Login

सोनेरी बादल भाग 2

कथा
भाग 2

विमानतळावरून दोघेही थेट हॉस्पिटलमध्ये गेले. सोनूच्या होस्टेलच्या जवळच होतं हॉस्पिटल. दादाने तोवर फोन करून सोनूच्या मित्रांना कुठे यायचं ते विचारून घेतलं होतं. रिक्षावाल्याला पैसे देऊन जवळजवळ धावतच ते हॉस्पिटलमध्ये शिरले. आयसीयूच्या दारातच सोनूचे मित्र त्यांची वाट बघत थांबले होते. त्यांनी ताबडतोब त्या दोघांना सोनूच्या खोलीत नेलं.

सोनूला बघून दोघांचं अवसानच गळाले. सोनू अनेक नळ्यांमध्ये गुरफटून बेशुद्ध होता. मशीनवर विविध आकडे कमी जास्त होत होते. नाकावर ऑक्सिजन मास्क चढवला होता. दादा आपला सोनू… हर्षित त्यापुढे काही बोलूच शकला नाही. त्याचे मित्र त्यांना धीर देत होते. तेवढ्यात डॉकटर आले. त्यांनी सोनूला तपासले. ते परत जाणार, तेवढ्यात त्यांचं लक्ष हर्षित आणि दादाकडे गेलं. “तुम्ही वडील का याचे?” “हो डॉकटर. काय झालंय डॉकटर सोनूला?” “या तुम्ही माझ्यासोबत. बोलूया आपण.” दादा आणि हर्षित डोकटरांच्या मागोमाग त्यांच्या केबिनमध्ये गेले.


“हे बघा, तुमच्या मुलाची तब्येत खूप गंभीर आहे. खूप रक्त वाहिलं आहे. रक्त वाहून गेल्यामुळे दाब कमी होऊन त्याचं हृदय बंद पडलं होतं. सुदैवाने पाचच मिनिटात आम्हाला त्याच हृदय पुन्हा सुरू करण्यात यश मिळालं. पण मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याने तो कोमात जाण्याची शक्यता आहे. अजून 24 तासात जर तो शुद्धीवर आला नाही तर कोमात जाण्याची शक्यता आहे.” “डॉकटर, काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, पण तुम्ही सोनूला वाचवा.” “काळजी केऊ नका. आम्ही सर्व प्रयत्न करतोय. सगळं नीट होईल हा विश्वास बाळगा. तुमच्या मुलाला तुमची खूप गरज लागणार आहे, त्यामुळे स्वतःची तब्येत सांभाळा.”


डॉकटरचे बोलणे ऐकून दोघांनाही प्रचंड धक्का बसला. डोकं बधिर झालं होतं. आजूबाजूला काय घडतंय काहीच समजेनासं झालं होतं. दोघेही केबिनमधून बाहेर आले. पुढे काय करावं काहीच समजत नव्हतं. आपल्या मुलाची ही परिस्थिती कुठल्या बापाला बघवणार होती! “दादा, आपल्याला घरी कळवावे लागेल.” हर्षितने दादाला आठवण करून दिली. “बरोबर आहे रे. पण काय आणि कसं सांगणार? आपल्याला जिथे बघवत नाहीये तिथे आईबाबांना कसं सांभाळणार आपण?” “नको काळजी करुस दादा तू. आपला सोनू नक्की बरा होईल. आपण सगळे आहोत ना त्याच्यासोबत. तू घरी फोन करून सगळ्यांना इकडे बोलाव. मी जाऊन औषध घेऊन येतो.” हर्षितने दादाला धीर दिला. नर्सने औषधांची यादी दिलीच होती. तो ताबडतोब औषधे घ्यायला गेला.

औषधं घेऊन तो परत आयसीयूमध्ये आला, तर सोनूच्या खोलीत डॉकटर आणि नर्सची धावपळ सुरू होती. दोन डॉकटर आणि चारपाच नर्स चिंताक्रांत चेहऱ्याने सोनूला तपासत होता. मशीनवर सरळ रेषा आलेली दिसत होती. सर्व मशिन्स कसलेसे आवाज काढत होती. दादा आणि मित्र खोलीबाहेर घाबरून उभे होते. “काय झालं दादा? आत्ता पर्यंत तर सोनू व्यवस्थित होता ना?” “माहीत नाही रे. मी ही घरी फोन करून आलो, तर इथे सोनूची तब्येत बिघडली हाती.”

काही वेळाने मशिन्सचा आवाज बंद झाला. डॉकटर बाहेर आले. “पेशन्टचं हृदय पुन्हा बंद पडलं होतं. आता तरी तो बरा आहे. पण त्याची तब्येत क्रिटिकल आहे. तुम्ही शक्य तितक्या लवकर घरच्यांना बोलावून घ्या.” दोघांनाही काळीज फाटण म्हणजे काय ह्याची जाणीव होत होती. मनात नकारात्मक विचार ठाण मांडून बसले होते.

सोनूच्या मित्रांनी हर्षित आणि दादाला बळजबरी होस्टेलवर नेलं. ते इथे येऊन तीन चार तास उलटून गेले होते. दोघांनीही काहीच खाल्लं नव्हतं. सोनूच्या काळजीने दोघांनाही जेवण जाणं शक्य नव्हतं. पण सोनूच्या मित्रांनी दोघांना जबरदस्तीने खाऊ घातलं. खाऊन आणि आवरून सर्वजण पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले.

ते हॉस्पिटलमध्ये आले, तेव्हा सोनूच्या खोलीबाहेर दोन पोलीस सोनूच्या डॉकटरशी बोलत होते. हर्षित दादा आणि मित्रांना आलेले बघून त्यांनी त्यांचं लक्ष ह्यांच्याकडे वळवलं. “काय रे, हे घरचे का ह्याच्या?” सोनूच्या मित्रांना उद्देशून पोलिसी खाक्याने आणि दरडावणीच्या सुरात विचारलं. “हो साहेब. आजच आले इथे.” सोनूच्या मित्रांनी खालमानेने उत्तर दिलं. “त्यांना सांगितले का तुमच्या मित्राचे कारनामे? सांगून ठेवा. आम्ही येतो उद्या जबाब नोंदवून घ्यायला. समजलं का?” “हो साहेब.” “आणि डॉकटर, पेशन्ट शुद्धीवर आला की ताबडतोब आम्हाला कळवायचं. त्याचाही जबाब घ्यायचाय आम्हाला.” पोलीस आले तसे निघून गेले. पण जाता जाता हर्षित आणि दादाच्या मनातलं प्रश्नांचं मोहोळ उठवून गेले. त्या मोहोळतल्या विचारांच्या माश्या पुढे कितीतरी वेळ दोघांना डसत राहिल्या.

पोलिसांच्या ह्या दरडावणीने हर्षित आणि दादा अजूनच गोंधळात पडले. पोलिसांच्या कारनामे ह्या शब्दाने आणि आपला जबाब नोंदवणार ह्या कल्पनेने दोघांनाही प्रचंड टेन्शन आलं. त्यांनी जरा उद्वेगाने सोनूच्या मित्रांना विचारलं, “अरे काय झालंय नक्की? का आलेले पोलीस? नक्की काय काय समोर यायचंय अजून? बोला ना घडाघडा. काय काय आणि किती काळ लपवणार आहात?” काय केलंय आमच्या सोनुने? “काका, तुम्हाला टेन्शन येईल, म्हणून आल्या आल्या सांगितले नाही. आधीच तुम्ही सोनूची अवस्था बघून काळजीत होता. जरा निवांत झाल्यावर संगणारच होतो. खरंच काका. आम्हाला लपवायचं नव्हतं तुमच्यापासून. काका, आपल्या सोनुने….” “अरे काय केलं सोनुने? बोला घडाघडा”. “काका, सोनुने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.”...