Login

घरोघरी मातीच्या चुली भाग ५ अंतिम.

रक्ताची नाती सहजा सहजी सुटत नाही
सीमा पाणावलेल्या डोळ्यांनी सर्वेशला पहात होती.
ती सर्वेशच्या बाजूला बसली.
त्याचा हात हातात घेतला.

"खरंच माझ्या डोळ्यावर जी पट्टी होती ती उतरली आहे. जेव्हा तुम्ही अमेयला वेगळं व्हायला सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. आपला अमेय वेगळा राहील ह्या विचाराने मी कोलमडून गेले. काही केल्या मला ते सहन होईना. तो आपल्याशिवाय कसा राहील? त्याचं कसं होईल ह्या विचाराने व्याकुळ झाले. शेवटी मी त्याची आई आहे. माझ्या पोटचा गोळा आहे अमेय, तो माझ्यापासून दुरावणार  हा विचारही मला करवत नव्हता. तुम्ही बरोबर बोलायचा प्रीती तिच्या आई बाबांना सोडून आली आहे. तिला आपलंसं केलं पाहिजे. तेव्हा माझ्यातील आई कुठे गेली होती माहीत नाही, माझ्यातील सासू  निष्ठुरपणे वागू लागली.  अमेयचं लग्न झालं आणि मी लगेच सासूच्या भूमिकेत शिरले. तुम्ही बरोबर बोलायचे, मी अशी नाहीये. प्रीती माझ्यासाठी खूप काही करायची, मला आवडतं ते जेवण करायची, भेटवस्तू आणायची, माझ्याशी ती गप्पा मारायला बघायची; पण मी माझ्या सभोवताली एक रेखा आखली होती, काहीही झालं तरी प्रीतीला जवळ येऊ द्यायचे नाही. घरात एकरूप होण्याचा नेहमीच प्रयत्न करायची; पण माझं निगरगट्ट मन मात्र अडून बसलं होतं. काही केल्या तिचा स्वीकार करायचा नाही हे मनोमन ठरवलं होतं त्यामुळे तिने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. माझ्या कोषात राहू लागले. तुमचं, अमेयचं बोलणं मला पटायचे नाही. माझा राग मला सतत उकसावत होता.
मला माहितीये मी नेहमीच कुचक्यासारखं बोलत राहिले,चिडचिड करत राहिले, मनातील द्वेष, आग ओकत राहिले  कारण अमेयचं लग्न माझ्या भावाच्या मुलीशी अरुणाशी व्हावं हेच कायम मला वाटत राहिले,  मला असं वाटायचं की, अमेय अरुणासोबत खुश राहीला असता. प्रितीने अरुणाची जागा घेतल्याने तिच्याबद्दल द्वेष वाढू लागला.  नेहमी असा विचार यायचा अमेयने काय पाहिले प्रीतीमध्ये? का त्याने प्रीतीशी लग्न केलं?  आज मला ते दिसलं. तुम्ही असं बोलून गेल्यावर मी रडत होते, तर ती धीर देत होती, तिच्याठिकाणी कोणी दुसरी मुलगी असती तर बघ्याची भूमिका घेतली असती,  तिला माझ्यावर हसू आलं असतं. सासराच वेगळं हो असं म्हणतो आहे हे ऐकल्यावर सून खुशच होणार,  प्रीतीसाठी आनंदाची बाब असायला पाहिजे होती; पण ती दुखावली. ती तुमची बाजू घेवून मला समजावत होती. माझे डोळे पुसत होती. प्रीतीला समजण्यात माझी चूक झाली. तिचा खटाटोप नेहमीच दुर्लक्ष करत राहिले. लहान सहान गोष्टीत देखील तिला खाली पाडत राहिले,सतत अपामान करत राहिले आणि आज तीच माझे अश्रू पुसण्यासाठी पुढे सरसावली. खरंतर मोठयानी लहानांना समजवायचे असते,योग्य मार्ग दाखवायचा असतो, मी मात्र लहान मुलीगत वागत राहिले. माझ्या वागण्याचा नवऱ्याला, मुलाला त्रास होतो आहे हे देखील मला दिसू नये, इतकं मी वाहवत गेले. मला माझी चूक कळली आहे."

हे सारं ऐकून सगळेच भावुक झाले. प्रीती देखील सीमाला घट्ट बिलगली.  तिलाही हेच पाहिजे होते, माहेरापासून तुटली होती आता सासरपासून तुटायची तिची हिम्मत होत नव्हती.
तिचे अश्रू ओघळले.
सीमाने अगदी मायेने  प्रीतीचे डोळे पुसले. प्रीतीला जणू समोर आई उभी असल्याचा भास झाला.

"प्रीती, मी तुला खूप दुखावले आहे. माफ करशील मला?" गहिवरलेल्या आवाजात ती म्हणाली.

"आई, तुम्ही मोठ्या आहात. असं नका बोलू.  तुम्ही मोठ्या मनाने माझा स्वीकार केला हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. अजून काय पाहिजे मला."

सर्वेशला तर हे स्वप्न पाहतो आहे की काय असे वाटत होते.
अमेय देखील सीमाकडे आला.

सीमाने अमेयचे डोळे पदराने पुसले.

"अमेय, किती जीव लावतो आई बाबांवर. मी मात्र कशीही वागत राहिले. तू बरोबर बोलतोय आजकालची मुलं सहा महिने होत नाहीत की, वेगळं राहतात आणि तू मात्र आमच्या प्रेमापोटी आमच्यासोबत राहिला. कविता काकूंचा  मुलगा दोन महिन्यात वेगळा झाला. माझी मैत्रीण शामल तिचाही मुलगा चार महिन्यात वेगळा झाला. कळत होतं पण वळत नव्हतं. माणसाचे मन हे दुष्मन असते. वाहवत गेले मी. खरंतर डोक्यात जो विचार होता तसं झालं नाही म्हणून माझा इगो दुखावला. नेहमी माझ्या मनाप्रमाणे वागणारा तू लग्न स्वताच्या मर्जीने केलं ही सल खुपत होती. त्यापुढे मला काहीच दिसत नव्हतं. प्रीतीचा चांगुलपणा मुद्दाम नजरेआड करत राहिले.  प्रीती तुझीही किती काळजी घ्यायची ते मला दिसायचे तरीही मी अशी वागले. बाबांनी रागात बोलून देखील तू आम्हाला सोडायला तयार नाही. खरंच हीच माझी श्रीमंती."

तिने त्याच्या डोक्यावरून  हात फिरवला.

ही रक्ताची नाती अशीच असतात ना? काही केल्या बंध सुटता सूटत नाही. एक नाळ जोडली जाते ती शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करते. बरोबर ना?

प्रीतीला कोणत्याही कामात मदत न करणारी सीमा आज मात्र जेवण बनवण्यात तिला मदत करत होती. जेवण बनवून झाले.
सगळे जेवायला बसले.

सीमाने काचेच्या प्लेट आणि बाऊल डायनिंग टेबलवर मांडले होते.
प्रीती आश्चर्याने पाहू लागली.
सर्वेश आणि अमेयही तिथेच होते.

"आई, ही भांडी?" प्रीती

"आपल्या इथेही आता ह्या भांड्यात जेवायचे." असं म्हणत तिने जेवण वाढायला सुरवात केली.

समाप्त.
अश्विनी ओगले.
"आमच्याइथे असं चालत नाही पासून ते आपल्याकडेही असंच चालणार" हा प्रवास कठीण होता. असो अंत भला तो सब भला.
कथेत वाचून इतका आनंद होतोय तर प्रत्यक्षात जर असं घडलं तर?घडायला हवं ना? वाचकहो कथा कशी वाटली कंमेंटमध्ये जरूर सांगा. एक लाईक जरूर द्या. धन्यवाद.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.

🎭 Series Post

View all