भाग ४
मागील भागात आपण पहिले, आपल्या संसारासाठी धडपडणाऱ्या. नोकरी, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सरिताला घरच्यांकडून हवा तसा पाठिंबा मिळत नव्हता…आता पुढे…
खरं तर, एकाच्या पगारात भागत नाही ही वस्तुस्थिती होती. म्हणजे अगदी उपासमार, खायची भ्रांत अशातला भाग नव्हता. तसं सुखवस्तू कुटुंब होत त्याचं. पण एक्स्ट्रा खर्च आ वासून समोर उभे राहिले की ओढाताण होत होती. आधुनिक तंत्रज्ञान…बरीचशी कामे मशिन्स करत असल्यामुळे शरदचे ओव्हरटाईम कमी झाले होते. परिणामी पगार कमी मिळत होता. शरदवर ताण पडत होता. म्हणूनचं सरिताचा जीव तळमळत होता. पण शरद साथ देत नव्हता. त्याला त्याची बायको सतत घरात हवी होती.
कधी कधी सरिताला वाटायचं, 'कशासाठी करते मी एवढा नोकरीचा अट्टाहास…इतकी वर्ष शरदच्या मनासारखं वागले. ते म्हणतील ती पूर्व दिशा…त्यांना आवडत नाही नां…मग नको, ह्यापुढे देखील असेच वागते…आला दिवस ढकलते. पण मुलांचे काय? त्यांनी का मन मारून जगावं ? हौसमौज जाऊ दे…त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय करून ठेवायला नको का? हल्ली नुसत्या पदवीला कोण विचारतयं? असे अनेक अनुत्तरित प्रश्नं सरिताच्या मनात थैमान घालायचे.
असो, मध्यल्या काळात सरिताच्या बहिणीचे लग्न झाले,. शिक्षणात तशी तीची गती कमीच होती. गाडी सेकंड इयर पर्यंत येऊन अडकली होती. त्यामुळे तीने ब्युटी पार्लरचा कोर्स केला. आपल्या सौंदर्याच्या जोरावर गडगंज श्रीमंत मुलगा बघून, घरच्यांचा विरोध पत्करून आंतरजातीय प्रेमविवाह केला. अर्थात कालांतराने विरोध मावळला होता. ही बाब वेगळी. तिच्या नवऱ्याने तिला स्वतःचे पार्लर काढून दिले. तीन - चार मुली हाता खाली कामाला ठेवूनं ती दिमाखात मिरवत होती. सरिताचा भाऊ देखील अकाऊंट म्हणून कार्यरत होता. सरिताच्या नोकरी करण्याला सतत विरोध करणाऱ्या आईने आपली सून मात्र अटीतटी घालून नोकरीवाली बघितली होती. आपल्या कमावत्या सुनेचे, धाकट्या मुलीचे आईला भारीच कौतुक होते. सरिताची नणंद सुद्धा टीचर होती. नववी, दहावी मोठ्या वर्गांना शिकवत असल्यामुळे तिचा वेगळाच तोरा होता. ह्या सगळ्या नोकरदार स्त्रियांमध्ये सरिता एकटीच आऊट डेटेड वाटायची. त्यांचे विषय वेगळे. शिवाय स्वतः कमवत असल्यामुळे हातात पैसा खुळखुळत होता. हवा तसा त्या खर्च करू शकत होत्या.
'ह्यांना विचारून सांगते किंवा कशाला एवढा खर्च मी घरीच बनवते, पोटभर होईल.' अशा सरिताच्या विचारांची, नेहमीच खिल्ली उडविली जायची. खरेदीला जाताना वहिनी, बहीण, सरिताला न्यायला टाळाटाळ करायची. तीही बिचारी नाहक खर्च नको म्हणत घरीच रहायची. काम असेल तर सगळ्यांना तिची आठवण यायची. तू घरीच असतेस, मॅनेज करू शकतेस, मला सुट्टी, वेळ नाही...म्हणतं अनेक कामं तिच्या माथी मारली जायची. ती पण कमी तिथे आम्ही, म्हणत आनंदाने मदतीला तत्पर असायची. तरीही गरज सरल्यावर डावलली जायची.
त्यात सरिताचे सासर, माहेर गावातच होते. अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे माहेरी रहायला मिळायचं नाही. पण बरेचदा कामानिमित्त, कारणाने तिची दोन चार दिवसात माहेरी चक्कर व्हायची. कल्पना तर वर्षाकाठी एक दोनदा माहेरी यायची. येताना भाचरांसाठी महागडी खेळणी, इम्पोर्टेड चॉकलेट्स घेवून यायची. वहिनीला ब्रँडेड कॉस्मेटिक मोफत पुरवायची. आईला हात खर्चासाठी पैसे दयायची. तर कल्पनाचा नवरा सासू सासऱ्यांना चारधाम यात्रा, पंढरपूर कुठे नां कुठे घेवून जायचा. आपल्या अलिशान एसी गाडीतून फिरवायचा. त्यामुळे सुरवातीला नकोसा वाटणारा धाकटा जावई, सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता. शरद कंजूस होता अशातला भाग नाही. पण, एवढा खर्च त्याच्या आवाक्या बाहेरचा होता.
मुलांना सुद्धा हातावर वडी किंवा लाडू ठेवणाऱ्या सरिता आत्त्यापेक्षा कल्पना आत्या जास्त आवडायची. मुलांची काही चूक होती अशातला भाग नाही. ती फक्त मोठ्यांच अनुकरण करत होती.
एकंदरित काय तर, पैसा मोठा झाला होता…सुरवातीला सरिता आपल्याच माणसांकडून काय मानपानाची अपेक्षा करायची म्हणतं ह्याकडे दुर्लक्ष करायची. पण हल्ली घरीच तर असतेस…म्हणतं सततच ते हिनवणं, गृहीत धरणं, यामुळे जास्तच दुखावली जायची.
मुलांनी का विनाकारण परिस्थितीचे चटके सोसावेत ? कुटुंबीयांकडून मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक या सगळ्यांवर तूर्तास तरी एकच उपाय होता…अॅडिशनल इन्कम…नोकरी…पण शरदला ते मान्य नव्हतं.
क्रमशः
या सगळ्यातून मार्ग काढता येईल का सरिताला? पाहूया पुढील भागात.
०००
०००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा