घरकोन भाग 45

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी.

घरकोन-45
©राधिका कुलकर्णी.

रात्रीचे किती वाजले कुणास ठाऊक पण फोनच्या घंटीने रेवा दचकुन जागी झाली.डोळे चोळत चाचपडत ती हॉलमधे आली.घड्याळात पहाटेचे साडेतीन झाले होते.इतक्या रात्री कोणाचा फोन?काही अशुभ बातमी तर नाही ना?
रेवाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.काकांची तब्ब्येत नाजुक झालेली असल्याने सतत ही शंका रेवाच्या मनात येत राही.
घाबरतच रेवाने फोन उचलला.
"हॅलोऽऽऽ???"
"कोण??"
"हायऽऽ रेवा!उन्मेश बोलतोय."
"ओह्...तु होय."
"थँक गॉडऽऽ!किती घाबरले होते मी इतक्या अपरात्री फोन ऐकुन."
ओह्ऽऽअॅम रिअली सॉरी डिअर,माझ्या लक्षातच नाही आले की मी अवेळी फोन करतोय."
"मी निघतोय हे कळवायलाच फोन केला.
तु झोप.मी सकाळी पोहोचलो की कॉल करतो परत."
"अगेन सॉरी."
"अरे सॉरी कशाला म्हणतोस.बरेच झाले कळवलेस.मी येते तुला घ्यायला.."
तुझ्या फ्लाईटची वेळ सांग म्हणजे मी येवुन थांबेन त्यावेळी तिकडे."
वेळ पाच पंचावन्न आहे.पण लेट होऊ शकेल मे बी."
"बर चल मी निघतोय आता..बायऽऽ"
"ओके.ये लवकर.भेटुच.हॅप्पी जर्नी!"
फोन संपला तशी रेवा जरा रिलॅक्स झाली.त्याला सहा वाजता आणायला जायचे म्हणजे साधारण पाचला घरून बाहेर पडावे लागणार होते.म्हणजे अजुन तास-दिड तास तरी डुलकी काढता येणार होती.
हायसे होऊन पुन्हा रेवाने बेडवर अंग टाकले.
पण प्रयत्न करूनही झोप काही लागेना.काय करू नी काय नको असे झाले होते रेवाला.सुश आणि रेवाचा एकमेव जीवश्च कंठश्च मित्र आज किती तरी वर्षांनी भेटायला येत होता.
रेवा मनोमन त्याच्या आवडीचे कोणते पदार्थ करायचे त्याचे प्लॅनिंग करायला लागली.
हॉस्टेलवर असताना त्याला काय बर आवडायचे ह्याचा रेवा विचार करू लागली पण काही केल्या तिला त्याची आवड काही आठवेना.
विचार करकरून तिला डुलकी आली.
आणि डोक्याजवळचा बझर वाजताच ती पुन्हा जागी झाली.
"अरे बापरेऽऽ पाच वाजले की. कसा डोळा लागला अचानक.?"
ती लगबगीने उठली.तोंडावर पाणी मारले.केस निट केले.ड्रेस बदलला.आणि गाडी बाहेर काढत घाईनेच एअरपोर्टच्या दिशेने निघाली.पहाटेची वेळ,रस्त्यावर फारशी वाहनांची वर्दळ नव्हती.शांत आल्हाददायक वातावरण आणि सकाळचा मंद वारा अंगाला शिरशीरी आणत होता.
रेवाने भन्नाट वेगाने गाडी एअरपोर्टच्या दिशेने वळवली.
ती लवकरच एअरपोर्टवर पोहोचली.
उन्मेशच्या फ्लाईटला अजुन वेळ होता पोहचायला.ती गाडी पार्क करून वेटींग लाउंज मधे त्याची वाट पहात उभी राहीली.
साडेसहाच्या आसपास उन्मेश दुरूनच बाहेर येताना दिसला.रेवाने खुष होऊन हात हलवुन त्याचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न केला.
त्याचे लक्ष नसावे बहुतेक.तोही सगळीकडे नजर फिरवत रेवालाच शोधत होता.अखेरीस जरा अंतर कमी झाल्यावर  रेवा त्याच्या नजरेस पडली.
त्यानेही हात हलवुन तिला दुजोरा दिला.
अखेर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा दोघेही एकमेकांना भेटले.त्या भेटीचा आनंद दोघांच्याही चेहेऱ्यावर ओसंडुन वहात होता.
भेटल्य़ा क्षणी दोघांनाही काय बोलावे सुचेना.डोळ्यात पाणी तरळलेले जाणवत होते.दोघेही एकमेकांना हसुन हस्तांदोलन करत  भेटले.
तिने गाडीत सामान ठेवत भरधाव वेगाने पुन्हा घराच्या दिशेने गाडी वळवली.
तिला कधी एकदा उन्मेशला घरी घेऊन जातोय असे झाले होते.
गाडीत दोघेही शांत शांत होते.सकाळच्या शांत वातावरणाचा परीणाम होता की मौनातुनच सारे संवाद डोळे आणि मन टिपत होते माहित नाही. 
उन्मेश डोळे मिटुन सीटवर मान कलंडुन पडला होता.प्रवासाचा शीण असावा बहुदा.पण कुणीच कुणाशी बोलत नव्हते.
घरी पोहचल्यावर मात्र रेवा पुन्हा नॉर्मल मोडवर येत उन्मेशला हात धरून घरात घेऊन आली.
"हे बघ उन्मेश, हे आमचे छाट्टुसे घरकुल.."
"वेलकम टु अवर स्वीट होम!!"
"कसे वाटले आमचे घर??"
"ह्याला तु छोट्टेसे म्हणतेस!!"
अगं हा तर महाल आहे तुम्हा राजा-राणीचा.,
मस्त आहे बंगला."
"अरे कंपनी कडुन मिळालाय."
"बर तु काय घेशील चहा का कॉफी??
काय बनवु सांग?"
"अगं,मला सध्या झोप हवीय.जरावेळ पडु का?"
'ह्या अर्लि मॉर्निंग फ्लाईट्स नाऽ पारऽऽ झोपेचे खोब्रे करून टाकतात बघ."
"आधी निघायचे म्हणुन आवरायची घाई त्यामुळे झोप लागत नाही आणि नंतर चढे चढे पर्यंत उतरायची वेळ.तुला सांगतो अख्खी रात्र झोपलोच नाहीये,कुठे वेळ चुकली तर फ्लाईट मिस होईल ह्या भितीने."
डोळे बघीतलेस माझे कसे लाल झालेत?"
डोळे हातानी फाकवुन उन्मेश रेवाला दाखवत होता.

रेवा फक्त हसत होती त्याचे बोलणे एेकुन.
त्यावर पुन्हा उन्मेश बोलला,
"तुला काय जातेय गं हसायला?"
"इकडे आमची काय वाट लागलीय ते आमचे आम्हालाच माहित,तुला काय कळणार?तु हास मला.."
ह्यावर रेवा अजुनच हसत सुटली.बिचाऱ्याच्या झोपेची खरच वाट लागली होती.तिच्या एका म्हणण्यावर घाईघाईत त्याने ही भेट प्लॅन केली होती.मनोमन रेवा आभारच व्यक्त करत होती परंतु ह्याक्षणी त्याची ती केवीलवाणी स्थिती बघुन तिला खरच हसायला येत होते.
तरीही स्वत:वर शक्यतो ताबा ठेवत तिने त्याला गेस्टरूम दाखवली.
तिथेच त्याची सर्व राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती.
उन्मेश रूममधे शिरल्या बरोबर स्वत:ला बेडवर झोकुन देत रेवाला बाय केले.म्हणजे थोडक्यात तु आता मला थोडे तास तरी डिस्टर्ब न करता शांत झोपु दे असे म्हणतच तो निद्रेच्या आधीन झाला.
रेवाने अलगद दार लावुन घेतले.
कधी एकदा ह्याची झोप होईल आणि हा आपल्या बरोबर संवाद करायला उपलब्ध होईल ह्याची वाट पहातच रेवा किचनमधे पुढच्या तयारीला लागली.
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-45
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतोय की नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all