Login

नात्यांचा गोडवा गोकुळ भाग ३

A story About Struggle On The Sea
गोकुळ -भाग ३


कृष्णाजी सुद्धा त्या जहाजातून समुद्राच्या लाटांनी दूर फेकल्या गेले. त्या निर्जन बेटावरच्या पलीकडील किनाऱ्यावर ते जाऊन पडले. जेव्हा त्यांना शुद्ध आली, तेव्हा त्यांच्या शेजारी त्यांना आणखी एक स्त्री त्यांच्या जवळच पडलेली त्यांना दिसली. ती सुद्धा त्या अपघातग्रस्त क्रूझ वरील प्रवासी होती.

ते दोघे एकमेकांना पाहून अचंबित झाले. आता काय करायचं? इथे तर वर आकाश, खाली धरती. आणि सभोवती दाट जंगल. काय करावे? दोघेही विचारात पडले.

पण एकास दोघे म्हणून, दोघांनाही तेवढाच एकमेकांचा आधार वाटू लागला. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्यांना ग्लानी आली. त्यांनी तेथील काही वनस्पतींची फळे चाखून पाहिली. नारळाची झाडे तिथे होती. ती नारळाची झाडे त्यांना कल्पवृक्षच ठरली. त्या दोघांनी तेथील बांबू व नारळाच्या झावळ्यांनी एक झोपडी तयार केली. नारळाचं पाणी पिऊन तहान भागविली. तेथील बांबू व झावळ्यांच्या मदतीने तराफा तयार केला.

असेच दिवसा मागून दिवस गेलेत .आपल्या मदतीला कोणी येईल, याची अपेक्षा त्यांना नव्हतीच. कारण त्यांना माहीत होते, येथे कोणीच येऊन आपली सुटका करू शकणार नाही. आपल्यालाच काहीतरी करावे लागेल.

त्यांनी त्या तराफ्या साठी बांबूला नारळाच्या झावळ्या बांधून वल्हे बनविले. दोघेही तराफ्यातून समुद्राचे पाणी वल्हवत दुसऱ्या किनाऱ्यावर निघाले. ज्यावेळी ते दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. कुणीतरी आपल्याकडेच येत आहे, हे पाहून श्यामजी भाईंना खूप आनंद झाला. ते उठून उभे राहून पाहू लागले. तर बघतात काय! त्यांचा मित्र कृष्णाजी त्यांच्या मदतीला धावून आला होता. सोबतीला एक स्त्री पाहून, त्यांनी विचारले? 'या कोण आहेत'? तेव्हा दोघांनीही, आपली सुद्धा अशीच अवस्था त्या जहाजा मुळे झाली अशी माहिती दिली. आम्ही दोघे होतो, त्यामुळे आम्ही त्या किनाऱ्यावर झोपडी बांधून राहू लागलो.' चला श्यामजी भाई त्या दुसऱ्या किनाऱ्यावर!'. 'आपल्या तिघांनाही काहीतरी चांगले खाता येईल'.


अरे कृष्णाजी! 'तूम्ही तर प्रत्यक्ष गोविंद, गोपाळ, कन्हैया बनुन माझ्या मदतीला आलात'. श्यामजी भाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कारण त्या निर्जन बेटावर त्यांनी कसे दिवस काढले, हे त्यांचे त्यांनाच माहीत होते.


अरे कृष्णाजी! 'तूम्ही या तुमच्या मीरा सोबत आलात, हे सर्व नियतीने जुळवून आणले बघा' .चला आता, आपण आपल्या मायदेशी जाण्याचा मार्ग शोधूया. ते तिघेही त्या तराफ्या वर बसून त्या दोघांनी बांधलेल्या झोपडीकडे निघाले. तेथे तिघांनी गप्पा गोष्टी करीत वेळ घालवला. परतीच्या प्रवासासाठी तराफा होताच ."बुडत्याला काडीचा आधार" म्हणून त्या तराफ्या च्या भरवशावर, ते तिघेही तिथून मार्ग काढण्यासाठी बाहेर पडले.

एकमेकांच्या साथीने तराफा वल्हवित असताना, त्यांना एक बोट त्यांच्याकडेच येताना दिसली. त्या बोटी मधील खलाशांनी त्यांना सुखरूप मुख्य मार्गावर आणून, त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा केला.


घरी संपूर्ण कुटुंब वाट पाहून थकले होते. कुठेही कोणताही संपर्क होत नसल्यामुळे, त्यांचा जीव टांगणीला लागला होता. काय करावे, त्या कुटुंबाला काहीच कळेना. त्यांनी स्कॉटलंड पर्यंतचा मागोवा घेतला. तेव्हा त्यांना कळले, की दोघेही क्रुझ ने प्रवास करीत असताना त्या क्रुझ चा अपघात झाला. संपूर्ण कुटुंब शोक सागरात बुडून गेले.


आणि अचानक.... श्यामजी भाई आणि कृष्णाजी दारात उभे दिसले. मंजू बेन ने देवघरातल्या कृष्णाच्या मूर्तीला आलिंगनच दिले. राधाचा त्यांच्या पत्नीचा व भावांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. राधाने औक्षणाचं ताट तयार केलं, तेव्हा त्या सर्वांना त्यांच्यासोबत एक स्त्री सुद्धा दिसली. प्रश्नार्थक नजरेने सर्व कुटुंब तिच्याकडे बघतच राहिले. तेव्हा सगळं शांत झाल्यावर श्यामजी भाईंनी कृष्णाजी ला गच्च मिठी मारली. म्हणाले, मित्रा! 'तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही'.' तू खरंच ग्रेट आहेस'. 'तुझे उपकार कसे फेडावे मला कळतच नाही.' तू त्या निर्जन बेटा वरून मला सोडवलंस' .'नाहीतर मी तेथेच माझी प्राण सोडले असते'. हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं.
कृष्णाजींनी त्यांना, त्यांच्या मिठीतून सोडवत, त्यांचे हात हातात घेत म्हणाले, 'एक मार्ग आहे, माझे आभार मानायला'... 'मी जे केलं, ते तूम्ही उपकार समजत असाल,तर ते फेडायचा एक मार्ग आहे'.
कोणता? सांगा मला लगेच .मला शक्य असेल ते सर्व मी करीन. श्यामजी भाईं डोळे पुसत म्हणाले.

अहो! अगदी सोप्प नाही, परंतु कठीण सुद्धा नाही. काय आहे ते? आता संपूर्ण कुटुंबाला सुद्धा उत्सुकता लागून राहिली. कृष्णाजी गंभीर आवाजात म्हणाले,' ही स्त्री, जी आपल्या सोबत आहे, तिचा तुम्ही बहीण म्हणून स्वीकार करावा'. 'तसही तिच्याकडून मी माहिती घेतली असता, तिचं संपूर्ण कुटुंब त्या समुद्राने गिळंकृत केलेलं आहे. त्यामुळे आता तिला, तुमच्या कुटुंबाचा आधार हवा आहे. आणि तो आधार, आपण सर्व तिला द्याल, याची मला खात्री आहे'.

माई! 'या स्त्रीचा तुम्ही मुलगी म्हणून स्वीकार करावा'. आणि श्यामजीभाई ! जशी श्यामची बहीण 'सुभद्रा', तशीच तुमची ही 'द्रोपदी'. 'हिला कधीही अंतर देऊ नका. मला तुम्ही तसे वचन द्या'!

श्यामजी भाईंना बहीण नव्हतीच. द्रोपदी च्या रूपाने त्यांना बहीण मिळाली .आता मंजू बेन चे कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झाले.'गोकुळ च जणू'...