घुसमट -कथा स्त्री मनाची (भाग-७)

सुनेला वाईट पायगुणाची म्हणून तिला दोष देणे.हे एक स्त्री म्हणून किती योग्य आहे?

कथेच्या मागच्या भागात शालुचे लग्न ठरण्याआधीच तिचे वडील मुलाकडच्यांकडुन तिच्या पुढच्या शिक्षणाविषयी आणि नौकरी विषयी बोलुन घेतात.आणि पुढच्या गोष्टींची रीतसर सुरवात होते..आज शालुच्या घरात सगळीकडे आनंदी आनंद असतो.आईवडिल खुपच खुश असतात.शालु मात्र थोडी अस्वस्थ असते.तिच्या मनात एक अनामिक भिती असते.तिच्या मैत्रिण ही तिला तेच विचारतात "शालु मुलाकडचे हो तर म्हटले आहेत.पण ते खरंच तुला नौकरी करु देतील का गं?" शालु चे मन अजुनही लग्नाला पुर्णपणे तयार नव्हते.पण सांगावे कसे,आई पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन ति काही बोलत नव्हती.आणि वडिलांसमोर आपले मत परखड पणे मांडण्याची मुभा तर नव्हतीच. कशी असते एका मुलीची अवस्था तिला तिच्या स्वतः च्या भविष्याचा निर्णय स्वतः कधीच घेता येत नसतो.. लग्नाआधी वडिल,तर लग्नानंतर नवरा या पुरुषी मक्तेदारी च्या मध्ये तिची सतत घुसमट होते..
नवऱ्याकडची मंडळी आली.रीतसर सर्व कार्यक्रम पार पडला. नंतर मुलाने मुलीशी बोलण्याचे विचारले.दोघेही गच्चीवर बोलण्यासाठी गेले.शालुने आज पहिल्यांदाच विशालला जवळुन आणि व्यवस्थित पाहिले होते. उंचपुरा, सावळा आणि नाकी डोळी तरतरीत असा विशाल तिच्या लगेच मनात भरला.. विशाल बराच वेळ बोलत होता.शालु फक्त ऐकत होती.शेवटी तो तिला म्हणाला
"मीच बोलतो आहे.तु काहीच बोलत नाही.तुझ्या इच्छेने तर होते आहे ना हे लग्न.आणि मी तर ऐकलंय तु खुप छान वकृत्व करतेस.मग इतकी शांत का,तुला काहीही विचारायचे नाही का मला?"
शालु -"नाही तसं नाही,पण मी खरंच खूप कमी बोलते.हा शाळ कॉलेज मध्ये स्पर्धेसाठी वकृत्व तसं चांगलं आहे माझं,पण मुळात मला कमीच बोलायला आवडते.
मला फक्त एकच प्रश्न विचारायचा होता.मी लग्नानंतर नौकरी तर करु शकते ना? कारण माझे स्वप्न आहे ते "

विशाल -" हो नक्कीच .तु तुझे पुढचे शिक्षण आणि नौकरी दोन्ही करु शकतेस आणि याविषयी आधीच तुझ्या वडिलांशी सविस्तर बोलणं झालं आहे..चला या निमित्ताने का होईना तुझा आवाज तरी ऐकायला भेटला मला."
शालु गोड लाजते आणि तिथुन निघुन जाते.
आता शालुला कुठलेही टेन्शन नसते.. तिला जे हवे होते ते मिळाले.
शालुची कळी खुलली होती.आईला हे पाहून खुपच आनंद झाला होता.पुढच्या एक महिन्यात तिच्या परीक्षा होत्या.आणि त्यानंतर लग्नाची तारीख ठरणार होती.शालु जोमाने अभ्यासाला लागली होती. दोन तीन दिवसाआड विशालशी फोनवर बोलणं ही होत असे.दोघेही एकमेकांना समजुन घेत होते.स्त्री सुलभ भावनेने तिच्या मनात भावी संसाराचे स्वप्न रंगत होते.मन फुलपाखराप्रमाणे स्वच्छंदी विहारत होते.शालु आता खुश रहाते, स्वतः कडे लक्ष देते.या गोष्टी बघुन वडिलांनाही बरे वाटत होते. की,आपली निवड योग्य आहे.आणि आपले कर्तव्य आपण व्यवस्थित पार पाडतो आहोत.

एप्रिल महिन्यात शालुच्या परीक्षा संपल्या नेहमीप्रमाणे तिचे पेपर खूप छान गेले.आणि मे महिन्यात तिच्या लग्नाची तारीख ही ठरली. मोठ्या धुमधडाक्यात, हौसमौजेत निर्विघ्नपणे शालुचे लग्न पार पडले.आणि शालुच्या आईवडिलांचा जीव भांड्यात पडला.  जणू मुलीचे लग्न हेच फक्त आईवडिलांची सर्वस्वी जबाबदारी असते.आणि आपण आपल्या कर्तव्यातुन सुटलो असेही काहींना वाटते.
शालुचा स्वभाव मुळातच शांत, समंजस आणि प्रेमळ ती जिथे जाईल तिथे मिसळून जाणारी पोरगी.हे तर तिचे आपले घर होते.आपली माणसं या विचाराने ती सासरी हळूहळू रुळायला लागते. नव्याची नवलाई लवकर संपते आणि घरातील प्रत्येक सदस्याचे खरे स्वभाव हळूहळू समोर यायला लागतात.
शालुच्या सासरेबुवांना बि.पी.आणि शुगरचा त्रास गेल्या पाच ते सहा वर्षांपासून होता.आता मुलाच्या लग्नात धावपळ झाली.खाणेपिणे चुकीचे झाले. त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला.आणि त्यांना बायपास सर्जरी करावी लागली.. लग्नानंतर एका महिन्यात असे घडले याचा दोष सासुने शालुला दिला. "हिचे पायगुण चांगले नाहीत.म्हणुन ही घटना घडली." हे ऐकून शालुच्या पायाखालची जमीन सरकली. तिने विचार केला की, सध्या यांची मनस्थिती चांगली नाही.म्हणुन बोलत आहेत.सगळं चांगलं झालं की,आई सुद्धा शांत होतील.विशालनेही तिला तेच समजावले. आपला नवरा आपल्या पाठीशी आहे.म्हणुन काही चिंता नाही.असा विचार शालु करत होती.
आठ दिवसांत शालुचा रीझल्ट आला आणि शालु कॉलेजमध्ये पहिल्या नंबराने उत्तीर्ण झाली. शालुला खूप आनंद झाला.विशाललाही आनंद झाला.पण घरातील इतर लोकांना मात्र तेवढा आनंद झाल्याचे दिसत नव्हते.
कारण शालु चे नाव जेव्हा वर्तमान पेपरमध्ये आले.तेव्हा विशालने मोठ्या कौतुकाने तो पेपर आपल्या आईवडिलांना दाखवला.
"आई,नाना हे बघा आपल्या शालन चा फोटो आला आहे पेपरमध्ये कॉलेज मध्ये पहिली आली आहे ती.आणि विद्यापिठात तिसरी.हे बघा. किती अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.?"
पण विशाल च्या आईने लगेच उत्तर दिले
"अरे आभ्यासाची हुशारी काय कामाची ती, सुनबाईचा पायगुण चांगला नाही.शिक्षणाला काय करायचं आहे. लग्न झाले कुठे झाले तेवढ्यात तुझ्या नानांची ही अवस्था."
विशाल -"आई हे काय बोलते आहे तु, अगं एवढे मागासलेले विचार कसे असु शकतात तुझे, हे पायगुण वगैरे काही नसतं गं तसं. कावळा बसायला आणि फांदी तुटायला.असं काही झालं. तर त्याचा दोष तु शालुला कसा देऊ शकते?"
विशालचे बोलणे ऐकून त्याचे वडील मध्येच बोलतात
"विशाल हळु बोल जरा.आईशी बोलतो आहे तु,विसरु नकोस.ते तिचे विचार असतील, मनस्ताप असेल पण तु तिला समजून घे.वयामानानुसार होते चिडचिड."
शालु हे सर्व ऐकत होती.तिच्या बाजुला तिच्या मोठ्या जाऊबाई पण होत्या. शालुसाठी हे सगळं नवीन असलं तरी जाऊ साठी हे सर्व नेहमीचच झालं होतं.
शालुने  संधी पाहून विशालला आपल्या एम.ए. च्या ॲडमिशन विषयी विचारले.  तेव्हा विशाल ने तिला "चिंता नको करु वेळ संपण्याआधी ॲडमिशन करुन घेऊ तुझं.एकदा मला आई आणि नानांशी बोलुन घेऊ दे."

विशाल ने परीस्थिती पाहुन आई वडिलांकडे शालुच्या ॲडमिशन चा विषय काढला. तर सासुने तर सरळ सरळ नकारच दिला.
"अरे तुला काही वाटत नाही का ?घरात परिस्थिती काय,तु बोलतो काय, तुझ्या नानांचे एवढे मोठे ऑपरेशन झाले आहे.अजुन एक महिना झाला नाही.इथे पाहुण्यांची वर्दळ,घारातली धावपळ. तुला काही  कळतं की, नाही. इथे बापाच्या जिवावरचे गेले.आणि तुला तुझ्या बायकोच्या शिक्षणाचे पडले आहे.."
सासुचे बोलणे पुर्ण होतं नाही.तेवढ्यात जेठाणी स्वयंपाक घरातील काम अपूर्ण सोडुन धावतपळत हॉल मध्ये आली.सासुला थांबवत मध्येच बोलली
"अहो भाऊजी आई बरोबरच बोलत आहेत. बघा ना पाहुणे रावळे सारखे चालु आहेत. घरात भरपूर कामं असतात. नानांचे पथ्यपाणी वेगळे.  मी एकटीने सगळं कसं सांभाळायचं बरं?"
अहो वहिनी हे काय बोलताय तुम्ही? विशाल बोलला.
"मी काय बोलते आहे? मी या घरात लग्न करून आले.तेव्हा मलाही शिकायचे होते.पण आईंने नाही सांगितले तर तुमच्या दादांनी तिथेच विषय बंद केला.तो आजपर्यंत परत कधी काढलाच नाही.गेली दहा वर्षे एकटीने सर्व घर सांभाळते आहे. आता कुठे मदतीला जाऊबाई आल्या तर , काय म्हणे त्या जातील कॉलेजमध्ये आणि आंम्ही आपलं एकट्याने सगळी कामं करायची. हा भेदभाव कसा होऊ शकतो?
शालु सर्वांचे सर्व बोलणे ऐकत होती. तिच्या साठी हा मोठा धक्का होता. आणि तिला आता लग्ना आधीची ती अनामिक भिती काय होती.ते कळु लागले.
सासऱ्यांच्या तब्बेतिचे कारण झाले. आणि सगळं चित्र पालटले. सासुने तर तिच्या शी बोलणे ही बंद केले होते. कारण सासऱ्यांना ॲटक आल्याचे सर्व खापर तिने शालुच्या डोक्यावर फोडले होते. सासु जुन्या विचारांची असल्याने आता तिच्या रोषाला शालुला सामोरे जावे लागणार होते. आणि त्याची सुरुवात सासुने केली होती.
शालुच्या ॲडमिशन ला नकार देऊन.
शालुचे एम.ए.चे ॲडमिशन ‌होईल की, नाही की,परत सासु काय काय अडचणी आणेल हे पाहुयात कथेच्या पुढच्या भागात .
(क्रमशः)
फोटो साभार गुगल
©® सौ.दिपमाला अहिरे.