घरकुल आपुले छान _ भाग २
प्रीती धावतच आईच्या जवळ आली आणि तिला मिठी मारत म्हणाली,
"आई समीरच्या आई-बाबांनी आमच्या लग्नाला होकार दिला आहे. त्यामुळे आता तुमचं हे पाखरू उडून जाणार बरं का."
"बघा बघा नवीन घरी जाणार म्हणून किती खुश आहे प्रीती. तुझं लग्न होणार म्हणून आम्हाला आनंद होतोच आहे पण तू गेल्यावर आम्ही दोघेच राहू गं. घर खायला उठेल. तुला बाहेरून यायला जरा जरी उशीर झाला तरी जीव कासावीस होतो. आता तू आमच्यापासून दूर जाणार या विचारानेच मन उदास होतं."
"प्रीती तुला कल्पना नाही ग तू गेलीस की आमच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होईल. अर्थात ती जगरहाटीच आहे. प्रत्यक्ष तो क्षण जवळ आला की जास्त जाणवतं." बाबांचा स्वर पण हळवा झाला होता.
"आई बाबा तुम्ही दोघं आतापासूनच असं रडू लागलात तर मी काय करणार. माझा तरी पाय घरातून निघणार का. शिवाय मी काही खूप दूर जाणार नाही या शहरातच माझं सासर आहे. अधून मधून मी येत जाईन कधी तुम्ही या. याशिवाय फोन, व्हिडिओ कॉल आहेच."
"खरं आहे पोरी. एक बरं आहे की तुझं सासर याच शहरात आहे. त्यातल्या त्यात तीच एक सुखाची गोष्ट आहे."
"अहो नुसतं या शहरात आहे असं नाही तर अगदी सुखवस्तु आहे. समीरची स्वतःची सी.ए. फर्म आहे. टुमदार बंगला आहे. दिमतीला गाड्या, नोकरचाकर सारं काही आहे. घरी सासू-सासरे,एक दिर आणि एक धाकटी नणंद. बरं आहे तू भरल्या घरात जातेस. मुख्य म्हणजे ते सगळेच खूप मनमिळाऊ आहेत."
"आई बाबा तुम्ही चहा घेतला का. आई तुझ्या हातचा मस्त फक्कड चहा होऊन जाऊ दे. मी फ्रेश होऊन येते मग आपण लाॅनवर बसून गप्पा मारत चहा पिऊ या."
"हो मी आता चहा करणारच होते म्हटलं तू येतेस का वाट बघूया. चल मी चहा टाकते आणि मस्तपैकी गरमागरम थालीपीठ करते."
आई बाबांच्या बोलण्यामुळे प्रीतीचे मन पण खूप हळवं झालेलं होतं. एवढ्या मोठ्या बंगल्यात आई बाबा दोघंच राहतील. एक बरं आहे की बाबांनी त्यांच्या बिझनेसची धुरा त्यांचा मानसपुत्र म्हणजेच सुजय वर सोपवली होती. समीरने प्रीतीशी लग्न करण्याची ग्वाही दिली होती तरीही मुलीचे आई बाबा म्हणून आई-बाबांच्या मनात नेहमी चिंता असायची. आज समीरने प्रीतीला सांगितलं होतं की आपलं आता लवकरच लग्न होईल. आई बाबा आता तयार आहेत. त्यामुळे प्रीती सातवे आसमां पे होती. ती फ्रेश होऊन लाॅन वर आली आणि आई-बाबांबरोबर चहा घेऊ लागली.
"वसुधा तू उद्याच गुरुजींना फोन करून साखरपुड्याचे आणि लग्नाचे दोन-तीन मुहूर्त काढून घे आणि समीरच्या आईला पण फोन करून कधी भेटायचं ते विचारून घे. आता लवकरात लवकर सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडली म्हणजे झालं."
"हो मी उद्या फोन करेनच आणि खरेदीचे पण बघायला हवं. प्रीतीसाठी दागिने तर तयारच आहेत फक्त साड्या आणि इतर सगळ्याची खरेदी करूया."
"आई लग्न लागताना मी नऊवारी नेसेन आणि रिसेप्शनला मी सुंदरसा नवीन फॅशनचा लेहंगा घालीन. संगीत आणि मेहंदीचे फंक्शन पण आपण ठेवायचं हं. त्याच्यासाठी पण वेगळे ड्रेसेस घेऊया."
"हो बाई हल्लीच्या पद्धतीप्रमाणे सगळे समारंभ आपण करू. सगळी खरेदी करू. काहीच काळजी करू नकोस. सगळं तुझ्या मनाप्रमाणेच होईल. मुख्य म्हणजे कोणा कोणाला बोलवायचं त्याची यादी करून त्याप्रमाणे पत्रिका छापायला द्यायला हव्यात."
"ते बाकी सगळं तू, मावशी, आत्या सर्व मिळून ठरवा. चला आता आत मध्ये जाऊया तुझ्या सगळ्या टीव्ही सिरीयल सुरू होतील." प्रीतीने आईला चिडवत म्हटलं.
(दोन्ही घरी आता लग्नाची तयारी सुरू आहे. लग्न कसं पार पडतं पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा