Login

सोनेरी बादल भाग 7

कथा

भाग 7

बैठकीत शांतता पसरली होती. कसं, आणि काय बोलावं हे कोणालाच कळत नव्हतं. प्रीती अस्वस्थतेने पाय हलवत होती. शेवटी प्रीतीच्या बाबांनी धीर एकवटून बोलायला सुरुवात केली. “तुम्हाला बहुदा कल्पना नसावी. प्रीती दोन अडीच वर्षांची झाली तरी एकही शब्द बोलली नव्हती. आम्हाला चिंता वाटायला लागली. आम्ही ताबडतोब डॉक्टर कडे गेलो. प्रीतीच्या सगळ्या तपासण्या केल्या. डॉक्टरच्या केबिनमध्ये बसलो होतो. डॉक्टर आले, आणि त्यांनी ती बातमी आम्हाला दिली. त्या बातमीमुळे आमचं आणि प्रीतीचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. डॉक्टर म्हणाले, प्रीतीच्या स्वरयंत्राला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या पुरेशा विकसित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे स्वरयंत्रही नीट विकसित होऊ शकले नाही. त्याचमुळे प्रीती कधीही बोलू शकणार नाही. तेव्हा फारसं तंत्रज्ञान विकसित नसल्यामुळे जन्मतः हे लक्षात आलं नाही. आता फार उशीर झाला होता.”

सगळ्यांना ह्या खुलाशाने धक्का बसला. प्रीतीच्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते बघून प्रीती आणि सोनू कावरेबावरे झाले.सोनूच्या बाबांनी प्रीतीच्या बाबांच्या हातावर हलकेच थोपटलं. त्यांना धीर दिला. “काही काळजी करू नका. आम्हाला सोनुने काहीच कल्पना दिली नव्हती. म्हणून जरासा धक्का बसला एवढंच. आणि अहो ह्या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी. तुम्ही चिंता करू नका.”

वातावरण गंभीर झालेलं बघून हर्षित जरा नाटकी आवाज काढून म्हणाला, “काय मग मंडळी, लग्नाची तारीख कुठली काढायची?” दोन क्षण सगळे त्याच्याकडे बघतच राहिले. तो काय म्हणलाय हे लक्षात येताच सोनू आणि प्रीती लाजून पळूनच गेले. सगळे मोठे हास्यात बुडून गेले. वातावरण अगदी हलकं होऊन गेलं.

मग बराच वेळ मोठ्यांची खलबतं चालू होती. साखरपुडा लग्न बाकी कार्यक्रम ह्यांच्या तारखा मुहूर्त बघून पक्क्या केल्या गेल्या.दिवस जात होते, तसतसा खरेदीला रंग चढत होता. दोन्ही घरात बायकांनी जोरदार साफसफाईला सुरवात केली होती. घरांवर रोषणाईच्या माळा आणि दिवे चढले.त्यांच्या ह्या कामामुळे पुरुषमंडळी मात्र वैतागली होती. त्यांचा खरेदीचा उत्साह बघता सोनूच्या आई, आजी आणि प्रीतीची आई ह्या तिघींनी एकत्रच खरेदी करायचं ठरवून टाकलं. सोनू मात्र न कंटाळता खरेदीत सहभागी होत होता.

साखरपुड्याचा दिवस उगवला. मोजकीच माणसं होती दोन्हीकडून. एकमेकांवर खर्चाचा बोजा टाकणं दोन्ही कुटुंबांना रुचणार नव्हतं. आजीआजोबांना जायची यायची दगदग नको, म्हणून सोनूच्या घराजवळच्याच कार्यालयात साखरपुडा होता. सोनू आणि प्रीती दोघांच्याही चेहऱ्यावरचं तेज लपत नव्हतं. लाजऱ्या हास्याने दोघेही अगदी सुंदर दिसत होते.

सगळा साखरपुडा अगदी नजर लागेल असा सुरेख झाला. दोघांनीही साधा पारंपरिक पोशाख घातला होता. लग्न चार महिन्याने होतं. दोघेही एकमेकांसोबत जितका जमेल तितका जास्त वेळ घालवत होते. हे सोनेरी पंख लागलेले दिवस अनुभवत होते. त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने मोठयांच्याही गुलाबी आठवणी जाग्या झाल्या होत्या. दोन्ही घरं चैतन्यांनी भारली होती.

लग्नाचं सगळं ठरवण्यासाठी बैठक बसली होती. दोन्ही घरातली मोठी माणसं जमली होती. प्रीतीच्या इच्छेनुसार तिच्या आजोबांच्या गावी वाड्यामध्ये लग्न करायचं नक्की ठरलं. आजोबांचा भला मोठा वाडा होता. तिथेच रहायचीही सोया होणार होती. सगळी मंडळी पाच सहा दिवस आधी, गावी जाणार होती. लग्नाधीचे कार्यक्रम तीन दिवस आधी सुरू होणार होते. सोनूच्या आईने सगळ्यांची तोंडं गोड केली. बैठक उठणार, इतक्यात सोनूची आई म्हणाली, “थांबा विहिणबाई. माझी एक अट आहे.” सगळे शांत झाले. प्रीतीच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं तयार झालं. सोनूचं कुटुंबही चकित झालं होतं. सोनूची आई नक्की काय मागेल ह्याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. “काय बोलतीयेस तू? कसली अट?” सोनूच्या बाबांनी आईला विचारलं. पण तिने खूण करून त्यांना थांबवलं. “तुम्ही बिनधास्त सांगा काय हवं असेल ते. आम्ही तुमची अट पूर्ण करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करू.” “ही, करायला तर तुम्हाला लागेलच. कारण आमच्यासाठी महत्वाचं आहे ते.”

तेवढ्यात सोनू आणि प्रीती फिरून घरी आले. त्यांनी दारातूनच सगळं बोलणं ऐकलं होतं. प्रितीने सोनुकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती दाटली होती. सोनूलाही काहीच कळेनासं झालं होतं. आपली आई आयत्या वेळी असं काही म्हणेल, ह्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. “आई अग काय बोलतीयेस तू? कसली अट? आणि कशासाठी? सगळं नीट चाललंय ना.” सोनुने काहीसं वैतागून आईल प्रश्न केला. “हे बघ, मी तुमचा विचार करूनच ही अट घातलीये. लग्न फक्त तुमच्या दोघांचं नाहीये. आमच्याशीही प्रीतीचं नातं जोडलं जाणार आहे. आणि म्हणूनच ही बाब अतिशय महत्वाची आहे.” सोनूच्या आईने सोनूला गप्प केलं.

काय अट असेल सोनूच्या आईची?