Login

घे भरारी भाग पाच

घे तू भरारी
घे भरारी : भाग 5

दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच विशालचे काका, आत्या अशी मंडळी यायला लागली. आरोहीचा भाऊ देखील आला होता. त्याने आईला एकट्यात गाठलं आणि म्हणाला; "हे बघ आई, हे सगळं आटोपलं की तू माझ्या सोबत निघायचं आहे. उगाच आरोहीचं लटांबर गळ्यात घेऊ नकोस. आपल्याला आपलाच खर्च उरकत नाहीय. त्यात तिची भर नको." त्याचं बोलणं ऐकून आरोहीच्या आईला खूप राग आला. पण ती काहीच बोलली नाही. मुलाशी वाकड्यात जाऊन काही उपयोग नाही; हे तिला माहीत होतं. शेवटी त्याच्या सोबतच तर राहायचं होतं तिला मरेपर्यंत."

"आरोही नाही येणार आपल्या सोबत. चिंता करू नकोस. तीच सासर तिला पोसू शकतं." आई चिडक्या आवाजात म्हणाली. त्यावर "मग ठीक..." असं म्हणून आरोहीचा भाऊ निघून गेला.

त्यानंतर भटजी आले आणि त्यांनी हवनाला सुरवात केली. सगळे सोपस्कार करण्यासाठी विनयच बसला होता. विनयचे डोळे सतत आरोहीचा मागोवा घेत होते आणि आरोहीच्या आईचे डोळे विनयच्या डोळ्याचा...

हवन आटपलं आणि भटजींनी सगळ्यांना एक एक करून नमस्कारासाठी बोलावलं. आरोही नमस्कार करण्यासाठी वाकली आणि कोणालाही लक्षात येण्याच्या अगोदर विनयने तिच्या हातात एक चिठ्ठी सारली. आरोही एकदम चमकली आणि तिने नजर उचलून विनयकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात आर्जव होतं. त्याच्या डोळ्यात डोळे घालून काही क्षण बघून आरोहीने नमस्कार केला आणि बाजूला झाली. हे सगळं अगदी काही क्षणात घडलं होतं. त्यामुळे कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण...... आरोहीच्या आईच्या नजरेतून काहीच सुटलं नव्हतं. मात्र त्याक्षणी ती काहीच बोलली नाही.

हवन आटोपलं आणि भटजी म्हणाले; "इथलं सगळं आटोपलं आहे. आता सगळी पुरुष मंडळी एकदा स्मशानात जाऊन आली म्हणजे विशालचा आत्मा मोकळा होईल."

भटजींनी सांगितल्या प्रमाणे सगळे पुरुष निघाले. विशालच्या आईला रडू आवरत नव्हतं. आत्या आणि काकू तिची समजून घालत होत्या. पण तरणा ताठा मुलगा गेल्याचं दुःख त्या माउलीला सहन होत नव्हतं. आरोहीला मात्र अजिबात रडू येत नव्हतं. उगाच कोणी काही बोलू नये म्हणून आरोही उठली आणि हळूच तिच्या खोलीत गेली. आरोहीच्या आईने ते बघितलं आणि ती देखील पटकन उठून आरोहीच्या मागे गेली.

आरोही पलंगावर बसली होती. विनयने दिलेली चिठ्ठी ती उघडणार इतक्यात तिची आई आत आली. आई आली म्हणून आरोहीने चिठ्ठी असलेला हात मागे नेला. पण आई पुढे आली आणि तिने तिच्या हातातून ती चिठ्ठी काढून घेतली आणि उघडली.

आरोहीला आईचं वागणं आवडलं नव्हतं. पण ती काहीच न बोलता आईकडे बघत बसली. चिठ्ठी वाचली आणि आरोहीच्या आईने नजर उचलून आरोहीकडे बघितलं. आरोहीला तिच्या आईच्या चेहेऱ्यावरून काहीच अंदाज येईना. आईने शांतपणे हातातली चिठ्ठी आरोहीला दिली. आरोहीने चिठ्ठी हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली...

"आरोही,

आयुष्य एकमेकांसोबत प्रेमाने घालवणं सुंदर असतं. पण ती भावना दोघांच्याही मनात असावी लागते. दादा मला हेच अनेकदा म्हणाला होता. त्याला तुझ्यात मैत्रीण दिसायची. प्रेयसी नाही. पण तरीही मला वाटतं, तो असता तर तुमचा दोघांचा संसार खूप सुंदर झाला असता; कारण दोस्तीचं नातं हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा शुद्ध आणि प्रामाणिक असतं; असं मी मानतो. पण आता तो नाही.... आणि म्हणूनच तू त्याच्या सोबत बांधल्या गेलेल्या नात्यातून मोकळी आहेस. मात्र हे इथल्या कोणालाही कळत नाहीय असं मला वाटतं. आरोही दादा गेला आणि तू एक निर्जीव वस्तू असल्याप्रमाणे सगळ्यांनी तू काय करावं; कसं जगावं हे ठरवायला सुरवात केली.

आरोही दादा आणि तुझ्यात जी मैत्री निर्माण झाली होती त्यापेक्षा देखील जास्त गहिरी दोस्ती आपल्यात आहे असं मला वाटतं. आरोही तू खरंच कोणालाही आवडविस अशीच आहेस. हुशार, सोज्वळ आणि स्ट्रीट स्मार्ट!

आरोही तू लग्न होऊन आलीस आणि तुझ्या वाचनाच्या आवडीमधून मला लक्षात आलं की तुझं केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि इंग्रजी भाषेवर देखील उत्तम प्रभुत्व आहे शिवाय वनस्पती शास्रतील तुझी आवड पाहता जबरदस्ती हॉर्टिकल्चर ची एंट्रस एक्साम द्यायला फोर्स केला.

आरोही... आता मी तुला जे सांगतो आहे ते मात्र खूप खूप महत्वाचं आहे. आरोही, खरंच तू माझ्यासाठी खूप खास आहेस. म्हणूनच तुझ्याबद्दल सगळे बोलायला लागले आणि तेव्हाच मी ठरवलं की तू आता तरी कोणाच्याही मर्जीने जगायचं नाही.

आरोही, तुझा ई-मेल चेक कर. तुला परवा एका शिमल्यातील संस्थेकडून तुला पुढील शिक्षणासाठी ऑफर आली आहे. दादाच्या मोबाईल वर कॉल आला होता. त्यात तुला स्कॉलरशिप देखील जाहीर केली आहे, ज्यात तुझा माही खर्च आरामात निघू शकतो. मी दादाच्या एका मित्रांशी बोललो आहे. ते तुला सुरुवातीच्या दिवसात तिथे मदत करतीलच. तुझ्या कपाटात मी दादाचा मोबाईल आणि पाकीट ठेवलं आहे ज्यात त्याचे काही पैसे आणि बँकेचं डेबिट कार्ड आहे, त्यावरच त्याचा पासवर्ड देखील लिहिला आहे, ते तुझ्याकडे ठेव अडी-अडचणीत कामी येतील.


आरोहीऽऽ माझ्या लाडक्या मैत्रिणी (तू आणि मी असताना मी तुला अशीच हाक मारायचो आणि कायम अशीच हाक मारणार आहे.) now sky is the limit for you. पंख पसर आणि घे भरारी! आम्ही परत येईपर्यंत जर तू निघाली असलीस तर पुढच्या प्रवासात देखील मी तुझ्या सोबत असेन. पण निर्णय तुला घ्यायचा आहे. आश्रित म्हणून जगायचं की स्वतःच्या टर्म्सवर स्वतःला सिद्ध करायचं आणि विचार करायला फक्त आजचा दिवस आहे, त्यानंतर तुला शिमल्याला जाण्यासाठी निघावं लागेल.


तुझा मित्र,
विनय

आरोहीने चिठ्ठी वाचली आणि तिचे डोळे भरून आले. चिठ्ठी वाचतानाच तिच्या मनात आलं होतं की आई आता मोठा तमाशा करणार आहे. तिने मान भरल्या डोळ्यांनी मान वर केली आणि....

आरोहीची आई कपाटातून आरोहीचे कपडे काढून एका बॅगेत भरत होती. आरोहीला आता पुढे काय वाढून ठेवलं आहे ते कळेना. तिने आईला हाक मारली.

"आईऽऽ"

"आरोही उठ. तुला लगेच निघायला हवं. इतक्यात येतीलच सगळी मंडळी. ज्याचे त्याचे घरी पंगोपंग झाली की तुझ्या घरच्यासोबत बोलून घेते मी आणि हे घेऽऽ हे थोडे पैसे आहेत माझ्याकडे, ते ठेव. लागतील तुला सोबत." आई भराभर तिचं समान भरत म्हणाली.

आरोहीला आईच्या बोलण्याने आणि वागण्याने धक्का बसला. आई जवळ जात तिने आईला घट्ट मिठी मारली. तिला जवळ घेत तिची आई म्हणाली; "बाळाऽऽ, काल जे काही बोलले ते तुझ्या काळजीने होतंच ग; पण त्याहूनही जास्त माझी अगतिकता बोलत होती. बेटाऽऽ मला तुझी हुशारी कळत नव्हती असं नाही; पण सामाजिक बांधिलकी मला काही करू देत नव्हती. पण कोण कुठला तो विनय. माझ्याहूनही जास्त तो तुझा विचार करत होता ग. तो म्हणतो आहे तेच बरोबर आहे बेटा. आश्रिता सारखं आयुष्यभर जगणं अशक्य आहे. तुझ्या पंखात बळ आहे. जाऽऽ... जग ग बाळा सुखाने."