भाग १
नेहमीप्रमाणे संध्याकाळी लायब्ररीत गेलेल्या सरिताचे लक्ष पुस्तक चाळता चाळता, 'तीन महिने अर्धवेळ ग्रंथपाल' या पदासाठी नेमणूक करणे आहे. बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक, महिलांना प्राधान्य, इच्छुकांनी संपर्क साधा.' या नोटीस बोर्डकडे गेले. आणि 'करावा का अर्ज या पदासाठी...' असा विचार तिच्या मनात चमकून गेला. वय, शिक्षण, अनुभवाची गरज नाही. सगळं कसं जुळून येतयं. शिवाय अर्ध वेळ म्हणजे... घरातली सगळी कामं आटपून येता येईल. कोणाची कसली आबाळ होणार नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे...असे विचार मनात घोळू लागले. विचारू की नको...करत ती तिथे बराच वेळ घुटमळली. लायब्ररीत फारशी गर्दी नव्हती. चौकशी करणं सहज शक्य होतं. पण ओठातून शब्द बाहेर पडत नव्हते. काहीशी विचित्र अवस्था झाली होती तिची.
तर, ज्ञानामृत वाचनालयाची ही शाखा सरिताच्या घराजवळ गेल्या वर्षी सुरू झाली होती. तशी आद्यावत एअरकंडीशन, दोन मजल्यांची इमारत असलेली मुख्य लायब्ररी, शहराच्या पूर्व भागात होती. पण ती जरा टोकाला होती. नोकरी करणाऱ्या वाचकांच्या दृष्टीने गैरसोयीची होती. बऱ्याच जणांच्या तक्रारी, सूचनांना ग्राह्य धरून, स्टेशनजवळ छोटा गाळा भाड्याने घेवूनं इथे शाखा सुरू करण्यात आली होती. घराजवळ रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर असल्यामुळे सरिताने काही महिन्यांपूर्वी लायब्ररी लावली होती.
"माझी मुलगी यायची आहे बाळंतपणासाठी, म्हणून मी सुट्टीवर जाणार आहे. माझ्याच जागी नेमणूक करायची आहे. पुस्तकांच्या देवाण घेवाणीची नोंद करायची. कोणी फी दिली तर पावती बनवायची. मुख्य शाखेला रिपोर्ट करायचा. जास्त काम नसतं इथे. मुख्य शाखेच्या मानाने वीस टक्के देखील काम नाही. या शाखेची सभासद संख्या फार जास्त नाही. काम नसल्यास हवं ते पुस्तक काढून वाचू शकता. ग्रंथालयाचं पॅकेज आहे. त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल. अवघड असं काहीच नाही. रविवारी आणि आपल्या सणांच्या दिवशी सुट्टी. कामाचा व्याप कमी त्यामुळे पगारही कमी. सुरवातीला तीन महिने म्हणत असले तरी, कदाचित पुढे एक्स्टेन पण करतील. पगारही वाढवतील नंतर. कोणी असेल तर नक्की सांगा." सरिताची चाललेली चलबिचल ओळखल्यामुळे असेल किंवा जोपर्यंत इथे कोणाची नेमणूक होत नाही तोपर्यंत आपली सुट्टी मंजूर होणार नाही. ह्यामुळेही असेल बहुतेक, देसाई मॅडमने सरिताला सगळी आवश्यक माहिती पुरवली.
हे सगळं ऐकून सरिताच्या आशा पल्लवीत झाल्या. आपल्यासाठी आयती संधी चालून आली आहे, असं वाटू लागलं. पण घरून परवानगी मिळेल की नाही, याची खात्री नसल्यामुळे ती नोकरी बद्दल देसाई मॅडमशी फार काही न बोलता पुस्तक बदलून तिकडून बाहेर पडली.
खरं तर छोटीशी कां होईना नोकरी करावी. स्वतःच्या पायावर उभं रहावं... अशी सरिताची फार पूर्वी पासूनच इच्छा होती. पण कधी संधीच मिळाली नव्हती. माहेरी घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. कसं बसं बी.ए. पुर्ण केलं. पदवीधर झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केला. दोन चार इंटरव्ह्यू पण झाले. कधी तिचं सिलेक्शन झालं नाही. तर, कधी फार लांब आहे...दोन तासांचा ट्रेनचा प्रवास, त्यामानाने पगार कमी, इतकी दूर नको... म्हणून घरच्यांनी करू दिली नाही. बऱ्याचदा तिचंही तेच म्हणणं पडलं. आणि आलेली संधी हुकली.
पुढे सरिताची आई घरातच पाय घसरून पडली. उजवा पाय फ्रॅक्चर. दीड दोन महिने सक्तीची विश्रांती. आई तर परावलंबी झाली. आता घरात करणार कोण...? सरिताची बहीण बारावीला होती. तर भाऊ दहावीला. दोघांची महत्वाची वर्ष, त्यांची फारशी मदत होणार नाही. त्या दोघांना डिस्टर्ब करायचं नाही. हे ओघानेच आलं. त्यात बाबांची पण फिरतीची नोकरी. वयोमानापरत्त्वे आजीला फारसं काही जमत नव्हतं. तेव्हा, तूर्तास तरी नोकरीची शोध मोहीम थांबवावी. घराकडे लक्ष दयावं. असं सर्वानुमते ठरलं. तिलाही ते पटलं.
क्रमशः
काय होतं पुढे ? अनेक वर्षापासूनचे सरिताचे नोकरीचे स्वप्नं पुर्ण होतं का...? वाचूया पुढील भागात.
००
००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा