घे भरारी : भाग चार
"मी काही चुकीचं सांगत नाही आहे. लहान आहे आरोही, परत तिचं आयुष्य सुरू करू शकते ती." काका म्हणाले.
अचानक आरोहीचा भाऊ उभा राहिला आणि म्हणाला; "आरोहीला आम्ही नेणार नाही. तिचं लग्न करून दिलं आम्ही. आता परत तिला परत नेणं शक्य नाही आम्हाला. मुळात विधवा मुलीचं लग्न परत होणं सोपं नाही. त्यात आम्ही राहातो लहानशा गावात. तिथे तर असं बोलणं म्हणजे देखील पाप. आता माझे वडील देखील नाहीत. आईची जवाबदारी माझ्यावर आहे. माझी पत्नी, दोन मुलांचं शिक्षण आणि आईच्या आजारपणांचा खर्च भागवताना मी मेटाकुटीला आलो आहे. त्यात अजून विधवा बहिणीची जबाबदारी घेणं मला परवडणार नाही. तुम्ही सधन आहात काका. तुम्हीच सांभाळा तिला."
" पण वहिनी, शेवटी तुमचं मत महत्वाचं. पण मला वाटतं तरणी ताठी मुलगी घरात असणं योग्य नाही. विनय आणि आरोहीच्या वयात फार अंतर नाही. उद्या नको ते काही घडलं तर त्या मुलीला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ठरवा काय ते. आम्ही देखील उद्या निघू. तेराव्याला येऊ तोपर्यंत ठरवा म्हणजे झालं." असं म्हणून काका देखील गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची बायको देखील उठली.
काका गेल्यावर आत्याने विहिनीच्या खांद्यावर थोपटल आणि म्हणाली; "तुम्ही खरंच विचार करा ह वहिनी. तसं एक सांगू का? मी माझ्याकडे नेईन आरोहीला हवं तर. तुम्हाला तर माहीत आहे आमचा वाडा किती मोठा आहे; घरात आला गेला पण खूप. सासरे सरपंच आहेत माझे. घरात काम खूप असतं. नोकर कितीही ठेवले तरी घरचं माणूस लागतंच न. आरोही आली तर मला मदतच होईल मला." तिचं बोलणं ऐकून विनय एकदम उभा राहिला आणि आत्याकडे चिडून बघायला लागला.
विनयच्या आईने एकदा विनयकडे बघितलं आणि म्हणाली; "ठीक आहे वन्स. मी विचार करीन." तिचं बोलणं ऐकून तर विनय पुरता भडकला; "आई कसला विचार करणार आहेस? आरोही इथे राहू शकते. हे तिचं घर आहे." असं म्हणून तिथून रागारागाने निघून गेला.
तो गेला त्या दिशेने बघत आत्या म्हणाली; "पहा बरं वहिनी.... दोन दिवस नाही झाले मोठा भाऊ जाऊन तर वहिनी वरून आरोही झाली ती या विनयसाठी. मला काय? मी आपलं तुमचं काम सोपं व्हावं म्हणून बोलत होते. ठेऊन घ्यायची असेल ही आग घरात तर ठेवा. मी कोण काही बोलणारी? आण्णा सारखी तेराव्याला येऊन जाईन झालं." असं म्हणून आत्या देखील आत निघून गेली.
आरोहीच्या खोलीत तिची आई गेली. बघते तर आरोही भरतकाम करत बसली होती. "हे काय करते आहेस आरोही? बाहेर तुझ्यावरून वादळ पेटलं आहे आणि तू इथे शांतपणे भरत काम करत बसली आहेस?" बोलताना आईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.
आईकडे शांतपणे बघत आरोही म्हणाली; "मग काय करू मी आई? माझ्याबद्दल बोलताना मला किमान ऐकण्यासाठी तरी बाहेर बोलवावं असंही कोणाला वाटलं नाही. मग किमान मी माझं मन रमेल असं काहीतरी करते ना."
तिच्या जवळ जात आई म्हणाली; "कसं होणार ग तुझं पुढे आरोही? पूर्ण आयुष्य पडलं आहे तुझं तुझ्या समोर. पोरी... काय फुटकं नशीब घेऊन जन्माला आलीस ग?"
आरोहीने हातातलं काम बाजूला ठेवलं आणि आईकडे शांत नजरेने बघितलं आणि म्हणाली; "आई, माणसांच्या चुकीच्या निर्णयाचं खापर आपण नशिबावर फोडणं कधी बंद करणार ग?"
"म्हणजे?" नकळून आईने विचारलं.
"आई, एकोणीस वर्ष हे लग्नाचं वय नाही. या आजच्या काळात तर नक्कीच नाही. त्यात शिकायची इच्छा असताना शिकू न देणं चूकच. तुमच्याकडे पैसे नव्हते हे मान्य... पण म्हणून दुसरे मार्गच नव्हते असं नाही. ग्रंथाळ्यातल्या काकांनी बाबांना सांगितलं होतं की मुलींनी शिकावं म्हणून अलीकडे सरकार कितीतरी योजना आणत आहे; पण दुर्दैवाने बाबांची मानसिकता नव्हती. दादा म्हणाला आणि लग्न ठरवून टाकलं त्यांनी. हा... लग्नानंतर नवरा गेला हे मात्र नशीब. पण मग इतक्या लहान वयाच्या मुलीला आता पुढे काय करायचं आहे हे तिला न विचारता तिच्या आयुष्याचा निर्णय असे लोक घेणार जे फक्त लग्नाला जेवायला आले होते? आणि म्हणणार काय... तर मुलीचं नशीब फुटकं." शांतपणे परत भरतकाम करत आरोही म्हणाली. तिचं बोलणं आईला पटत देखील होतं आणि सामाजिक बंधनाची जाणीव देखील मनाला टोचत होती.
तिसऱ्या दिवशी काका, आत्या आणि त्यांच्या घरातले सगळे निघाले. निघताना तेराव्याला येतो. काही मदत लागली तर कळवा. असं औपचारिक बोलणं झालं. ते सगळे गेले आणि आरोहीचा भाऊ आईसमोर येऊन उभा राहिला.
"मला निघायला हवं. तिकडे कामं पडली आहेत सगळी. तू थांब हवं तर तेराव्या पर्यंत. पण मग मात्र माघारी ये. घरची कामं सुलेखाला एकटीला आवरत नाहीत. मदत नसेल तर ती आजारी पडेल." आईकडे बघत तो म्हणाला.
काय बोलावं आईला सुचेना. आरोहीच पुढे झाली आणि म्हणाली; "दादा, माझं राहूदे... पण आईचा थोडा तरी विचार कर. तिच्या तरण्या ताठ्या मुलीचा नवरा वर्ष पूर्ण व्हायच्या आत गेला आहे. मुलीचं कसं होणार या चिंतेत ती आहे. तुला मात्र फक्त तुझे प्रश्न दिसतात का रे?" आरोहीचं बोलणं तिच्या भावाला चांगलंच झोंबलं.
"ए अवदसे गपते का? काळ्या तोंडाची अपशकुनी आहेस तू. आमचं सगळं छान चाललं होतं आणि अचानक जन्म घेतलास. इतकी लहान नणंद म्हणून मला मुली सांगून येईनात. त्यात बाबा रिटायर्ड झाले; तरी तुला शिकवत राहिले. कुठून आणणार होते ते पैसे? मग माझ्या वाटणीचे पैसे तुझ्यावर उडवायला लागले. शेवटी मीच ती उधळपट्टी बंद करून तुझं लग्न लावून दिलं म्हणून बरं. गेलेच न ते अगोदरच. सगळी जवाबदारी माझ्यावर सोडून? आणि आईचं काय सांगतेस मला? मी काही तिच्यावर सगळं काम लादत नाही. तिनेच अति हौसेने ती झाडं लावून ठेवली आहेत; त्याची उस्तवारी फक्त तिने करावी. इतकीच माफक इच्छा आहे माझी. च्यायला, पण तुला का सांगतो आहे हे सगळं मी? हे बघ आरोही... तुझं लग्न करून दिलं आणि तुझा आमचा संबंध संपला. आता तू आणि तुझं सासर काय ते बघून घ्या. आई परत येताना तुला घेऊन आली न... तर दोघींना घरातून हाकलून देईन. समाजलात?" एकदम उसळून आरोहीचा भाऊ बोलला आणि तसाच निघून गेला.
आरोहीने अपेक्षेने आईकडे बघितलं. पण आईची खाली गेलेली मान वर येत नव्हती. आरोहीने सुस्कारा सोडला आणि ती खोलीतून बाहेर पडली.
आरोही तिच्या खोलीत जाऊन मुसमुसायला लागली. इतक्यात हळूच दरवाजा उघडून विनय आत आला. "वहिनी..." त्याने अगदी मऊ आवाजात आरोहीला हाक मारली. पण आपल्याच विचारात हरवलेल्या आरोहीला त्याची हाक ऐकू नाही आली. तिच्या जवळ जात विनयने प्रेमळपणे तिला परत हाक मारली; "आरोही...." त्याच्या हाकेने दचकून आरोहीने वर बघितलं.
"अरे विनय? तू कधी आलास आत? मला कळलंच नाही." आरोही म्हणाली.
"तू रडत होतीस तेव्हा...." विनय म्हणाला आणि स्वतःचे डोळे पुसत हलकेच हसत आरोही म्हणाली; "हो का? बरं! मग बघ मी डोळे पुसले. बोल काय म्हणत होतास?"
"आरोही.... मला तुला काहीतरी विचारायचं होतं." विनय म्हणाला.
"अरे, काल पण तू काहीतरी बोलणार होतास न? मग बोल की. तू हे असं परवानगी घेऊन का बोलतो आहेस माझ्याशी?" आरोही अगदी सहज आवाजात बोलत होती. तिला विनयच्या मनात काय चालू आहे त्याचा मुळीच अंदाज नव्हता.
विनयने एकदा तिच्या डोळ्यात खोल बघितलं आणि म्हणाला; "आरोही तू तुझ्या पुढच्या आयुष्याचा काही विचार केला आहेस का? तू अजून फक्त वीस वर्षांची आहेस. माझ्याहून देखील लहान. दादाहून तर बरीच लहान होतीस. मुळात तू दादाला हो कसं म्हणालीस हेच मला कोडं होतं. पण तुला बघितल्या पासून मी.... आणि दादासुद्धा एकदम आनंदी होता... म्हणून मी काहीच बोललो नव्हतो तेव्हा. पण आता.... आरोही आता अचानक सगळं बदलून गेलं आहे. तुझं लहान वय हे तसं बघितलं तर तुझ्यासाठी चांगलं आहे; पण तसं बघितलं तेच तुझ्या आयुष्यातला मोठा अडसर होणार आहे."
"विनय तुला नक्की काय सांगायचं आहे मला?" नकळून आरोही म्हणाली.
"आरोही... सांगायचं नाहीय... विचारायचं आहे...." विनय तिच्या समोर तिच्या पलंगावर बसत म्हणाला. त्याचवेळी आरोहीची आई आरोहीला बोलवायला परत आली आणि खोलीत आरोही सोबत विनयला बघून एकदम गडबडली. पण तिची विनयला काही बोलण्याची हिम्मत झाली नाही. त्यामुळे अचानक आरोहीवर भडकत ती आरोहीला ओरडली... "मी म्हंटलं अजून का येत नाहीस तू कामात मदत करायला... तुझी ही थेरं चालु आहेत म्हणून बसली आहेस का इथे? आरोही... एक सांगून ठेवते... माझ्यासमोर हे असलं वागणं चालणार नाही. कळलं? उठ आत्ताच्या आत्ता आणि चल माझ्यासोबत."
आरोहीला काहीच कळलं नाही की आई अचानक इतकी का चिडली. मात्र विनयच्या ते लक्षात आलं. तरीही तो तिथेच बसून राहिला. त्याच्या नजरेत एक वेगळाच आत्मविश्वास होता. आरोहीच्या आईला त्याची नजर आवडली नाही. पण ती काहीच म्हणाली नाही. आरोहीला पुढे घेऊन ती खोलीतून निघून गेली.
आरोही आणि तिची आई खोलीतून जाताच विनय आरोहीच्या कपाटाजवळ गेला. कपाटाला लॉक नव्हतं. त्याने ते उघडलं... एकदा वळून खोलीच्या दाराकडे बघितलं आणि समोर दिसणाऱ्या आरोहीच्या कपड्यांना हात घातला. विनय खोलीतून बाहेर पडला आणि थेट त्याच्या खोलीत गेला. आरोहीची आई मागे लपून लक्ष ठेऊन होती. विनयने काहीतरी नेलं आहे हे तिच्या लक्षात आलं; पण काही एक न बोलता ती कामाला लागली. मात्र त्यानंतर तिने आरोहीला एक मिनिटं देखील एकटं सोडलं नाही.
रात्री आरोही आणि तिची आई खोलीत आल्या. आज आरोहीला खूपच दमायला झालं होतं. कारण विनय पासून लांब ठेवण्याच्या नादात तिच्या आईने तिच्याकडून खूप जास्त काम करून घेतलं होतं. काही कारण नसताना सगळ्या घराचे पडदे बदलणं; चादरी बदलणं.... असली कामं आज आरोहीने केली होती. त्यामुळे खोलीत येताच ती आडवी झाली. तिच्या शेजारी आडवं पडत तिची आई म्हणाली; "आरोही हा विनय कसा मुलगा आहे ग?"
"हा काय प्रश्न आहे आई अचानक?" आरोहीने विचारलं.
"खरं सांगू का? विशालजी गेल्याचं कळलं आणि आम्ही आलो.... तेव्हापासून मी बघते आहे की विनय सतत तुझ्याकडे बघतो आहे. खरं सांग आरु ; तुमच्यात काही चालू आहे का? मी ऐकलं तो सकाळी काय बोलला. हे खरं आहे की विशालजी आणि तुझ्यामध्ये वयाचं बरंच अंतर होतं; पण अग मी आणि तुझ्या बाबांनी त्यावेळी हाच विचार केला होता की मुलगा उत्तम शिकलेला आहे आणि मुंबईत नोकरी करतो. त्यामुळे तुला सुखी ठेवेल. पण तू त्याच्या सोबत न जाता इथेच राहिलीस. हा विनय देखील शिक्षण संपलं आहे तरी अजून नोकरी न करता इथेच आहे. त्यामुळे तुझं आणि त्याचं उठणं बसणं होतच असेल न? तो ज्या पद्धतीने तुझ्याकडे बघतो; तुझी बाजू घेऊन बोलतो आणि मुख्य म्हणजे तुझ्याशी बोलताना त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळाच भाव असतो.... म्हणून विचारलं तुझं आणि त्याचं...." आरोहीची आई बोलता बोलता थांबली आणि तिने आरोहीकडे बघितलं. दमलेली आरोही कधीच झोपली होती. आईच्या मनात एकदा आलं की तिला उठवावं आणि विषय पूर्ण बोलून घ्यावा. पण मग तिला आरोहीची दया आली आणि तिला थोपटत ती देखील झोपली.
आरोही खोलीबाहेर पडली ते थेट गच्चीत गेली. ती गच्चीच्या कठड्यावर बसली होती आणि तिची नजर कुठेतरी हरवून गेली होती. किती वेळ गेला त्याचं तिला भानच नव्हतं. पण आता उन्ह उतरायला लागली होती. कलती संध्याकाळ होती. अचानक आरोहीला मागून हाक ऐकू आली.
"आरोही!" विनय आरोहीच्या मागे उभा होता.
आरोहीने वळून बघितलं. "काय करते आहेस इथे? बराच वेळ मी तुझ्या मागे उभा आहे. पण तुझं लक्षच नाहीय." विनय म्हणाला.
"विनय.... लग्नानंतर सगळ्याच आयुष्य संपतं का रे? मी फक्त माझ्यासाठी नाही म्हणत रे. पण एकदा लग्न झालं की मुलगा आणि मुलगी वेगळे नसतातच का? त्यांच्या आयुष्यात जे होतं ते एकत्र जोडीनेच होतं का? तसं असेल तर का असावं तसं? विशाल इतकी चांगली नोकरी करत होता. छान जगत होता.... पण मग त्याचं लग्न झालं आणि मी त्याची एक जवाबदारी म्हणून आले त्याच्या आयुष्यात. तुला माहीत आहे.... आम्ही फारच कमी वेळ घालवला एकत्र. मला त्याच्या डोळ्यात खूप जिव्हाळा - काळजी दिसायची माझ्याबद्दल. आम्ही एकत्र देखील आलो. पण तरीही प्रेम नव्हतं फुललं आमच्यात. बोलताना नेहेमी तो माझ्यासाठी काय करणार ते सांगायचा. मग स्वतःचे प्लॅन्स सांगायचा आणि मला म्हणायचा की माझ्यात खूप पोटेन्शियल आहे; टॅलेंट आहे. मी देखील काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या बोलण्यात कधीही आम्ही दोघे काय करणार हे नव्हतंच. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून जे अपेक्षित आहे न तशी रेअकॅशन मी देऊ शकणारच नाही रे. धाय मोकलून रडण्या इतकं प्रेम नव्हतं आमचं आणि दुःख न करण्या इतकी दुरी पण नव्हती. विशालची आणि माझी मैत्री होती रे... जी लग्न बंधनात अडकली होती. त्यामुळे आता तो नाही तर माझ्यासाठी किंवा तो स्वतःसाठी काय करणार हे आपोआप संपतं न! आता मी काहीतरी केलं पाहिजे इतकंच उरलं आहे रे माझ्यासाठी. मनात सतत तेच विचार असतात. पण हे मी आईला सांगूच शकत नाहीय. कारण तिला ते समजणारचं नाही. तिलाच का.... कोणालाही कळणार नाही. विनय हे किती दुर्दैव आहे न... की मला काहीतरी करायचं आहे. तशी लायकी आणि हुशारी आहे... फक्त मार्ग माहीत नसल्याने मी अडकून पडणार आहे या टिपिकल आयुष्यात. कोणाच्यातरी उपकारांवर जगत आयुष्य काढणं सोपं नसतं रे. त्या नुसत्या विचाराने देखील मी अस्वस्थ होते आहे." उसासून काहीसं विनयशी आणि काहीसं स्वतःशी बोलली. इतक्यात तिला तिच्या आईने मारलेली हाक ऐकू आली.
आरोहीने विनयकडे बघितलं. विनय आरोहीकडे स्थिर डोळ्यांनी बघत होता. काहीतरी होतं त्याच्या डोळ्यात. आरोहीला कळलं नाही. विनय पुढे झाला आणि त्याने आरोहीचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाला; "आरोही, काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. उद्या तेरावं आहे दादाचं. सकाळी सगळे येतील. खूप गडबड असेल. ते सगळं उरकलं की मला तुला...." विनय काहीतरी सांगणार होता; इतक्यात आरोहीची आई गच्चीत आली. विनयने आरोहीचे खांदे धरले होते ते बघून ती एकदम स्थब्द झाली. विनयची नजर अगदी शांत होती. त्याने एकदा आरोहीच्या आईकडे बघितलं आई मग आरोहीला म्हणाला; "आरोही मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तुझ्याबद्दल.... माझ्या मनात जे आहे ते. पण आत्ता नाही. उद्या सगळे विधी उरकले की मगच. त्यामुळे आत्ता जा तू."
आरोहीने एकदा विनयकडे गोंधळून बघितलं. आई आली तरी विनयने बोलायला हरकत नव्हती असं तिचं मत होतं. पण ती काहीही बोलली नाही आणि आई सोबत खाली उतरायला लागली.
"आरोही काय म्हणत होता तो?" आईने आरोहीला जिन्यातच प्रश्न केला.
"त्याला काहीतरी विचारायचं आहे मला. किंवा सांगायचं आहे... माहीत नाही मला नक्की. पण उद्या सगळं उरकलं की बोलेन म्हणाला आहे तो." आरोहीने शांतपणे उत्तर दिलं.
आरोहीच्या आईला ते काहीच पटलं नाही. पण काय बोलावं न कळून ती गप्प बसली.
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा