Login

सोनेरी बादल भाग 1

कथा
भाग 1

आज दोन दिवस झाले हर्षित हॉस्पिटलमध्ये बसून होता. मनात उलटसुलट विचारांचं वादळ उठलं होतं. काळजीने भूक, तहान, झोप सगळं हरपलं होतं. कोणीतरी क्षणाक्षणाला काळजावर घणाचे घाव घालतंय असं वाटत होतं. आयसीयूमध्ये डॉकटर आणि नर्सची धावपळ सुरू होती. वहिनी आणि आईबाबा देवाचा अखंड जप करत होते.

हर्षित एक प्रसिद्ध मानसरोगतज्ञ होता. एकत्र कुटुंब होते त्याचे. तो त्याचा मोठा भाऊ, वहिनी, आईबाबा, आणि पुतण्या. प्रभात रोडला एका बंगल्यात एकत्रच राहायचे सगळे. सहा महिन्यांपूर्वी पुतण्या म्हणजेच सोनू शिकायला म्हणून कानपूरला होस्टेलवर रहायला गेला होता.

नाही म्हणलं तरी सोनू गेल्यापासून हर्षितला करमेनासं झालं होतं. दोघा काका पुतण्याचं जरा जास्तीच सख्य होतं. दोघे अगदी मित्राप्रमाणे रहायचे. बारावीनंतर सोनुने जेव्हा सांगितलं, की त्याला शिकायला कानपूरला जायचंय, तेव्हा हर्षितला धक्काच बसला होता. घर सोडून एवढया लांब, महिनोंमहिने भेट नाही, चेहरासुद्धा दिसणार नाही. पण,सोनूने भरपूर मनवल्यावर त्यालाही नाही म्हणता आलं नाही. पण त्याने सोनूकडून एक वचन मात्र घेतलं; रोज घरी न चुकता फोन करण्याचं. हॉस्टेलवर सोडायलाही बाबांच्या ऐवजी काकालाच घेऊन गेला होता सोनू. हर्षित त्याला तिथे सगळं समान लावून देऊन त्याचं कॉलेज बघून मग परतला होता घरी.

तिकडे गेल्यानंतर थेट दिवाळीत सुट्टीला घरी आला होता तो..हर्षितला खूप आनंद झाला होता. सोनू आल्यामुळे खरोखर घर चैतन्याने सळसळलं होतं.पण यावेळेस सोनू जरा बदललेलाच वाटला होता. जास्त काही बोलला नाही. एकटा एकटाच होता. हर्षितशीही फारसं बोलला नाही. मुळातच हर्षित अबोल होता. त्यामुळे बोलण्याचं काम खरं सोनूकडेच होतं.

सुट्टी संपवून सोनू परत गेला. हर्षितही क्लिनिकमध्ये बिझी झाला. कदाचित परीक्षेची काळजी वाटत असेल, म्हणून जास्त बोलला नसेल, नंतर घरी आला की बघू, म्हणून हर्षितने मनातले विचार झटकुन टाकले. वर्ष संपत आलंच होतं सोनूच. बघता बघता महिने सरले. उन्हाळ्याची चाहूल लागली आणि घर मोहरून निघालं. महिन्याभरात सोनू परत येईल म्हणून घरात उत्साह पसरला होता. सुटीच्या चर्चांना उधाण आले होते. आला, की चांगले दोन महिने असणार होता. त्यामुळे सहलीसाठी विविध ठिकाणं सुचवली जात होती आणि रद्द होत होती.

आज रोजच्याप्रमाणे सकाळी नाष्टा करून हर्षित क्लिनिकमध्ये आला. सकाळी त्याने सोनूला फोन केला होता, पण त्याने उचलला नव्हता. रात्रीपासून हर्षित त्याला फोन करायचा प्रयत्न करत होता. पण फोन उचललाच नव्हता त्यानं. खरं म्हणजे ही काकासोबत
बोलायची रोजची वेळ तो कधी चुकवायचा नाही. त्यामुळे हर्षितला जरा आश्चर्य वाटलं. पण मित्रांसोबत असेल म्हणून उचलला नसेल अशी त्याने स्वतःची समजूत घातली.

दुपारी तो पेशन्टचं सेशन आटपून केबिनमध्ये आला. बघतो, तर दादाचे 25 ते 30 मिसकॉल दिसत होते. हर्षित घाबरला. त्याने ताबडतोब दादाला फोन लावला. पण त्याचा फोन वाजून बंद झाला. एवढे फोन केले म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असणार, हे हर्षितला माहीत होतं. त्याने आपल्या स्टाफला सूचना दिल्या आणि तो घाईघाईने घरी जायला निघाला.

अर्ध्या तासात तो घरी पोचला.घरी गेला, तेव्हा सगळे घरीच होते. सगळेच घाबरलेले आणि चिंतीत दिसत होते. आई रडत होती. वहिनीला चक्कर आली होती. बाबा त्या दोघींना सावरायचा प्रयत्न करत होते. दादा हातात एक बॅग घेऊन आला. हर्षित काही विचारणार तेवढ्यात दादा त्याला म्हणाला, “लवकर चल आपल्याला कानपूरला जायचंय. सोनूला ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. हर्षितला धक्काच बसला. त्याने अधिक विचारायचा प्रयत्न केला, पण दादाने त्याला थांबवलं. तेवढ्यात दादाचा एक मित्र विमानाची तिकिटं घेऊन आला. “मी आणि हर्षित पुढे होतो. तिथला अंदाज घेतो आणि तुला फोन करतो. मग गरज असेल तर तू आई बाबा आणि हिला तिकडं पाठवायची व्यवस्था कर. आणि प्लिज दोन दिवस इथेच राहू शकशील का?” दादाने त्याच्या मित्राला विचारलं. “ हो मी राहतो इथे. तू इथली चिंता करू नकोस. तूम्ही लवकर निघा, आणि आम्हाला कळवत रहा.” घरच्यांचा निरोप घेऊन दोघेही निघाले.

विमानतळावर चेक इन केलं. दोघेही विमानाची वाट बघत बसले होते. “दादा आता तरी सांग काय झालंय नक्की? माझा जीव टांगणीला लागलाय. प्लिज नीट सांग मला काय झालंय.” हर्षितला आता मात्र राहवलं नाही. नको त्या विचारांनी मनात शिरकाव केला होता. अशुभाच्या सावल्या मनाला झाकोळून टाकत होत्या. एक एक मिनिट, युगाप्रमाणे भासत होतं. “मलाही तसं काही नीट कळलं नाही रे. सोनूच्या मोबाईलवरून फोन आला मला. म्हणून मी उचलला, तर सोनूचा कोणीतरी मित्र बोलत होता. तो म्हणाला, की सोनूला ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. सिरीयस आहे तो. तुम्ही लगेच निघा.” दादाने जे सांगितलं त्यामुळे हर्षित अजूनच अस्वस्थ झाला. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.काय संकट ओढवलं होतं नक्की? काय झालं आहे सोनूला?