भाग 9
लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडलं. परत आल्यावर गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, सत्यनारायणाची पूजा ह्यामुळे गडबड चालूच होती. लग्नानंतरचे खेळ खेळले जात होते. नवीन सुनेला भेटण्यासाठी पाहुणे येतच होते. मांडव परतणी साठी दोघे प्रीतीच्या माहेरी दोन दिवस राहून आले. घरचे कार्यक्रम आटोपल्यावर सगळे जण कुलदैवताच्या दर्शनाला गेले. मनापासून दर्शन करून पुढच्या आयुष्यासाठी आशीर्वाद मागितला. सोनू आणि प्रीतीच्या हस्ते कुलदैवतालाअभिषेक केला. दर्शन करून परत आले, तेव्हा सगळेच खूप थकले होते. दोन दिवस सगळ्यांनी विश्रांती घेतली.
सोनू आणि प्रीतीची आवराआवर सुरू होती. दोघेही फिरायला केरळला जाणार होते. त्यामुळे बॅगा भरणं सुरू होतं. आईबाबा दोघांसोबत काहीबाही बांधून करत होते.दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर दोघेही विमानतळावर पोचले. दोघांचेही आईबाबा सोडायला आले होते. दोघांचं विमान आकाशात झेपावलं, तसे ते परत फिरले. दोन तीन तासातच विमान केरळ विमानतळावर उतरलं. दोघे हॉटेलवर पोचले. लगेच दोघांनी झोपून टाकलं. इतक्या दिवसांची दगदग, आजही इतक्या पहाटे उठायला लागलं, त्यामुळे दोघेही प्रचंड दमले होते. एकमेकांच्या कुशीत निर्धास्त होत दोघेही स्वप्नांच्या राज्यात बागडत होते. तो अक्खा दिवस ते हॉटेलवरच घालवणार होते.
एक दिवस विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी पासून ते फिरायला बाहेर पडले. केरळमधील प्रसिद्ध ठिकाणे बघत होते. विविध ठिकाणं बघत ते फिरत होते.एकमेकांसोबत भरपूर फोटो काढले. खरेदी केली. दोघांनी घरच्यांसाठी अनेक भेटवस्तू घेतल्या.दोघांच्या नात्यातले नाजूक कंगोरे अलगद उलगडत होते. प्रीत बहरली होती. दोघांवर प्रेमफुलांचा वर्षाव होत होता.
चार दिवस फिरून दोघे परत आले. आता खऱ्या अर्थाने संसार सुरू झाला. दोघांची सुट्टी संपली. आता दिवसभर सगळा वेळ ऑफिसमध्ये जायला लागला. ऑफिसच्या थकवणाऱ्या दिनचर्येमधून मोठ्या मुश्किलीने एकमेकांसोबतचे क्षण गोळा करावे लागत होते. काम आणि नात्यांचा समतोल साधताना दोघेही थकत होते. दोघांच्याही आयुष्यात नवीन नाती मिळाली होती. तरीही दोघेही मिळेल ती प्रत्येक संधी साधून एकमेकांसोबत, घरच्यांसोबत वेळ घालवत होते. जमेल तेव्हा फिरायला जात होते. एकमेकांना समजून घेत होते. पण हे गुलाबी दिवस संपणार होते. एक वादळ दोघांच्या संसारावर घोंघावत होतं.
गेले दोन चार दिवस सोनू आणि प्रीतीचं काहीतरी बिनसलं होतं. दोघे घरच्यांसमोर सगळं आलबेल असल्याचं भासवत होते. पण घरातल्या अनुभवी नजरांनी दोघांमधला बेबनाव अचूक हेरला होता. काहीतरी बिनसलं होतं हे नक्की. दोघे एकमेकांना टाळत होते. दुर्लक्ष करत होते. फसरसे एकमेकांशी बोलत नव्हते.अडून अडून चौकशीही केली घरच्यांनी, पण नवरा बायकोतल्या भांडणात पडू नये, म्हणून कोणीच फारसं खोलात शिरलं नाही. पहिले भांडण म्हणून दोघांची थोडीफार चेष्टाही केली. पण हे वादळ इतक्यात शमणार नव्हतं. हळूहळू ठिणग्या उडायला लागल्या होत्या. घर्षण होत होतं.
एक दिवस मात्र दोघांचं जोरदार भांडण झालं. सोनूचा चढलेला आवाज सगळ्या घरभर ऐकू येत होता. “काही गरज नाहीये माझ्यासाठी त्याग करायची. कोण लागतो मी तुझा? जा, कुठं जायचंय तिकडे जा. पण मी येणार नाही तुझ्यासोबत. लक्षात ठेव.” सोनूचं बोलणं ऐकून घरच्यांना धक्काच बसला. नक्की कशावरून भांडण झालंय हे समजायला मार्ग नव्हता. पण काही विचार करणार, इतक्यात प्रीती भरलेली बॅग घेऊन बाहेर आली. रडून रडून तिची डोळे लालबुंद झाले होते. हॉलमध्ये सगळे आहेत, हे बघून ती जागीच थबकली. सोनुने धाडकन खोलीचा दरवाजा लावून घेतला. ते बघून ती बॅग घेऊन घराबाहेर पडली. घरच्यांनी तिला अडवायचा खूप प्रयत्न केला. पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. मग सगळे सोनूच्या खोलीबाहेर आले. पण बराचवेळ दार वाजवूनही सोनुने दार उघडलं नाही. सगळे आता चिंताक्रांत झाले होते. काय करावं हे कोणालाच कळत नव्हतं. प्रितीला असं बॅग घेऊन रडत रडत घरी आलेले बघून तिचे आईबाबही काळजीत पडले. दोनतीन दिवस असेच गेले. ताण कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. दोघेही आईबाबानं काहीच सांगत नव्हते.
नक्की काय झालं असेल दोघांच्यात? कुठल्या वळणावर उभं होतं दोघांचं नात?..
क्रमशः