घरकुल आपुले छान _भाग ५(अंतिम)
प्रितीच्या सासरचे तिच्याशी किती प्रेमाने वागतात तरी हिचा तक्रारीचा सूर ऐकून आई तिला समजावत म्हणाली,
"अग उलट तुझ्या घरातलं वातावरण किती छान आहे. सगळे एकमेकांशी घट्ट बांधले गेलेले आहेत. प्रायव्हसीचं म्हणशील तर आता तुमच्या जमान्यात तुम्हाला सेपरेट रूम्स आहेत. पूर्वी आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो एकमेकांशी नीट बोलणं सुद्धा व्हायचं नाही. मला असं म्हणायचं नाही की आमचं जे झालं तसं तुमचं व्हावं. पण रात्री तरी तुम्ही दोघे एकत्र असता तेव्हा तुम्ही गप्पा मारू शकता. शिवाय तूच तर म्हणत होतीस की सुट्टीच्या दिवशी तुम्ही दोघं बाहेर जाता तेव्हाही तो वेळ तुम्हाला मिळतोच ना."
"आई माझ्या संसाराबद्दलच्या काही कल्पना आहेत. मला समीर बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे."
"हे सगळं तू एकुलती एक आहेस म्हणून असं बोलतेस. तुझ्याबद्दल ते सगळे किती आत्मीयतेने बोलतात. समजा तुला अजून एखादा भाऊ असता आणि नवीन आलेल्या वहिनीने तुझ्याशी अशी वर्तणूक केली असती तर तुला कसं वाटलं असतं. हा विचार करून बघ. तू त्या सर्वांशी खूपच प्रेमाने वागलीस तर समीरच्या मनातलं तुझं स्थान अधिक दृढ होईल. सारी सुखं पदरात असताना सुख बोचतं म्हणतात ते हेच."
"चल मी निघते आता. तू सांगितल्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेन."
रात्री जेवण झाल्यावर प्रीती आपल्या रूममध्ये जात होती इतक्यात पाय घसरून जोरात पडली. त्या आवाजाने सगळेजण तिच्याजवळ आले. तिला प्रचंड वेदना होत होत्या. सुजयने लगेच फोन करून डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी बघितल्यावर सांगितले की हिच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे हिला प्लास्टर घालावे लागेल. लगेच सुजय आणि आई बाबांनी तिला हॉस्पिटलमध्ये . समीर पण तिथेच आला. आई बाबा तिच्याबरोबर होते. नंतर घरी आणल्यावर पण सगळेजण तिची खूपच काळजी घेत होते. वेदना तिला होत होत्या पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या वेदना दिसत होत्या. सासुबाई तिच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष देत होत्या. तीला बेडवरून उठता येत नव्हतं. त्यांनी तिच्या चार-पाच मैत्रिणींचे फोन नंबर घेतले होते. तिला कंटाळा येऊ नये म्हणून त्यांना तिच्याशी गप्पा मारायला त्या बोलवायच्या. त्यांच्याशी गप्पा मारून झाल्यावर प्रीतीचा मूड खूपच छान होत असे. समीरला पण त्यांनी अधून मधून घरी राहायला सांगितलं होतं. या निमित्ताने का होईना पण प्रीतीला त्याचा खूपच सहवास लाभत होता. त्यामुळे प्रीतीची कळी खुलली होती. प्रीतीचे आई बाबा पण तिला येऊन दोन-तीन वेळा भेटून गेले. आईला प्रीतीच्या स्वभावातील बदल हळूहळू जाणवत होता.
प्लास्टर काढल्यावर जेव्हा फिजिओथेरपिस्ट घरी यायची तेव्हा तिच्या सासूबाई स्वतः तिथे उपस्थित राहून सर्व एक्सरसाइजचे निरीक्षण करत होत्या. घरातील सर्वजण रोजच दोन तीन वेळा तीची प्रेमाने चौकशी करत होते. सर्वांचे प्रेम पाहून प्रीतीच्या विचारात सकारात्मक परिवर्तन होत होतं. तिला आईचं म्हणणं पटू लागलं होतं. तिची आई जेव्हा पुन्हा तिला भेटायला आली तेव्हा तिने आईजवळ कबूल केलं. आईचा हात हातात घेऊन ती म्हणाली,
"आई तू नेहमी म्हणतेस ते आता मला शंभर टक्के पटलं आहे. एका मुलीचे जेव्हा लग्न होतं तेव्हा तिचं नातं फक्त नवऱ्याशी जोडले जात नाही तर तिच्या सासू-सासर्यांमध्ये आई बाबा असतात. नणंद किंवा जाऊ यांच्यामध्ये तिची बहिण असते आणि दिरामध्ये तीचा भाऊ असतो. इथे सगळेच माझी खूपच काळजी घेतात. हे माझं सासर आहे असं मला कधीच जाणवत नाही. आई, कवयित्री विमल लिमये यांनी लिहिलेल्या,
'घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती'
या कवितेचा अर्थ आज मला खऱ्या अर्थाने मला कळला. समीरमुळे मला छान हसतं खेळतं घरकुल मिळालं."
समाप्त
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा