चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी (संघ कामिनी)
लघुकथा फेरी (संघ कामिनी)
शीर्षक : गिरीजाचे कीर्तन
गावच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे कीर्तन सोहळा रंगला होता. गावकऱ्यांच्या ओठांवर भजन, डोळ्यांत भक्तिभाव निर्माण झाला होता. आज कीर्तनकार जोशी बुवा कुठल्या गोष्टी कीर्तनात घेणार या बद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली होती.
जोशीबुवांच्या कीर्तनाला आसपासच्या पंचक्रोशीतून लोक यायचे. ते ज्या तडफदार भाषेत बोलायचे, त्यातल्या ओव्या, दृष्टांत आणि सामाजिक उपदेश ऐकून येणारे सगळे लोक भारावून जायचे.
त्या दिवशी त्यांनी एक ओवी घेतली,
“आईवडिलांची दोन्ही बाळे,
एकच आहेत घराच्या गोकुळां।
कोणी न म्हणो ही कन्या कमी,
समरस व्हावे घराघरां॥”
एकच आहेत घराच्या गोकुळां।
कोणी न म्हणो ही कन्या कमी,
समरस व्हावे घराघरां॥”
लोकांना त्याचा अर्थ कळला नव्हता, त्याची तोंडे पाहून जोशीबुवांनी त्याचा भावार्थ सांगायला सुरुवात केली.
“बघा, कोणी मुलगा आणि मुलगी यात भेद करू नका. दोघेही ईश्वराचीच देणगी आहेत. अजूनपर्यंत मुलीशिवाय कुठलेच घर उजळले नाही, हो की नाही? मग आपण मर्त्य मानव का बरे हा भेदभाव करतो?”
गावकरी माना डोलावून सहमती देत होते. जोशीबुवांनी नेहमीप्रमाणेच लोकांना मुलींचे महत्त्व, त्यांची जपणूक आणि मुलगा-मुलगी समानता याविषयी छान समजावले.
पण म्हणतात ना दिव्याखाली अंधार असतो किंवा 'लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण' त्यानुसार त्यांच्या घरात मात्र वेगळेच चित्र होते.
जोशीबुवांची सून 'प्रणाली' ही हुशार, समंजस; पण शांत स्वभावाची होती. तिला एक सोन्यासारखी गिरीजा नावाची मुलगी होती. ती दहा वर्षांची झाली होती तरी देखील जोशी बुवांना नातू हवा असा हट्ट होता, जो त्यांचा वंश चालवेल आणि पुढे कीर्तनाची परंपरा सुरू ठेवेल आणि म्हणून ते प्रणालीला प्रत्येक वेळी टोमणे मारत बसायचे. त्यांच्या स्वतःच्या मुलाला दुसरे लग्न कर, यासाठी देखील मागे लागायचे. घराच्या बाहेर मात्र ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती, तेथे जोशीबुवा म्हणजे सौजन्याचा पुतळा होते.
जोशीबुवा जेव्हा घरी असायचे, तेव्हा बहुतेकदा प्रणालीला टोमणे मारायचे.
“काय गं प्रणाली, अजून किती दिवस म्हाताऱ्याला वाट पाहायला लावणार, कधी होणार मुलगा तुला? घराला वारस कोण देणार? या गिरीजाकडून थोडीच माझा वंश पुढे चालत राहणार आहे?”
असे टोमणे ऐकून प्रणालीचे मन घट्ट व्हायचे; पण तिने कधीच त्यांना प्रत्युत्तर दिले नाही.
अशाच एके दिवशी बाजूच्या गावात कीर्तनाचा मोठा सोहळा आयोजित केला होता. मंदिर गर्दीने तुडुंब भरून गेले होते. लोक उत्सुकतेने जोशीबुवांची वाट पाहत होते.
मात्र जोशीबुवांच्या छातीत अचानक दुखू लागले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांनी कीर्तन सुरू करायचा प्रयत्न केला; पण शब्द बाहेर पडत नव्हते.
लोक कुजबुजू लागले...
“काय झाले बुवांना? एवढी मंडळी जमलीयेत; पण कीर्तन सुरूच होत नाही!”
“हे काय, वेळ पाळली नाही तर लोकांचा विश्वास कसा राहील?”
“काहीतरी चूक झाली असेल त्यांच्याकडून, म्हणूनच देवीचा कोप झाला असेल.”
व्यक्ती तितक्या वल्ली, प्रत्येकाची वेगवेगळी मते गर्दीतून येत होती. जोशीबुवांना कसे तरी वाटू लागले, आज त्यांचा मुलगा देखील दुसरीकडे गेला होता, नाहीतर त्याने कीर्तन सुरू केले असते.
तेव्हा अचानक जोशीबुवांच्या पाठून एक कोवळा आवाज आला. तो होता प्रणालीच्या मुलीचा, गिरीजाचा!
गिरीजा वयाने फक्त दहा वर्षांची होती; पण तिने लहानपणापासून आजोबांचे आणि वडिलांचे कीर्तन ऐकून सगळे काही मनात साठवले होते. कुठल्या सणाला कुठले कीर्तन, कुठली गोष्ट सांगायची याची तिला खडानखडा माहिती होती. ती निर्भीडपणे उभी राहिली.
“आजोबा आजारी आहेत; पण कीर्तन थांबायला नको. मी सांगते तुम्हाला आजचे कीर्तन.”
सगळ्यांच्या नजरा त्या लहान मुलीकडे वळल्या.
गिरीजाने चिपळ्या हातात घेतल्या आणि सुरात ओवी घेतली,
“आई-वडिलांची दोन्ही बाळे,
एकच आहेत घराच्या गोकुळां।
कोणी न म्हणो ही कन्या कमी,
समरस व्हावे घराघरां॥”
एकच आहेत घराच्या गोकुळां।
कोणी न म्हणो ही कन्या कमी,
समरस व्हावे घराघरां॥”
त्या ओवीचा स्वर मंदिरभर गुंजत होता.
गिरीजाने कीर्तन सुरू केले ते संपेपर्यंत गावकरी भक्तीभावाने ऐकत राहिले. जोशीबुवा बाजूलाच जमिनीवर बसलेले होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
“हीच माझी नात आहे. मी जिच्या आईला रोज टोचून बोलत होतो, सारखा नातू पाहिजे म्हणून राग राग करत होतो; पण आज हिच्या आवाजाने माझे अंधत्व दूर झाले. खरेच, मुलगा-मुलगी यात भेदभाव करणे ही माझी सर्वात मोठी चूक होती.”
त्यांनी थरथरत्या हातांनी गिरीजाला मिठी मारली.
“बाळा, आज तू मला योग्य दिशा दाखवली. मी जीवनभर लोकांना शिकवत राहिलो; पण मनातून मुलगा-मुलगी हा भेद दूर सारता आला नव्हता; पण आज तुझ्या शब्दांनी मला खरी जाणीव झाली.”
त्या दिवसापासून जोशीबुवांचा चेहरा उजळला. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या.
"उगाच नाही जोशी बुवांची नात आहे!"
"अहो सगळे गुण जोशीबुवांचे हुबेहूब घेतले आहेत."
"अगदी बरोबर... उभे राहण्याची, बोलण्याची पद्धत अगदी जोशीबुवांसारखीच!"
गावातील लोक एकमेकांबरोबर गिरीजाचे कौतुक करत होते. त्या दिवसानंतर जोशीबुवांनी कधीही प्रणालीला टोमणे मारले नाहीत. उलट, “प्रणाली, मुलगा-मुलगी काहीही नसते, तुझ्या गिरीजाने तर आपल्या घराचे नाव उजळवलंय.” असे म्हणत ते गिरीजाच्या डोक्यावरून हात फिरवत असत.
गावकऱ्यांनाही त्या घटनेतून धडा मिळाला,
"जोशीबुवा फक्त कीर्तनातून समाज प्रबोधन करत नाहीत तर त्यांच्या घरात देखील तेच असते. त्यांचा उपदेश फक्त शब्दांनी नाही, तर कृतीने देखील ते करून दाखवतात."
जोशीबुवांच्या मनातून मुलगा-मुलगी यातला भेद आता कायमचा निघून गेला होता.
समाप्त
©भालचंद्र नरेंद्र देव
©भालचंद्र नरेंद्र देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा