Login

गोडवा - नात्यांमधला, मनामनांतला - भाग 1

नात्यातल्या अन् मनातल्या गोडव्याची एक गोड कथा.


गोडवा - नात्यांमधला, मनामनातला - भाग 1
© स्वाती अमोल मुधोळकर

मुग्धा एक सुंदर, हुशार मुलगी. ती एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होती. स्वभावतःच विजिगिषु वृत्ती आणि कामसू स्वभावामुळे कंपनीमध्ये वरिष्ठ लोकांच्या विश्वासास पात्र ठरून तिने आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली होती.

ऑफिसला जाणारी मुलगी असल्यामुळे साहजिकच त्यानुसार तिची वेशभूषा असे. तिला मुख्यत्वे करून साधे सुटसुटीत कपडे जसे फॉर्मल शर्टस आणि ट्राउजर्स, कुर्ते, इत्यादी घालण्याची सवयही होती आणि तशीच आवडही होती. फार भरजरी , वजनदार कपडे तिला तेवढे आवडायचे नाहीत. रोज ऑफिसमध्ये जाण्याच्या दृष्टीने केशभूषाही साधीच असायची. छानशी हेअरकट केलेले लहानच खांद्यापर्यंत ठेवलेले केस. एक कंगवा फिरवला, एखादी क्लिप लावली की तयार. नाजूकसेच दागिने तिला आवडायचे. त्यामुळे कानात नाजूकसे इअरिंग्स आणि गळ्यात नाजूकसे पेंडंट. हातात एक नाजूकसे ब्रेसलेट इतकेच दागिने ती घालत असे . मुग्धा आई वडिलांची एकुलती एक असली तरी योग्य संस्कारात वाढलेली होती. स्नेहाताईंनी तिला वेळोवेळी चांगली शिकवण दिली होती.


सात आठ महिन्यांपूर्वी तिचे सुजयशी लग्न झाले होते. तेव्हापासून ती नव्या संसारात रुळत होती. सुजयसुद्धा एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये होता. दोघेही सोबतच ऑफिसमध्ये जात . सुजय तिला ऑफिसमध्ये सोडून मग पुढे त्याच्या ऑफिसमध्ये जात असे. मुग्धाच्या सासूबाई वर्षाताई या आपल्या सुनेला शक्य तितके सांभाळून घेत होत्या. अर्थातच नोकरी करणाऱ्या मुलींचे लग्नाआधी स्वयंपाक घराशी जितके नाते असते, तितकेच मुग्धाचेही होते. तरीही गरजेपुरते पदार्थ स्नेहाताईंनी हट्टाने तिला शिकवले होते. सुरुवातीला वर्षाताईंनी स्वयंपाकातील काही गोष्टीही मुग्धाला शिकवल्या होत्या. त्या थोडीफार मदतही करत असत.

वर्षाताई अतिशय हौशी होत्या. त्यांना कलाकुसरीची आवड आणि जाण दोन्हीही होते. कधी कधी फावल्या वेळी त्या काहीतरी कलाकुसरीचे काम करत बसत. विणकाम, भरतकाम , लोकरीच्या वस्तू, मोत्याच्या कलाकुसरीच्या वस्तू हे सगळे त्या खूप सुंदर बनवीत असत. वर्षाताईंना पारंपरिक, भरजरी, जरीकाठाच्या साड्या आवडत आणि दागिनेसुद्धा ठळक आणि ठसठशीत उठून दिसणारे त्यांना जास्त आवडत.

आवडीनिवडी जरा वयातील आणि इतर फरकामुळे वेगवेगळ्या जरी असल्या तरी दोघी सासू-सून त्यावरून एकमेकींना काही बोलत नसत.

नुकताच जानेवारी महिना सुरू झाला होता. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वर्षाताईंना सोसायटीमध्येच राहणाऱ्या दाते वहिनींचा दुपारी फोन आला.

"वर्षा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा बरं का तुला. "

"दाते वहिनी, तुम्हांलासुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. "

"वर्षा, या वेळी तुझ्या सुनेची पहिली संक्रांत ना ग? "

"हो ना वहिनी. हां हां म्हणता संक्रांत येईल आता, नाही का?"

"अग हो ना, काय स्पेशल करणार आहेस मग सुनेसाठी या वेळी संक्रांतीला?"

"आज सकाळीच मनात आलं ते माझ्या. ठरवते काय करायचं ते."

"हं, ठरव. तुझ्या हातात कला आहे ग छान. अन हौसही आहे तुला. " दाते वहिनी.

थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून त्यांनी फोन ठेवला आणि वर्षाताई मात्र विचारात पडल्या.

क्रमशः


काय करतील वर्षाताई ? वेगवेगळ्या आवडी निवडी असलेल्या सासूसुनेचे एकमेकींशी पटेल का? कशा जुळवून घेतील दोघी एकमेकींशी?

बघू या पुढील भागात.

🎭 Series Post

View all