घरकोन भाग 27

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड, प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन....

घरकोन-27
©®राधिका कुलकर्णी.

सकाळी लगबगीने तयार होऊन रेवा स्टँडवर पोहोचली.
हवेत एक प्रसन्न गारवा जाणवत होता.आत्ताशी कुठे सुर्य उगवून त्याची सोनेरी प्रभा सर्वत्र पसरवत होता.
वातावरणात आज काहीतरी वेगळेच आकर्षण होते.रेवाची नजर सुशांतलाच शोधत होती.
ठरल्यावेळी सुशांतही तिचीच वाट पहात आधीच तिकडे हजर होता.
पाचच मिनीटात गाडी स्टेशनमधे आली.
दोघेही गाडीत चढुन दोघांसाठीच्या सीटवर बसले.
रेवाला खूपच वेगळे काहीतरी वाटत होते.
सुशांत बरोबर आता किमान तिन तास तरी असेच बसायला मिळणार,खूप साऱ्या गप्पा करायला मिळणार ह्या नुसत्या विचारांनीच तिला आतुन रोमांचक वाटत होते.
सुशांत बरोबर इतक्या वेळ एकत्र घालवायची संधी तिला ह्या आधी कधीच मिळाली नव्हती,त्यामुळे आज अचानक एखादी लॉटरी लागावी त्यापेक्षाही जास्त आनंद होत होता.
सुशांतच्याही भावना जवळपास अशाच काहीशा होत्या फक्त तो त्या उघडपणे दाखवत नव्हता इतकेच.
गाडी हलली आणि एका रोमांचक प्रवासाला सुरवात झाली.
रेवाला तर क्षणभर एक वेगळाच विचार मनात आला आणि ती आपल्याच विचारांनी मनोमन लाजली.
सुशांत तिचे हावभाव टिपत ती का अशी लाजतीय हेच न्याहाळत होता पण त्याला समजत नव्हते की हि का स्वत:च स्वत:शी लाजतेय म्हणुन त्याने उत्सुकतेपोटी प्रश्न विचारला.
"काय ग,काय झाले?अशी गालातल्या गालात स्वत:शीच का हसतेय?"
त्यावर लाजतच रेवाने उत्तर दिले,"काही नाही, असेच."
"असेच कसे?काहीतरी तर कारण असेलच,फक्त मला सांगायचे नाहीये ना?"
"अरे तसे काही नाहीये."
माझ्या डोक्यात काहीतरी स्टुपीड कल्पना येता म्हणुन हसु आले,बाकी काही नाही."
"बरऽऽऽ,पण मग मलाही सांग ना तुझे ते स्टुप्पीड विचार."
"नको,तू मला वेड्यात काढशील."
"अग,आता ह्याच वेडेपणाबरोबर आयुष्य काढायचा धाडसी निर्णय घेतलाय ना मी,मग नुसत्या विचारांनी काय होणार आहे,सांगुन टाक."
"सुशांऽऽऽत!
मी वेडी काय?"
लटक्या रागाने सुशांतवर रूसतच तिने त्याला दोन चार धपाटे मारले.
"ओकेऽऽ ओके,सॉरी बाबा..,आता तरी सांग काय विचार करत होतीस."
मग आढेवेढे घेत रेवाने सांगायला सुरवात केली.
"सुश,मी तुझ्याबरोबर नगरला निघालेय ना,तर मला आत्ता कसे वाटतेय सांगू?"
कसे? सुशांतने परतुन प्रश्न केला.
"म्हणजे मी अशी कल्पना करतेय की आपले लग्न झालेय आणि तू मला पहिल्यांदा माहेरहून सासरी न्यायला आलाएस आणि आपण सोबत सासरी निघालोय."
"नुसत्या कल्पनेनेच मला शहारून आलेय बघ ना."
अच्छाऽऽऽ म्हणजे हे कारण आहे होय."
"अजुन काही कल्पना नाही ना केल्यास हे सोडून."आता सुशांतही मस्करीमधे तिची खेचत होता.
रेवाला त्याचा रोख कळला तशी तीही लाजली.
"बास हंऽऽ सुश,अगाऊपणा नको करूस."
दोघांचीही अशीच चेष्टामस्करी करता करता वेळ कसा गेला कळलाच नही आणि म्हणता म्हणता नगर जवळ आले.
आज प्रवास इतक्या पटकन कसा संपला असेच सुशांतला वाटत राहीले,एरवी हाच प्रवास एकट्याने इतका कंटाळवाणा व्हायचा की कधी घरी पोहोचतोय असे व्हायचे.
दोघेही बसमधुन उतरून रीक्षाने घराकडे निघाल्यावर मात्र रेवाला अचानक दडपण यायला लागले.
सुशांतने दिलेल्या ह्या बातमीने घरात काय प्रतिक्रीया उमटतील,काही विपरीत प्रतिक्रीया आलीच तर मी नेमके काय करू?जाऊ की थांबू.?"
विचारांच्या नादात नकळत रिक्षा ब्रेक लागुन थांबली आणि रेवा भानावर आली.
"सुश,एक बोलु का?"
"हं,बोल ना."
"माझे इकडे कोणीही नातेवाईक नाहीत.जर घरी काही विपरीत प्रतिक्रीया उमटल्याच तर मग मी काय करू,कुठे जाऊ?"
"Am really feeling so worried."
रेवाने आपली काळजी न राहवून बोलुन दाखवली.
त्यावर सुशांतनेही उत्तर दिले,"तूला वाटते तसे काही होणार नाही डिअर,प्लिज डोन्ट गेट वरीड."
"आणि जरी तसे काही झाले तरी मी प्रयत्नपुर्वक कन्व्हीन्स करेन आईला,प्लिज ट्रस्ट मी."
सुशांत खूप कॉन्फीडन्सने बोलत होता त्यावरून रेवालाही थोडा धीर आला की सुश नक्कीच आईचा होकार मिळवण्यात यशस्वी होईल.
मनोमन देवाचा धावा करतच ते दोघेही घराजवळ पोहोचले.
सुशांतच्या काकांचा बंगला खूपच मोठ्ठा,सुंदर आणि आकर्षक होता.
बंगल्याच्या सभोवताली छोटीशी बाग होती.
बागेतच मधोमध एक छोटा तलाव आणि त्यात कारंजे होते.
कारंज्याच्या भोवतालीच कमळे डोलताना दिसत होती.
खालची हिरवळ पण कापणी करून व्यवस्थित मेंटेन केलेली होती.
तिकडेच बसायला अशी एक छोटीशी बैठक केलेली होती.
बाजुलाच एक झोपाळाही दिसत होता.
कंपाऊंडच्या सभोवतालने चारही कॉर्नर्सना बहूतेक अंब्याची झाडे दिसत होती.
एकंदर सगळ्या दृश्यस्थितीवरून त्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी चांगली होती हे सहज कळत होते.
सुशच्या वडिलांच्या जीवावर काका खूपच सुखासीन आयुष्य जगत होते हे दिसतच होते.
आज सुशचे वडील हयात असते तर हे सगळे वैभव सुशांतचे आणि त्याच्या आईने उपभोगले असते पण दैवाचा खेळ कुणाला चुकलाय?
सुशांतने डोअरबेल वाजवून दरवाजा उघडे पर्यंत रेवाच्या मनात हे सगळे विचार उमटून गेले.
पुन्हा एकदा दरवाजा उघडण्याची चाहूल लागली आणि रेवाच्या मनाची धडधड वाढायला लागली.
दार आईनेच उघडले.
सुशांतला दारात बघुन आईचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आनंद,आश्चर्य सगळ्या भावनांची एकत्रीत दाटीवाटी चेहऱ्यावर साफ दिसत होती.काकुंनी प्रेमाने सुशांतला आत घेतले.त्याच्या मागोमाग मला बघुन पुन्हा काकुंच्या चेहऱ्यावर तेच सगळे भाव झरकन उमटून गेले.
माझेही त्यांनी हसुन स्वागत केले.
रेवाला सुचतच नव्हते की नेमके काय बोलावे.
"काकुंनी काही विचारलेच तर काय उत्तर देऊ?"
काकूंनी दोघांसाठीही पाणी आणले.
तिने घटाघट पाणी पिऊन घशाची कोरड शमवली.
तिन तासाच्या प्रवासातुन घरी पोहोचायला साधारण दुपार झाली होती त्यामुळे हवेत बऱ्यापैकी उष्मा जाणवत होता.
त्यात मनावर असलेल्या अनामिक दडपणामुळे रेवाला जरा जास्तच घामाघुम होत होते.
जरा तोंडावर पाणी मारायचे निमित्त करून तिने काकुंना वॉशरूम विचारत तिकडे पळ काढला.
मी सुशांत बरोबर का आलीय हा प्रश्न जर काकुंच्या मनात असेल तर तो विचारायला त्यांना प्रायव्हसी मिळावी आणि स्वत:लाही सावरायला तिला थोडा एकांत हवाच होता.
थोड्यावेळ वॉशरूम मधेच थांबुन मनाला आणि चेहऱ्याला थोडे फ्रेश करून ती बाहेर पुन्हा बैठकीत आली.इतका वेळ झाला तरी घरात इतर कोणाचीच हालचाल दिसत नव्हती.
सगळे बाकीचे लोक कुठे आहेत हा विचार अचानकच रेवाच्या मनात तरळुन गेला.
ती हॉल मधे एकटीच होती आता.
सुशांतही दिसत नव्हता.
काकुंचा किचनमधे कसलासा आवाज येत होता.
ती भीतभीतच किचनमधे गेली.काकु सरबत करत होत्या.तिने आत जाताजाताच काकुंना काहीतरी बोलावे म्हणुन विचारले,"आत येऊ का काकू?"
"अगं ये की,विचारायचे काय त्यात."
दुपारची वेळ म्हणुन कोकमचे सरबत केलेय,चालेल ना गं?"
"हो काकू चालेल काय धावेल.."
रेवानेही हसुन उत्तर दिले.
"घरात बाकीचे कोणी दिसत नाहीत,कुठे गेलेत सगळे?"
रेवाने घाबरतच प्रश्न केला.
इतर कोणी घरी नसतील तर बरेच होईल असे मनोमन रेवाला वाटत होते कारण जर काही उलट सुलट झालेच तर गोष्टी फक्त तिघांमधेच राहतील एवढीच काय ती तिची मनिषा होती.
मनाचाच कौल अखेर खरा ठरला.
कारण काकुंनी तिला अपेक्षित तेच उत्तर दिले.
सुशांतचे काका-काकु कुठल्याशा कार्यानिमित्त बाहेरगावी गेले होते.दोन दिवसांनी परत येणार होते.त्यातल्या त्यात बरे म्हणुन बातमी ऐकुन रेवाला हायसे वाटले.
मग रेवाने काकुंना स्वैपाकात मदत म्हणुन किचनमधे गेली.माहेरी एवढ्या मोठ्या कुटुंबात राहलेल्या रेवाला किचन काम कधी करायची वेळच आली नाही नंतर शिक्षणामुळे बाहेर त्यामुळे स्वैपाकातले तिला फारसे काही येतच नव्हते पण तेवढीच काकुंना काहीतरी मदत म्हणुन ती किचनमधे उभी होती.
"काकु,काय मदत करू? काही चिरायचे काम असेल तर द्या ना मी करते."
काकू हसुनच म्हणल्या,"तूला येतो का गं स्वैपाक?"
"आजकालच्या मुलींना स्वैपाक शिकायलाही वेळ नसतो."
"मलाही सवय नाहीये काकू."
"घरी आई,काकी,आत्या माझी आज्जी इतकेजण असल्याने मला कधी कामच पडले नाही किचनमधे जायचे."
"आता निदान बाहेर राहते म्हणुन थोडी तरी वेळ पडते म्हणुन रूममेट्सच्या मदतीने भात-वरणाचा कुकर आणि चहा करायला शिकले."
रेवाने हसतच सगळी कबुली दिली.कारण उद्या जर सुशांत बोललाच तर काकुंना माझ्याबद्दल खरे काय ते माहित असावे म्हणुन मुद्दामहूनच तिने ही माहिती पुरवली होती.
काकुंना मदत करत करत गप्पामधेच त्यांचा स्वैपाक आटोपला.तिघांचीही जेवणे उरकली.
काकुंनी रेवाला त्यांच्या खोलीत आरामासाठी नेले.
सुशांत त्याच्या खोलीत आणि रेवा काकुंच्या.
दोघांमधे घरात आल्यापासुन कुठलाच संवाद घडला नव्हता आणि तशी शक्यताही दिसत नव्हती.त्यामुळे रेवा जास्तच अस्वस्थ झाली होती.तिला काहीच सुचत नव्हते,"हा कधी बोलणार आहे काकुंशी?"
"त्यांचे बोलणे झालेय की नाही हे मला कसे कळणार?"
"काकुंना ह्या प्रस्तावाने धक्का बसला तर?"
एक ना अनेक प्रश्नांनी रेवाच्या डोक्यात गर्दी केली होती.संध्याकाळ कधी होतेय ह्याची वाट पहातच ती बिछान्यावर पडून राहीली.
विचारांच्या गर्दीतच डोळा कधी लागला तिला समजलेच नाही पण कसल्याशा आवाजानेच तिला जाग आली.
डोळे उघडले तेव्हा खोलीत ती एकटीच होती.हलकेच दाराशी जाऊन तिने कानोसा घेतला तेव्हा समोरच्या खोलीतुन कोणीतरी बोलण्याचा अस्पष्टसा आवाज कानावर पडत होता.बहुतेक सुशांतच्या खोलीत काकू आणि सुशच बोलत असावेत असा अंदाज होता.
रेवाला आता जास्तच टेंशन यायला लागले.नेमके दोघांत काय बोलणे चालू असेल.काकुंनी मला नकार दिला तर?
नुसत्या विचारांनीच तिच्या पोटात कालवा कालव व्हायला लागली.डोळ्यात नकळत आपल्याच विचारांनी पाणी तरळले.खरच असे झाले तर सुश आईच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न करेल की......?
मन चींती ते वैरी न चींती अशी रेवाची अवस्था झाली होती.
स्वत:च्या मनावर संयम ठेवुन ती फक्त सुशांत काय बातमी देतोय हे ऐकण्यासाठी मनाची तयारी करत होती.
~~~~~~~~~~~~~~
क्रमश:
घरकोन-27
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतोय की नाही? 
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all