Login

सोनेरी बादल भाग 6

कथा
भाग 6

कोर्टात वकील पोलीस बाकीची मुलं, आणि त्यांचे पालक हजर होते. सोनूच्या घरचेही होते. जज आल्यावर कोर्टाचं कामकाज सुरू करण्यात आलं. सोनूला फरार म्हणून दोन समन्स देण्यात आली होती. पण अजूनतरी तो कोर्टात आला नव्हता. बाकी मुलांना शिक्षा सुनावण्यात आल्या. सोनूला अटक करण्याचा आदेश देणार, इतक्यात तो वोर्डबॉय सोनूला घेऊन तिरासारखा कोर्टात शिरला. “थांबा जजसाहेब. मी आणलय सोनूला. तो माझ्यासोबतच होता. त्यामुळे त्याला अटक करू नये.” “कोण आहेस तू?” “अंडरकव्हर एजंट अभय रिपोर्टिंग सर”. अभयने आपलं ओळखपत्र जजसाहेबांना दाखवलं.

सोनूची निर्दोष सुटका झाल्यामुळे घरच्या सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांच्या मनावरचं एक मोठं ओझं उतरलं होतं. सगळं प्लॅनप्रमाणे झालं होतं. त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी आपापसात चर्चा केली, आणि ते सोनूच्या खोलीत परत आले. “हे बघ, त्या मुलांना पकडायचं असेल, तर तुझी मदत लागेल आम्हाला. कॉलेज सुरू झालं की तू ते पाकीट त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर नेऊन दे. ती मुलं, तुझ्या पाळतीवर येतीलच. आम्ही तिथे आधीच हजर असू. संशय येऊ नये, म्हणून आम्हाला तुला अटक करावी लागेल. पण काळजी करू नका, आमचा एक माणूस, साध्या वेशात तुमच्या बरोबर आजपासूनच असेल.तोच तुला तुरुंगातून बाहेर काढेल.”

ठरल्याप्रमाणे, सोनुने पाकीट दिल्यावर पोलिसांनी सगळ्यांना अटक केली. एजंट अभयने सोनूला तुरुंगातून पळवून नेले. अर्थातच गस्त नव्हतीच तेव्हा. सोनू आणि अभयची खोटीच शोधाशोध करण्यात आली. ती मुलं, आणि ड्रग्स ज्यांच्यासाठी पाठवलं होतं, त्या सगळ्यांना अटक झाल्यामुळे एक खूप मोठं रॅकेट उघडकीस आलं होतं. अनेक शहरांमध्ये कॉलेजच्या मुलांना हाताशी धरून, धमक्या देऊन हे काम केलं जात होतं.

मुलांचा दबाव संपल्यामुळे सोनू आता निर्धास्त झाला होता. त्यामुळे त्याचा अभ्यासही सुधारला. तो कॉलेजच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागला. भरपूर मित्र झाले त्याचे. उत्तम गुण मिळवून तो पदवीधर झाला.शिक्षण संपल्यावर त्याला कोलेजमधूनच एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. तो आयुष्यात स्थिरस्थावर झाला होता.

सोनूचे आजीआजोबा आता थकले होते. आता, सगळ्या घराला त्याच्या लग्नाचे वेध लागले होते. पण तो मात्र काही दाद देत नव्हता. आईबाबा, हर्षित सगळ्यांनी त्याला खोदून खोदून विचारलं होतं. पण त्याने मला इतक्यात लग्न करायचे नाही, ह्यापलीकडे काहीही उत्तर दिलं नव्हतं. आजीआजोबांनी त्याच्यावर भावनिक शब्दांचा मारा देखील करून बघितला होता. कोणी आवडत असेल तर सांग असंही सांगितलं. पण सोनुने ताकास तूर लागू दिला नाही.

एक दिवस सोनुने रात्री ऑफिसमधून निघताना त्यांच्या कुटुंबाच्या ग्रुपवर मेसेज केला, ‘सगळ्यांनी घरीच थांबा. मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय.’ सगळे हॉलमध्ये जमा झाले होते. सगळे एकमेकांना एकच प्रश्न विचारत होते, काय बोलायचं असेल सोनूला? सगळे अस्वस्थपणे चुळबुळ करत होते. समोर टिव्हीमध्ये कोणाचाच लक्ष नव्हतं. सारखी सोनूच्या येण्याची चाहूल घेत होते सगळे.

अखेर सोनू घरी पोचला. कपडे बदलून आला, तर सगळे घरचे लहान मुलांसारखे उत्सुकतेने त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते. सोनुने उत्सुकता न ताणता बोलायला सुरवात केली. “आईबाबा, मी लग्न करायचा निर्णय घेतलाय. माझ्याच ऑफिसमधली मुलगी आहे. प्रीती नाव आहे तिचं.” आमचं एकमेकांवर प्रेम आहे.” “अरे वा. पण आम्ही इतकं विचारत होतो तेव्हा का नाही सांगितलंस? घाबरलास का आम्हाला?” घरच्यांच्या ह्या प्रश्नाने सोनू गडबडला आणि पळून गेला. “अरे फोटो तरी दाखव”. आजीला ओरडूनच हो सांगून त्याने प्रीतीचे फोटो ग्रुपवर पाठवले. प्रीती एका नजरेत घरच्या सगळ्यांना आवडली. गव्हाळ वर्णाची, पाणीदार डोळ्यांची प्रीती सोनूला साजेशी होती. घरात हास्याचे कारंजे फुलले. आईबाबांनी सोनूला तिला भेटायला घेऊन यायला सांगितले. सगळ्यांच्या सोयीनुसार उद्या प्रीती तिच्या आईबाबांसोबत सोनूच्या घरच्यांना भेटायला येणार होती. सगळ्यांच्या मनात धाकधूक होती. काय होईल उद्या?

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आई आणि आजी कामात गुंतल्या होत्या. सगळं घर आवरून, आणि खायला बनवून ठेवलं. पाच वाजता प्रीती येणार होती. सगळ्यांच लक्ष सारखं घड्याळाकडे जात होतं. बरोबर पाच वाजता बेल वाजली. सोनूची आई उत्साहात दार उघडायला धावली. सोनूही लगबगीने बाहेर आलेला बघून सगळ्यांनी त्याला भरपूर चिडवलं. प्रीती आणि तिचे आईबाबा आले होते, त्यामुळे चिडवणं आवरतं घेऊन सगळे हॉलमध्ये आले. आल्याबरोबर प्रितीने घरच्या सगळ्यांना नमस्कार केला. चहापाणी झालं. पण आल्यापासून प्रीती गप्पच होती. तिच्या आणि आईबाबांच्या, सोनूच्या खाणाखुणा चालू होत्या. ते बघून सोनूच्या घरचे सगळे गंभीर झाले. काय चालले होते नक्की? कसल्या खाणाखुणा करत होती प्रीती?