घरकुल आपुले छान _भाग ३
एकदा लग्न ठरलंय म्हटल्यावर दोन्ही घरी लगीनघाई सुरू झाली. गुरुजींनी मुहूर्त काढून दिले. दोन्ही घरातले हे पहिलंच कार्य होतं. प्रीती एकुलती एक मुलगी होती आणि समीर रानडे हा रानडे यांच्या घरातला सर्वात मोठा चिरंजीव. त्यामुळे उत्साह ओसंडून वाहत होता. सगळी खरेदी मनासारखी झाली म्हणून प्रीती खुश होती. या सर्व लगीन घाईमध्ये पण प्रीती आणि समीर वेळ काढून एकमेकांना भेटत होते. असेच ते एकदा भेटले असताना प्रीती खूप हळवी झाली. भावुक स्वरात समीरला म्हणाली,
"आई-बाबांना सोडून यायला मन होत नाही रे. माझं लग्न झाल्यावर त्यांना खूप एकटं एकटं वाटेल. त्यांचं सारं विश्व माझ्यातच सामावलं आहे." प्रीती उदास झालेली पाहून समीरला थोडं तिला हसवावसं वाटलं आणि तो मजेत म्हणाला,
"मी तुझ्या आई बाबांचा घरजावई होऊ का ग!"
"अजिबात नाही घरजावई ही संकल्पना मला मुळीच आवडत नाही. एक बरं आहे की आई-बाबा ह्या शहरात आहेत मी कधीही त्यांना भेटू शकते."
"एवढं माहितीये ना तुला आणि माझ्या घरातून तुला आई-बाबांकडे जायला कधीही विरोध होणार नाही. अगदी कधीही जा तू."
साखरपुडा झाल्यानंतर मेहंदी, संगीत, हळद असे एकेक कार्यक्रम झाले. सर्व कार्यक्रमात प्रीती खूपच देखणी दिसत होती. निमगोरी, मध्यम उंचीची, कमनीय बांध्याची प्रीती कोणत्याही रंगाच्या वेषात शोभून दिसत होता.समीरची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. एकदा गुरुजींनी काय करायला सांगितलं आणि त्याने भलतंच काहीतरी केलं. जमलेले सगळे लोक हसायला लागले आणि समीरची मस्करी करू लागले. लग्नाचा दिवस उजाडला तेव्हा प्रीतीचे आई-बाबा आणि इतर सर्व नातेवाईक खूपच भावुक झाले. घरातून निघताना वधूवेषात प्रीती खूपच खुलून दिसत होती. आई-बाबांच्या गळ्यात पडून रडताना तिच्या मनात आलं हे कोणी सगळे रीतीरीवाज केले असतील की लग्न झाल्यावर मुलींनी सासरी जायचं. मोठ्या दिमाखात विवाह सोहळा संपन्न झाला. उपस्थितांनी प्रीती आणि समीरचं मनापासून अभिनंदन केलं. दोघांचा जोडा खूप अनुरूप दिसत होता. जेवण, डेकोरेशन एकंदरीत सर्व व्यवस्थेबद्दल सर्व पाहुणे खुश होते. लग्न झाल्यावर प्रीतीने रानडेंची सून म्हणून त्यांच्या घरात प्रवेश केला. पूजा, हनिमून या सर्वांमध्ये नव्या नव्हाळीचे दिवस खूपच आनंदात गेले. सासरी आलेल्या पाहुण्यांशी प्रीती खूपच अगत्यपूर्वक वागत होती त्यामुळे सर्वांनी तिचं भरभरून कौतुक केलं. समीरच्या आईला सर्वांनी सांगितलं की तुमच्या घराला साजेशी सून मिळाली सर्वात मिळून मिसळून वागणारी.
रानडे कुटुंबाला नोकरी करणारी सून नको होती आणि प्रीतीला मुळातच नोकरीचा कंटाळा होता त्यामुळे तिने दोन वर्षातच नोकरी सोडली होती. त्यांच्या घरात स्वयंपाकासाठी आणि वरकामासाठी नोकर माणसं होती. त्यामुळे तिथे काम असं काहीच नव्हतं. सासुबाई अधून मधून स्वयंपाक घरात जाऊन प्रत्येकाच्या आवडीचं काहीतरी बनवत असत. प्रीती तेवढे सुद्धा काही करत नव्हती अर्थात कोणाला त्याबद्दल काही आक्षेप नव्हता. एकंदरीत माहेरसारखेच सुखाचे जीवन प्रीतीच्या वाट्याला आलं होतं.
रानडे कुटुंबाला नोकरी करणारी सून नको होती आणि प्रीतीला मुळातच नोकरीचा कंटाळा होता त्यामुळे तिने दोन वर्षातच नोकरी सोडली होती. त्यांच्या घरात स्वयंपाकासाठी आणि वरकामासाठी नोकर माणसं होती. त्यामुळे तिथे काम असं काहीच नव्हतं. सासुबाई अधून मधून स्वयंपाक घरात जाऊन प्रत्येकाच्या आवडीचं काहीतरी बनवत असत. प्रीती तेवढे सुद्धा काही करत नव्हती अर्थात कोणाला त्याबद्दल काही आक्षेप नव्हता. एकंदरीत माहेरसारखेच सुखाचे जीवन प्रीतीच्या वाट्याला आलं होतं.
लग्नाला जेमतेम एक महिना झाला आणि प्रीती एक दिवस दुपारी अचानक सासूबाईंना सांगून माहेरी आली. तिला पाहून आई-बाबांना खूप आनंद झाला तरीही आई तिला म्हणालीच,
"काय गं अशी एकटीच कशी आलीस समीरला पण बरोबर घेऊन यायचंस."
(प्रीती अशी अचानक एकटीच येण्याचं काय कारण असेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा