घरकोन भाग 50

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी.

घरकोन-50
©राधिका कुलकर्णी.

रेवाने घाईघाईने घराची आवराआवर सुरू केली.असे अचानक जायचे म्हणजे किती तरी गोष्टी पहायला लागतात.
ह्याला काय जातेय लगेच जा सांगायला.
दूध,दुभते,केलेले पदार्थ,भाज्या,वस्तुंची झाकपाक असे जे जे आठवेल तसे ती कामे उरकत होती.
एकीकडे बॅग पॅकींग ही चालु होती.
किती दिवस रहावे लागेल काहीच अंदाज नव्हता.नेमके काय काय न्यायचे हेच समजत नव्हते.नुसता मनाचा गोंधळ चालला होता.हि परिस्थिती अशीच किती दिवस राहणार?
खरच का सगळे ठिक होईल?सुश खरच बोलेल ना काकुंशी,माझ्याशी?करेल का अॅक्सेप्ट काकांना त्यांच्या चुकांसहित?
देव जाणे हा रस्ता कुठे जाऊन थांबणार आहे! पण आता एकदा मार्गक्रमण सुरू केल्यावर माघार नाही.जे होईल ते होईल.
आपले नशिब म्हणुन स्विकारूया..
थोडीशी हताश निराश मनानेच रेवाने सामानाची आवराआवर केली.
तेवढ्यात पुन्हा फोन खणखणला.रेवा वेड्या आशेनेच फोनकडे धावली.कदाचित सुशचा फोन असेल तर.?
पण तिची निराशा झाली कारण फोन उन्मेशचा होता.त्याने दुपारची फ्लाईट बुक केल्याचे कळवायला फोन केला होता.साडे तिन वाजताची फ्लाईट होती.
म्हणजे काहीच तास शिल्लक होते.

तिने घाईने हात चालवत आठवतील तशी सगळी कामे हाता वेगळी करायला सुरवात केली.
सुशचा स्वैपाक करून ठेवला.
हे असे न सांगता जाणे तिच्या बुद्धीला पटतच नव्हते पण ठरलेल्या प्लॅनमधे कोणताही बदल न करता फक्त उन्मेशच्या इनस्ट्रक्श्ऩ्सला फॉलो करायचे तिने ठरवले.
सगळे आवरून झाल्याची खात्री करत दरवाजा बंद करून ती निघाली.ह्या दरवाज्यातुन अशी ती कधीच बाहेर पडली नव्हती लग्नानंतर आजपर्यंत.
त्यामुळे साहजिकच तिला खूप त्रास होत होता.एक अश्रु अचानक डोळ्यातुन ओघळुन जिभेवर आपली खारट चव ठेवुन गेला.तसेच डोळे पुसत बंद दरवाज्याकडे पाठ फिरवुन रेवा निघाली.
वेळेतच प्रवास पुर्ण करत ती मुंबईला पोहोचली.

इंजिनियरींगची अख्खी चार साडेचार वर्ष आणि त्यानंतर जॉब मुळे मुंबई तिच्या चांगलीच परीचयाची होती.
जितक्या लवकर शक्य होईल तितके तिला घर गाठायचे होते.मुंबईहुन मिळेल त्या नगरची गाडी पकडुन तिने पुढला प्रवास सुरू केला.गाडीत बसली तेव्हा सात वाजले होते संध्याकाळचे.
सुश नॉर्मली आठ-नऊ पर्यंत घरी येतो.काय वाटेल त्याला मी घरी नाही पाहुन? नको नको त्या विचारांनी मनात काहुर पेटले.
मुंबईहुन नगरला निघण्याआधी तिने उन्मेशला तसे कळवले होते त्यामुळे ती थोडी निश्चिंत होती.
विचारांच्या तंद्रीत तिचा डोळा लागला.

खूप गडबड आरडा-ओरड्याने तिला जाग आली.
कोणत्यातरी बाईचा मुलगा खाली राहीला होता आणि गाडी सुटली म्हणुन ती गदारोळ करत होती.कंडक्टर पण चिडुन काहीबाही बोलत होता तिला पण तिचे कशाकडेच लक्ष नव्हते.
लेकरू जसे परत आले ती आपली फक्त त्याला उराशी घट्ट धरून रडत होती.
पोरगंही भेदरलेले होते. तेही आईच्या पोटात शिरून रडत होते.
एकंदर सगळा गोंधळ शांत झाला आणि गाडी पुन्हा मार्गस्थ झाली.रेवाला मात्र त्या माय लेकरांमधे ताटतुट झालेले सुश आणि काकुच दिसत होते.
काकुंच्या मनाची अवस्था अशीच असेल का?
आणि सुश?तोही असाच मिस करत असेल काकुंना?
नाती किती विचित्र असतात ना?
एकाचवेळी ती हवीशी असतात पण अति 'मी'पणा नडत असतो कुठेतरी.
माघार कोणी आणि का घ्यायची?कोण चुक कोण बरोबर असल्या अहंऽगंडाच्या फुटुट्ट्यांवर जेव्हा नात्यांच्या उंची आणि खोलीची मोजमाप व्हायला लागते,नाते नाते न उरता फक्त एक ओझे-वाहु शब्द उरून राहतो.
ज्यात भावभावनांची किंमत शुन्य असते.
आताही तसेच काहीसे झाले होते.
रेवा खूप अस्वस्थ झाली नकळत.एक वेळ होती हाच प्रवास होता हेच गाव होते पण त्यावेळी एक नातं सोबत होत आणि एक नात जोडणारा तो प्रवास होता.किती सुखद आणि तरल आठवणी होत्या.
पण आज तोच प्रवास एकाकी मार्गस्थ होताना किती भयाण वाटत होता.
काकुंचेही जीवन किती भयाण आणि उजाड असेल सुशच्या नसण्यामुळे ह्याची प्रखरतेने जाणीव आज होत होती रेवाला.इतके दिवसात का कधी जाणवले नाही आपल्याला इतक्या प्रकर्षाने?
कारण एक नाते माझ्या सोबत होते,आज ते नाहिये म्हणुन मला
काकुंची व्यथा जास्त चांगली समजतीय.
मनोमन रेवाने उन्मेशला धन्यवाद दिले,त्याच्यामुळे आज ती हा सगळा असा विचार करू शकत होती.आणि आता हाच सगळा विचार करायची सुशची वेळ होती.त्यानेही ह्याच जाणीवेने हा विचार करून योग्य निर्णय घ्यावा म्हणुन हा सगळा खटाटोप होता.अापला अहम् बाजुला सारून किती लवकर सुशला त्याच्या चुकांची उपरती होतेय हेच बघणे शिल्लक होते.
विचारांच्या गुंत्यात अशी काही गुंतली की नगर जवळ आलेय हे ही समजले नाही रेवाला.
साधारण साडेदहा अकरा झाले असतील.स्टेशनवर फारशी वर्दळ नव्हती.एक रिक्षा पकडुन रेवाने तडक घर गाठले.
जसजसे घराजवळ पोहचत होती मनात एकच विचार येत होता काकुंना काय सांगायचे असे तडकाफडकी कोणतीही सुचना न देता मी नगरला का आले?
मी पोहोचे पर्यंत सुशने इकडे फोन तर नसेल ना केला?
त्या नुसत्या विचारांनीच तिच्या अंगावर काटा उमटला.
तात्पुरते सगळे विचार बाजुला सारून रेवा घरी पोहोचली.
दरवाजाची बेल भीत भीतच वाजवली.तिला दारात बघुन घडेल त्या नविन नाट्याला सामोरे जाण्याचा मनाची पुर्ण तयारी करतच रेवा दार उघडण्याची वाट पहात थांबली.आज तो दोन मिनिटाचा अवधी देखिल दोन युगांसारखा भासत होता रेवाला.
जरा वेळाने दाराजवळ कोणाचीतरी चाहुल झाली.बांगड्याच्या किणकिण आवाजावरून काकुच असाव्यात असा अंदाज रेवाने केला.श्वास रोखुन ती दार उघडायची वाट पहात होती.
आता ह्या वेळी इतक्या उशीरा कोण बरे असेल असा विचार करतच काकुंनी दार उघडले.
रेवाला अशी अवेळी दारात पाहुन काकु खुपच घाबरल्या पण तसे चेहऱ्यावर न दाखवता त्यांनी रेवाला आधी घरात घेतले.
अात गेल्या गेल्या रेवाने बॅग समोरच्या खुर्चीवर फेकतच काकुंच्या कुशीत शिरून रडायला लागली.
काकुंना काहीच समजेना. हिची समजुत काढावी की तिला जाब विचारावा ह्याच संभ्रमात तिचे सांत्वन करत पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत राहिल्या.
रडण्याचा बहर ओसरल्यावर काकुंनी तिला विचारले.
"अगं अशी अचानक इकडे कशी तु?"
"काही खाल्लेस का?भूक लागली असेल ना!असं कर आधी जेऊन घे मग बोलु बाकीचे."
"चल डोळे पुस आणि हातपाय धुवुन ये बरं."
काकुंच्या बोलण्याने रेवा थोडी सावरली.वरच्या खोलीत बॅग ठेवुन जरा तोंडावर पाण्याचा
हपका मारून फ्रेश होऊन ती पानावर बसली.
कितीतरी दिवसांनी कुणाच्यातरी हातचे मायेने आयते जेवायला मिळत होते.सकाळ पासुन गडबडीत हे ते अबर-चबर खातच तिने प्रवास केला होता त्यामुळे आता तिला सपाटुन भूक लागली होती.
तिचे जेवण होई पर्यंत काकुही शांत होत्या.
जेवण झाल्यावर रेवा काकांच्या खोलीत गेली.काका बेडवर झोपले होते.त्यांचा तो कृश देह बघवत नव्हता.त्यांना कसलीच शुद्ध नव्हती.सुशच्या काकु म्हणजेच काकांच्या पत्नी ही बाजुच्याच पलंगावर पहुडल्या होत्या.त्यांनाही रेवाला अचानक इकडे बघुन आश्चर्य वाटले.पण त्याही इतक्या उशीरा कुठल्याच चौकशी करण्याच्या मुडमधे नव्हत्या त्यात रेवाही चेहऱ्यावर प्रवास करून थकलेली दिसत होती.त्यामुळे उद्याच बोलु हा विचार करून त्यांनी फक्त एक स्माईल देऊन रेवाला आराम करायला सांगितला.
रेवाला वाटत होता तितका प्रसंग नाट्यमय घडला नव्हता.सध्यातरी आजच मरण उद्यावर टळलय ह्या विचारांनी रेवाला हायसे वाटले.
प्रवासाने थकुन गेलेल्या रेवाला अंग टाकताच झोप लागली.
उद्याची सकाळ काय नाट्य घडवणार होते हे फक्त त्या विधात्यालाच माहित होते.
मात्र उद्याची पहाट दोन्ही घरात काहीतरी नविन नाट्य घडवणार हे मात्र निश्चित होते.

~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-50
©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
घरकोन कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all