घरकोन भाग 57

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी.

घरकोन-57
©राधिका कुलकर्णी.

सकाळ सरून जेवायची वेळ झाली तरी रेवा झोपलेलीच होती.अशी अवेळी ती काम टाकुन झोपत नाही, मग अजुन का उठली नाही?सुशच्या आई विचार करतच रेवाच्या खोलीत आल्या.रेवा बेडवर गाढ झोपेत होती.जवळ जावुन कपाळाला हात लावला तर अंग तापाने चटकत होते.गरम चटका बसल्यावर हात झटकावा तसा आईंनी हात बाजुला घेतला.
अगोबाईऽऽ ही तर तापलीय की चांगलीच.कामाचा शीणवटा बाहेर पडतोय.
रेवाऽऽ ए रेवाऽऽ, काय होतेय बाळ बरे नाही वाटत का? 
जरा खाऊन घेतेस का बाळ? अंग बघ किती तापलेय तुझे."
आई कानाशी बराच वेळचे बोलत होत्या पण रेवा फक्त हुंकार देवुन अस्पष्ट प्रतिसाद देत होती.ती पुर्ण ग्लानीतच होती.
आईंना काहीच सुचेना.नविन जागा.काही माहिती नाही मुलगा ऑफीसला गेलेला.त्याच्या ऑफीसचा नंबर नाही.डॉक्टर कोण माहित नाही.काय करावे त्यांना काहीच सुचत नव्हते.रेवाही कशालाच रिस्पॉन्स देत नव्हती.
त्या घाईने किचनमधे गेल्या थोडा बर्फ फ्रिजमधुन काढला.एका भांड्यात पाणी घेवुन थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवायला सुरवात केली.थंड स्पर्शाने दचकुन रेवा जागी झाली.आईंना समोर बघुन ती घाबरली.काय झाले आई?"मला कुठे काय झालेय.तुलाच ताप भरलाय बघ.केव्हाची उठवतेय पण तु ग्लानीतच होतीस."
आई मला गरगरल्यासारखे होतेय.सकाळ पासुन बरेच नाही वाटत आहे म्हणुन थोडी पडले तर झोपच लागली.
तुला सगळ्या दगदगीचा शिणवटा आलाय.किती धावपळ झाली.
आता स्वस्थ पडुन रहा मी पेज करून आणते गरम गरम खा म्हणजे बरे वाटेल हो."
रेवाच्या डोळ्यातुन कढत अश्रुंचे लोट वाहु लागले.इतकी माया आज्जीनंतर आजच अनुभवत होती ती.आजारी पडली की आज्जीच तिला बटव्यातली औषधे उगाळुन पाजायची.कसलातरी काढा द्यायची.डोके चेपायची.रात्रभर उशाशी बसुन रहायची.आज तेच सगळे आठवुन तिला रडु येत होते.
आईंचे लक्ष गेले तसे त्यांनी तिचे डोळे पुसत विचारले, " का ग रडतेस पोरी,?मी आहे ना, काय होतेय सांग पाहु."
काकुंनी केलेल्या मायेच्या चौकॆशीने तिला पुन्हा भरून आले.ती कुशीत शिरून रडायला लागली.
आईंना तिचे अनपेक्षीतपणे रडणे संभ्रमात टाकत होते.
काही नाही आई आज अचानक आज्जीची खूप आठवण आली.ती असती तर तिनेही माझी अशीच सेवा केली असती.आमच्या माहेरी आई पेक्षा मला आज्जीच सगळं करायची.आज तुम्हाला सगळ करताना बघुन तिची आठवण आली.
"मला येते तशी माझ्या घरच्यांना पण माझी आठवण येत असेल का हो?"
गप पोरी गप..असे विचार मनातही आणु नकोस.तुझे आई-बाप खरेच भाग्यवान, त्यांच्या पदरी तुझ्यासारखी एवढी गुणी मुलगी जन्माला आली.आणि माझे भाग्य थोर म्हणुन तु माझ्या घरी आलीस.आता असा विचार नाही हं करायचा.मी आहे,काकु आहेत तुला दोन दोन आयांचे प्रेम मिळतेय की नाही,सांग पाहु?"
काकु कशी बशी तिची समजुत काढायचा प्रयत्न करत होत्या.थोडी शांत झाली तशी रेवाला जाणीव झाली की दुपार उलटुन गेलीय.
"आई तुमची जेवणे झाली का?"
"किती वाजलेत?"
"काका काकुंची उरकलीत. माझे राहिलेय.करते मी तुला एवढी पेज देऊन."
आई अजुन जेवल्या नाहीत हे समजताच रेवा बेडवरून टणकन ऊठुन बसली.
ते काही नाही,तुम्ही आधी जेवा बघु.असे इतक्या वेळ उपाशी राहणे तुमच्या तब्येतीला योग्य नाही.चला आपण दोघी तिकडेच बसु.मी ही तुमच्या बरोबर बसते.चला.
तिने हट्टानेच आईंना जेवायला बसवले.आणि स्वत:ही काकुंनी केलेली पेज त्यांच्या सोबत बसुन खाल्ली.पेज पोटात गेल्यावर तिला बरे वाटत होते.
अचानक मनावर आलेल्या ताणामुळे तिला ताप भरला असावा. तिचा अंदाज अचुक होता.मागेही तिला सुशांतने कॉलेजात असताना सायली बरोबर सलगीचे नाटक केले तेव्हाही असाच ताप भरला होता.
पण तेव्हा जरी नाटक होते तरी आजची त्याची वागणुक नाटक मुळीच नव्हती.
पण आता तिच्यावर तीन म्हाताऱ्या जीवांची काळजी होती.त्यामुळे उगीच आततायी विचार करून सगळ्यांना त्रास देणे योग्य नाही हे तिला जाणवले.
दोन दिवसांनी सुश घरी येईलच.तेव्हाही त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही तर मग सरळ सरळ बोलुन टाकुया.मनावर असले फालतुचे ओझे टाकुन तब्येतीवर परीणाम करून घेण्यात काहीच अर्थ नव्हता.जरा विचार केल्यावर आता रेवाचे मन थोडे थाऱ्यावर आले.विचार संयमीत झाल्यावर तिला आतुनच बरे वाटतेय असा फिल येवु लागला.
तरीही अंगात ताप असल्याने आरामही आवश्यकच होता.पेज संपवुन गोळी घेवुन ती पुन्हा झोपली.
~~~~~~~~~~~~~`~~~~
संध्याकाळच्या देवघरातील धुपाच्या घरभर पसरलेल्या मंद सुगंधाने रेवा जागी झाली.तिला आता बरेच बरे वाटत होते.आईंनी देवघरात सांजवात केली होती.काकु किचनमधे चहा करत होत्या.आज पहिल्यांदा रेवाला खूप छान वाटत होते.
हेच एरवी तब्येत बरी असो, नसो तिचे काम करायला तिला उठायलाच लागायचे. इच्छा असो/नसो,अंगात बळ असो की नसो स्वत:ला लागते म्हणुन चहा करायला तरी उसने अवसान आणुन काम करावेच लागायचे.पण आज दोन आयांनी तिच्या सर्व कामांची वाटणी घेऊन तिला पुर्ण आराम दिला होता हे बघुन तिचे मन खूप सुखावले होते.अचानक खूप छान पॉझिटीव्ह व्हाईब्ज मनाला खूप उभारी देत होत्या.
रात्री उशीरा सुशने फोन करून पोहचल्याचा निरोप दिला.आईंना फोन दे सांगुन त्याने रेवाशी बोलणेही टाळले.रेवा खट्टु झाली.आईं बरोबर सुश खूपवेळ बोलत होता.आई पण फक्त हं. ,हं इतकाच प्रतिसाद देत होत्या.त्यांच्यात काय बोलणे चाललेय हे त्यामुळेच समजत नव्हते.रेवाची बेचैनी पुन्हा वाढायला लागली.
तरीही मनाला शांत करत ती पुढची कामे करत राहीली.साधारण तासभरानी फोन संपला.आईपण त्यांच्या रूम मधे निघुन गेल्या.ऑलरेडी खूप उशीर झाला होता त्यामुळे आता उद्याच बोलायचा विचार करून रेवाही झोपी गेली.
पुन्हा एक विचार चमकुन डोक्यात आला आणि रेवा उठली.
हळुच हॉलमधे आली.दोन्ही बेडरूमला कानोसा लावुन झोपल्याची खात्री करून ती फोनपाशी गेली.
रात्रीचे बारा वाजुन गेले होते.
तिने शेवटच्या नंबरला रिडायल मारला.हा तोच नंबर होता ज्यावरून सुशने शेवटचा कॉल केला होता.आपल्या मनातली भिती खरीय की खोटी हे तपासायलाच तिने रिडायल मारला.फोन एंगेज्ड टोन दाखवत होता.तिने थोडावेळ थांबुन पुन्हा कॉल केला तरीही फोन एंगेज.
आतामात्र रेवाचे धाबेच दणाणले.एवढ्या रात्रीचा हा कुणाशी बोलतोय.
खरच का ह्याच्या आयुष्यात.......?
पुढचे वाक्यही तिला पुर्ण करायची हिम्मत होईना.पायाखालची जमीन सरकुन आपण खोल दरीत धसत चाललोय की काय असा तिला भास होता होता.
जे असेल ते असेल पण आता गप्प बसुन चालणार नाही.मला अंधारात ठेवुन ह्याची ही थेरं मी खपवुन घेणार नाही.
मी दूर गेले होते ते त्याची नाती सांधायला.पण हा मात्र स्वत:च्या स्वार्थाकरता माझी आहुती देतोय.हे चालणार नाही.मला आता कणखर बनायलाच हवे.
दृढ निश्चयाने रेवाचे मन पेटुन उठले.
आपल्यामुळे घरातल्यांची शांतता भंगु नये ह्याची काळजी घेत तिने पुढला दिवस कसाबसा ढकलला.दुसऱ्या
रात्री पुन्हा तिने सेम नंबरवर उशीरा फोन केला.पुन्हा कालप्रमाणेच फोन एंगेज.मग तिने तासभर जाऊ दिला.आणि दिड वाजता पुन्हा कॉल केला तेव्हा मात्र रींग गेली.म्हणजे फोनचा रीसीव्हर काढुन ठेवला असण्याची शक्यता पण मोडीत निघाली.
आता हे प्रकरण वाटते तितके सोप्पे नाहीये ह्याची रेवाला जाणीव झाली.तिने ह्या विषयाला शांतपणेच हाताळायचा निर्णय घेतला.
मन चलबिचल होत होते.काही केल्या झोप लागत नव्हती.
"सकाळी आल्यासरशीच बोलावे की दोन दिवस वाट पहावी.?"
एक मन सांगत होते आले की बोलुन विषयाचा तुकडा पाड तर दुसरे,मन सबुरीने घे असे सुचवत होते.तिच्या मनातील द्वंद्व काही केल्या निष्कर्षा पर्यंत पोहचवतच नव्हते.शेवटी सगळीकडुन हारल्यावर सगळे करतात तेच तिने केले.देवाजवळ गेली.असल्या गोष्टीवर विश्वास न ठेवणारी पण आज तिने देवापुढे चिठ्ठ्या टाकल्या.देवाचा कौल जो तसे वागु असे ठरवुन हळदी कुंकवाच्या चिठ्ठ्या हवेत डोळे मिटुन उधळल्या.बंद डोळ्यांनीच चाचपडत एक चिठ्ठी उचलली.कुंकू आले तर नंतर बोलायचे हळद आली तर आल्या आल्या.चिठ्ठीत कुंकू आले.म्हणजे देवानेही हाच कौल दिला की सबुरीने घे.
ठिक आहे.जिथे इतके दिवस सहन केले तिथे अजुन दोन दिवस ...
शेवटी निर्णय तर कळेलच आज ना उद्या...
आपल्याच विचारांत ती पुन्हा बेडवर येवुन स्वत:ला झोकुन दिले.
कधी झोपेने ताबा घेतला तिलाही कळले नाही....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-57
©राधिका कुलकर्णी.
नमस्कार मित्र/मैत्रिणींनो,
आता कथेचा शेवट जवळ येत चाललाय.कशी वाटली कथा हे सांगायला विसरू नका.
काही सजेशन्स असतील तर जरूर कळवा म्हणजे पुढील लिखाणात त्याचा विचार करता येईल.
धन्यवाद.प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत.....

🎭 Series Post

View all