घरकोन भाग 3

नात्यांची वीण हळुवारपणे उलगडणारी सुंदर प्रेमकहाणी घरकोन जरूर वाचा

घरकोनभाग 3
®©राधिका कुलकर्णी.

देवघरात दिवा लावला.
नकळत सवयीने हात जोडले गेले विधात्या समोर.
पण काय मागत होते मन आज?
काहीच नाही.
रेवाला कळतच नव्हते का बसलीय मी देवा समोर!
काही हवेय का मला?
काय मागू.सगळेच तर न मागता मिळाले होते देव कृपेने,मग आज कसले साकडे घालतेय?
काहीच समजत नव्हते पण आज फक्त तीला एकटेपणा दूर करण्यासाठी देवघरात बसावे वाटत होते.
आज सारखी रेवा मूळात मुळूबाई कधीच नव्हती.
माहेरची जैन कुटूंबात जन्मलेली एकुलती एक आणि सगळ्यांत लाडकी म्हणून जरा जास्तच लाडाकोडात वाढलेली.आज्जी ,काका, काकू, चुलत भाऊ, बहि‌णी एक विधवा आत्या अशा मोठ्या कुटूंबात वाढलेली त्यामुळे स्वैपाकघराचा रस्ता तर तीला चुकूनही माहित नसावा.
त्यात अभ्यासात हुशार त्यामुळे तीचा जरा जास्तच वरचष्मा होता सर्व भावंडात.

घरातले वातावरण कट्टरपंथी त्यामुळे जास्त शिकून तरी काय करणार,शेवटी "चूल-मूल","पकाना-खिलाना" हेच करावे लागणार असा सूर असायचा एकंदरीत.

पण ह्या सगळ्यात तीचे खरे कौतूक जर कुणाला असेल तर ती होती तिची सत्तरी पार केलेली आज्जी.
कधीही कोणत्याही चांगल्या/वाईट घटना घडल्यावर हक्काने सांगावे असा एकमेव कोपरा म्हणजे तिची आज्जी होती तीला.
रेवाने कोणतेही बक्षीस मिळवले किंवा परीक्षेत मार्क्स चांगले मिळाले की ती ते घेवून आज्जीकडे पळणार.
मग आज्जी हळूच एखादी रूपयाची नोट किंवा एखादा बत्तासा,रेवडी जे बटव्यात सापडेल ते कौतुकाने हातावर ठेवणार आणि आपले सुरकुतलेले थंडगार हात गालावरून फिरवणार आणि म्हणणार, "मेरी बेटी-तूप रोटी",मग बोटे कानशीलावर मोडणार आणि गालाचा मुका घेणार.
अशीच घराचे नाव पूढे ने ग माझी बाय.
तूच घराण्याचे नाव रोशन करणार ..
आज्जीला नेहमी रेवात आपलीच बालछबी दिसायची.

त्याकाळी मुलींना नहाण आले की लग्न लावून दिले जाई तसेच तीच्या आज्जीचे झाले.
शाळेत नाव घातले पण रोज घरकामातून शाळेत जायला मिळायचे नाही तरीही वार्षिक परीक्षेत छान मार्कांनी पास व्हायची.
पण लग्न झाले अन्  शिक्षण,आवडी-निवडी सगळेच संपले.

आपली शिक्षणाची हौस ती रेवाच्या रूपाने पूर्ण होताना बघत होती.
हेच कारण होते की कधी कधी आऊट ऑफ द वे जावूनही ती रेवाला मदत करत असे.
अशी अनेक गुपीते जी फक्त तिच्यात आणि आज्जीत कुपीबंद होती.
आजही तीला आज्जीचीच खूप आठवण येत होती.

तेवढ्यात पाठीमागे थोडी हालचाल जाणवली.
कोण म्हणून मागे वळून बघीतले तर मागे सूशांत ऊभा होता.

डोळ्यातले सुकवलेले अश्रुंचे आेघळ कमंडलूतील पाणी दोन्ही डोळ्यांना लावून ते पुसण्याचा तीने हुशारीने प्रयत्न केला.
आणि काही न बोलताच देवघरातून पून्हा किचनकडे वळली...
#################
(क्रमश:3)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
(नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतोय की नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all