Login

सोनेरी बादल भाग 3

कथा
भाग 3

मित्रांनी केलेला उलगडा ऐकून हर्षित आणि दादा जवळजवळ बेशुद्धच पडायच्या बेतात होते. “काय म्हणालात? काय केले सोनुने?” “हो काका. आम्ही खरंच सांगतोय. सोनुने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आमची परीक्षा संपली होती. त्यादिवशी आम्ही दोघे बाहेर जाणार होतो. आम्हाला घरी जाताना काही गोष्टी घ्यायच्या होत्या. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. सोनूला पण विचारलं की आमच्याबरोबर येणार आहे का? पण तो म्हणाला की मी दमलोय त्यामुळे मी खोलीवरच जातो. हल्ली तो आमच्यात येतच नव्हता फारसा. आम्ही खूपदा विचारलं त्याला काय झालंय, पण तो नेहमी उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. खूप प्रश्न विचारले तर चिडून निघून जायचा. सतत कुठल्यातरी तणावाखाली वावरायचा. जरा मोठा आवाज आला, तरी दचकायचा. त्यामुळे तो खोलीवर जातो म्हणल्यावर आम्हीही त्याला फार काही न विचारता हॉस्टेलबाहेर पडलो. खरेदी करून परत आलो. कॉलेजचा शेवटचा दिवस असल्याने आम्ही सर्वजण खालीच गप्पा मारत बसलो. अक्खी रात्र आम्ही गप्पा मारत जागवली. पहाटे आवरून निघायचं म्हणून खोलीत आलो, तर सोनू बेडवर निपचित पडला होता. बेडखाली रक्ताचं थारोळ झालं होतं. सोनुने स्वतःचा हात कापून घेतला होता. त्याच्या दुसऱ्या हातात अजूनही ब्लेड होतं. त्याचे श्वास आणि नाडी खूपच मंदावले होते. खूप रक्त वाहून गेलं होतं. आम्ही ताबडतोब ऍम्ब्युलन्स मधून त्याला इकडे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मग मीच तुम्हाला फोन केला, त्याच्या मोबाईलमधून नंबर घेऊन.”

सोनूच्या मित्राचं बोलणं ऐकून दोघांच्याही मनात भीषण शांतता पसरली. सोनू असं काही करेल ह्यावर दोघांचाही विश्वास बसत नव्हता. दादा डोकं धरून मटकन खाली बसला. हर्षित त्याला धीर द्यायचा प्रयत्न करत होता. पण काय आणि कसं समजवणार होता तो त्याला! त्यालाही प्रचंड धक्का वसला होता. पण त्याला खचून चालणार नव्हतं. त्याला घरच्यांना धीर द्यायचा होता. दादा वहिनी आईबाबा ह्यांना सावरायचं होतं. सोनुने असं का केलं, त्याला कसला ताण आला होता, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त सोनुकडे होती. आणि तो, जीवन मरणाच्या उंबरठ्यावर मृत्यूशी झुंजत होता.

दुसऱ्या दिवशी पोलीस पुन्हा तिथे आले. “काय साहेब, कळलं का तुमच्या पोराने काय केलं ते?” पोलिसांना द्यायला त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. दोघांनीही शांत बसणच पसंत केलं. पोलिसांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. ‘मुलगा वेगळा वागत होता का? काही बोलला होता का? कोणी त्रास देत होतं का?’ अगणित प्रश्न. पण मित्रांनी सांगितलेल्या महितीशिवाय काहीच माहिती नव्हती त्यांच्याकडे. नुकत्याच आलेल्या घरच्यांना सोनूची परिस्थिती, हा आत्महत्येचा धक्का, पोलिशी सरबत्ती, सगळ्याला एकदमच तोंड द्यावं लागलं होतं.

ह्या सगळ्या ताणामुळे आईबाबांची तब्येत बिघडायला लागली होती. सगळ्या घरावरच चिंतेचे काळे ढग दाटून आले होते. त्यामुळे हर्षितला एक कठोर निर्णय घ्यावा लागणार होता. कारण सोनू शुद्धीवर येण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. हर्षितने सोनूच्या मित्रांना समजावून आधीच घरी पाठवलं होतं. त्यांच्या आईबाबांना काय वाटत असेल हे तो जाणून होता. आपल्या मुलाचा विरह काय असतो, हे तो स्वतः भोगत होता. इतक्या जवळ असूनही सोनू त्यांना भेटत नव्हता. त्यांच्याकडे बघत नव्हता. त्यांच्याशी बोलत नव्हता. असं वाटायचं आत्ता उठेल तो, झोपेतून उठल्यासारखा, आणि काका म्हणून त्याच्याकडे हट्ट करेल लहानपणी सारखा. दिवसभर बाईकवर फिरवायला लावेल. भरपूर लाड पुरवून घेईल. पण हा फक्त भासच राहिला होता. आता तो घरच्यांनाही परत पाठवणार होता. बाकीच्यांची तब्येत सांभाळणं महत्वाचं होतं. दादालाही नोकरीवर परत जाणं आवश्यक होतं. हर्षितच स्वतःचं क्लीनिक असल्यामुळे त्याला ऑनलाइन सेशन्स घेणं, फोनवर रुग्णांना भेटणं शक्य होतं. त्याने जबरदस्तीनेच बाकीच्यांना घरी पाठवलं. कोणीच सोनूला तशा परिस्थिती सोडून जायला तयार नव्हतं. सगळ्यात वाईट अवस्था तर वहिनीची होती. ती जणू जगणंच विसरली होती. रोज सगळे व्हिडीओ कॉल वर सोनूशी बोलायचे. त्याला सगळं ऐकू जातंय, आणि समजतंय हा ठाम विश्वास होता सगळ्यांचा. हर्षितही शक्य तितका सगळा वेळ त्याच्याच खोलीत घालवायचा. त्याने रोजच्या अपॉइंटमेंट कमी केल्या होत्या. जमेल तेव्हा घरचे येत जात होते.

आता जवळजवळ महिना उलटला होता.डॉकटरनी सोनूच्या तपासण्या करून तो कोमात गेल्याच निदान केलं होतं. त्यांचे सर्व उपाय फोल ठरले होते. तो समोर असूनही समोर नव्हता. कधी शुद्धीवर येईल, येईल की नाही, काहीच माहिती नव्हतं. विविध मशिन्सनी सोनूचा ताबा घेतला होता. कधी त्याची तब्येत सुधारत होती, कधी बिघडत होती. सगळ्यांसाठी काळ जणू थांबला होता.आशा निराशेचा अनिर्बन्ध खेळ चालू होता,आणि पसरलं होतं, अनिश्चिततेचं विशाल अंधारमय राज्य..