घरकोन भाग 59

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी.

घरकोन-59
©राधिका कुलकर्णी.

संध्याकाळ उलटुन गेली होती.आज दिवसभरात सुशने एकही कॉल केला नव्हता.गेली दोन वर्ष लंच अवर्स मधे कॉल करण्याचा नियम कधीही तशाच काही कारणा खेरीज चुकला नव्हता त्याचा.पण गेल्या दहा बारा दिवसात चक्र इतक्या वेगाने फिरले होते की सुश मधला हा बदल बघुन आधीचा सुश खरा की आता वागतोय तो सुश खरा असा संभ्रम व्हावा इतके त्याचे वागणे बदलले होते.
संध्याकाळच्या आकाशात वेगवेगळ्या छटा पसरल्या होत्या.रेवा आकाशातील विविधरंगी छटांकडे एकटक बघत होती.
एखादी करडी छटा अवचित सगळ्या रंगामधुन जागा काढत होती.इतर रंगछटांमधला तो करडा रंग विटका नकोसा वाटत होता.
तो करडा रंग मीच तर नाही??
अचानक रेवाला वाटुन गेले.तांबडे नारंगी पिवळे निळे रंग किती सुंदर वाटतात ना.हे आकाश म्हणजे जणु सुश  आहे अशी कल्पनाकरत होती रेवा आणि सगळे पसरलेले रंग म्हणजे त्याच्या अवतिभोवतीची माणसे.त्या सगळ्यात नकोसा झालेला , विटका करडा रंग म्हणजे ती स्वत: असे वाटत होते तिला..
आपण सुशला नकोसे झालोत ह्या कल्पनेनेच डोळे भरून आले रेवाचे.
आई कधी बाजुला येवुन उभ्या राहिल्या तिला कळलेच नाही.
आपला रडवेला चेहरा त्यांनी बघु नये म्हणुन तिने चटकन चेहऱ्यावरून हात फिरवला आणि शिताफीने डोळे पुसले.
पण लाल झालेले डोळे आणि नाक पाहुन आईंनी अंदाज बांधलाच.
"रेवा तिन्हीसांजेची इकडे एकटीच का ग अशी उभी?"
"चेहरा का उदास रडवेला दिसतोय तुझा?"
"नाही ..कुठे काय?सहजच उभी आहे."
आपले विचार लपवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला रेवाने..विषय बदलायचा म्हणुन बोलायला लागली
"आईऽऽ,आकाश बघा ना किती विविध रंगांनी नटलेय.प्रत्येक छटा निराळी. काही हव्याहव्याश्या तर काही छटा नकोशा.
नात्यांचेही असेच असते का हो??
काही नाती आधी खूप हवीहवीशी वाटतात पण अचानक ती नकोशी, विटकी वाटायला लागतात."
"आज असे काय बोलतीएस असंबद्ध.?."
"काही झालेय का? " 
"नाही हो.असेच सहज सुचले आकाशाकडे बघुन."
"तुला बरे नाही वाटत का बाळा,कुणाची आठवण येतेय का?"
रेवाचा गळा ऋद्ध झाला.पुन्हा कढ दाटुन यायला सुरवात झाली.तरीही मनातली घालमेल वरकरणी दिसु न देताच ती उत्तरली," छेऽऽ हो.कुणाची आठवण काढावे असे उरलेय तरी कोण माझ्या आयुष्यात."
"आता तुम्हीच माझे जवळचे.मला तर तुमच्याशिवाय कोणीच नाही ह्या संपुर्ण जगात."
"मला आपल मानतेस ना,मग सांग बघु का उदास उदास असतेस हल्ली?"
नगरला किती बडबड करायचीस इकडे आली तसे बघतीय तु गप्प गप्पच असतेस.आमच्या येण्याने तुझ्यावर कामाचा ताण वाढलाय का?"
"नाही हो आई..हे काय भलतेच.उलट एकटीला घर खायला उठायचं.आता निदान घर भरलेल तरी आहे.तुम्ही प्लिज चुकुनही असा विचार करू नका."
"मग सुश बरोबर काही झालेय का?"
काही व्हायला तो घरात असायला तर हवा ना आई.आल्या पासुन बघताय ना कशी भिंगरी लागलीय त्याच्या पायाला.साधे दोन शब्द बोलायलाही वेळ नाहीये त्याच्याकडे."
"अच्छा म्हणजे हे कारण आहे होय तुझ्या उदासीचे."
"थांब येवु दे त्याला घरी.आज बघतेच त्याच्याकडे."
सुशची आई रेवाची समजुत काढण्याचा प्रयत्न करत होत्या.
"छेऽऽ छेऽ..त्याला काही बोलु नका हं तुम्ही.नाहीतर त्याला वाटायचे मीच तक्रार केली.उगीच अजुन नसता त्रास वाढायचा."
"रेवा नेमके काय झालेय तुमच्यात,मला कळेल का? आत्ता पर्यंत मस्करी करत होते मी,पण मी ही बघतेय गेली पाच सहा दिवस त्याचे तुझ्याशी वागणे तुटक तुटक वाटतेय."
"तुझ्याशी भांडलाय का सुशा?"
"नाही आई.असे काहीच नाहीये.मला खरच काही माहीत नाहीये.फक्त इतकेच सांगते की नगरहुन आल्यापासुन त्याने माझ्याशी बोलणे टाकलेय." का? काय कारण, मला खरच माहित नाही."
"कामापुरतेच बोलतो.आमच्यातील संवादच खुंटलाय.तो मला तुमच्या मार्फत गोष्टी कळवतो.आता ह्याहुन जास्त काही विचारू नका आई.मला काहीच सांगता येणार नाही."
"अगं पण का?"
"ते मला कळले तर तुम्हाला सांगेन ना.माझी काय चुक हे ही मला माहित नाही."
"सुशा असा नव्हता गं.किती बदललाय हा."
"आई‌ऽऽ तुम्हाला असे वाटतेय का की माझ्यामुळे तो असा झालाय?"
"ए वेडाबाई..मी असे का म्हणेन?
उलट तुझ्यामुळे मला माझा लेक पुन्हा मिळाला.पण तुझ्यावर इतके प्रेम करणारा अचानक इतका कसा बदलला हा प्रश्न पडलाय मला."
"आज पहिल्यांदा तो दुपारचा फोन करायला विसरला आहे."
"मला खूप काळजी वाटायला लागलीय आई."
"अगं होऽ, मी विसरलेच.दुपारी त्याने फोन केला होता.मी त्याला म्हणलेही की थांब रेवाला बोलवते पण तो म्हणला की मी घाईत आहे नंतर फोन करून बोलतो तिला.मला वाटले केला असेल त्याने फोन."
"हरकत नाही.तुम्ही बोललात ना,मग झाले तर."
बरं जाऊदे हे सगळे.उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस ना.सांग काय बेत करायचा उद्या?
काकुंनी(सुशांतची आई)मुद्दामच विषय बदलला.
"तुला काय हवेय माझ्याकडुन सांग पाहु?"
"मला काहीऽऽ नको आई.
तुमचे आशीर्वादच खूप आहेत आणि खूप सारी माया करा माझ्यावर."
"सुशांत आणि तुझा काही प्लॅन असेल तर आधीच सांगा हो.
नाहीतर आम्ही म्हातारे काही प्लॅन करायचो आणि तुमचा हिरमोड व्हायचा असे नको व्हायला."
"छे हो..आता जो पण प्लॅन असेल सगळे मिळुनच करू.
हे वर्ष खरच खूप स्पेशल आहे आमच्यासाठी.किती वर्षांनी आपण पुन्हा एकत्र आहोत नाही का?"
"मुड गेलाय का मग?"
"सुशा पार्टी करायला नाही म्हणला म्हणुन अपसेट आहेस का?"
"तसेही नाहीये हो आई." तो काहीतरी लपवतोय असे सतत वाटतेय मला.मलाच कळत नाहीये की मी जो विचार करतेय तो बरोबर की चुक?विचार करकरून वेड लागायची पाळी आलीय नुसती."
"बघ मला तर वाटतेय सुशा तुला नक्की काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असणार.मुद्दाम तुला कळु देत नसेल.ह्याआधीही तुला अनुभव आहेच की ह्याचा.
उद्याचा दिवस खूप खास आहे ना तुमच्यासाठी मग असे उदास नको राहुस, हास पाहु आधी."
"मला तुझा उदासवाणा चेहरा बघवत नाही."
"कोणी बघितले तर काय म्हणतील, काय बाई सासू छळ छळ छळतीय सुनेला.पहा कसा चेहरा उतरलाय सासु आल्यापासुन."
आईंनी मुद्दामुन रेवाची मस्करी केली.
"काय हो आई,कसली थट्टा करताय ही अशी?"हे स्वप्नात तरी शक्य आहे का?"
रेवाने हसुन उत्तर दिले.
"नाहिये ना शक्य?मग छान नेहमी सारखी हसुन रहा बघु."
आईंनी क्षणात रेवाचा मुड बदलला.रेवाच्या चेहऱ्यावर तात्पुरते का होईना हास्य उमटलेले पाहुन आईंनाही समाधानी वाटले.
 घड्याळाने आठचे ठोके दिले तशा दोघीही भानावरआल्या.
काका-काकुंच्या पथ्य-पाणी/जेवणाची वेळ होत आली होती.
 किचनकडे जाताजाताच आई रेवाला म्हणाल्या.
"बर चल खूप अंधार पडलाय.जवणाचे बघुया.काका-काकुंची वेळ चुकुन चालणार नाही."
काहीही न बोलता दोघींची पावले स्वैयंपाकघराकडे वळली.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-59
©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार वीचक मित्र मैत्रिणींनो..
कशी वाटतेय कथा..आता ह्यानंतर फक्त एक भाग आणि कथेची सांगता होईल.तेव्हा तुमच्या प्रतिक्रीया द्यायला विसरू नका.तुम्ही ह्या कथेवर जसे प्रेम केलेत तसेच माझ्या इतरही कथांवर भरभरून प्पेम कराल ही अपेक्षा..
कमेंट्स नक्की कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.)
धन्यवाद.
@राधिका कुलकर्णी.

🎭 Series Post

View all