घरकोन भाग 48

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी.

घरकोन-48
©राधिका कुलकर्णी.

उन्मेश रात्रीच्याच फ्लाईटने चेन्नईला परत गेला.
तो तर गेला पण जाता-जाता दिलेला कान मंत्र आता प्रत्यक्षात कसा उतरवायचा हेच कोडे रेवाला पडले होते.

लग्न होऊन दोन वर्ष झाली होती.कितीतरी वादाचे प्रसंग आले,नाही असे नाहीच पण तरीही रेवाने वाद न वाढवता प्रसंगी नमते घेऊन वाद टाळायचेच प्रयत्न केले होते.
मुळात सुशवर रागवणे, फारकाळ चिडणे तिला जमायचेच नाही आणि त्यात आता असे तिच्या स्वभावा विरूद्ध जाऊन वर्तन स्वत:ला कितपत जमेल हिच तिला शंका होती.
त्यात वरून सुशला पैशांची मदत करण्यापासुन रोखणे,विरोध करणे हे तिच्या स्वत:च्याच मनाला पटत नव्हते तर त्यासाठी सुशशी भांडण करायचे हे कसे घडणार ह्याचाच ती विचार करत होती.

ईलाज जरा अवघड होता पण म्हणतात ना बिमारी जितनी पुरानी और लंबी, दवा भी उतनीही कडवी होती है। तसेच उन्मेशने दिलेला ईलाज पण भयंकर कडु
 होता.
विचारांच्या नादात कधीतरी असाच रेवाचा डोळा लागला.
रात्र सरली,दिवस उगवला.रोजची दिनचर्याही सुरू झाली पण मनातली वटवाघुळे जळमटासारखी वाकुल्या दाखवतच होती.

सुश दुपार पर्यंत परत येणार होता.
बाहेरगावहुन आल्या आल्याच हा विषय़ कसा छेडायचा आणि मग त्याचे भांडणात रूपांतर कसे करायचे हे काही रेवाला समजत नव्हते.
नुसता विचार करूनच घशाला कोरड पडत होती.
पण काही झाले तरी हे अग्निदिव्य तिला करावेच लागणार होते.कारण इथे सवाल तिच्या घराचा होता,घरातल्या माणसांचा होता आणि हे सगळे कोन सांधायचे तर दिव्यातुन तर जावेच लागणार होते.प्रसंगी स्वत:कडे थोडा वाईटपणा घेऊन का होईना ह्या भळभळत्या जखमेवर मलमपट्टी करावीच लागणार होती. 

लहानपणी शाळेत नाटकात केलेली कामे कधी उपयोगी पडणार?
अचानक ते आठवुन मनाला एक वेगळीच उभारी आली.तिचा आत्मविश्वास अचानक जागृत झाला.आता पुर्ण विश्वासाने हे मिशन सक्सेसफुल करायचेच अशी मनाशी खुणगाठ बांधताच ती स्वत:च स्वत:शी खुदकन हसली.
चला रेवा मॅडम आज पतिदेवांना दाखवुनच देऊ की सती-सावित्री पत्नी जेव्हा चंडीचे रूप घेते तेव्हा काय होते.

आपल्या खऱ्या आयुष्यात नाटक करण्याची अशी वेळ तिच्यावर येईल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते.
असोऽऽ आता आलिया भोगासी.......
करायला तर लागणारच.

सकाळी ठरल्याप्रमाणे सुशचा फोन आला.तो बारा पर्यंत निघणार होता तिकडुन तेच सांगायला त्याने फोन केला होता.
व्वा म्हणजे हा संध्याकाळ पर्यंत घरी येईल.
बरय म्हणजे जेवुन खावुन शांततेनेच भांडुयात.
पुन्हा एकदा आपल्याच विचारांवर ती हसली.
ह्या उन्म्याने काय करून ठेवलेय माझे.माझ्याच गोड नवऱ्याबरोबर भांडायला लावतोय मला..
"काय करू आता?"
जर का प्लॅन बोंबलला ना तर मी तुझे काय हाल करेन ते तु बघशील.
मनातल्या मनात ती स्वत:शीच संवाद करत उन्मेशवर चरफडत होती.

दुपार उलटली तसे तिच्या मनावरचे ओझे वाढायला लागले.
चार वाजुन गेले होते.
कोणत्याही क्षणी सुश घरी येणार.नुसत्या विचारांनीच घड्याळाच्या काट्या प्रमाणेच ऋदयातली धडधड वाढत होती.
मनातली सगळी विचारांची वादळे मनात लपवुन वरवर गोड गोड वागुन मग अचानक नको त्या विषयावरआकस्मिक वार करून मुद्दाम भांडण उकरून काढणे हे राहुन राहुन तिला अयोग्य वाटत होते.
पण आजवर उन्मेशने त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम्समधे जशी मदत करून मार्ग काढले होते ते पाहता त्याच्यावर थोडातरी विश्वास ठेवणे गरजेचेच होते.

सुशला आधी आल्या आल्या खुष करण्यासाठी त्याच्या आवडीचा काहीतरी मस्त चटकदार पदार्थ बनवुन त्याला इम्प्रेस करून मग त्याच्या गाफील क्षणी त्याच्यावर वार करायचा पुर्ण प्लॅन रेडी केला.
मस्त हरेभरे कबाब सोबत स्टाँग वाफाळती कॉफी करायचा रेवाने बेत केला.
त्यासरशी ती तयारीला लागली.
तेवढ्यात सुशच्या गाडीचा हॉर्न वाजला.
एरवी असा टुरवरून घरी आला की आनंदाने नाचणारी रेवा आज नकळत घाबरली होती.ऋदयाची धडधड अचानक वाढल्याचे तिला जाणवत होते.
वरकरणी तसे भासवु न देता तिने हसुन सुशचे नेहमीप्रमाणे स्वागत केले.
आल्या आल्या सुशने उन्मेशची चौकशी केली.त्याच्याबद्दलच्या सर्व हालहवालाच्या गप्पा झाल्या.
सुशला तिने लगेच त्याची आवडती डिश केलेली सांगुन टेबलवर बोलावले.
थोडे आडवे पडुन रेस्ट घ्यायचा विचारात असलेला सुश हरेभरे कबाबचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटले त्याच्या.
तात्पुरता तरी झोपायचा प्लॅन पोस्टपोन करत तो पटकन हातपाय धुवुन फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर एखाद्या लहान मुलागत धावत आला.
लग्न झाल्यावर सुरवातीला रेवाला काहीच स्वैपाकातले बनवता येत नसे.
पण सुशने खूप सारी पाककृतीची पुस्तके आणुन दिली.काही पुस्तकातुन काही काकुंना विचारून तर काही टिव्हीवरचे कुकरी शोज बघुन वर्ष भरात रेवा खूप छान जेवण बनवायला शिकली.
आणि आता तर काय स्वत:च इनोव्हेटीव्ह डिशेश बनवायला लागली होती.
तिच्या हाताला खरच चव होती आणि सुशला तिच्या हातचे काहीही खूप आवडायचे.
सुशच्या जिभेचे सर्व चोचले रेवा उत्तम पुरवत असे.
त्यामुळे आजची तिची बेस्ट डिश आणि सुशची फेव्हरीट म्हणुन तो मोह टाळु शकला नाही.
लगेच रेवाने प्लेटमधे कबाब सॉस सोबत सर्व्ह केले.
आणि त्याच्या सोबत येऊन बसली.
सुशने मुंबईच्या टुरची सर्व कहाणी एेकवता एेकवता सारे कबाब फस्त केले.त्यानंतर मस्त कडक कॉफीचा मग पुढे आला.
कॉफी पिऊन झोप उडणार हे माहित असुनही त्याने कॉफी घेतली.
त्याला आता खूप फ्रेश वाटत होते त्यामुळे आत्ता झोपण्यापेक्षा रात्रीच लवकर झोपु असा त्याने मनोमन निश्चय केला.
रेवालाही हेच हवे होते.
सुश मात्र भलताच खुष होता.
न्यु रिक्रुटेड स्टाफमधे सगळ्या यंग मुलांचा भरणा होता.त्याला स्वत:चे जॉइनिंग डेज आठवले.तेव्हा त्यांच्या मेंटॉर्सबद्दल त्यांना जे फिल व्हायचे तिच फिलींग तो आज अनुभवत होता.
त्यामुळे समोरून जेव्हा असे कमेंट्स ऐकायला मिळतात की सर आप बहुत अच्छा सिखाते हो.
तेव्हा खूप मस्त वाटते हे सगळे तो रेवाशी भरभरून बोलत होता. एरवीची रेवा असती तर तिने सुशचे कौतुक ऐकुन किती खुष झाली असती त्याला अगदी प्रेमाने मिठीबिठी मारली असती पण आज विषय कसा मूळ मुद्द्यावर आणता येईल ह्याचा विचार करण्याच्या नादात ती सुशच्या आनंदात म्हणावी  तशी इनव्हॉल्व्ह होऊ शकत नव्हती.
सुश काही केल्या त्याच्या मूडमधुन बाहेरच येत नव्हता आणि रेवाला कुठुन का होईना विषय कसा बदलता येईल ह्याची घाई झाली होती.
शेवटी देवालाच तिची दया आली आणि बोलता बोलता तो थांबला,स्तब्ध झाला.
रेवाने विचारले 
"काय झाले?"
"काही नाही असेच."
"असेच काही नसते,काय झाले सांग?"
"इतक्यावेळ उत्साहात बोलणारा अचानक शांत का झालास?"
"अग् काही विशेष नाही गं.तु सांग मी नसताना कुणाचा काही फोन वगैरे?"
जेव्हा त्याला आईंविषयी जाणुन घ्यायचे असायचे तो असेच आडुन आडुन प्रश्न करायचा.मग ती ही काकुंशी झालेले बोलणे  सगळे कथन करायची.
म्हणजे न बोलताही त्याला त्यांची ख्याली खुषाली कळायची.
त्यांच्या गरजेनुसार मग तो पैशांची पुर्तताही तिच्याच मार्फत करायचा.
त्याच्या ह्याच प्रश्नाची रेवा किती वेळची वाट पहात होती.
कोणताही आनंद किंवा दु:खद प्रसंग असेल तर त्याला काकुंची मनातुन आठवण यायचीच पण स्वत:च स्वत:ला घातलेल्या बंधनांनी तो काकुंशी बोलण्यापासुन परावृत्त करत असे स्वत:ला.
आत्ताही रेवाला माहित होते की तो अचानक शांत का झाला.काय सलत होते त्याच्या मनात पण आत्ता त्या विषयावरून बोलुन मुद्दा भरकटण्याचा धोका रेवाला पत्करायचा नव्हता त्यामुळे त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊन आपला हेतु साध्य करायचा तिने निर्णय घेतला.
मग रेवाने जाळं पसरायला हळुहळु सुरवात केली.
सकाळी काकुंचा फोन येऊन गेला हे तीने सांगीतले.
त्यावर फक्त हं एवढा एकच हुंकार भरून सुश शांत बसला.
त्याला माहित होते नेहमी प्रमाणे रेवा स्वत:हुन सगळे इथ्यंभुत कहाणी वर्णन करून सांगणार.
त्यामुळे त्याला काही विचारायची गरजच पडणार नव्हती.
रेवानेही मग सांगता सांगता विषय काकांची ट्रिटमेंट,पैसा,खर्च इथवर आणुन सोडला.
एरवीही काही न बोलता निमुटपणे तो रेवाला बँकेतुन पैसे ट्रांसफर करायला द्यायचा.
आताही ते होणारच ह्याची तिला पुर्ण खात्री होतीच.
त्यामुळे तो कधी तिला चेक देतो त्याचीच ती वाट पहात होती.
काही न बोलताच सुश बेडरूममधे गेला.
कपाटातुन चेकबुक काढले त्यातुन एक चेक साईन करून तो बाहेर आला.
"रेवा मी खूप थकलोय आज.मी लवकर झोपतोय.
सकाळी मी विसरून जाईन म्हणुन आजच हा चेक ठेऊन घे.उद्या चेक बँकेत जमा करून टाक."
"सुश मला तुला काहीतरी सांगायचेय,बोलु का?"
हे बघ रेवुऽ तु तुझी ती नेहमीचीच कॅसेट ऐकवणार असशील तर मला त्यात मुळीच इंनट्रेस्ट नाहिये.अॅम रिअली सो टायर्ड नाऊ."
"अरे मी काय बोलतेय ते तर एेकुन घे,आधीच असा कन्क्लुजन्सवर काय येतोस?"
"रेवा मला तु काय बोलणार ते पाठ झालेय, प्लिज मी आज खूप खूष आहे,माझा मुड खराब नको करूस काहीतरी बोलुन."
"नाही सुश तु समजतोस तसे काहीही मी आज बोलणार नाहीये.माझे वेगळेच म्हणणे आहे जरा ऐकुन तर घे."
"बर सांग,काय बोलायचेय?थोडक्यात सांग."
"हे बघ सुश मला एकाच प्रश्नाचे उत्तर खरे खरे दे."
"आता काय गं तुझे?"
"कसले प्रश्न?कसले उत्तर?माझा मुड खराब नको ना करूस रेवुऽऽ,आय बेग ऑफ यु डार्लिंग."
"हे बघ सुश तुला आज ह्या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल कारण ह्या प्रश्नाचे खरे उत्तर दिलेस ना तर भविष्यातले सगळे प्रश्न आपोआप चुटकीसरशी सुटणारेत."
"व्हाय बिटींग अराऊंड द बुश?मुद्द्यावर ये पटकन."
"काय विचार?"
सुशने वैतागतच रेवाला परवानगी दिली.
आता रेवाची वेळ होती.
योग्य वेळी हुकुमी एक्का काढुन गेम क्लोज करायचा तिचा प्लॅन मस्त वर्कआऊट होत होता.
"सुश मला एकच सांग,तु तुझ्या काकावर प्रेम करतोस?"
"हा काय प्रश्न आहे रेवाऽ,यु नो माय आन्सर."
"तरीही मला ते तुझ्या तोंडुन ऐकायचेय.प्लिज सांग तु तुझ्या काकावर प्रेम करतोस?"
"काय बालिशपणा आहे हा रेवा,काऽऽ नको त्या जखमा उकरून काढत आहेस आज?"
"माझे उत्तर काहीही असो त्यांच्या कर्तव्यात मी कुठे कमी पडतोय का?"
"प्रश्न तो नाहिच आहे सुश,मला सरळ सरळ इतकेच सांग,तुला तुझ्या काका बद्दल प्रेम आहे की नाही?"
"नाहीऽऽऽ,नाहीये मला त्यांच्याबद्दल काहीच फिलिंग्जऽऽ.,झाले समाधान?पडली कलेज्यात थंडक?"
"का?काऽऽ हा विषय आज आत्ताच काढायची घाई,माझा आनंद तुला बघवत नाही का गं?"
सुशच्या चेहऱ्यावर त्याचा राग,चिडचिड साफ दिसत होती.
"हे बघ सुश उलट मला तुला कायम आनंदी बघायचेय म्हणुन एकदाच काट्याचा नायटा व्हायच्या आत त्याला समुळ उपटुन काढायचा विचार मी करतीय."
"म्हणजे?,तु काय बोलतीएस मला समजत नाहीये.काय ते नीट स्पष्ट बोल."
"मला तुला एवढेच सांगायचेय की ज्या काकांबद्दल तुला एक टक्काही कुठल्याच भावना उरलेल्या नाहीत,ज्य़ा आईशी तु कायमचे संबंध केवळ ह्याच कारणांनी तोडले की ती तुझ्या काका काकुला सोडुन आपल्याकडे कायमची येत नाही,मग मला सांग का आपण त्या थेरड्याला वाचवण्यासाठी पैसा ओततोय?"
"जाऊदे मरूदे ना त्यांना."
"तसेही त्यांच्या ह्या रोगातुन ते काही बरे होणार नाहीचेत मग का उगीच आपला पैसा फुकट वाया घालवायचा.?"
"रेवाऽऽऽऽऽ" सुश रागाने थरथरत होता.ज्वालामुखी फुटावा तसे सगळे रक्त त्याच्या डोळ्यात साखळले होते.
त्याला इतके चिडलेले रेवाने कधीच बघितले नव्हते.पुढे काय घडणार हे समजायच्या आत
रागाने सुशने खाडकन रेवाच्या मुस्काटात ठेऊन दिली आणि थरथरत तिकडून बेडरूममधे गेला.त्याच्या आत जाण्याबरोबरच धाडकन दरवाजा बंद झाल्याचाही आवाज पाठोपाठ आला.

रेवाच्या गालावर सुशच्या बळकट हातांची पाचही बोटे उमटली होती. गालाला अजुनही झिणझिण्या येत होत्या.
डोळ्यातुन खळकन पाणी आले.तिला गरगरल्या सारखे वाटायला लागले.सगळे घर आजुबाजुच्या भिंती आणि छत गरागरा आपल्याभोवती फिरताहेतअसे वाटायला लागले.
आयुष्यात सुशने आज दुसऱ्यांदाच इतका चिडुन हात उगारला होता.
तिला काहीच समजत नव्हते.असे काही घडेल ह्याची तिने कल्पनाच नव्हती केली.
ती तशीच मटकन बसुन राहिली.
डोकं सुन्न झाले होते.
आता पुढे काय?हाच प्रश्न इतके घडुनही तिच्या डोक्यात फिरत होता.

उद्याची सकाळ पुन्हा कोणते नवे नाटक घेऊन उगवणार ह्याचाच विचार करत बसली ती......
जे काही घडले ते तिच्या समजण्या पलिकडचे होते.....
उद्या उन्मेशला काय सांगायचे हाच विचार करत रेवाने सोफ्यावर अंग टाकले.हो कारण आजतर पहिल्यांदा तिला तिच्याच बेडरूममधे शिरण्यास मज्जाव होता.
वाईटातुनही काहीतरी चांगलेच निष्पन्न होईल ही एवढीच आशा बाळगुन रेवा उद्याच्या सुर्योदयाची वाट पहात बसली.
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-48
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
(नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतोय की नाही? 
रेवा आणि सुश मधला वाढता तणाव कुठे नेऊन सोडणार ह्या नात्याला?
उन्मेशच्या मनात काही काळंबेरं तर नाही ना...
काय आहे खर सत्य?
हे जाणुन घ्यायचे असेल तर पुढील भाग जरूर वाचा आणि तुमच्या प्रतिक्रीया कमेंटद्वारे जरूर कळवा.
 (लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all