Login

घरकुल आपुले छान _भाग ४

एकत्र कुटुंबात कंटाळलेल्या नवविवाहितेचे मतपरिवर्तन
घरकुल आपुले छान _ भाग ४

प्रीतीला अचानक एकटीला आलेलं पाहून वसुधाताई काळजीत पडल्या. हसत प्रीती म्हणाली,

"मला खूप कंटाळा आला म्हटलं तुम्हाला भेटून जरा मला बरं वाटेल म्हणून मी आले."

लाडकी लेक आल्यावर आईने तिला आवडतात तशी गरमगरम कांदा भजी केली, आलं घातलेला चहा दिला. तिने आई-बाबांशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि मग ती सासरी गेली.
पुन्हा पंधरा दिवसांनी सकाळी अकरा वाजता ती माहेरी आली. तिला बघून आई आश्चर्यचकित झाली.

"अगं आत्ताच पंधरा दिवसांपूर्वी तू येऊन गेलीस आणि पुन्हा लगेच आलीस ठीक आहे ना सर्व."

"सगळं छानच आहे गं पण मला कधी कधी कंटाळा येतो."

"हो पण असं वरचेवर माहेरी येणं चांगलं नाही गं. तुला तिकडे काही त्रास आहे का?"

"नाही मला काहीच त्रास नाही सगळं छान चाललं आहे. घरातली सगळी माणसं सुद्धा चांगली आहेत."

संध्याकाळी ती निघाली तेव्हा वसुधाताईंच्या मनात आलं की हीचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. त्यावेळी त्या काहीच बोलल्या नाहीत.
पुन्हा काही दिवसांनी प्रीती माहेरी आली तेव्हा वसुधा ताईंनी तिचे कान उघडायचे ठरवलं. त्यांनी तिला खोदून खोदून विचारलं,

"तू अशी सारखी का येतेस. सगळं छान आहे म्हणतेस तरीसुद्धा तुझं मन तिकडे का रमत नाही?" आईच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे प्रीतीला सुचत नव्हतं की आईला सांगावं की नाही. पण कधीतरी सांगावं लागणारच होतं. प्रीतीने तिच्या मनातलं आईला सांगण्याचा निर्णय घेतला पण आई काय बोलेल याची काहीच कल्पना नव्हती.
प्रीती काय उत्तर देते याकडे वसुधा ताईंचे लक्ष लागून राहिले होते.

"आता काय सांगू आई तुला. त्या घरात मला माझी 'स्पेस'च मिळत नाही. सकाळी नाश्ता झाला, माझं सगळं आवरून झालं की मी माझ्या रूममध्ये जाते. थोड्याच वेळात नीता, माझी नणंद येते ती माझ्या रूममध्येच येते डायरेक्ट. तिच्या कॉलेजमधली मजा, तिने आज काय घेतलं, काय खाल्लं सगळं मला सांगत बसते. नवीन काय घेतलं असेल तर मला दाखवायला आणते. मी काय घेतले का आणि इतर सगळ्या चांभार चौकशा करत बसते. मला खूप बोअर होतं."

"अगं आता तुला आनंद वाटला पाहिजे की नीता तुला तुझी मैत्रीण समजून तुझ्याशी बोलायला येते. तू पण तिच्याशी उत्साहाने बोलायला हवं. तुम्ही दोघींनी कुठे बाहेर जायला पाहिजे. तुलाही जरा बरं वाटेल. एकमेकींचे विचार समजून घ्यायला हवेत. तुझं आपलं उलटच बोअर होतंय."

"नाहीतर काय ती नीता काय आणि तो सुजय म्हणजे माझा दीर काय. तो पण घरी आला की माझ्या रूममध्ये येतो मला सगळं त्याच्या मित्र-मैत्रिणीबद्दल सांगत बसतो. त्याच्या आवडीनिवडी,त्याला शर्ट घ्यायचं असेल तर मी कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ सगळं मला विचारत बसतो. इतकंच काय समीर सुद्धा सकाळी ऑफिसमध्ये जातो तो सातच्या नंतर घरी येतो. त्यांच्या घरात संध्याकाळी आल्यावर सगळ्यांनी एकत्र गप्पागोष्टी करायच्या हा नियम आहे. मला सुद्धा बोलावतात ते बाहेर मी पण असतेच तिकडे. पण मला आणि समीरला एकांत मिळतच नाही. मला पण त्याच्याशी काही बोलायचं असतं हे कोणी समजूनच घेत नाही. रात्रीचे जेवण झाल्यावर पण सगळे एकमेकांशी थट्टा मस्करी करत बसतात. नंतर आम्ही आमच्या रूममध्ये येतो. त्यामुळे आम्हाला प्रायव्हसी मिळतच नाही."

(प्रितीची ही तक्रार आई समजून घेईल की चार उपदेशाच्या गोष्टी सांगेल पाहूया पुढील भागात)