भाग 10 अंतिम
दोन दिवस दोघांच्याही घरी तणावतच गेले. दोघेही एकमेकांशी बोलायला तयार नव्हते. हळूहळू दोघांचा राग जरा शांत झाला. मग दोघांच्या घरच्यांनीच प्रीतीच्या घरी भेटायचं ठरवलं. सोनूला घेऊन सगळे प्रीतीकडे गेले. प्रीतीनेच दार उघडलं. सोनूला बघून न बघितल्यासारखं करत ती घरच्यांना घेऊन आतमध्ये गेली. सोनूच्या बोलण्याने दुखावली गेली होती ती. चहापाणी झालं, तरी दोघेही काहीही बोलायला तयार नव्हते.
दोघांना घरच्यांनी मग आपल्यापाशी बसवून घेतलं. “तुमचं भांडण तुम्ही सोडवत नाहियात. आम्हालाही सांगत नाहियात नक्की काय झालंय ते!” सोनूच्या आजोबांनी सोनू आणि प्रितीला विचारलं. “विचारा की हिलाच. बंगलोरला जायचंय तिला. बढती मिळतीये ना!” सोनू जरा रागातच म्हणाला. नकळत त्याचा आवाज चढला होता. ते बघून प्रीतीच्या डोळ्यात पाणी आलं.“आजोबा अहो दोनच वर्षांचा प्रश्न आहे. ते मला तिथली प्रमुख बनवणार आहेत. खूप छान संधी आहे माझ्यासाठी. आणि मलाही तुम्हाला सगळ्यांना सोडून नाही राहायचंय. पण दोनच वर्ष लांब राहायचंय, त्यानंतर इथेच प्रमुख मॅनेजर म्हणून मी येऊ शकणार आहे. पण हा ऐकतच नाहीये. मला म्हणाला तुला कुठे जायचे तिकडे जा!” प्रीतीनेही तिची बाजू मांडली.
घरच्यांनी मग बराच वेळ दोघांची समजूत घातली. दोघांनाही एकमेकांचा विचार करा, दोनच वर्ष आहे जाऊन या, तुम्हालाही एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळेल, असं बरच काही समजावलं. प्रितीला घेऊन घरी आले. दोनतीन दिवसांनी प्रीतीने आणि सोनुने बंगलोरची ऑफर स्वीकारल्याचे सांगितलं. सोनू जरा नाखुषीनेच तयार झाला होता. कॉलेजची वर्षं बाहेर राहिल्यामुळे आता पुन्हा घरच्यांपासून लांब राहायला लागणार म्हणून तो नाराज होता. पण प्रितीसाठी तो तयार झाला होता.
त्या दोघांना राहायला कम्पनीतर्फे फ्लॅट मिळाला होता. सामानाची बांधाबांध सुरू झाली. बरोबर नेण्याच्या वस्तू, संसाराचं सामान, सगळं जमवताना नाकीनऊ आले होते. मोठे दोघांनाही संसाराच्या महत्वाच्या गोष्टी समजावत होते. एकमेकांपासून 2 वर्ष दूर राहायचं म्हणून सगळेच हळवे झाले होते. दोघे ज्या दिवशी निघणार होते, त्याच्या आदल्या दिवशीची रात्र सगळ्यांनी गप्पा मारत जागवली. एकत्र जितकं जास्त रहाता येईल तितकं रहाण्याचा सगळ्यांचा प्रयत्न होता.
दोघे सगळं सामान घेऊन निघाले, तेव्हा सगळ्यांनी मोठ्या मुश्किलीने अश्रू रोखले होते. आजीआजोबा तर विशेष हळवे झाले होते. ह्या वयात नातू आणि नातसुनेपासून दोन वर्षे लांब रहायचं हे दोघांनाही अवघड वाटत होतं. पुढचे दोनतीन दिवस सगळे उदासच होते. त्या दोघांनाही तिथे करमत नव्हतं. रोजच ऑफिस सुरू झालं,ते तिथे स्थिरस्थावर झाले तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. दोघे घरातून गेल्यापासून घरातली गडबड, घाई सगळं गेलं होतं. पण दोघेही वेळात वेळ काढून घरी फोन करायचे. मोठी सुट्टी मिळाली की घरी यायचे. दोन वर्षे संपत आली होती.
आज घरातले सगळे पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर बाहेर अस्वस्थपणे उभे होते. येरझाऱ्या घालत होते. सगळ्यांना सोनूच्या वेळचा प्रसंग आठवून अंगावर काटा येत होता. पण ह्या वेळी वेगळीच चिंता होती. सोनू आणि प्रीती ऑपरेशन थिएटरमध्ये गेले होते. दोन तास होत आले होते. सगळ्यांनाच आठ महिन्यापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. एक दिवशी सकाळी अचानक सोनू आणि प्रीती बंगलोरहून परत आले होते.
“काय रे असे अचानक घरी आलात? संगीतलेही नाहीत येताय म्हणून. सगळं ठीक आहे ना?” सोनूच्या आईने काळजीने विचारलं. “सगळं सांगतो आई. आधी सगळ्यांना येउदेत. तू बस इथे.” सोनुने आईला बसवलं. घरचे सगळे आले, तस त्याने बोलायला सुरुवात केली. “गेले काही दिवस प्रीती आजारी होती. पोटात काहीच रहात नव्हतं. अशक्तपणा आला होता. चक्कर येत होती. तुम्हला काळजी वाटू नये म्हणून फोनवर काही सांगितलं नाही. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने काही टेस्ट केल्या होत्या. त्याचे रिपोर्ट्स आज मिळा लेत. म्हणूनच आम्ही घरी आलोय.” “काय झालंय प्रितीला? गँभिर नाहीये ना काही?” आईने प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. पण सोनू काहीच बोलत नव्हता.
अचानक दरवाजा उघडला.ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडल्यामुळे सगळ्यांच्याच विचारांची तंद्री तुटली. सोनू बाहेर आला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. “आई, बाबा, मुलगी झाली. तुम्हाला नात झाली. मी बाबा झालो.” सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रुंनी दाटी केली होती. बाळ आणि प्रीती दोघेही तंदुरुस्त होते. सोनूचा कॉलेजपासून सुरू झालेला प्रवास आज एका गोड जबाबदारीने अधिकच गोड झाला होता. त्याच्या भरल्या कुटुंबात दुधावरची दाट साय आली होती. साठउत्तरी कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
समाप्त...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा