भाग 8
सगळे गोंधळले होते. प्रीतीचे आईबाबा, प्रीती सोनू, सारेच शंकीत मनाने, चिंतेने ग्रासून गेले होते. शेवटी सोनूच्या आजोबांनी सगळ्यांना शांत केलं. “थांबा सगळे. आधी अट काय आहे ते तरी ऐकूयात.” सगळे मग शांत बसले. सोनूच्या आईने बोलायला सुरुवात केली, “प्रीती आता लग्न करून आमच्या घरी येणार. ती आमच्यात मिसळून जावी अशीच आमची इच्छा आहे आणि आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्नही करू. पण त्यासाठी आम्हाला तिच्याशी संवाद साधता येणं महत्वाचं आहे. त्यामुळे, जर तुम्ही आम्हाला ही खुणांची भाषा शिकवलीत तरच हे लग्न होईल.” आई एवढं बोलून शांत बसली.
दोन क्षण प्रीतीचे आईबाबा काहीच बोलू शकले नाहीत. सोनूच्या आईने काय अट ठेवली आहे हे समजल्यावर त्यांचे चेहरे आनंदाने फुलले. डोळ्यात आनंदाने पाणी आलं. प्रीतीचेही डोळे भरून आले. आनंदाने ती सोनूला बिलगली. तिच्या भविष्याबद्दल प्रीतीचे आईबाबा निश्चिन्त झाले होते.
दिवसागणिक तयारीला रंग चढत होता. मंगळसूत्र, लग्नाचे कपडे, दागिने, ह्यांची खरेदी झाली. आमंत्रण पत्रिका, कुलदैवतांना दिल्या गेल्या. बघता बघता सगळीकडे वाटून देखील झाल्या. ठरल्या दिवशी वऱ्हाड प्रीतीच्या गावी येऊन पोचलं. प्रीतीचे आईबाबा जातीने त्यांच्या स्वागताला आले होते. वाडा बघून सगळेच दिपले. प्रीतीच्या आजोबांचा पिढीजात भव्य वाडा होता. वाड्याच्या प्रवेशद्वाराशी केळीचे खांब उभे केलेले होते. वाड्याबाहेर मोठ्ठा मांडव घातला होता. मांडवावर जाई जुईचा वेल चढवलेला होता. मोठी रांगोळी काढली होती. आत जागोजागी कळष्यांमध्ये मोगऱ्याची फुलं टाकलेली होती. त्यामुळे सर्व वाड्यात वाऱ्यावर मंद सुवास दरवळत होता. सगळं बांधकाम शिसवी लाकडाचं होतं. खांबांवर कोरीव नक्षीकाम केलेलं होतं. पडवीमध्ये भलामोठा लोखंडी झोपाळा बांधलेला होता. त्याला नाजूक घुंगरू बांधलेले होते. वाड्याच्या आजूबाजूला डौलाने उभी असलेली फुलबाग होती. फुलांनी सारी झाडे पानोपान भरली होती. सारी व्यवस्था आजोबांच्या वैभवाची साक्ष देत उभ्या होत्या.
हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली. वाडा हास्याने, किलबिलाटाने गजबजून गेला. सगळे कार्यक्रम उत्साहात सुरू होते. दोन दिवस आधी ग्रहमक पार पडलं. प्रीतीच्या हातावर कोपरापासून मेंदी रंगली होती. त्या लाल हातांवर हिरवा चुडा शोभून दिसत होता. मोत्यांच्या मुंडावळ्या कपाळाची शोभा वाढवत होत्या. लग्नाच्या दिवशी गुलबक्षी साडीत ती नववधू म्हणून उभी राहिली, तेव्हा सारे बघतच राहिले. अगदी नक्षत्रासरखी दिसत होती. सोनूही पितांबर आणि चिंतामणी उपरण्यामुळे अगदी उठून दिसत होता. मंगलाष्टक झाली, आणि ठरल्या मुहूर्तावर अंतरपाट दूर झाला. दोघांच्यामधले सारे दुरावे देवब्राह्मणांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने दूर झाले. दोघेही आता एकरूप झाले होते. दोघांनीही मनापासून सगळे विधी पार पाडले. प्रीतीच्या अंगावर सौभाग्यलंकार चढले. सप्तपदी चालताना दोघांनाही एकमेकांना अनेक वचनं दिली. साऱ्या उपस्थितांचे आशीर्वाद घेतले. एकमेकांना घास भरवले गेले. दोघांची भरपूर थट्टा मस्करी केली जात होती. दोन्हीकडच्या आज्या, मावश्या आत्या सारखी दोघांची दृष्ट काढत होत्या.
लग्न झालं, जेवणावळी झाल्या. आलेले पाहुणे एकेक करून परतायला लागले. इतका दिवस आनंदाने गजबजलेला वाडा आता उदासवणा वाटायला लागला. वर्दळ कमी झाली. भरला वाडा रिता झाला.
पाठवणीची वेळ जवळ आली, तसे प्रीतीचे आईबाबा भावुक झाले. आपली मुलगी आता दुसऱ्यांची सून झाली, आपल्यापासून दूर झाली, ही भावना सगळ्याच आईबाबांसाठी फार कष्टदायक. काहीच अंतरावर त्याच शहरात असली, तरी आता पाहुणी म्हणून घरी येणार होती. दिवसरात्र चाललेली तिची बडबड आता ऐकायला येणार नव्हती. प्रीतीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. नवीन माणसं, नवीन घर. नवीन चालीरीती. नवीन पद्धती. सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत होती ती. माहेरची माणसं, घर, ओळख सगळं सोडून एका नव्या प्रवासाला निघाली होती ती…
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा