Login

नात्यांचा गोडवा गोकुळ भाग १

A story About Struggle On The Sea
कथा -नात्यांचा गोडवा

गोकुळ-भाग१

राधा अगं! पानं वाढायला घे ना... 'आज सकाळी नाश्त्याला माझा आवडता ढोकळा तू बनवला नाहीस, म्हणून मी नाश्ता सुद्धा केला नाही'. आता तरी जेवायला वाढ लवकर... राधा च्या सासूबाईंनी मंजू बेन ने, राधा ला हाक मारली. तशी राधा ने लगबगीने सासूबाईंच्या हाकेला ओ देत पानं वाढायला सुरुवात केली. तिची लहान जाऊ, या तिघी जेवायला बसल्या. दुपारच्या एक ते दोन च्या दरम्यान त्यांच्या घरातल्या सर्व बायकांचे जेवणं व्हायचे. पुरुष मंडळींचं पितळी भांड्यांचं होलसेलचं मोठं दुकान बाजार ओळीत असल्यामुळे त्यांचे दुपारचे जेवायचे डबे दुकानावरच जायचे.

श्यामजी भाईंचं कुटुंब सुखवस्तू .श्यामजी भाई सतत दुकानातल्या कामात व्यस्त. व त्यांचे लहान भाऊ सुद्धा नोकरां वर लक्ष ठेवण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना दुकान बंद करून घरी जायला नेहमीच उशीर होई. त्यामुळे घर संपूर्ण बायकांचच . पुरुष मंडळी फक्त रात्रीच बायकांच्या वाट्याला येत असत.

का गं राधा !'आज नाश्त्याला ढोकळा का बनविला नाहीस' ?'मी सांगितलं होतं तुला, रात्रीच ढोकळ्याची तयारी करून ठेव म्हणून... दोघी जावां नी एकमेकींकडे पाहिलं. दोघींनाही सासूबाईंचा हा प्रश्न अपेक्षित होताच. त्यांचं उत्तर तयार होतं .'अहो माई! काल तुम्ही यांना म्हणालात, की उद्या नाश्त्याला छोले खाऊन जाशील रे' !मी ते ऐकलं. 'आणि छोले रात्री पाण्यात भिजविले' .'असं होय का?' आणि तिघेही खळखळून हसायला लागल्या.

अशा आनंदी वातावरणात गप्पा गोष्टी करीत त्या संपूर्ण दिवस घालवायच्या. संपूर्ण घरावर मंजू बेन चा वचक होता. त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदरयुक्त भीती होती. त्यांची, त्यांच्या घरातल्या प्रत्येक वस्तूंवर, माणसांवर डाळिंबाच्या दाण्या सारखी घट्ट पकड होती. ज्याप्रमाणे डाळिंबाच्या आतील दाणे एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, त्याचप्रमाणे त्यांनी घरातील माणसांना आपल्या मायेने घट्ट बांधून ठेवले होते. परंतु ज्याप्रमाणे बटाट्याच्या ढिगातील बटाट्यांची स्थिती असते, प्रत्येक बटाटा कुठेही घरंगळतो. तो ढिगार्‍यात स्वस्त बसू शकत नाही. थोडा जरी हात लावला की घरंगळत गेलाच म्हणून समजा... याची जाणीव मंजू बेन ला असल्यामुळे त्यांचं आपल्या मुलं, सुना, नातू यांवर संपूर्ण लक्ष असे. त्यामुळे घरातील पुरुष मंडळी निश्चिंत असत .


पाय लागू माई! म्हणत कृष्णाजींनी मंजू बेन ला वाकून नमस्कार केला.कसं काय येणं केलं कृष्णाजी? बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं तर! आपण कुठे होतात इतके दिवस?
'मला आपली सर्वांची आठवण आली. म्हणून माझे पाय तुमच्या गोकुळाकडे वळले. हो तर !आमचं घर म्हणजे जणू कृष्णाचं गोकुळच !माझ्या दोन्ही सूना एवढ्या समंजस आहेत, त्या दोघी आपली सगळी कामं अगदी व्यवस्थित करतात .
'हो ना! मला सुद्धा तुमचं खूप कौतुक वाटतं'. 'तुम्ही संपूर्ण घराला, घरातील माणसांना कसं रेशमी धाग्यात गुंफून ठेवलेलं आहे.'
बरं ते राहू द्या. कोणतं काम काढलं? मंजू बेन म्हणाल्या.
माई ,मला शामजी भाईंशी जरा व्यवसायासंबंधी बोलायचं होतं. हो का! पण ते सध्या दुकानावर आहेत. कोणतं काम होतं?'
'श्यामजी भाईंना पितळी मूर्त्यांची खूप आवड आहे'. 'त्यांचे ग्राहक हे ठराविक असतात. त्यांचा मला फोन आला होता की आपण दोघे परदेशातून म्हणजे स्कॉटलंडला जाऊन वेगळ्या पद्धतीच्या पितळी मूर्त्या आणू.' तसं माझं तेथील व्यापाऱ्यांशी बोलणं झालं आहे.' कृष्णाजींनी येण्याचं प्रयोजन सांगितलं.

मंजू बेन म्हणाल्या, 'बोलून घ्या मग श्यामजी शी दुकानावर जाऊन. 'सविस्तर बोलणं तिथेच होईल'. कृष्णाजींनी चहापान करून मंजू बेन चा निरोप घेतला.

श्यामजी भाई घरी आल्यावर मंजू बेन ने त्यांना विचारलं, का रे श्यामजी? झालं का बोलणं कृष्णाजींशी.
हो माई! मला त्या पितळी मूर्त्यांचं पार्सल आणायचं आहे. माझ्या ग्राहकांना त्याविषयी मी सांगून ठेवलेलं आहे' .

तसं त्यांचं परदेशी जाणं वर्षातून दोनदा तरी व्हायचं. कारण वेगवेगळ्या देशातून पितळी मूर्त्या आणि इतरही शो च्या वस्तू ते आणत. त्यासाठी त्यांचं दुकान प्रसिद्ध होतं. संपूर्ण पंचक्रोशीत त्यांच्या दुकानाची प्रसिद्धी होती.

राधा! 'मला या आठवड्यात परदेशात जावं लागेल' .तसा ,माझा मित्र कृष्णाजी, घरी आला होता. त्याने सांगितलं असेलच. मला दुकानावर सुद्धा त्याने माहिती दिली'. 'बरं !'माझी बॅग भरून ठेवायची तयारी कर'. शामजी भाई आपल्या पत्नीला म्हणाले .
अहो! यावेळी तुम्ही कशाला जाता? पुढे केव्हा तरी जा की!
का बरं? काही वेगळं कारण आहे का? नाही हो! पण मला जरा आता बरं वाटत नाही. तुम्ही सोबत असलात की मला बरं वाटतं.पुढे दोन महिन्यांनी जा. मला तुमच्याशिवाय करमत नाही. तसे तर तुम्ही नेहमी बाहेरच असता. आम्ही बायकाच घरात असतो. आम्हालाही तुमच्यासोबत वेळ घालवावा वाटतो. आता तुम्ही दुकानात सुद्धा जाऊ नका. जरी आपल्याला मूल नाही, तरी धाकटीला आहेच की. आपण त्याचे किती कोड कौतुक करतो; असा दोघांमध्ये आठवडाभर संवाद चालला....


श्यामजी भाईंचं स्कॉटलंडला जाणं होणार कां
पाहूया पुढील भागात भाग 2 मध्ये


छाया राऊत बर्वे