरात शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्याची बाटली सुद्धा जागेवरची हलली नव्हती.

पाण्याचे ग्लास धुतले गेले नव्हते.
स्वयंपाक घरात सर्वत्र जाळी लागली होती.

त्यांनी भावाला विचारलं तेव्हा तो सांगत गेला की हे घर रात्रीचे काही तास झोपण्यासाठी एक रेस्ट हाऊस आहे, त्याची देखभाल करण्याची त्याला इच्छा नाही.
केवळ दोन वेळेला खानावळीतबाहेर जेवतो आणि रात्री त्याच्या खोलीत येऊन पडतो.
ती खोली तेवढी स्वच्छ आहे की नाही ते ही तो काहीही बघत नाही.
आठ दिवसाला एकदा कामवाली येते व त्याची तेवढीच खोली साफ करते.

बाकी स्वयंपाक घर, हॉल, मुलांचं बेडरूम या खोल्या त्याच्यासाठी अस्तित्वातच नाहीयत.

भाजी, दूध याच्याशी तर त्याचा केव्हाच संपर्क तुटलाय. त्याची सरकारी नोकरी आहे म्हणून नोकरी टिकली जर प्रायव्हेट असती तर केव्हाच काढून दिलं असतं.
दोन वेळेला खाणे ते पण पोटाला लागतं म्हणून आणि रात्री सगळं दुःख विसरण्यासाठी पिणे एवढा एकच काय तो त्याच्या जगण्याचा टाईम टेबल बनलेला आहे.

भावाचं हे सगळं मनोगत ऐकून व त्याची खंगलेली अवस्था पाहून बहिणी मनामध्ये खूप दुःखी झाल्या.

आठवडाभर त्या घरातला सगळा कचरा व अनावश्यक सामान काढून टाकत होत्या.
नको असेल ते दान करून टाकत होत्या.
मग त्यांनी घराला रंगरंगोटी करवली.
दोन मुलींची लग्न झाली पण कोणीच घर आवरलं नव्हतं.
घराला रंग दिला दहा-बारा दिवसात घराला थोडीशी कळा आली . लिमिटेड सामान घरात ठेवलं. जेवढे आवरता येईल तेवढे त्यांनी घर आवरलं .
त्यांची ती कामाची लगबग व आवरलेलं घर पाहून मृदुलाच्या बाबांना खूप छान वाटलं.

तो म्हणाला "तुम्हाला दोघींना तुमचा संसार आहे तरीही इतके दिवस सगळे सोडून कशासाठी इतकी मेहनत करताय?"

"संसार तर आहे रे आम्हाला पण तुझ्यासाठी आणि मुलींना माहेरी यावं वाटावं यासाठी करतोय. आता बघ बरं आम्ही आलो की कशा रोज चकरा मारताहेत पोरी. आई नसली म्हणून काय झालं, घर पण जपायला हवं, पोरींचं माहेर रहायला हवं. त्यांच्या आठवणी आहेत इथे."
नमू आत्याचं बोलणं ऐकून मुलीही तिला बिलगल्या. घराचा कायापालट झाला होता.

"आईविना बाहेर पडलेल्या मुलाला वर्षातून एकदा तरी घर बघावं वाटलं तर त्याने यावं ना!" मोठी आत्या प्रेमाने म्हणाली.

"खरं आहे. मलाही किती दिवसांनी घरातलं जेवण मिळतंय. पण तुम्ही आज आहात, उद्या परत जाणार! पुन्हा घराची तीच अवस्था होईल."

" अशी कशी होईल. आता आम्ही इतकी मेहनत केलीय तर तुला ते मेंटेन करावंच लागेल. हवं तर ही नवीन कामवाली लावून जातो." मोठी बहिण अधिकारवाणीने म्हणाली.

त्यांने एकच प्रश्न विचारला, " अक्का घर मेंटेन करेल मी फक्त सांग कोणासाठी?"

त्याच्या या प्रश्नांनी दोघी बहिणींची जणू दातखिळ बसली.

" स्वतःसाठी! अजून कोणासाठी?" नमू म्हणाली.

" मी तर असून नसून एकसारखाच आहे नाही का? तुम्ही इतकी मेहनत करून पुन्हा पुढच्या वर्षी याल तर घर पुन्हा तशाला तसंच! "

" बरं तुझी ऑफिसला तेवढी दोन वर्षे नोकरी आहे ना तेवढी कर तोपर्यंत तरी घर मेंटेन कर. मुली सुद्धा येत जात राहतील रे!"

"घर ही बिल्डिंग नसते , घर हे माणसं असतात हे उशीरा कळालं मला. पण घर कोणासाठी ठेवावं असं ही वाट तंच!"

असं काहिसं बोलत तो तयार होऊन ऑफिसला गेला आणि मग त्या क्षणी बहिणींनी एकमेकींकडे पाहिलं आणि ठरवलं.

बाकी सगळं असू देत पण आता याचं लग्न करायचं. याला पुन्हा बोहल्यावर उभं करायचं.

जर पुरुष गेला तर बाई घर धरून राहते, घराला घरपण राहतं, पण बाई गेली तर पुरुष स्वतःलाच सांभाळत नाही मग घरही सांभाळू शकत नाही. त्याला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

त्यामुळे घर त्याच्यासाठी जरी ठेवायचं असेल तरी ते आवरणारी हवी आणि मुलींना माहेर हवं व मिहिरच्या होणार्‍या बायकोला सासर!

मग त्यांनी पटापट आपल्या मैत्रिणीचे ग्रुप, नातेवाईकांच्या ग्रुप वरती मेसेज टाईप करून फिरवला.

" वधू हवी आहे. 56 वर्षाच्या बिजवरासाठी. घराची देखभाल करणारी ,सुयोग्य महिला, परित्या विधवा किंवा कुमारी पण चालेल. लवकरात लवकर संपर्क साधा."

घराला घरपण आणून दोघी बहिणी आशावादी विचाराने परत निघाल्या.

भावाने खूप कृतज्ञतेने दोघींना मिठी मारली.
" तुमच्यासारख्या बहिणी असल्यावरती कुठल्या भावाला एकट वाटेल? मी तयार आहे."

" बघ दोन महिन्यात आम्ही दुसरे लग्न लावून देऊ मग घर कोणासाठी? असा प्रश्न तू विचारणार नाहीस. पण तुला तुझ्या नको त्या सवयी बदलाव्या लागतील आणि आहे ते आयुष्य आनंदाने जग स्वतःसाठी. ती येणारी घर सावरायला येतीय तर तिच्याशी नीट रहा. "
अक्का म्हणाली.

"बघ तुझी पाखरं पुन्हा घरी येतील व घर चिवचिवाटाने भरून जाईल."
नमू लाडाने म्हणाली.

आता त्या वास्तूत पुन्हा घराचं रूप अवतरत होतं.

शुभं भवतु!

समाप्त
©®स्वाती बालूरकर, सखी
दिनांक २० .०६ .२३

🎭 Series Post

View all