Login

मुलींचे शिक्षण संस्कार आणि समाजदृष्टी

मुलींच्या शिक्षणाकडे दुय्यम स्थान देणारा समाज
शीर्षक : मुलीचं शिक्षण, संस्कार आणि समाजदृष्टी एक वास्तवदर्शी चिंतन

मुलीच्या लग्नाबद्दल आणि खर्चाच्या विषयावर माझा लेख वाचल्यानंतर एका सज्जन व्यक्तीने मला फोन केला. त्यांच्या आवाजात कृतज्ञता, आदर आणि मनापासूनचं कौतुक जाणवत होतं. काही वेळ मनसोक्त गप्पा मारल्या. संवाद संपत आला तसा त्यांनी एक खंत व्यक्त केली

“तुम्ही मुलींच्या शिक्षणाबद्दल लोकांना प्रोत्साहित करता, पण याच विषयाचा दुसरा, कडू अनुभव असलेला पैलूही समाजात आहे… यावरही तुम्ही लिहायला हवं.”

त्यांच्या सांगण्यावरून ही सत्य घटना मनाला चटका लावणारी होती.

एक कुटुंब.
एकुलता एक मुलगा. साधा, संयमी, मेहनती.

आई-वडिलांनी त्याचं लग्न कमी शिकलेल्या पण शिकण्याची इच्छा असलेल्या मुलीशी लावून दिलं. तिच्या डोळ्यात स्वप्न होतं पण ते स्वप्न एखाद्याच्या आधाराशिवाय पूर्ण होणं शक्य नव्हतं.

त्या मुलाने, नवऱ्याने पत्नीची इच्छा ओळखली.
तिला शिकवलं, उभं केलं, प्रोत्साहन दिलं.
कुटुंबातील कर्तव्य सांभाळत तिने शिक्षण पूर्ण केलं आणि वकील बनली.

दरम्यान त्यांच्या संसारात एक गोंडस मुलाचा जन्म झाला. तो दहाव्या वर्षी आला… आणि आईही उच्च शिक्षणाच्या उंच शिखरावर पोचली.

पण याचवेळी आयुष्याने एक अनपेक्षित, धक्कादायक कलाटणी घेतली.

शिक्षण, स्वावलंबन, प्रगती या सगळ्यांमध्ये असताना तिचं एका पोलीस व्यक्तीशी अनैतिक नातं जुळलं.
हे नातं हळूहळू घट्ट होत गेलं… आणि संसार मागे पडत गेला.

नवऱ्याने आधार दिला, उभं केलं, सर्व मालमत्तेचा दर्जा दिला…
पण त्या स्त्रीने बुद्धीने पाऊल टाकलं आणि

नवऱ्याची मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली

आणि नंतर सोडचिठ्ठीची मागणी करू लागली

त्याच वेळी पोलीस कर्मचाऱ्याशी असलेला संबंध लपवून संसार मोडेल अशा प्रकारची पावलं उचलू लागली


फोन करणारे सज्जन दुःखाने म्हणाले
“अशा मुली शिकल्या तरी काय फायदा? अशा संस्कारांचा उपयोग काय? आणि अशांचं पाहून आई-वडील मुलींचं शिक्षण थांबवतात.”

मी त्यांना शांतपणे सांगितलं

हो, काही मुली चूक करतात.
काहींच्या निर्णयांमुळे, लालसेमुळे किंवा चुकीच्या नात्यामुळे संसार उद्ध्वस्त होतो.

पण… या काही मुलींच्या वागण्यामुळे सर्व मुलींच्या शिक्षणावर बंधनं आणणं हे अगदीच चुकीचं आहे.

जगात हजारो, लाखो मुली आहेत

ज्या मनापासून शिकतात

स्वप्नं पाहतात

पालकांचं नाव उजळवतात

सासरी जाऊन घरात संस्कार रुजवतात

नवऱ्याच्या यशासाठी हातभार लावतात

समाजात नवी उंची निर्माण करतात

वाईट वागणारी एक मुलगी अपवाद आहे,
पण चांगल्यांच्या रांगा अपार मोठ्या आहेत.

शिक्षण दोषी नाही संस्कारच चांगलं वाईट ठरवतात

शिक्षणामुळे मुलगी वाईट होत नाही.
शिक्षण माणसाला सामर्थ्य, निर्णयक्षमता आणि स्वत्व देतं.

वाईट होत असेल तर
संस्कार, लोभ, चुकीची संगत किंवा दिशाहीन विचारसरणी यामुळे होतं.

त्या मुलीने वागणूक चुकीची दिली
पण त्या मुलाने तिला उभं केलेलं मोठेपण समाजाने पाहायलाच हवं.

त्याने दाखवून दिलं
“यशस्वी स्त्रीच्या मागेही कधी कधी एक कणखर, त्यागी पुरुष असतो.”

समाजासाठी काही प्रेरणादायी उदाहरणं

समाजात वाईट घटना असतील,
पण चांगुलपणाची परंपरा प्रेरणा देणारी आहे.

"सावित्रीबाई फुले" जगाने विरोध केला तरी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य झोकून देणारी.

"राणी लक्ष्मीबाई" धैर्य, शौर्य आणि स्वाभिमानाचं तेजस्वी उदाहरण.

"अहिल्याबाई होळकर" संस्कार, न्याय, दूरदृष्टी आणि आदर्श नेतृत्वाचं प्रतीक.

"ताराबाई" मराठेशाही टिकवणारी, कणखर आणि बुद्धिमान योद्धा.

इतिहासातील या स्त्रिया सांगतात
स्त्रीशक्ती जेव्हा योग्य संस्कार, योग्य दिशा आणि दृढ स्वभावासोबत चालते… तेव्हा ती समाज घडवते.

पालकांसाठी शिकवण

एक मुलगी चुकीचं वागली म्हणून
सगळ्या मुलींचं स्वातंत्र्य काढून घेणं योग्य नाही.

मुलींना शिक्षण द्या.
संस्कार द्या.
दिशा द्या.
विश्वास द्या.

मग त्या जिथे जातील तिथे सुवासच पसरवतील.

समाजात चांगलंही आहे, वाईटही.
दोन्ही गोष्टी सत्य आहेत.

पण कोणतं ‘अधिक मोठं’ करायचं हे आपण ठरवायचं.

त्या मुलीने चूक केली, संसार मोडला, चुकीचं नातं जोडलं
हो, हे वाईट आहे.

पण अशी एक घटना पाहून सर्व मुलींवर शिकवण बंद करणं हे त्याहूनही वाईट आहे.

योग्य संस्कार असलेली मुलगी
दोन्ही घरांचं नाव उजळवते,
आणि इतिहासातही सुवर्णाक्षरांनी नोंदली जाते.

त्यामुळे
मुलीचं शिक्षण म्हणजे खर्च नाही,
ती समाजाच्या भविष्यातली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
0