विषय - घरटं
भाग -1
कोकणातलं एक टुमदार गाव – दापोली, आंब्याच्या बागा, डोंगरामधून वळण घेत जाणारे रस्ते, आणि त्या रस्त्यांच्या टोकाला वसलेलं जोशी कुटुंबाचं घर. लाल कौलांचं, तुळशीवृंदावन असलेलं, एक सुंदर निसर्गमय घरटं.
या घरट्याचा आधार होता – अशोक साठे - कुटुंबाचं खंबीर छत्र. त्यांच्या पत्नी - सारिका, दोन मुले – अमित आणि सुमित, आणि धाकटी मुलगी पूजा.
एकत्र कुटूंबातील गोड माणसं मिळून मिसळून राहात असतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
मुलं आपल्या परीने प्रगती करत होती, तींघही अभ्यासात चांगली होती.
अमित आणि सुमित शहरात शिकायला गेले. पुढे दोघांनी नोकरीही पकडली – एक पुणेला आयटी मध्ये, दुसरा पण त्याच्या बरोबरचं राहू लागला.पूजा बाबांसोबत शेतीत मदत करत गावातच राहिली.
सारिका कधी कधी काळजीत म्हणत असे –ही बाहेर शिकायला गेलेली आपली मुलं- भविष्यात "सांभाळतील का आपलं घर?"
अशोकरावं उत्तर देत – "मुलं उंच झेप घेतायत, शिक्षण घेऊन नोकरीत प्रगती करत आहेत, पण त्यांचं मूळ इथेच आहे. हे घरटं त्यांचं आहे आणि त्यांनाच परत यायचं आहे."
पण वर्षानुवर्षे गेली, मुलं फक्त सणावाराला यायची. गाडी घेऊन, फुलं घेऊन, पण वेळ कमी. मोबाईल, मीटिंग्स, चॅटिंग, सेल्फी... आणि घरटं हळूहळू एकटं होऊ लागलं.
मुलांना पंख फुटले, पण...मुलं घरी कमी येईनाशी झाली..
पुजाचं लग्न जमवायला अशोकराव धावपळ करत होते. एकुलत्या एक बहिणीचं लग्न जमवण्यासाठी तिला स्थळ शोधण्यासाठी मुलांना गावी येता येत नव्हते. शेवटी अशोकरावांनीचं त्यांच्या मित्राच्या मुलाशी पुजाचं लग्न जमवलं..पुजाचा होणारा नवरा सुद्धा शहरातल्या सवयींशी जोडलेला, मुंबईला राहणारा होता.
अमित - सुमित दोघंही ‘ऑनलाइन’ सोबत होते, पण प्रत्यक्ष वेळ देता येत नव्हता. लग्नासाठी पैसे देत होते पण स्वतः कमी येऊ लागले होतें.
लग्नाच्या चार दिवस आधी दोघे आले, लग्न छान थाटात पार पडले. अमित-सुमित लग्न झाल्यावर दोन दिवसांनी पुन्हा नोकरच्या ठिकाणी निघून गेले..
पूजा लग्नानंतर मुंबईला गेली. आणि आता घरटं खरंच रिकामं झालं.
घरात आता सारिका आणि अशोकराव दोघंच उरले. घरात आवाज कमी झाले, आंगणात फुलांची माळ केव्हाच वाळली होती.
एका दिवशी सारिकाने जुने कपाट आवरायला काढलं, आणि तिथे एक जुनी डायरी मिळाली. अशोकरावांच्या हस्ताक्षरात लिहिलेली.
त्यात खुपशा चारोळ्या, छोट्याश्या कविता लिहलेल्या होत्या, तिने त्या वाचायला घेतल्या...
"हे घरटं फक्त वीटांनं नाही, तर आठवणींनी बांधलेलं आहे. इथं प्रत्येक भिंतीला मुलांची हसणं, भांडणं, आणि आपुलकी चिकटली आहे.
मी कधीच मोठं घर, मोठा बंगला, मोठं स्वप्न मागितलं नाही. मी फक्त एक घरटं बांधलं... जे मुलांना उडायला शिकवेल आणि गरज पडली की परत येण्यासाठी पंखात ओल ठेवेल."
सारिका ती वाक्य वाचून डोळे पुसत म्हणाली – " अशोकराव, हे घर आपल्यासाठी नाही राहिलं का आता?"
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा