Login

गोधडी (भाग -३)

Incomplete Love Story
जलद कथामलिका लेखन जानेवारी २५
विषय - अनुत्तरित प्रश्न

शीर्षक - गोधडी - (भाग ३)
लेखिका - स्वाती बालूरकर, सखी

दुसऱ्या दिवशी तिच्या विद्यार्थिनीच्या सहाय्याने तिने त्या गोधडी वेबसाईटची सगळी माहिती काढायला लावली तिला कळालं की साईनाथ अँड सन्स नावाचा कुणीतरी नवीन उद्योगपती आहे.

दहा दिवसानंतर सोनल त्या गोधडी आउटलेट मध्ये नाव नोंदवण्यासाठी गेली.

तिथे ज्या प्रकारचे मानसोपचार तज्ञ होते, तिथला स्टाफ होता ,त्यांचं आलेल्या ग्राहकांशी वागणं पाहून तिला खूप भारावून गेल्यासारखं झालं .

म्हणजे ही सगळी आपलीच माणस आहेत असं वाटायला लागलं.

त्यादिवशी तिचं पहिलं सेशन पूर्ण झालं .
आज तिने बोलताना अनाहूतपणे आपल्या लहानपणीच्या कितीतरी गोष्टी मानसोपचार तज्ञांकडे शेअर केल्या. खूप हलकं वाटायला लागलं.

आठवड्याभरानंतरची पुढची डेट घेऊन ती काउंटर वरती बोलत होती इतक्यात नेव्ही ब्लू टी शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट घातलेला गॉगल धारी एक व्यक्ती रिसेप्शन जवळ उभा राहिला .

तो तिच्याकडे पाहत आहे हे लक्षात येताच ती भानावर आली आणि रिसेप्शनिस्ट एकदम चाचपडत "गुड इवनिंग सर " म्हणाली .

तो तिला थांबवत म्हणाला," मिस,तुमचं सेशन झालं का? मला तुमच्याशी बोलायचं होतं ?"

आता मात्र तिला काय उत्तर द्यावं कळलं नाही.

त्याच्या आवाजातला मार्दव आणि त्याचे ते व्यक्तिमत्व पाहून 45 च्या वयात देखील तिला वितळल्यासारखं वाटलं.

" कशाबद्दल सर?"

"काही नाही, आमच्या या प्रोजेक्ट बद्दलच बोलायचं आहे. तुम्ही आमच्या कस्टमर आहात तर आम्हाला फीडबॅक गरजेचा आहे ! सोनिया ,आत माझी केबिन रिकामीच आहे ना ?"

" येस सर,रिकामीच आहे."
सोनल दबल्या दबल्यासारखीच त्याच्या मागे ,त्याच्या केबिनमध्ये गेली.

तो खुर्चीवर जाऊन बसला आणि त्यांने चेहऱ्यावर गॉगल काढला, आता तर तो तिला खूपच ओळखीचा वाटायला लागला.

" सर ,एक सांगू का? मला का तुम्हाला खूप पहिल्यासारखं वाटतंय ."

"आपण एकमेकांना खूप चांगलं ओळखतो फक्त आपण कधी भेटलो नव्हतो. . असं वाटतंय का?"

"नाही सर , मला असे वाटते की आपण भेटलो पण आहोत. . "

" व्हेरी गुड मग आपल्या त्या बुद्धी वरती ताण द्या आणि आठवा. बाय द वे, मिस सोनल शिक्षण कुठे झालं तुमचं?"

त्याच्या ह्या प्रश्नावरती तिचं मन थेट बालपणात गेलं .

मगाशी कौन्सिलर शी बोलताना तिने बाकी सगळ्या घटना सांगितल्या होत्या पण ती मनात दडलेली एक घटना ती बोलली नव्हती.

"मितांश ? आहात का तुम्ही ?"

"बरोबर ओळखलस सोनल, मला वाटलं तू मला ओळखतेस की नाही ?"

"अरे पण दहावी नंतर असं 28 -30 वर्षानंतर कसे ओळखणार मी. . चेहऱ्यात किती बदल झालाय तुझ्या. मानलं तुला, 'गोधडी 'किती सुंदर संकल्पना काढलीस, मला आवडली."

"सोनल,अजून एक सांगू. . मी ओळखतो तुला. आपण रोज बोलतो त्यामुळे तू मला दुरावल्यासारखी वाटलीच नाहीस ."

"कुठे भेटलास ? स्वप्नात ?" ती खळखळून हसली

"नाही प्रत्यक्ष. . . कुठे काय विचारतेस ? फेसबुकवर, मेसेंजर मधे .म्हणजे तू तिथे सखी नाव लावलं तर मी तुला ओळखणार नाही असं वाटतं का? म्हणजे ज्या मित्राशी मीत म्हणून बोलतेस तू . . . मीच तो मीत. उगाच का तुझ्या प्रेमात पडलो?"

आता मात्र तिच्या अंगावर शहारा उठला . 44 च्या वयाला हा प्रेमात पडलो म्हणतोय.

" तू काहीही बोलतोस !"

"अग हो, खरंच."

मग दोघांच्या त्यांच्या कुटुंबा बद्दल आणि भूतकाळाविषयी गप्पा झाल्या.

"तुझी बायको?"

" म्हणावं तर. . उशीरा एक बायको मिळाली होती, पण तिला हे माझं गोधड्या शिवण आवडलं नाही . . माझ्याच मित्रासोबत पळून गेली . नॉट जोकिंग! अगं खर सांगतोय, तेव्हापासून मी सिंगल आहे.

"पण मग नाव का बदललं?"

" कुठे बदललं. बाबांच्या नावाने बीजनेस ठेवलय, माझ्या नावाने नाही , ब्रँड मुळे लोक मला ओळखतात .त्यामुळे केवळ तुझ्याशी मैत्री करण्यासाठी मीत नावाने बोलतो ."

"कमाल आहेस तू!"

"खाजगी प्रश्न. . पण तुझं कुटुंब सोनल?"

" तुला तर परिस्थिती माहित असेलच, माझ्या बाबांच्या अपघातानंतर मी शिक्षण सोडलं आणि घर सांभाळलं.
माझ्या पेक्षा धाकट्या तीन ही बहिणींची लग्न झाली, त्या सगळ्या सुखी आहेत पण त्यात माझं लग्न राहूनच गेले रे! नंतर कोणी मिळाला नाही."

" बरोबर आहे, कसा मिळेल .मी नव्हतो ना दुसरा कोण लग्न करेल तुझ्याशी? तेव्हापासून आवडायचीस ग तू मला पण आपला काळच साला वाईट . सांगण्याची चोरी होती."

"मीतांश काय बोलतोस?" तिची धडधड वाढली.

"अरे यार, आता मी कुणाला भीत नाही .त्यामुळे तू आवडत होतीस आणि आताही आवडतेस. तू इथे जवळच संगीत विद्यालय चलवतेस . इथूनच रोज जात असतेस ,सगळ्याची माहिती मला आहे. यादरम्यान इकडे घर घेतलंस ना!"

" ओह गुप्तहेर! मी नाही रे, बाबांनी. ते जाईपर्यंत त्यांच्याकडे किती ठेव आहे वगैरे माहित नव्हतं आम्हाला. अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये मात्र या घराचे पेपर्स माझ्या हातात ठेवले . मुलगा होऊन मी आई-बाबांना सांभाळलं त्याची त्यांना खूप जाणीव होती. आता मी आणि आईज दोघीच असतो ."

"अगं सोनल, अर्धे आयुष्य तर मी तुझ्या आठवणींची गोधडी शिवण्यात घालवलं, जेव्हा तू मिळाली नाहीस, संसारही नशिबी नव्हता मग म्हटलं चला लोकांच्या गोधड्या शिवून देऊयात. तू तुझ्या गाण्याच्या सुरात मला विसरलीस आणि मी लोकांच्या गोधड्या शिवण्यात तुला.
तू कधीतरी भेटशील या आशेवर जगत राहिलो ."

हे सगळं ऐकून ती संभ्रमात पडली. स्वप्न तर नाही ना असे वाटले.

"शांत का? सोनल एक विचारू?" तो म्हणाला .

ती पटकन उभी राहिली, तिने हात जोडले आणि म्हणाली "नाही मितांश आता काहीच विचारू नकोस. तू विचारशील पण ते आता होणार नाही . मला कल्पना आहे तू काय विचारणार आहेस ?"

" अगं हे काय ? या अर्धवट वयात राहिलेलं आयुष्य सोबत घालवूंया असं म्हणतोय ."

"पण ते शक्य नाही रे ! तुझी एक प्रतिष्ठा आहे, माझा पण वेगळं नाव आहे. आपण भेटूयात ,बोलूयात, गप्पा मारूयात पण ते पुन्हा संसार लग्न होणार नाही माझ्याच्याने या वयात. "

"पाहूयात ना थोडे दिवस, आठवणींची गोधडी अजून किती उबदार होते ते ?" तो डोळ्यात पहात म्हणाला.

" मितांश,आपण एकमेकांच्या नशिबात नव्हतो म्हणूनच देवाने तेव्हा नाही भेटलंवलं ना, ते आता आपण नाही करायचं ." ती ठामपणे म्हणाली.

" मस्त जगूयात ना सोनल, देवाच विचार बदलेल या आशेने आहे!" तो मिशिल हसला.

"जगुया, पण आहेत त्या ठिकाणी आहेत तसे! भेटण्यास माझी ना नाही. गाण्याच्या सुरात दुःख विसरते मी. पण पहा ना कसं नशीब घेवून आले आहे. . . या अर्धवट वयात तू भेटलास . . "

तो पटकन जवळ आला.

"राहिलेलं आयुष्यही माझ्या सोबत घालवू शकतेस , सोनल विचार कर. . . "

" तुझं नुसतं सोबत असणं देखील माझ्यासाठी खूप मोठं वरदान आहे रे!"

"चला हेही नसे थोडके ! मी एक उभा धागा विणतो तू आडवा वीण ! अशीच विणली जाईल ना आयुष्याची गोधडी ! बाकीचं त्या देवावर सोडून देवुयात."
त्याने उठून तिच्या खांद्याभोवती हात टाकला आणि ती चक्क लाजली.