भाग ३
मागील भागात आपण पाहिले, आलेल्या स्थळाला होकार दयावा, यासाठी सगळे कुटुंबीय सरिताची मनधरणी करत होते… आता पुढे…
खरं तर सरिताला शरद मनापासून आवडला होता. हाच आपल्या भावी आयष्याचा जोडीदार...अंर्तमनाने कौल सुद्धा दिला होता. फक्त नोकरी करणारी मुलगी नको ही अट खटकत होती. बाकी नाही म्हणण्यासारखं काहीचं नव्हतं. अखेर हृदयाची साद अंर्तमनाने ऐकली. आणि सरिता शरदमय झाली.
तिचा निर्णय ऐकून घरातले चिंतेचे सावट क्षणात दूर झाले. आनंद उत्साहाला उधाण आले. बाबा आणि काकांनी शरदच्या कुटुंबीयांची भेट घेतली. रीतसर बैठक झाली, लगेचच साखरपुडा, लग्नाची तारीख ठरली.
खरेदीच्या निमित्ताने झालेल्या भेटीत आपली निवड योग्य असल्याची सरिताला खात्री पटली. संसाराच्या सुख स्वप्नांनी ती मोहरुन गेली. रुखवत, पत्रिका, आमंत्रण, केळवण यांची लगबग सुरू झाली.
चार महिन्यांनंतर सरिता व शरदचा दणक्यात विवाह संपन्न झाला. सौ. सरिता शरद साने नामक तिच्या आयुष्याचा नवीन आध्याय सुरू झाला. पूजा, गोंधळ, देवदर्शन सगळे कुळाचार आटपून महाबळेश्वरला गेलेले...नवविवाहित दांपत्य तिथल्या गुलाबी थंडीत एकमेकांच्या मिठीत विरघळूनं एकरूप झाले. नव्या नवलाईचे दिवस…सगळं काही छान चालू होतं. ओंजळ सुखाने भरून दुथडी वाहत होती. हळूहळू सरिता सासरी रुळत होती.
सासूबाई जरा कडक स्वभावाच्या होत्या, वेळेच्या बाबतीत काटेकोर होत्या. कामं वेळेत झाली पाहिजेत हा त्यांचा खाक्या होता. घरात इनमीन तीन माणसं, सासूबाई, शरद, सरिता…शरद कामावर गेल्यावर सरिताला खूप कंटाळा यायचा. कामंधामं आटपल्यावर दुपारचा वेळ खायला उठायचा.
"मी एम. ए. ला अॅडमिशन घेऊ का? किंवा नोकरी शोधू" धीर एकवटून तिने शरदला विचारले.
"नोकरी कशाला? काय कमी आहे तुला?" त्याचा स्वर त्रासिक झाला.
"दमून भागून घरी आल्यावर माझी बायको डोळ्यासमोर हवी मला" तिला जवळ घेतं, गोड बोलूनं त्याने विषयच संपवला. बसली मग तीही गप्प नाईलाजाने…
पुढे माहेरी गेल्यावर गप्पांच्या ओघात "बघ नां आई, नां हे मला पुढे शिकू देतं नां नोकरी करू देत..." म्हणत घडलेला प्रसंग सरिताने आईला सांगितला.
"अजून आहेच का हे खूळ डोक्यात, अगं नाही आवडत नां त्यांना, मग कशाला उगाचं मिठाचा खडा घालतेस. वर्षसण, मंगळागौर सगळं एन्जॉय करायचं सोडून हे काय घेवून बसली आहेस?" आईने जावयांची बाजू घेतं मोडता घातला.
"एकदा का पाळणा हलला की वेळ पुरणार नाही तुला..."
काही महिन्यातच आईचे हे शब्द खरे ठरले, लग्नाला वर्ष होत नाही तोच मातृत्वाची चाहूल लागली. ईशानचा जन्म झाला, पाठोपाठ अडीच वर्षांनी शिवानीचा…आपल्या दोन्ही मुलांचं संगोपन, संस्कार, शाळा, अभ्यास याखेरीज सणवार, नातीगोती, पै पाहूणे, घरातली सगळी कामं करता करता तिला वेळ पुरेनासा झाला.
सरिता सगळ्या आघाड्या समर्थपणे पेलतेयं म्हंटल्यावर दरमहा ठराविक रक्कम दिली की आपली जबाबदारी संपली ही शरदची भूमिका कायम होती. त्याची कशातच मदत नव्हती.
सगळ्यांचं सगळं करुन सवरूनही "घरीच तर असतेस, काय काम असतं तुला?" म्हणतं सरिता कायमच उपेक्षली जात होती. 'सगळेच गृहीत धरतात मला...' यामुळे ती कमालीची अस्वस्थ होत होती.
"मुलं आता बर्यापैकी मोठी, सुटसुटीत झाली, काही तरी करावसं वाटतं, पण… शरद बिल्कुल नोकरी करून देणार नाहीतं. लहान मुलांच्या ट्युशन्स घेऊ शकते. पण जागा लहान..." सरिताने आपल्या मनातली खंत मैत्रिणीला बोलून दाखवली.
"तुझ्या हाताला चव आहे सरू, तुला स्वयंपाकाची आवडही आहे. उकडीचे मोदक, पुरणपोळी, दिवाळीचा फराळ अप्रतिम बनवतेस तू, ऑर्डर का घेतं नाहीस ?"
"जमेल मला ?"
" नं जमायला काय झालं ? घर सांभाळून करू शकतेस, सुरवातीला छोट्या छोट्या ऑर्डर घे, हल्ली घरगुती पदार्थांना फार मागणी आहे, जमं बसला की वाढवं व्यवसाय. नोकरी म्हणजे पूर्ण वेळ बांधिलकी...त्यापेक्षा हे बरं, जमत असेल, तर ऑर्डर घ्या. अन्यथा नाही म्हणा, "हल्ली गृहउद्योगाला कर्ज पण पटकन मिळत."
कर्ज घेवून व्यवसाय करायला शरद कधीच परवानगी देणार नाही. हे माहित होते सरिताला...आणि मुळात तिलाही फार मोठं काही करायचं नव्हत, घरसंसार संभाळून चार पैसे कमवते, संसाराला हातभार लावते, एवढंच समाधान हवं होत तिला…
सरिताला मैत्रिणीचा सल्ला पटला, हिंमत करून तिने जेवताना घरात विषय काढला.
"म्हणजे आता सान्यांची सून दारोदार पोळपाट, लाटण घेवून फिरणार, ही असली थेरं मी जिवंत असेपर्यंत तरी चालणार नाहीत." तिचं बोलणं समजून नं घेताच सासूबाई कडाडल्या.
"मी काही घरोघरी जाऊन स्वयंपाकाची कामं करणार नाही, ठराविक पदार्थ ऑर्डरनुसार बनवून देणार आहे."
"लोक काय म्हणतील ? एवढी वेळ आली ह्यांच्यावर…तुला फुकटचे सल्ले देणाऱ्या मैत्रिणीला म्हणावं तूच कर हे असले गृहउद्योग, नाही म्हणजे नाही, परत घरात हा विषय नको ."
सरिताला वाटले, शरद आपल्या बाजूने बोलेल. पण तो आईच्या धाकाने नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसला होता.
क्रमशः
काय होतं पुढे…पाहूया पुढच्या भागात..? पाहूया...
०००
०००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा