घरकुल आपुले छान _ भाग १
"मे आय कम इन सर"
"येस कम इन"
केबिनमध्ये आलेल्या प्रीतीकडे काही क्षण समीर बघतच राहिला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. नीमगोऱ्या रंगाची, मध्यम उंचीची, रेशमी सरळ केसांची आणि बदामी टपोऱ्या डोळ्यांची देखणी प्रीती पण त्याच्याकडे पाहत होती. भानावर येत समीर पटकन म्हणाला,
"बसा न तुम्ही उभ्या का?"
समीरची स्वतःची सीए फर्म होती. प्रीती तिच्या कंपनीच्या कामासाठी तिथे आली होती. नंतर ती वरचेवर तिथे येत होती. कंपनीसाठी मीटिंग करता करता दोघे वैयक्तिक पातळीवर एकमेकांना भेटू लागले. ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडले त्यांनाही कळलंच नाही. प्रीती आणि समीरचं एकमेकांवर खूपच प्रेम होतं. चार वर्षांंपासून प्रीती आणि समीर प्रेमात होते. त्यांच्या प्रेमाला दोघांच्याही घरून संमती होती. प्रीतीचे आई-बाबा लवकर लग्न व्हावं म्हणून घाई करत होते परंतु समीरच्या बाबांचं असं मत होतं की समीर जरी सीए झाला असला, पिढीजात व्यवसाय असला तरी त्याला स्वतः काम करण्याचा अनुभव घेऊ दे. थोडं यश त्याच्या पदरात पडू दे मग आपण लग्न करूया. समीरने प्रीतीच्या आई-बाबांना खात्री दिली होती की तुम्ही काही काळजी करू नका मी लवकरच प्रितीशी लग्न करेन.
काही दिवसांनी प्रीतीला समीरचा फोन आला,
"आज संध्याकाळी लवकरच ये भेटायला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे" समीरने फोनवर हे सांगितल्यापासून प्रीतीच्या मनात धाकधुक सुरू झाली. तिच्या मनात नको नको ते विचार यायला लागले. त्याचे आई बाबा आता लग्नाला नाही तर म्हणत नसतील ना! खरंच लग्न होईपर्यंत काय घडेल काही सांगता येत नाही. समीरला भेटायला ती मस्त त्याच्या आवडीचा गुलाबी रंगाचा ड्रेस घालून गेली. समीर नेहमीच्या हॉटेलमध्ये आधीच येऊन बसला होता. त्याने नेव्ही ब्लू कलरचा शर्ट आणि ग्रे कलरची जीन्स घातली होती. त्या वेषात तो स्मार्ट दिसत होता. प्रीतीने आल्याबरोबर त्याला म्हटलं,
"समीर तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे. तू लग्नाबद्दल काही सांगणार आहेस का?"
समीरने तिची उत्सुकता ताणून न धरता तिला म्हटलं,
"अगं हो हो जरा धीर धर. आनंदाची बातमी आहे. प्रीती आई बाबांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे." हे ऐकून प्रीती खूपच खुश झाली. ती त्याला म्हणाली,
"फोनवर किती गंभीर आवाजात बोलत होतास. तेव्हाच सांगायचं होतंस ना"
"अगं असं पटकन सांगितलं असतं तर काही मजा नसती आली."
इतर अवांतर गप्पा झाल्यावर दोघंही आपापल्या घरी गेले.
"प्रीतीचे झुळझुळ पाणी" गाणं गुणगुणतच प्रीतीने घरात प्रवेश केला. ती तिच्या तंद्रीतच डायरेक्ट रूममध्ये जात होती. इतक्यात तिचं लक्ष सोफ्यावर बसून टीव्ही बघणाऱ्या वसुधा ताई आणि शामराव देसाई म्हणजेच तिच्या आई-बाबांकडे गेलं. वसुधाताई शामरावांना डोळ्यांनी इशारा करत होत्या. दोघेही प्रीतीकडे पाहत होते.
"अरे आई बाबा तुम्ही इथे बसला आहात. मला वाटलं तुम्ही चहा घेत लॉनवर बसला असाल." एकदम गांगरून प्रीती म्हणाली.
"हो बाई आम्ही बापडे टीव्ही बघत बसलो आहोत. पण तू आज एवढी खुश का? आम्हाला पण तुझ्या खुशीचं कारण कळू दे."
(प्रीतीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल की नाही ते पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा