घरकोन 51

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुदर प्रेमकहाणी.

घरकोन-51
©राधिका कुलकर्णी.

ऑफीसची रोजची कामे संपता संपता आज नऊ वाजले तरी सुशला भान नव्हते.यु.एस.ला जायचे दिवस जसजसे जवळ येत होते त्या संदर्भातली कामे करता करता दिवस कुणीकडे कलायचा कळायचे देखील नाही.
आजही तेच झाले.
सहज हातावरच्या घड्याळावर नजर पडली आणि तो भानावर आला.
"बापरेऽ किती उशीर झालाऽ.."
आता भुकेचीही जाणीव झाली.
दिवसभराच्या कामाच्या धावपळीत तो रागावुन रेवाशी न बोलताच घर सोडला हे साफ विसरला होता पण घरी जायचे विचार येताच ते सगळे पुन्हा आठवले.
पटपट टेबल वरच्या फाईल्स पेपर्सचा पसारा जागेवर लावत तो ऑफीसमधुन बाहेर पडला.आज रेवाने देखील एकही फोन केला नाही.
का बोलली ती अशी?
ती ह्याआधी असे कधीच बोलली नव्हती मग कालच का? 
मलाही काय झाले अचानक?मी एवढे रिअॅक्ट व्हायला नको होते ना..|
पण रागात पारा सटकला.
तिच्यावर हात उगारायला नको होता.चुकलेच जरा.
सुश गाडी ड्राईव्ह करता करता मनाशीच संवाद साधत होता.
विचारांच्या नादातच घराजवळ पोहोचला.
नेहमी प्रमाणे बेल वाजवली पण पलीकडुन कोणताच प्रतिसाद येत नव्हता.पुन्हा एकदा बेल वाजवली. पण काहीच रिस्पॉन्स नाही.त्याने चिडुनच लॅचकीने स्वत:च दार उघडले.
रेवाने दार न उघडल्याने पुन्हा त्याचा राग उफाळुन आला.
बॅग सोफ्यावर फेकतच तो बेडरूम मधे गेला.फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर आला.जेवण तयार बघुन त्याने जास्त फंदात न पडता जेवण उरकले.
जेवता जेवता सकाळी घाईत गेल्याने न वाचलेला पेपर वाचन सुरू झाले.त्या नादात आसपास रेवा नसल्याचा क्षणभर विसरच पडला त्याला.
आणि फार फार तर गेस्ट रूम मधे असेल कुठे जाणार घर सोडुन?अशी त्याची भ्रामक समजुत त्यामुळे रेवा घर सोडुन जाऊ शकते हा विचारही त्याच्या मनाला शीवला नव्हता.
जेवण झाले पेपर वाचन झाले तरीही घरात कुठलीच हालचाल जाणवेना तेव्हा मात्र सुश जरासा अस्वस्थ झाला.
हळुच गेस्टरूमचा दरवाजा उघडुन बघितला.रेवा रूममधे नव्हती हे पाहताच तो घाबरला.
एवढ्या रात्रीची ही कुठे गेली असेल?
आतामात्र त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरायला लागले.रेवा विषयीची रागाची जागा आता काळजीने घेतली होती.अजुनही त्याला असेच वाटत होते की रागावुन एखाद्या मैत्रिणीकडे वगैरे गेली असेल.
त्याने तिच्या किटी पार्टी गृपच्या समस्त मैत्रिणी ज्यांचे ज्यांचे नंबर डिरेक्टरीत मिळाले सगळ्यांना फोन करून चौकशी करून झाली पण रेवा कुणालाच भेटली किंवा बोलली नसल्याचे कळले.
आता मात्र काळजीची जागा भीतीने घेतली.कुठे गेली असेल रेवा?
मी हात उचलला म्हणुन रागावुन स्वत:चे काही....
नाही नकोच तो विचार.रेवा इतक्या कमकुवत मनाची नक्कीच नाही की जीवाचे काही बरे वाईट करेल पण मग इतक्या रात्री आता हिला शोधायचे तरी कसे आणि कुठे?
पोलीस कंम्प्लेंट करू का?
पण नको उगीच जवळपास कुठे गेली असेल तर तो पोलीसांचा ससेमिरा मागे लागायचा.काय करू?
सुश आता पुरता घाबरला होता.रेवाची काळजी वाटायला लागली होती त्याला.
नको नको ते विचार मनात थैमान घालत होते.काहीच समजत नव्हते की नेमके काय करावे?रेवाचा कुठे शोध घ्यावा.
अचानक काहीतरी आठवले.
काही महिन्यांपुर्वीच त्यांच्या घरापासुन जवऴच एक नविन देवीचे मंदिर स्थापन झाले होते.
ते कळल्या पासुन कधी कधी दोघेही उशीरा त्या मंदिरात जात असत.खूप शांत आणि प्रसन्न वाटायचे तिथे गेले की.म्हणुन सुशने लगेच गाडी काढली आणि मंदिरात गेला.
रेवा तिकडे नव्हतीच.पण तरीही तो दोन मिनिट तिकडेच टेकला.हात जोडुन देवीच्या मुर्तीकडे नुसता बघत राहीला.आता तुच काहीतरी मार्ग सुचव देवी रेवाला शोधण्यात.नकळत हेच भाव सुशच्या डोळ्यात एकवटले.
तिकडुन तसाच रेल्वे स्टेशन,बस स्टँड, जवऴपासचे जॉगींग पार्क्स,बस-थांबे जे जे म्हणुन सुचेल तिकडे सुशने शोध घेतला.पण कुठेच रेवाचा कोणताच क्लु मिळत नव्हता.आता मात्र त्याचे अवसान गळुन पडले.अंगाला घाम फुटायला लागला.
हातापायात नकळत कंप सुटायला लागला.
मन बेचैन झाले.काहीच कळेना की रेवाचा शोध कुठे घ्यावा.
निराश हताश मनाने पुन्हा घर गाठले.
घरात कुठे काही लिहुन ठेवले असेल तर शोधुया ह्या नव्या विचाराने पुन्हा घरातल्या कान्या कोपऱ्यातुन शोध सुरू झाला.कुठेही टिचभर चिठोराही लिहुन ठवलेला सापडला नाही.आता मात्र सुशचा धीर खचायला लागला.त्याला रडायला यायला लागले.
हे मी काय करून बसलो?रागाच्या भरात एक फोन पण मी केला नाही.रेवाला कुठे शोधु आता इतक्या रात्री.??
मनात विचारांचे काहुर माजले.
पण मार्ग सुचत नव्हता.
डोक्याला हात लावुन पुढे काय करायचे ह्या विचारात सोफ्यावर बसला असतानाच फोनचा रिंग वाजली.
वीजेच्या गतीने सुशांतने फोन उचलला.एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल.त्याने थरथरत्या हातानेच फोन उचलला.
कोण विचारतानाही आवाजात कंप येत होता.
रेवाचा आवाज ऐकण्यासाठी त्याचे कान तडफडत होते.
देव करो आणि हा फोन रेवाचाच असो हिच प्रार्थना सुश मनोमन करत समोरून कोण बोलतेय ह्याचा अंदाज घेत होता.
ठरल्या प्रमाणे उन्मेशनेच फोन केला होता.
"हाय सुशा,काय चाललेय?"
"डिस्टर्ब केले का?"त्याने मुद्दामच काहीच घडले नाही असा अविर्भाव दाखवत चौकशी केली.
सुशांत मात्र उन्मेशचा आवाज एेकताच आत्ता पर्यंतचा एकवटलेला सगळा संयम गळुन रडायला लागला.
सुशचे असे रडणे उन्मेशला एक्सप्क्टेडच नव्हते.
त्यामुळे तोही जरा घाबरला.
पण आत्ता तरी सुशाला सावरणे गरजेचे होते.म्हणुन मग त्याने उगीचच काही माहित नसल्याचा आव आणत विचारले,
"काय झाले मित्रा,रडतोस काय बायकां सारखा?"
"रडु नको तर काय करू उन्म्या?"
"रेवा घरात कुठेच नाहिये."
"काल आमचे एका छोट्याशा विषयावर भांडण झाले आणि रागाभरात मी तिच्यावर हात उचलला.सकाळीही तिच्याशी न बोलताच बाहेर पडलो.
दिवसभर ऑफीसमधे इतका बिझी होतो की दुपारी पण फोन करायला विसरलो आणि आता घरी येवुन बघतोय तर रेवा घरात नाहीये.मला तर समजेनासे झालेय की तिला कुठे शोधु?"
"बट रेवा इज सेन्सिबल गर्ल,ती असे आततायी काही करेल असे मला तरी वाटत नाही,नेमके काय झालेय?"
"ते सांगेन रे सगळे.आत्ता ते सगळे बोलायची वेळ नाहीये,माझा धीर खचत चाललाय उन्म्या,यार कुठे शोधु ह्या मुर्ख मुलीला?असे कोणी न सांगता घर सोडुन जाते का यार?"
"तु घरी काकुंना फोन करून बघितलास का?"
कदाचित काकुंना ती काही बोलली असेल तर?"
"आईलाऽऽ?"
तिला काय विचारू अन् कसे? जवळ आहे का नगरला जाणे?"
" इतके सोप्पेय का?"
"आणि तसे असते तर आईचाच फोन आला नसता का?"
"अरे कदाचित तु घरी नसताना त्यांचा फोन येऊन गेला असेल,तु करून तर बघ."

सुशला हे सांगता येत नव्हते उन्मेशला की गेली दोन वर्ष तो आईशी बोललेला नव्हता आणि आजही दोघांमधले भांडणाचे कारण तेच होते.
पण आता खरच पर्याय उरलेला नव्हता.त्याला आज रेवासाठी का होईना  फोनवरून आईशी संवाद साधणे क्रमप्राप्तच होते.
कदाचित देवाचीच मर्जी असावी अशी.
"हो खरय,होऊ शकते.थांब मी फोन करून बघतो."
"बर पण काही कळले तर मलाही कळव रे.मला पण काळजी वाटतीय."
उन्मेशने फोन ठेवता ठेवताच दोन सेंटी डायलॉग मारले.

सुशने घाईघाईने घरचा नंबर डायल केला.
रात्रीचे बारा वाजले असतील.
काकुंनी सगळे आवरून रूममधे येई पर्यंत रेवाचा डोळा लागला होता.चेहरा थकलेला दिसत होता.
काकु तिच्या जवळ जाऊन बसल्या.डोक्यावरून अलगद हात फिरवला.
"इतकी समंजस पोर,आज अचानक असे काय झाले की न सांगता इकडे निघुन आली?"
"बर त्या लेकराला तरी सांगितलेय की नाही देव जाणे.काय करावे ह्या पोरांना?ह्या वयात आपले बघायचे की ह्यांचे? ?"
काकुंचा मनाशीच संवाद चालु असताना खाली फोनची घंटी वाजण्याचा आवाज यायला लागला.मनात शंका आलीच की फोन सुशांतचाच असणार.
शक्य तितक्या गतीने पावले टाकत काकू जिना उतरून खाली आल्या.फोन अजुनही वाजत होता.
काकुंनी फोन उचलला.
"हॅलो कोण बोलतेय?"
आईचा आवाज ऐकताच क्षणभर सुशांतला सुचेना की काय बोलावे.तो काही न बोलता शांत झाला.
एक क्षण पुर्ण शांतता.
कुणीच काही बोलत नव्हते.अखेरीस काकुंनीच शांततेचा भंग करत प्रश्न केला "कोण सुश बोलतोय का रे?"
"ह्ं ऽऽऽ"
रडवेल्या आवाजातच सुशने हुंकार दिला.
"मग बोल की रे लेकरा..काय झाले?"
सुशचे राहीले साहिले कवच गळुन पडले आईचा लेकरा शब्द ऐकताच.काय जादू असते की ताकद माहित नाही पण प्रेमाचा,मायेचा एक आवाज कसे दु:खात देखिल आधार देऊन जातो.त्याचे प्रत्यंतर सुशांत आत्ता ह्या असहाय,निराधार क्षणी अनुभवत होता.आईच्या एका हाकेने सगळी कवच गळुन पडली होती आणि लहान मुलागत सुशांत फोनवर रडायला लागला.
इकडे काकुही आश्चर्यचकित झाल्या.रेवाही काही बोलली नव्हती आणि आता सुश एवढ्या रात्रीचा फोन करून ढसाढसा रडत होता.त्याचे कसे सांत्वन करावे तेच काकुंना उमगत नव्हते.
"सुशा,लेकरा,अरे रडतोस काय असा काय झाले?"
"आधी रडणे थांबव आणि नीट सांग बघु?"
"आईऽऽऽ रेवा घरात कुठेच नाहीये.मी ईकडे सगळीकडे शोध घेतला पण तिचा कुठेच पत्ता नाही.मी काय करू गं आई आता,कुठे शोधु माझ्या रेवुला."
सुश पुन्हा रडतच सगळे बोलला.

काकुंच्या लक्षात येत होत्या हळुहळु गोष्टी पण अजुन पुरता उलगडा झाला नव्हता म्हणुन ते जाणुन घेण्याकरता इतक्यात रेवा इथे असल्याचे न सांगण्याचेच ठरवले त्यांनी.
"अरे पण अशी विनाकारण का घर सोडेल कोणी?"
"तुम्ही भांडलात का दोघे,काय झाले?"
"हो आई काल आमचे भांडण झाले आणि रागात मी तिच्यावर हात पण उचलला,पण म्हणुन काय असे घर सोडून जायचे का?मला तिची माहित असलेली सगळी ठिकाणे शोधुन झालीएत. मला तर सुचतच नाहीये की आता पुढे काय करू?

आता मात्र काकुंना त्याची अवस्था बघवेना.त्यांनी सुशला सत्य सांगायचे ठरवले.
"हे बघ रडू नकोस.देव खूप दयाळु आहे.तुझी रेवा कुठेही गेलेली नाहिये ती इकडे आलीय नगरला.
तेव्हा आता शांत हो.डोळे पुस.
"अॉऽऽऽ!!" रेवा नगरलाऽऽ? ते कसे शक्य आहे.ती एकटीच कशी आली तिकडे?"
"हे बघ तीही आल्यापासुन काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हती म्हणुन मी जास्त प्रश्न विचारले नाहीत.ती आत्ता झोपलीय. उद्या सकाळी बोलते तिच्याशी.
"तुही शांत झोप.काळजी करू नकोस.सगळे ठिक होईल."
"थँक्यु आई.तुझ्याशी बोलुन खूप आधार वाटला.रेवा तिकडे सुखरूप आहे एेकुन तुला माहित नाही मी आत्ता किती निश्चिंत झालोय. काळजी घे स्वत:ची.मी उद्या पुन्हा फोन करतो..झोप आता तुही..."

फोन कट झाला तरीही आईचा आवाज,ते आवाजातले मायेचे बोल त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते.

किती सहज बोललो आपण.आई पण किती काळजीने बोलत होती.
का ???.
का इतके वर्ष लावले मी ह्याच मायेच्या आवाजाला ऐकायला?
किती हलके वाटतेय ह्याक्षणी.मग का मी मला पारखे केले ह्या आनंदापासुन?
कुठल्या गुर्मीत जगत होतो मी की आई नावाच्या प्राण्याची सुद्धा मला आठवण होऊ नये.."
सुश स्वत:च्याच पश्चात्तापाच्या अग्नित होरपळत होता.
फोन ठेवुन धावत सुश आपल्या खोलीत गेला.बेडरूम मधले कपाट उघडले.कपाटाच्या चोरकप्यात बंद करून ठेवलेला आईचा फोटो बाहेर काढला.
आणि फोटोला उराशी कवटाळुन हमसुन हमसुन रडायला लागला.
"आई आज मला तुझ्या कुशीत शिरून मोठ्याने रडावे वाटतेय गं."
"कुठेस तु?ये ना,मला जवळ घे ना."
"मी खूप दुष्टपणे वागलो गं,मला माफ करशील ना तु. "
सुशांत भान विसरून रडत होता.
अंगावरचा सदरा पश्चात्तापाच्या आसवांमधे भिजुन गेला होता.
डोळ्यातील सर्व प्रश्न, शंका,कुशंका,रूसवा,हेवा दावा सगळ्यांवर आईच्या एका मायेच्या शब्दाने सरशी केली होती.
अहंकार गळुन पडला होता एका कोपऱ्यात कोकरासारखा.आता डोळे आणि मन स्वच्छ झाले होते.
सर्व शंकांचा निचरा होऊन एक स्वच्छ मन उद्याच्या सुंदर पहाटेची वाट पहात होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-51
©®राधिका कुलकर्णी.
कसा वाटला हा भाग?काय होईल पूढे?
सुशांत रेवाला आणायला नगरला जाईल का?
ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर पुढचा भाग जरूर वाचा.
कमेंटमधे जरूर कळवा..
(लेखन वितरणाचे हक्क लेखिकेच्या स्वाधीन.)
धन्यवाद.

🎭 Series Post

View all