Login

घरीच तर असतेस भाग ५

हार न मानता परिस्तिथीवर मात करणाऱ्या गृहिणीची कथा
भाग ५… अंतिम

मागील भागात आपण पाहिले, सरिताला माहेरी कोणी किंमत देत नव्हतं. सासरी सुद्धा फार वेगळी परिस्थिती नव्हती. शरदलाही कोणी विचारत नव्हतं. आपल्याच माणसांच्या अश्या वागणुकी मुळे, सरिता चांगलीच दुखावली गेली होती. आता पुढे…

"आई आपण कधीच कुठे गावाला जात नाही."

"हे काय मध्येच, गेलो होतो की दिवाळीत कोल्हापूर, नरसोबाच्यावाडीला. मागच्या महिन्यात ईशानच्या वाढदिवसाच्या दिवशी नेलं होत की बाबांनी वॉटरपार्कला."

"देवदर्शन, सकाळी जाऊन संध्याकाळी परत. तसं नको, गोवा…दिल्ली लांब कुठेतरी...सौरभ, काव्या सारखं."

"हो जाऊ या, या सुट्टीत मी सांगते बाबांना."

मुलं आनंदाने नाचत खेळायला पळाली. मुलांना काय म्हणायचं ती बरोबर समजली.

मामा गावातच होता. आत्याचं सासरी मोठं खटलं. ती नेहमी व्यस्तं…जाणार तरी कुठे ? मुलांसारखं सरिताला सुद्धा नेहमी वाटयचं, चार दिवस कुठे तरी जावं रिलॅक्स व्हावं…माहेर लांब असतं तर पंधरा दिवस निवांत जाऊन रहाता आलं असतं…

खरं तर, 'ज्ञानामृत वाचनालयाची' नोकरी संदर्भातील जाहिरात पाहिल्यानंतर सरीता आपल्याच विचारात होती. घरी येऊन आपली कामं उरकताना पंधरा सोळा वर्षांचा इतिहास चित्रफितीसारखा डोळ्यासमोर तरळला होता तिच्या…मुलांच्या प्रश्नांनी तिची तंद्री भंग झाली. वरील प्रसंगामुळे तिचा निर्धार अजूनच पक्का झाला. काही झालं तरी शरदशी आज बोलायचं. त्याचा होकार मिळवायचा.

पण नेमका आज शरदला यायला उशीर झाला, त्यात लाईट गेलेले. त्याची चिडचिड, त्रागा ओघानेच आला. आता बोलण्यात अर्थ नाही, गप्प बसण्यात शहाणपण सरिताने ओळखले.

दुसऱ्या दिवशी मुलं सकाळी शाळेत गेली होती तर सासूबाई देवळात. शरद सेकंड शिफ्ट असल्यामुळे निवांत होता. मूडही बरा होता. त्यामुळे वेळ न दवडता सरिताने ज्ञानमृत वाचनालयातील व्हॅकंसीबद्दल, देसाई मॅडमने दिलेल्या माहितीबद्दल त्याला सर्व सांगितले.

'परत झालं का हिचं सुरू...' तो चांगलाच वैतागला. पण ती ह्यावेळी माघार घेणार नव्हती. तिने आपल्याला दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक…दूजाभाव…यामुळे होणारी तिची घुसमट…ओढाताण, मुलांचा आणि तिचा काल झालेला संवाद सगळं काही अगदी सविस्तर सांगितलं त्याला. तसं त्याला कळत नव्हत अशातला भाग नव्हता. तो दुर्लक्ष करत होता एवढंच.

"करू दया नां मला नोकरी. लगेच मिळेल असं‌ नाही. कमीत कमी प्रयत्न तरी करू दया. मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी, आपल्या म्हातारपणाची सोय म्हणूनं आताच हातपाय हलवायला नकोत का?" काकुळतीला येऊन ती म्हंटली.

"म्हणजे मी हातावर हात ठेवून बसलोय... काहीच करत नाही, असं वाटतं का तुला ?" त्याचा आवाज वाढला.

"असं कुठे म्हणते मी, तुमचा प्रयत्न चालूच आहे, तुमच्या एकट्यावर ताण नको म्हणून…"

बरेच वादविवाद झाले दोघात. अखेर यावेळी ती कोणाचं ऐकणार नाही हे लक्षात आल्यामुळे असेल, तिचं म्हणणं पटल्यामुळे असेल अथवा ज्या वास्तवापासून तो पळण्याचा प्रयत्नं करत होता. ते स्विकारण्या शिवाय पर्याय नाही. हे लक्षात आल्यामुळे असेल त्याने तिला परवानगी दिली.

त्याचा होकार येताच, तिने लगेचच लायब्ररीमध्ये जाऊन अर्ज दिला. देसाई मॅडमशी बिझी असल्याने फारसं बोलणं झालं नाही. "कळवते" त्या मोघम म्हंटल्या.

पुढे आठ दिवस काहीच नाही घडले. सरिताला वाटले, आपले सिलेक्शन नाही झाले. तिने ओळखीत सगळीकडे सांगतं नोकरी शोधणे सुरू केले. बहिणीने, वहिनीने नेहमीप्रमाणे, "जमणारं‌ आहे का तुला ?" म्हणत तिचा हिरमोड करण्याचे प्रयत्नं केले. पण ह्यावेळी नाक मुरडणाऱ्यांकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करत तिने दुर्लक्ष केले.

"अखेर चार दिवसांनी मुख्य शाखेत उदया सकाळी दहा वाजता भेटायला या." असा फोन आला. देसाई मॅडमने शिफारस केली असली तरी, रीतसर इंटरव्ह्यू घेवून मगच सरिताची निवड करण्यात आली. उद्यापासूनचं जॉईन व्हायला सागितलं. मोठ्या मुश्किलीने इथपर्यंत पोहोचलेल्या सरिताला आभाळ ठेंगनं‌ झाल्यागत झालं. नोकरी…तिच्या आयुष्यातील नवं पर्व सुरू झालं.

कामसू वृत्ती, नवीन शिकण्याची आवड, सुंदर हस्ताक्षर, कामात चोख तसेच वेळेची पाबंद असलेल्या सरिताने लवकरच नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांची मर्जी संपादन केली.

नोकरीला लागल्यावर तिने घरी सुद्धा कुठल्याच कामात दिरंगाई केली नाही. मुलांचा अभ्यास असो वा सासूबाईंचे पथ्यपाणी, सगळं पहिल्यासारखचं व्यवस्थित सांभाळत होती ती. ह्यामुळे सासरी, माहेरी सगळ्यांचाचं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सासूबाई स्वतःहून कुकर वगैरे लावून ठेवू लागल्या. आयता चहाचा कप तिच्या हातात देवू लागल्या. शरद सुद्धा जवाबदारीने वागू लागला. बिलं भरणे यासारखी कामं तो स्वतःहून करू लागला. सरिताच्या एका निर्णयामुळे घरात बराच सकारात्मक बदल झाला.

पहिला पगार हाती पडताच तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. छत्तीस वर्षातील तीची पहिली कमाई…याआधी फक्त खाऊसाठी, पास झाल्यावर तिच्या हाती पैसे ठेवले जायचे. पुढे लग्नं झाल्यावर नवरा देवू लागला घर खर्चासाठी.

तीन महिने भर्रकन गेले. मुख्य शाखेत भेटायला या, असा मेसेज पाहून आपली इथली गाशा गुंडाळायची वेळ आली. सरिताने लगेच ओळखले. पण तिकडे गेल्यावर काहीतरी वेगळेच घडले.

स्टेशन विभागात सुरू झालेल्या ज्ञानमृत लायब्ररीची वाढलेली सभासद संख्या, वाचकांचा प्रतिसाद पाहून शाखा पूर्णवेळ चालू ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. देसाई मॅडम अजून महिन्याभराने कामावर रुजू होणार होत्या. त्या आल्या की त्यांची बदली मुख्य शाखेत करण्यात येणार होती.

"तुझ्या कामावर सगळेच खूश आहेत सरिता, तूच स्टेशन शाखेचं कामकाज पूर्णवेळ पहावं अशी संचालक मंडळाची इच्छा आहे. लायब्ररी दुपारी बंद असेल, सकाळी आठ ते बारा , संध्याकाळी साडेचार ते साडेआठ दोन्ही वेळा तुला यावं लागेल. वेळ वाढल्या कारणाने पगारही वाढेल. तुझ्या घराजवळ लायब्ररी असल्या कारणाने तुला जमेल असं आम्हा सगळ्यांना वाटतयं. दोन दिवसात कळवं, पुढच्या आठवड्यापासून दोन्ही वेळ लायब्ररी चालू करू." विश्वस्त असलेल्या अनुराधा मॅडमने तिला सविस्तर सगळे सांगितले.

हे असे काही होईल सरिताला स्वप्नांत सुद्धा वाटले नव्हते. कायमस्वरूपी नोकरी, पगारवाढ…तिचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. कष्ट करायची तयारी असेल तर, मार्ग सापडतोच. याची प्रचिती आली तिला.

ह्यावेळी शरद नकार देणार नाही हे माहीत असल्याने, तिने तात्काळ होकार कळवला.

"ऑफिशिअल लेटर मेल करते." म्हणत मॅडमने तिला शुभेच्छा दिल्या.

सरिताने घरी सगळ्यांना ही बातमी देताच, त्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. सासूबाई देवापुढे साखर ठेवायला गेल्या.

"आईचा विरोध होता म्हणून सुरवातीला मला नोकरी करणारी बायको नको होती. काही दिवसातच तुझ्या हुशारीची चुणूक जाणवली. तू माझ्यापेक्षा पुढे जाशील, न्यूनगंड बळावला. कुठेतरी पुरुषी अहंकार आड आला. तुला घरात डांबून खूप चूक केली मी...तुला समजून घ्यायचा प्रयत्न सुद्धा नाही केला." हात हाती घेत शरदने सरिताची माफी मागितली.

"संसारात थोडं तुझं‌, थोडं माझं चालायचंच..." समजूतदार सरिताने त्याला माफ केले.

दुसऱ्या दिवशी शरद लवकर उठून तयार होवून बसला होता. त्याला लवकर जायचे असेल असा तिचा समज झाला. पण तो तर तिला सोडायला सज्ज झाला होता.

"दोन वेळा जायचं म्हणजे चार खेपा होणार, तू गाडी शिकून घे सरिता, दिवाळीच्या बोनस मध्ये अॅक्टिव्हा घेवू तुला, तोपर्यंत हा ड्रायव्हर जेव्हा जमेल तेव्हा सोडेल तुला."

"जवळच तर आहे दहा मिनिटाच्या अंतरावर, गाडी कशाला ?"

"मी शिकवेन तुला."

"मुळात असं हक्काचं माणूस रोज सोडणार असेल तर गाडी शिकायचीचं कशाला ?" म्हणत
त्याच्या मागे बसत, ‌भुरभुरणाऱ्या वाऱ्यावर, 'घरीच तर असतेस' हे बिरूद भिरकावत. ती टेचात त्याच्या मागे बसून लायब्ररीत निघाली.

हार न मानता परिस्तिथीवर मात करत तिने तिच्या संसाराची घडी सुरळीत बसवली.

समाप्त.

🎭 Series Post

View all