घरोघरी मातीच्या चुली असतात भाग 7 अंतिम

Matichya Culi
घरोघरी मातीच्या चुली असतात भाग 7
अंतिम


बरेच दिवस तिला ही घरात करमत नव्हते, नवरा असे का वागत आहे समजायला मार्ग नव्हता..


त्यात विधीला ही तिची चिंता समजून येत होती, दादा विचित्र वागतो हे पटत नव्हते ,पण दादा नक्कीच काही तरी लपवत आहे हे कळून चुकले होते...म्हणून ती जास्तीत जास्त वेळ निराली सोबत तिला समजवण्यात ,साथ देण्यात घालवत होती...दादाचे कौतुक करत तर कधी निराली ला हिम्मत देत होती...काही नाही बघ सगळे ठीक होईल..हे तिचे बोल होते..

आज सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला...

मिहीर का सतत बाहेर असायचा ,तो का कोणाशी ही काही बोलत नव्हता...त्याने ही गोष्ट फक्त आई कडे आणि बाबांकडे बोलून दाखवली...काकाला ही सांगितले... पण काकुला काहीच कळू दिले नाही...कारण काकू ह्यात पडली तर कोणाला ही काही करता येणार नाही..
--------


आज तेच दिसत होते वृंदा (काकूच्या) चेहऱ्यावर ,तिला अर्पिताची दया ही नाही आली, उलट राग राग ,आणि आग पखड.. मुलीला काय त्रास होत असेल ,ती कसल्या मानसिकतेतून जात असेल हे जाणून ही घ्यायचे नव्हते जणू तिला..फक्त ती सासर सोडून घरी का आली ,ते ही सगळ्यांना का हे सत्य सांगितले...आपल्या आपल्यात का ठेवले नाही..माझ्या अहंकाराला चुर केलं...लेक मोठ्या घरी दिली आहे ,सुखात मजेत ,ऐश्वर्यात नांदत आहे...हेच मी किती सांगत होते त्यावर पाणी फिरवले...आमची लेक जावयला सगळे सुख देते, तिला ही तो हवे ते देतो सांगण्यात मी गर्वाने फुलायचे आता सगळे पितळ उघडे पडले ह्या पोरीने...

वृंदा कडे लेकीने धाव घेतली ,आणि गळ्यात पडली पण आई ने तिला जणू हात ही नाही लावला.. ती तशी तटस्थ होती

वृंदा, "अर्पिता तुला जरा ही धीर नव्हता का ,लगेच सासर सोडून मिहीर सोबत आलीस निघून..?"

हे म्हणताच सगळे जण तिच्या ह्या बोलण्याकडे आणि वागण्याकडे बघतच राहिले ,कमाल तिच्या ह्या निगरगट्ट पणाची ,आई असून अशी कशी बोलू शकते ही बाई..

संपदा ने तिला चांगले झापले, "अग आई आहेस ना तिची ,मग तिला धीर दे म्हणाले होते मी तुला तर तू तिला ढकलते दूर.."

"राहू द्या मी अशी आहे कारण जास्त लाड केले की ती नांदने मोडून येईल आणि नवरा ही सोडून देईल हो ताई ते मला परवडणार नाही.." वृंदा


"काकू ती आता परत तिथे जाणार नाही ,आज मी गेलो नसतो वेळेवर तर आज अर्पिता आपल्यात नसती..तिला मारले असते जाळून त्यांनी कळते का तुला.." मिहीर


वृंदाला आता काहीच कळेना हे काय ऐकत आहे ती मिहिरच्या तोंडून...तिला आता त्याचे शब्द दुखावून गेले ,आणि डोळ्यात अश्रू उभे राहिले तशी ती खाली कोसळली ,ती ही रडू लागली


संपदा आणि मिहीर बाकी सगळे स्तब्ध होते ,की असे कसे हे सासरचे आहे की आमच्या लेकीला जाळून टाकायला निघाले..आज वेळीच आम्ही पोहचलो नसतो तर काय हा अनर्थ झाला असता..

तरी वृंदा लेकीला सासरी पाठवत असायची ,जरी तिला सासरी जाण्याची इच्छा नसली तरी ,नेहमी मार खाणे..उपाशी ठेवणे...कोंडून ठेवणे हे प्रकार आता आता सुरू केले होते...कशी बशी अर्पिता पळून जीव वाचून यायची आणि तिची आई तिला पुन्हा त्या नरकात पाठवायची का तर लोक काय म्हणतील म्हणून..इज्जती खातर सहन करू म्हणायची..मग अर्पिता काही झाले तरी कोणाला ही सांगत नसे कारण तिला आपल्याच घरच्यांची साथ नसे..

मिहीर, "काकू तिला मेलेले बघायचे आहे की तिला माहेरी ठेवायचे आहे ते ठरवा ,पण मग आयुष्यभर आपल्याला आपली अर्पिता दिसणार नाही.."

हे म्हणताच वृंदा जोर जोरात टाहो फोडून रडू लागली ,तिला हे दुःख दाबता येत नव्हते..तर कणखर ही राहू शकत नव्हती..अर्पिता महत्वाची आहे हेच खरे...नुसत्या दिखाव्यासाठी मोठ्या घरात लग्न करून दिले पण पाहिले नाही की माणसे कशी आहेत..पाहिले नाही की लेक सुखी आहे की नाही...आणि तिने सांगितले तरी वेळीच दखल ही घेतली नाही...लेकीला ह्या ऐश्वर्यात गुदमरुन टाकले...


विधी आणि निरालीला खूप धक्का बसला ,त्या ही घाबरल्या होत्या की असे ही सासर असू शकते ,जरा ही कदर न करणारे ,असा ही नवरा असू शकतो जनावरा प्रमाणे बायकोला त्रास देणार..लोकांचे ऐकले होते पण तेच आपल्या घरात आपल्या लेकिसोबत झाल्यावर पाया खालची जमीन हदरली

आता निरालीला आपल्या नवऱ्याबद्दल अभिमान वाटत होता ,किती चांगला आहे मिहीर ,किती दक्ष भाऊ आहे ,किती गुणाचा मुलगा आहे...तिला मनोमन अभिमान वाटत होता...कळले सगळेच बंधन बंधन नसतात...आपण उगाच समजयचो बाबांनी मैत्रीच्या बंधन निभवायसाठी माझा बळी दिला..पण आता इथून पुढे तसे वाटणार नाही हे नक्की.

संपदा, "वृंदा तुला जर अक्कल आली असेल ह्या प्रसंगातून तर आपण आता अर्पिताच्या काडी मोड घेण्यासाठी प्रकरण सुरू करू...अर्पिता पुन्हा तिथे जाणार नाही हे आमचे ठरले आहे पण तुझा शिक्कामोर्तब हवा आहे...परत जर तुझे मन बदलले तर सांगा...अर्पिताला पुन्हा सासरी पाठवू.."

वृंदा लगेच संपदाच्या पाया पडते आणि आपली चूक कबूल करते आणि म्हणते मला माझी लेक हवी आहे ताई...मी चुकले आता तुम्ही तिची आई आणि काकू म्हणून काय योग्य तो निर्णय घ्यायचा तो घ्या...

इकडे सगळेच ठाम होते ,सुमित ही ताईला परत जाऊ देणारच नाही मी त्या सैतान कडे ह्यावर आडला होता.. मिहीर ही काका आणि बाबासोबत जाऊन पोलीस हिंसाचारबाबत तक्रार करण्यासाठी आता बाहेर पडला होता..

कथा समाप्त...

घरच्या लोकांनी मुलीला लग्न करून दिले म्हणजे जबाबदारी संपली असे समजू नका, आता खरी जबाबदारी सुरू झाली हे लक्षात असू द्या..

©®अनुराधा आंधळे पालवे


🎭 Series Post

View all