Login

घरीच तर असतेस भाग २

हार न मानता परिस्थितीवर मात करणाऱ्या गृहिणीची कथा
भाग २

मागील भागात आपण पाहीले, आई आजारी पडल्यामुळे काही काळा करीता का होईना नोकरीची शोधमोहीम सरिताला थांबवावी लागते. आता पुढे….

आईच्या भूमिकेत शिरल्यामुळे सरिताची सकाळ पहाटे पाचलाच होत असे, बाबांचा, लहान भावाचा डबा, नाश्ता, घरातली स्वयंपाकापासून झाडलोट, कपडे भांडी, आईचं स्पंजिंग, वेणीफणी सगळी कामं तिलाच करावी लागत असत. त्यात आई पडल्यामुळे तिला भेटायला येणाऱ्या जाणाऱ्यांची रीघ लागलेली असे. शेजारी पाजारी, पाहुण्यांचे स्वागत, चहापाणी करता करता थकून जायची ती. लहान वयात सगळी जबाबदारी पडली तिच्यावर, फार करावं लागतं तिला...याची जाण होती आई, बाबा, आजी सगळ्यांनाच. पण, नाईलाज होता. कामवाली बाई ठेवणं खरचं परवडण्या सारखं नव्हत. म्हणूनच भाजी निवडणं, कपड्यांच्या घड्या घालणं अशी छोटी छोटी काम आई हळूहळू करायची. आजी देखील जमेल तशी मदत करायचा प्रयत्न करायची. पण लहान बहिण मात्र नेहमीच नामानिराळी असायची. तिला या सगळ्यांशी काहीचं देणंघेणं नसल्यासारखी वागायची. कॉलेज, मैत्रिणी वेगळं विश्व होत तिचं.

"अगं जरा लवकर उठून ताईला मदत करत जा, दिवसभर राबत असते ती."

"अभ्यास करू दे ग मला शांतपणे, क्लास टेस्ट आहे उदया माझी."

"आई, मी करते ना सगळं तू उगाच तिला बोलू नकोस, करू दे अभ्यास, कल्पना आणि केदार दोघांचं महत्वाचं वर्ष आहे. त्यांना डिस्टर्ब नाही करायचं..." म्हणत सरिता लहान भावंडांची बाजू घ्यायची.

"कामं सांगितली की तिला अभ्यास आठवतो, बाकीचा वेळ नट्टापट्टा,‌ टिव्ही बघण्यात जातो." कल्पना आणि आईची अशी नेहमीच वादावादी व्हायची.

"एवढ्या छोट्या जागेत, माणसांच्या गराड्यात अभ्यास होणे मुश्किल..." म्हणत कल्पना आपल्या मैत्रिणीकडे पसार व्हायची.

'कसं होणार या पोरीचं…? दोघी बहिणीत जमीन अस्मानचा फरक...' आई दिवसरात्र काळजी करत बसायची.

सरिता बहिणीची बाजू घ्यायची तरी एखाद्या कामात, कधी तरी का होईना तिने मदत करावी अशी तिचीही अपेक्षा असायची. पण स्वभाव आड यायचा. बोलायची मात्र काही नाही.

महिन्या दीड महिन्याने आईच्या पायाचे प्लास्टर काढण्यात आले. आणि सरिता जरा रिलॅक्स झाली. एम. ए. ला ॲडमिशन घेवून साईड बाय साईड नोकरी करायची. आता बाबांवर भार टाकायचा नाही तर स्वतः कमवून थोडाफार घरात हातभार लावायचा. या विचारात असतानाच, बाबा विवाह मंडळात नाव नोंदणी करून आले.

"मला पुढे शिकायचं आहे, नोकरी करायची आहे. एवढ्यात लग्नं नाही करणारं मी आई..."

"सुरवातीला सगळ्या मुली असचं बोलतात, नाव नोंदणी केली म्हणजे लगेच लग्नं ठरत नाही. पत्रिका, पसंती, देणंघेणं सगळं जुळून यायला कधी कधी वर्ष सुद्धा जातं. तुला नोकरी करायची तर कर आमची नां नाही. पण नोकरी करून पर्मनेंट होवू दे...तोपर्यंत लग्नं करणार नाही. हे असलं चालणार नाही..." आईने कडक शब्दात कानउघाडणी केली.

"तू कुठे काही जमवलं आहेस का?"

"नाही"

"झालं तर मग, उगाचं नाही म्हणू नकोस. बाबा रिटायर्ड व्हायच्या आत तुमच्या दोघींचं सगळं मार्गी लागायला पाहिजे."

जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्षापूर्वीचा काळ…मुलींनी करिअर ओरिएंटेड असावं. सेटल झाल्यावर लग्नं करावं, अशी मानसिकता सरिताच्या आईवडिलांची तरी नव्हती. लवकरात लवकर मुलींच्या जबाबदारीतून मोकळं व्हायची घाई त्यांना होती...

प्रॅक्टिकली विचार केल्यावर सरिताला आईवडिलांच म्हणणं पटलं व तिने त्यांच ऐकायचं ठरवलं.

काही दिवसातच तिला शरद सानेच स्थळ सांगून आलं. प्रायव्हेट नोकरी असली तरी, कंपनी नावाजलेली होती. आईला वडिलांची पेन्शन होती, बहिण दिल्या घरी सुखी होती. स्वतःच घर होतं फक्त मुलगी गृहकृत्यदक्ष हवी. नोकरी करणारी नको...एवढीच त्यांची अट होती. आणि तीच सरिताला खटकत होती.

फक्त ह्या गोष्टीसाठी एवढ्या चांगल्या स्थळाला नकार देणं मूर्खपणाच आहे. असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. पण, सरिताच काही ठरतं नव्हतं.

"मला कोणी सांगितलं नोकरी सोडं तर मी एका पायावर तयार आहे. नाईलाज म्हणून करते आणि तुला नोकरी नको करू म्हणतात तर, हौस आहे फार. एवढ्यासाठी या मुलाला नकार देवू नकोस. कदचित लग्नानंतर करू देतील नोकरी" सरिताला चुलत बहिणीने समजावले.

"शेवटी तुझं आयुष्य आहे, निर्णय तुला घ्यायचा आहे." म्हणतं हरप्रकारे सरितावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता.

क्रमशः

काय असेल सरिताचा निर्णय? वाचूया पुढील भागात…
०००

🎭 Series Post

View all