Login

घे भरारी भाग एक

घे तू भरारी
घे भरारी : भाग एक


आरोहीचा लग्नानंतर पहिलाच सण आला आणि आईच्या आग्रहावरून तिचा भाऊ तिला घ्यायला आला. आरोही खूप खुश झाली आणि आनंदाने दोन दिवसासाठी माहेरी गेली. रात्र झाली; सगळं काही आवरून सगळे झोपायला गेले. आरोही तिच्या आईजवळ आडवी झाली.

आरोहीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तिच्या आईने तिला विचारलं; "कसं चालू आहे बेटा?"

आईच्या त्या एका प्रश्नाने आरोहीचा बांध फुटला ती मुसमुसून रडायला लागली. आईला कळेना अचानक आरोहीला रडायला काय झालं. उठून बसत आरोहीचे डोकं तिने मांडीवर घेतलं आणि तिचे डोळे पुसून तिला विचारलं; "बेटा काय झालं काही त्रास होतो आहे का? विशालच वागण चांगलं नाही का? सासू बरोबर काही भांडण होतं का?"

आईच्या प्रत्येक प्रश्नाला आरोही नाही नाही म्हणून मान हलवत होती. आईला कळेना असं काय झालं आहे की आरोही रडते आहे; पण मग बोलत नाही, तिला थोडं मोकळं होऊ दिलं आईने. रडण्याचा भर ओसरला आणि आरोही उठून बसली.

"आई, कसं सांगू ग? दुःख काहीच नाही. सगळे चांगले आहेत तिथे. पण तरीही मला सतत वाटत राहात की आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही आहे." आरोही म्हणाली.

तिच्या आईला आरोहीचं म्हणणं कळत नव्हतं.

"तुला नक्की काय म्हणायचं आहे बेटा? मला कळेल असं सांगशील का?" आई म्हणाली.

"आईऽऽ विशालने मला प्रॉमिस केलं आहे की मुंबईमध्ये घर मिळालं की लगेच तो मला नेईल. पण आईऽऽ अग आपल्याला वाटतं तितकं मुंबईमध्ये घर मिळणं सोपं नसतं. एकदा जाऊन आले मी विशालसोबत पण आत्ता तो त्याच्या दोन मित्रांसोबत राहातो. तिथे तर मी राहू शकत नाही; त्यामुळे एकाच दिवसात मी परत आले." आरोही म्हणाली.

"होतं ग असं पोरी." तिला थोपटत तिची आई म्हणाली.

"अग पण माझी याबद्दल तक्रारच नाही." आरोही म्हणाली.

"मग? सासुशी पटत नाही का? सासरे कसे आहेत? तुझा तो दिर??? तुला काही वावग वाटलं का आरु ? तसं असेल तर मोकळेपणी सांग मला." तिची आई काळजी भरल्या आवाजात म्हणाली.

"नाही ग आई. तसं काहीच नाही. सगळेच चांगले आहेत. म्हंटलं न मी." आरोही आता पूर्ण सावरली होती.

"अग पण मग आत्ता अशी रडायला का लागलीस?" आई आता पूर्ण गोंधळून गेली होती.

आरोही आईच्या डोळ्यात बघत म्हणाली; "सगळं चांगलं असूनही आईऽऽ मला समाधानी वाटत नाही ग.!!"

"पोरी, बाईचा जन्मच असा असतो ग. आपल्याला काय हवं आहे हे महत्वाचं नसतं हे लक्षात ठेव. आपला नवरा आणि त्याच्या घरचे यांच्या डोळ्यातलं समाधान; आपलं समाधान असतं." आई आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"पण नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना आनंदी ठेऊनही मी मला हवं ते करू शकते न आई." आरोहीने आईच्या कुशीत शिरत विचारलं.

आईने एक हलकासा उसासा सोडला आणि आरोहीला थोपटत म्हणाली; "हो बाळा. करू शकतेस ना..!! फक्त ही तारेवारची कसरत सगळ्यांना जमतेच असं नाही ग"

आरोहीने मान वर करून आईकडे बघितलं आणि विचारलं; "मी प्रयत्न करू? तू राहशील सोबत?"

आरोहीला कुशीतून थोडं दूर करत तिच्या आईने तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाली; " आरुऽऽ, काही लढाया आपल्या आपण लढायच्या असतात. मी तुझ्या सोबत राहीन असं म्हंटलं तरी बेटा तू तिथे तुझ्या सासरी आणि मी इथे. त्यात आता तुझे बाबा नाहीत. लेकाच्या सोबत त्याची आश्रित म्हणून राहाते आहे, हे तुला माहीत नाही का?"

आईचं बोलणं ऐकून आरोही उठून बसली. आपलं दुःख बाजूला ठेवत ती आईला म्हणाली; "पण आई हे घर तुझं आहे. मागची लहानशी बाग तू वाढवली आहेस. त्यातून जे उत्पन्न येतं त्यात तुझं भागूच शकतं ना!! मग तू कशी ग आश्रित?"

"तेच तर सांगते आहे बेटा, ही तारेवरची कसरत असते. सगळ्यांना जमतेच असं नाही आणि न जमणाऱ्या समाजातली मी एक आहे ग." तिची आई दुसऱ्या कुशीवर वळत म्हणाली.

"पण आईऽऽऽ" आरोहीने बोलायचा प्रयत्न केला. पण तिच्या आईने डोळ्यावर पदर ओढून घेतला आणि म्हणाली; "झोप आरुऽऽ उद्या तुझा दादा तुला सोडून येणार आहे. उठायला उशीर नको व्हायला."

आरोहीचे डोळे भरून आले. आडवी होत तिने डोळे मिटले.

आरोही दुसऱ्या दिवशी परत तिच्या सासरी आली. आईने दिलेली साडी ती सासूबाईंना दाखवत होती. लाल रंगाची जरीबुट्टीच्या साडीचं सासूबाई कौतुक करत होत्या. इतक्यात तिचा दिर धावत आला.

"आईऽऽ आईऽऽ!! दादाऽऽ!! आईऽऽ." विनय हमसून हमसून रडत होता.

आरोही आणि तिची सासू काही न कळून उभ्या होत्या. आरोहीच्या सासूने विनयला बसवलं; आरोही आतून त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. आईने दिलेली लाल साडी अजूनही तिच्या खांद्यावर होती. तिच्याकडे बघून विनय परत रडायला लागला.

"वहिनीऽऽ." काय बोलावं विनयला सुचत नव्हतं.

"विनू असं काय झालं आहे? का रडतो आहेस तू इतका? प्लीज काय ते सांग. माझा आणि आईंचा जीव आता टांगणीला लागला आहे." त्याच्या जवळ बसत त्याच्या हातावर हात ठेवत आरोही म्हणाली.

तिचा हात हातात घेत विनय म्हणाला; "वहिनीऽऽ, विशालदादाचा ऍक्सिडेंट झाला आहे. तो...." विनय जे बोलला ते ऐकून आरोही एकदम दचकली आणि मागे सरली. मात्र तिच्या सासूने मोठ्याने एक हंबरडा फोडला आणि ती ओक्साबोक्शी रडायला लागली. आरोहीने तिच्याकडे एकदा बघितलं आणि परत विनयकडे बघितलं.