Login

घे कवेत आसमंत

घे कवेत आसमंत हा लेख क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची दखल घेणारा व स्त्री विषयक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा हा लेख आहे
घे कवेत आसमंत..!

चोहीकडे पोहचू दे
तुझ्या कार्याची कीर्ती
स्त्री तूच आहे खरी
वात्सल्याची मूर्ती

आई, बहिण, मुलगी, पत्नी, प्रियसी व मैत्रीण अशा रूपात आपण स्त्रीला ओळखतो. परंतु तिचे रूप एवढ्या पुरतेच मर्यादित नाही. तर या स्त्रीयत्त्वाची व्याख्या याहीपेक्षा अधिक मोठी आहे. परंतु पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे ती कदाचित आपल्यापैकी अनेक पुरुष आणि स्त्रियांनाही माहिती नसण्याची शक्यता आहे. तिच्या रूपाचा ठाव लागणे खरेच इतके सोपे नाही. स्त्री ही समाजाचा पाया आहे. पायदळी तुडवली जाणारी वस्तू नाही. झाशीची राणी ही एक स्त्री होती. झाशीच्या राणीने गाजवलेले शौर्य प्रोत्साहनात्मक आहे. इतिहासातील तिचे कार्य स्त्री जातीसाठी नवीन दिशा व प्रेरणा देणारे आहे. मध्ययुगीन काळात भारतीय महिलांचा काळ बदलला. आपल्या समाजात अनेक वाईट प्रथा पसरू लागल्या आणि स्त्रियांचे महत्त्व कमी होऊ लागले. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मनातील इच्छा नसलेल्या गोष्टी बद्दल विरोध करण्याचा, प्रत्यक्ष बोलण्याचा ही अधिकार नव्हता. माणसाच्या कोणत्याही कामात स्त्रीला ढवळाढवळ करता येत नव्हती. स्त्री कोणत्याही जातीची असली तरी तिची इतकी अधोगती झाली की ती स्वतःलाच विसरली. तिलाही समाजात काही महत्त्व आहे. हे स्वतः स्त्रीच्या लक्षातही आले नाही. विकासाची भावना तिच्या मनातून नाहीशी झाली. नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक योग्य अयोग्य इच्छा समोर डोके टेकवायचे जणू निर्मात्याने तिला यासाठी निर्मित केले आहे. अशी समजूत व्हावी लागली.विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या राष्ट्रीय चळवळी बरोबर सामाजिक चळवळ ही सुरू झाली. समाजात प्रबोधनाची लाट उसळली. राजा राम मोहन रॉय आणि महर्षी दयानंद यांनी समाजातील वाईट प्रथा नष्ट केल्या. महिला समाजाकडे विशेष लक्ष दिले गेले. पुढे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्रांती झाली. जनतेला स्त्रीचे महत्त्व समजायला लागले. आणि तिचे बंधन सैल होऊ लागले. शिक्षण आणि समाज दोन शब्दात महात्मा फुलेंचे जीवन कार्य साठवले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा केला. पुणे येथे मुलींची शाळा स्थापन करून स्त्री शिक्षणाची सर्वप्रथम मुहूर्तमेढ रोवली. मुलींना प्रथम स्वतः शिकविले पण मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका मिळत नव्हत्या म्हणून धर्मपत्नी सावित्रीबाई यांना स्वतः शिकवून त्यांना शिक्षिका केले. तसेच सर्व समाजातील मुलींना शिक्षण मिळावे म्हणून शाळा काढल्या. ती शिकू लागली. राष्ट्रीय चळवळीतही अनेक महिलांनी महत्त्वाचे कार्य केले. सरोजिनी नायडू आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्यासारख्या मान्यवर महिलांनी पुढे जाऊन स्त्री समाजाची वाट दाखवली. 1947 मध्ये भारत स्वातंत्र झाला. तेव्हापासून भारतात सर्व क्षेत्रात विकासाची कामे सुरू झाली. समाजातील दोष दूर करण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न सुरू झाले. सर्वात महत्त्वाची घटना अशी घडली की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित संविधानामुळे भारतातील सर्व जाती जमातीतील मुलींना शाळेमध्ये बसून शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला. सोबतच महिलांविषयक हक्काचा पुनर्विवाह करण्याचा अधिकार, घटस्फोट घेण्याचा अधिकार, महिला व पुरुषांना समान अधिकार, वारसा हक्क, पोटगी मागण्याचा अधिकार, हे हक्क स्त्रियांना मिळालेले आहे. भारतीय संविधान यात असलेल्या स्त्री शिक्षण अधिकारामुळे चांगले आणि वाईट यामध्ये फरक तिला समजायला लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तिला हक्काचे संविधानच मिळाले. भारतीय राज्यघटनेत महिलांना पुरुषाप्रमाणे समान अधिकार देण्यात आले आहे. अशा प्रकारचे कायदेशीर समानता बहुदा पहिल्यांदा स्त्रियांना दिली गेली. स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने अधिकार वाट्याला आले समाजातील प्रगती ही शिकलेल्या मुलींमुळे होते. समाज बळकट होतो. देशाच्या विकासासाठी स्त्री खूप महत्त्वाची आहे. पुरुषा इतकेच भविष्याची सकारात्मक वाटचाल स्त्रीच्या शिक्षणावर, स्त्री बळकटी करणावर अवलंबून आहे. आणि स्त्रीने हे करूनही दाखवले आहे. आजची स्त्री ही शिक्षणामुळे विविध पदभार सांभाळत आहे. आज महिलांनी शिक्षण, कला, विज्ञान, राजकारण या क्षेत्रात प्रवेश केला आहे. स्त्रिया कोणत्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी नाहीत. आज आपण पाहतो की महिलांमुळे समाजात वेगाने प्रबोधन होत आहे. पुरुषांनाही महिलांचे महत्त्व कळू लागले आहे. महिलांनी अल्पावधीतच हे सिद्ध केले आहे. महिला ही शिक्षण, बुद्धिमत्ता, सौंदर्य कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. महिलांच्या स्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. हे बरोबर आहे. पण हा विकास अजून पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही. शिक्षणाशिवाय देशाचा विकास होणे अशक्य आहे. आशा आहे की लवकरच भारतातील सर्व मुलं-मुली शिक्षित होतील. सुशिक्षित समाज स्त्री पुरुष एकमेकांचे महत्त्व समजून घेतील. तो दिवस दूर नाही जेव्हा भारतात स्त्री पुरुष दोघेही समानतेने प्रगतीच्या मार्गावर चालतील आणि शाळा, कार्यालय, प्रयोगशाळा आणि लष्करातही मोठ्या प्रमाणात समानतेने काम करताना आढळतील. मुलींनीही आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे. सावित्रीबाई यांनी त्रास सहन करून स्त्रियांना शिक्षित केले. स्त्रियांच्या हातात वही आणि पेन दिला आहे. त्याच्या चांगला वापर करून शिक्षण घेऊन यशाच उंच शिखर गाठलं पाहिजे..!

©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला

🎭 Series Post

View all