Login

घर कुणासाठी? ( भाग -१)

Heart wrenching story of a family.
घर कुणासाठी?


"हे असं किती दिवस चोरून भेटायचं रे. आता तर जॉब पण लागलाय ना तुझा. मग?"

"अगं आता माझी काहीच हरकत नाही. प्रॉब्लेम तर तुझ्या घरून आहे. तू ते सोडवायचं बघ."

"मी तरी काय करू अर्णव? घरच्यांना लग्नाची काहीच पडलेली नाहीय. ताईसाठी ते काहीच हालचाल करत नाहीयत. मग मी कशी घाई करणार ना?"

"मग मला हा प्रश्न पुन्हा विचारू नकोस की किती दिवस रे अर्णव?"

त्याने दुसरीकडे चेहरा वळवला तशी ती समजून चुकली की तो रागावलाय.

"सॉरी रे . बरं एक सांग जर माझ्या घरी काहीच हालचाल झाली नाही तर आपण पळून जावून लग्न करायचं का?" ती आशेने त्याच्या कडे बघत म्हणाली.

"अगं काय हे मृदुला? हे फिल्मी भूत उतरव डोक्यातून . मग काय प्लान आहे? पळून जायचं , कोर्ट मॅरेज करायचं अन वेगळं रहायचं? तुझ्या घरचे शोध घेणार, मग माझ्या घरचे लोक वैतागणार! हे सगळं कशाला? मुळात विरोध करण्यासारखं काहिच नाहीय आपल्या नात्यात."

"तसं नाही पण?"

" माझ्या घरून मला काहीच विरोध नाहीय. मी आजही लगेच सांगू शकतो.
आईला नुसती कल्पना दिली तरीही ती सगळं व्यवस्थित जमवून आणेल. तू तुझ्या घरी कळव इतकंच!"

अर्णवच्या या बोलण्याने मृदुलाला थोडी हिंमत आली. ती त्याच्या जवळ बिलगून बसली व त्याचा हातात हातात घेतला. संध्याकाळी त्या डोंगर पायथ्याशी खडकावर बसलेलं प्रेमीयुगुल भन्नाटच होतं. त्यानेही तिच्या खांद्याभोवती हात ठेवलेला होता.

कितीतरी दिवसांनंतर दोघांची इतकी निवांत भेट झाली होती. आज शांत डोक्याने ती विचार करायला लागली.

त्याच्याकडे एकदा पाहिलं, तो गोड हसला.
"सगळं सुरळीत होणार असेल तर बंडखोरी कशाला ना , अर्णव!"

तिच्या निरागस डोळ्यात पाहताना तिचा हा प्रश्न त्याला गुदगुली करून गेला.

"शांतपणे विचार कर, आईचा , ताईचा , बाबांचा। . नक्की मार्ग मिळेल!"
त्याच्या या आश्वस्तपणाने तर ती खरंच शांतपणे विचार करू लागली.

म्हणजे घरी सांगण्याचं तिला धाडस करावं लागेल. तिच्या डोळ्यासमोर तिच्या ताईचा- मनिषा चा निरागस चेहरा आला अन वाटलं की ती किती सरळ आहे. आईवडिलांना आवडलेल्या कुठल्याही स्थळाशी लग्न करायला तयार आहे. तिची वेगळी काहीच मागणी किंवा अपेक्षा नाहीयेत.

\"आई- बाबा काय आपलं वाईट करणार का? नाही ना! सगळे नवरे तसेच असतात गं ! आपण आपलं व्यवस्थित कर्तव्य करायचं.\" ही २५ वर्षांच्या तिच्या ताईची फिलॉसॉफी !

काय बोलणार कप्पाळ!

"अर्णव एक आठवडा मी अंदाज घेते आणि बोलते रे घरी! तू निवांत रहा."

" तुझी परीक्षा आहे ना पुढच्या आठवड्यात , ती होवू दे म्हणजे घरात काहीही प्रसंग उद्भवला तर अडचण नको व्हायला. "

" बरोबर! चल निघूयात!"

तो गाडीवर घराजवळच्या चौकात तिला सोडून गेला. ती बांधलेली ओढणी काढून घराकडे निघाली आणि पाठीवर थाप पडली.

मृदुलाने दचकून पाहिलं तर तिची ताई दुकानातून दूध घेवून परतत होती.

" किती उशीर केलास गं? मैत्रिणीं कडे गेलीस तर लवकर यायचं ना. बाबा चिडतात पुन्हा आईवर. आणि आता तिकडे गाडीवरून तूच उतरलीस का?"

"अगं ताई काय तू पण ,मी कशाला उतरेन गाडीवरून ? मी शेअर रिक्षातून आले ना. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे ना तर. . .वेळ झाला. बाबा नाही आलेत ना अजून?"

" नाही आलेत . चल लवकर घरी."

आज रात्री ताईजवळ काहीतरी हिंट दिली तर कदाचित काही हालचाल होईल असा विचार ती करत होती पण ताईचं बोलणं ऐकलं आणि सगळं सांगण्याचा विचार पुढे ढकलला.

घरी येवून पडून राहणं तिला खूप आवडायचं. कुणी काही म्हणालं तर अभ्यास करून थकले हे कारण होतंच.

मुळात या घरात काही काम करावं असं तिला वाटायचंच नाही.

तिच्या काही मैत्रिणीं कडे घरातलं वातावरण किती जॉली व मजेदार आहे असं वाटायचं. सगळे कसे आनंदात राहतात. आरडाओरडा नाही की घरात भीती नाही मग तिच्याच घरात असं वातावरण का आहे? कळायचं नाही.

विचारातच होती इतक्यात-

ताईने चहा करून हातात आणून दिला.

"तायडे ,तुला कसं कळतं गं , मला चहा हवा होता ते!"

" ते सोड , संध्याकाळी काय करायचं विचारत होती आई?"
चहा घेत ताई म्हणाली.

"का? ती कुठे?"

" अगं ती अंगणात दळण करतीय. कणिक संपत आलीय ना."

"बापरे ताई तू ग्रेट आहेस गं, घरातलं सगळंच कसं माहित असतं तुला? मला तर वाढलेल्या ताटात काय आहे तेवढंच कळतं.? काय संपलंय काय आणायचं काही खबर नसते. "

मृदुला मिश्कीलपणे म्हणाली पण मनिषा गंभीर झाली.

" असं नाही ना चालत मृदु, लग्न झाल्यावर त्रास होतो गं!"

" काही नाही गं , होतं सगळं नीट. मी तर सगळ्या कामांना बाई लावणार , आणि मी नोकरी करणार!"

"पण नवर्‍याने अन सासू सासर्‍यांनी मान्य करायला हवं ना?"

"हो करतील ते, खूप आधुनिक विचारांचे आहेत. असं आपल्या बाबांसारखा नवरा नसला की झालं, बस्स!

"अगं काय बोलतीयस हे ? एक मिनिट . तू काय म्हणालीस आधुनिक आहेत! कोण ? कुणाबद्दल बोललीस? तुझं काही ठरलंय का? आणि बाबांना काहीही म्हणायचं नाही. "

मनिषाचा हा सूर ऐकून मृदुला थोडी चपापली पण सावरून घेत म्हणाली की

" तसं नाही ताई,आजकाल सगळे आधुनिक झालेत गं ! असं सिनेमातल्यासारखे व सिरियल सारखे खाष्ट सासू सासरे नसतात गं, म्हणून म्हणाले. पण एक आहे, बाबा मनाने कितीही चांगले असले ना तरीही त्यांना कधीच प्रेमाने वागता आलं नाही आपल्याशी . आई तर एकटीने संसार ओढते असं वाटतं मला."

"मृदु . . . काही कमी पडू दिलंय का त्यांनी कधी आपल्याला? कमावतात ना ते ,पैसा महत्वाचा असतो गं!"

"घ्या! अगं पैसा महत्वाचा असतो पण . . . प्रेम व आपुलकी नसेल तर काय उपयोग? असू दे. त्या रेणूच्या घरी , मैत्रिणीं कडे काय धमाल चालू असते. हसतं खेळतं घर असतं. मस्त जोक्स चालतात काका काकूंचे. भारी वाटतं गं! आपल्याकडे काय म्हटलं की चिडतील याचा भरवसाच नाही!"

"असतं प्रत्येकाचं वेगळं ,ते सोड! वरणफळं करू का मग? आईला तेवढीच मदत होईल."

कपबशा उचलत मनिषा म्हणाली व निघाली.

"वाह छान ताई! तू भारी करतेस ही डिश. आणि मदत लागली तर सांग!" डोळा मारत मृदुला म्हणाली.

" हो मदत लागेल ना , चव बघायला व खायला." हसतच ती आत गेली.

मृदुला अर्णवच्या विचारातच होती. तो सांगत होता की फक्त परीक्षांकडे लक्ष दे. बरोबरच आहे. हे सगळं होईल पुढे.

फ्रेश होवून ती अभ्यासाला बसली.

९.३० च्या दरम्यान डोर बेल वाजली व आल्या आल्या दोन शिव्या हसडून बाबांनी मिहिर ला आवाज दिला.

आई घाबरून बाहेर आली.

"काय झालं हो?"

"गाडी दिसत नाहीय बाहेर? युवराज आली नाहीत का? की गाडी मित्राला दान दिलीय?"

"आला तो तेव्हांच , मीच दुकानात पाठवलं होतं तेल आणयला. येईल इतक्यात."

हातातली बॅग आईकडे देवून ते हातपाय धुवायला खोलीत गेले. आईने पिशवी बेडरूम मधे ठेवली व टॉवेल व कपडे काढून ठेवू लागली.
मनिषाला हळूच इशारा केला की मिहीरला फोन लाव.

आई बाबांपासून नेहमी झाकून न्यायची. कारण मिहिरला बाबांनी आल्या आल्या चिडलेलं आवडायचं नाही. मग वाद व्हायचे. तो मित्रमंडळात रमायचा.
काही बाही सांगून ती सावरून घ्यायची.

मिहिर परत आला, ताईचा मेसेज वाचून येताना तेल घेवून आला. दारातून डोकावून पाहिलं बाबांनी बेडरूम मधे मस्त बैठक जमवली होती. ड्रिंक्स आणि स्नॅक्स मांडून मस्त फोन वर गप्पा चालू होत्या.

मिहिर किचनमधे येवून हळूच म्हणाला ," आई किती दिवस हे चालणार आहे? यांनी घराचा बार करून टाकलाय. "

"तू सोड ना ते, जावू दे बेटा! ते बाहेर जात नाहीत ना आजकाल . ते बरं की नाही."

" अगं तू काहीच का बोलत नाहीस ? आम्ही मोठे झालोत आता, सगळं कळतं मला. तू एकदा झापून काढ बरं त्यांना."

"मिहिर , असं नाही बोलायचं. ताई ताट वाढतेय जा बरं जेवून घे!"

आईने विषय दाबला.

आई नेहमी अशीच सगळं दाबत आली होती. अगदी स्वतःचे विचारही कधी मनमोकळेपणाने व्यक्त केले नाहीत.
भांडण किंवा कटकटीपासून लांब राहणं एवढंच तिचं ध्येय होतं जणु!

******************
0

🎭 Series Post

View all